वेडींग ड्रेस - 9

व्हिक्टोरिया ने तेरेसा चे पत्र वाचले. तिच्याकडे एक लहानशी लाकडी पेटी होती. त्यात तिने आजवर तिला जपून ठेवावीशी वाटतात अशी पत्रं ठेवलेली होती. तेरेसाचे पत्र ठेऊन देण्यासाठी ती पेटी तिने बाहेर काढली . पेटी उघडताच सगळ्यात वर ठेवलेले हेन्री ने मरण्याच्या आधी तिला लिहिलेल्या पत्राचे पाकीट ठेवलेले होते. हेन्री ची शेवटची आठवण! तिने ते सहज उलटून पालटून पाहीले. उघडून पत्र बाहेर काढले, पुन्हा वाचले. पाकिटात खाली असलेली जांभळी फुलं तशीच होती, फक्त सुकून करडी पडलेली, हात लावला की चुरा होणारी. तिने पत्राचा कागद पुन्हा नीट घडी घालून पाकिटात ठेवला. ठेवताना पाकिटाच्या फ्लॅपच्या आतल्या बाजूला तिला काहीतरी जाणवलं. त्यावर तिने मागे पुढे बोट फिरवून पाहीलं तर वाळलेल्या ग्लू सारखं ते वाटत होतं. पाकीट आपल्याआधी कोणीतरी फोडलं होतं का? पण ते साहजिक होतं. पाकिटावर बाहेरून सरकारी स्टॅम्प होता आणि ते कोणासाठी आहे हेही बाहेर लिहिलं नव्हतं. डेझी काल म्हणाली तसं कदाचित मिस्टर लिटल नी ऑफिसच्या संबंधात आहे असं समजून ते पाहिलं असावं. तिला अचानक जाणीव झाली, हेन्री च्या अंत्यसंस्कारानंतर आपण तिथे परत गेलोच नाहीये. आज एकदा जायलाच हवं असं तिला वाटलं. त्याबरोबर ती निघाली. यावेळी तिने कार्व्हरला बरोबर न घेता, चालत जाण्याचे ठरवले. व्हिक्टोरिया चं घर गावाबाहेर होतं आणि नदीकाठही. घरापासून चालत जाऊन अर्ध्या ते पाऊण तासांचं अंतर होतं. पावसाच्या भुरभुरीने थोडी उसंत घेतली असली तरी त्याचा काही भरवसा नसल्याने तिने यावेळी छत्री न घेता काळा ओव्हरकोट चढवला, पावसाळी बूट घातले आणि बाहेर पडली. घरापासून दुतर्फा झाडे असलेला रस्ता पार करून ती मुख्य रस्त्याला लागली. गावाबाहेरच्या रस्ता असल्याने क्वचितच एखादे दारात लहानशी बाग असलेले छोटेसे घर दिसतहोते. रस्ता काहीसा खाचखळगे असलेला असल्याने अंदाज चुकला की पाय पडून खळग्यातले पाणी थपकन अंगावर उडत असे. बाहेरची मोकळी हवा लागल्याने तिला ताजेतवाने वाटत होते. आजूबाजूला जनावरांना घेऊन जाणारी माणसं, डोक्याला रुमाल बांधून , मळकट गाऊन घातलेल्या शेतात काम करणाऱ्या स्त्रिया, एखाद्या कुरणात गायींची दूध काढणारी माणसं अशा सगळ्या भवतालाचे निरीक्षण करत करत ती नदीकाठाकडे जाणाऱ्या फाट्यापर्यंत कधी पोहोचली तिलाही कळले नाही. पण त्या रस्त्याला लागताच तिचा मूड अखेर बदललाच. हृदयाची धडधड वाढली, घाम फुटल्यासारखा झाला. तिथूनच मागे वळावे असाही विचार तिच्या मनात आला. पण नाही, आज काही झाले तरी हेन्री ला भेटल्याशिवाय ती परत फिरणार नव्हती. आता तिला हेन्रीला पुरले त्या जागेचा उंचवटा आणि त्यावर खोवलेला क्रॉस दिसू लागला. तिकडे जाण्याआधी तिने काही जांभळी रानटी फुलं तोडली. हेन्री च्या थडग्याजवळ पोहोतचताच गुडघे टेकून बसली. काय विरोधाभास होता! तिच्या आयुष्यातले सर्वात आनंदाचे क्षण सर्वात प्रिय व्यक्तीबरोबर जिथे तिने घालवले तीच जागा तिच्या दुःखाचे अस्तित्व होऊन राहीली होती. तिने मनातल्या मनात हेन्री साठी प्रार्थना केली, जवळची फुले वाहिली आणि उठून जाण्यास निघाली. थोड्याश्याच अंतरावर दिसणाऱ्या त्या अभद्र पुलाकडे तिची नजर जाताच तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तिला आता तिकडे थांबवेना. मागे फिरून पटापट पाय टाकत ती परतीच्या रस्त्याला लागली. गर्द झाडीतून येणारे अदृश्य पक्ष्यांचे आवाज आणि डबक्याच्या साठलेल्या पाण्यात पडणाऱ्या पुन्हा सुरू झालेल्या पावसाच्या थेंबांची टिपटीप यांच्या सोबतीला असलेली कानठळ्या बसवणारी त्या एकांताची शांतता तिला जीवघेणी वाटली. पण त्या रात्री तिला बऱ्याच दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागली.

...
हेन्री ला जाऊन आता दोन महिना उलटले होता. एका सकाळी नेहमीच्या वेळेत अँजेला तिचा ब्रेकफास्ट घेऊन खोलीत आली. तिची आधीची मेड डेझी गेल्या चार दिवसांपासून तब्येत बरी नसल्याच्या कारणाने रजेवर होती. अँजेला येताच व्हिक्टोरियाने तिला विचारले.
"डेझी बद्दल काही कळलं का तुला? कशी आहे आता ती?"
"नो मॅडम, तिला अस्थमा आहे एवढंच मला माहित आहे. तो तिला आधीपासूनच होता. नवरा एकटाच थोडंफार कमवणारा त्यात घरात चार मुलं, कमावण्यापेक्षा खाणारी तोंडं जास्त , पुअर सोल"
अँजेलाकडून नेहमीच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा जास्त माहीती मिळे. डेझी चं तसं नव्हतं. कामाशी काम, जेवढं विचारलं तेवढंच उत्तर. गेल्या पाच वर्षात तिने चुकूनच कधीतरी तिच्या फॅमिलिबद्दल सांगितलं असेल, तेही चौकशी केल्यावर. तिचा नवरा कदाचित तिच्यासारखाच सभ्य, प्रामाणिक, प्रेमळ असावा. तिचे त्याच्यावर प्रेम असावे. त्याच्याबद्दल चुकून कधी विषय निघालाच तर तिच्या डोळ्यात चमक येत असे. याउलट अँजेला. तशी ही डेझी पेक्षा बरीच तरुण होती. व्हिक्टोरिया सारखीच कदाचित 19, 20 वयाची. आकर्षक दिसणारी. इथली बरीच मुलं तिच्यात इंटेरेस्टेड असले पाहीजेत. त्यापैकीच एकाने हिला ती घालून मिरवते ते हिल्स दिले असले पाहीजेत. वर बडबडी , गरजेव्यतिरिक्त चार गोष्टींबद्दल जास्तीची माहिती ठेवणारी. गॉसिप गर्ल .. हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ? व्हिक्टोरियाने स्वतःशी स्माईल केलं. अँजेला च्या बोलण्याने व्हिक्टोरिया विचारातून बाहेर
" मॅडम, पण मला नाही वाटत डेझी खूप आजारी वगैरे असेल. तिला इथे काम करायचं नसावं कदाचित" अँजेला कपबशी व्हिक्टोरिया कडे देत म्हणाली. "
" हे तुला कसं कळलं आता" व्हिक्टोरियाने कुतूहलाने विचारलं.
" असंच कुठूनतरी. आपल्या गावात रुमर्स ला कमी नाही"
" येस रुमर्स. त्यामुळे त्या आपल्याकडून अजून पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी" तिच्या बोलण्याने जसा काही अँजेलामध्ये बदल होणार होता.
"सॉरी मॅडम. मी लक्षात ठेवेन" अँजेला ओशाळल्यागत म्हणाली.
अँजेला निघून गेली तशी व्हिक्टोरिया तिच्या सो कॉल्ड रुमर वर विचार करू लागली. डेझीची विचारपूस करायला आपल्याला तसही गेलंच पाहीजे, तिला काही पैशांची मदत करता आली तर तेही बघुयात. असा विचार करून ती तयार होऊन डेझीकडे जाण्यास निघाली. कार्व्हर च्या कॅरीज मध्ये बसून डेझी राहते त्या वस्तीत आली. इथे आजवर तिने कधीही पाय ठेवला नव्हता. एक दोन ठिकाणी कार्व्हर ने विचारपूस् करत तिचे घर शोधून काढले. व्हिक्टोरीयाने बंद दारावर नॉक केले. काही सेकंदातच आतून दार उघडण्याचा आवाज आला. ती डेझीच होती. व्हिक्टोरियाला असं अचानक आपल्या दारात पाहून ती चमकली.
"सॉरी , आय मस्ट हॅव स्टार्टल्ड यु. "
" मॅडम तुम्ही? तुम्ही इथे काय करत आहात? " डेझी एकटक पहात म्हणाली.
" तू आजारी आहेस असं कळलं, म्हणून बघायला आले"
आपण व्हिक्टोरियाला अजून दारातच ठेवले आहे हे डेझिच्या लक्षात आले.
"आय अम एक्स्ट्रीम्ली सॉरी मॅडम. प्लिज कम इन, हॅव अ सीट"
डेझीचे घर म्हणजे दोन लहानश्या खोल्यात गरजेपुरत्या थोडयाशाच वस्तूंनी थाटलेला संसार होता. हॉल मध्ये एक कोपऱ्यात काहीशा जुनाट, काही मोडक्या लाकडी खेळण्या पडलेल्या होत्या. एका बाजूला जुनी पॉलिश नसलेली बॅसिनेट होती. त्यात एक गोंडस बाळ शांत झोपलेलं होतं. व्हिक्टोरिया तिकडे पाहत आहे हे बघून डेझी म्हणाली " माय यंगेस्ट डेव्हील, पहील्या तीन मुलांनंतर ही पहिलीच मुलगी. मला वाटलं हीला तरी आमची काळजी असेल , बट नो लक"
व्हिक्टोरिया ला हसू आले . डेझी तिच्या घरात असताना केवढी मोकळी वाटतेय! तरीही आजारी असल्यामुळे असेल कदाचित, थोडीशी सुकल्यासारखी वाटत होती. डोळ्यांखाली काळ्या वर्तुळाचे अस्तित्व जाणवत होते.
" कशी आहेस तू डेझी? मला कळलं तुला बरं नाहीये"
" मी ठीक आहे. अस्थमा अधूनमधून डोकं वर काढतो. मी खूपदा दुर्लक्ष करते पण यावेळी पूर्ण बरं वाटत नाही तोवर नवऱ्याने घराबाहेर पडायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे" डेझी म्लान हसत म्हणाली.
" तू हवी तेवढी रेस्ट घे. तुझा पगार कट होणार नाही याची काळजी मी घेते. जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा जॉईन हो"
डेझी यावर काहीच बोलली नाही.
"मॅडम तुम्ही काय घेणार ? चहा चालेल?"
" चालेल"
डेझीच्या छोटयाशा घरात व्हिक्टोरिया ला प्रसन्न वाटत होतं. ती किंवा तिचा नवरा किंवा दोघेही बरेच धार्मिक असावेत. घरात आत येताच दिसेल आशा ठिकाणी येशूला सुळावर चढवलेली मूर्ती भिंतीवर टांगलेली होती. त्याच्या पुढे एका लोखंडी अँगल वर बसवलेल्या लाकडी फळीवर साधासा पण चकचकीत कँडल स्टँड आणि त्यात बसवलेल्या पांढऱ्या कँडल होत्या. तिथेच शेजारी एका खुंटीला मध्यभागी क्रॉस असलेली माळ अडकवली होती. मूर्तीसमोरच कँडल स्टँड जवळ बायबल ची छोटीशी प्रत ठेवली होती. आपण शेवटचं कधी बायबल वाचलं होतं याचा ती विचार करू लागली. तेवढ्यात डेझी कपबशी घेऊन आली.
" डेझी, हे काही पैसे तुझ्याकडे राहूदे. उपचारासाठी कामाला येतील"
" नाही मॅडम, मी हे नाही घेऊ शकत" आत्तापर्यंत शांत वाटणारी डेझी एकदम अंगावर पाल पडल्यासारखी चमकली.
" डोन्ट वरी. हे काही फार जास्त नाहीत आणि मला परत नको आहेत."
" तसं नाही मॅडम पण मला खरंच तशी गरज नाही"
" डेझी, तुला हवं असेल तर तुझ्या पगारातुन ऍडव्हान्स देतेय असं समज"
डेझी एकदम गप्प झाली.
"काय झालं डेझी ?"
" मॅडम" पुन्हा गप्प
" बोल डेझी , काही प्रॉब्लम आहे का? तुला म्हणलंच आहे मी, तू हवी तेवढी सुट्टी घेऊ शकते"
" मॅडम, मी कदाचित पुन्हा जॉईन होणार नाही"
अँजेलाची रुमर खरी आहे तर.
"का? काय झालं? असं अचानक का ठरवलंस्?"
" बस ठरवलं. मला तिकडे काम करायचं नाही" डेझी खाली मान घालत चाचरत म्हणाली.
" हा तुझा पर्सनल प्रश्न आहे डेझी पण तू हे का ठरवलं हे मला माहिती म्हणून तरी कळायला हवं. तुझा नवरा ?"
" हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आहे. त्यालाही मी तिकडे काम केलेलं नकोय"
व्हिक्टोरिया चा धीर संपला. खुर्चीतून उभा राहून तिने डेझीचे दंड दोन्ही हातांनी धरले.
"डेझी , प्लिज . खरं काय आहे ते सांग. तुझ्याशी कोणी तिथे मिसबीहेव्ह केलं का? तसं असेल तर मी डॅडना सांगून..डेझिने डोळे मिटले आणि एकदम म्हणाली
"हो तुमचे डॅडच, ही इज अ मॉन्स्टर, ही इज सिनर"
व्हिक्टोरिया चमकली.
" डॅड? काय बोलतेयस तुझं तुला तरी कळतंय का"
"हो मिस्टर विल्यम्स. त्यांनीच त्या इनोसंट मुलाला मारून टाकलं. तुमचा फियोन्से. हेन्री. अशा माणसाशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचे नाहीयेत, हे पाप आहे" डेझी व्हिक्टोरिया च्या नजरेला नजर देत म्हणाली.
व्हिक्टोरिया ला संताप आला.
" डेझी, तू आज तुझी लिमिट क्रॉस केलीस. मी तुला काय समजत होते आणि तू.."
" मॅडम मला माफ करा. पण यातला शब्द न शब्द खरा आहे. तुम्ही खूप चांगल्या आहात मॅडम आणि तुमचे वडील तेवढेच..."
"या सगळ्याचं काय प्रूफ आहे तुझ्याकडे डेझी?" व्हिक्टोरिया चिडून म्हणाली.
" माझा नवरा बेन डिटेक्टिव्ह ऑफिस मध्ये त्याच्या मित्राला सोडवायला गेला होता. त्याने दारू पिऊन त्याच्या कामाच्या ठिकाणी गोंधळ केला म्हणून त्याला जेल मध्ये त ठेवलं होतं. त्याने हे प्रकार खुपवेळेस केले आहेत म्हणून यावेळी ते त्याला सोडयला अजिबात तयार नव्हते. त्यांनी माझ्या नवऱ्याला ही बाहेर हाकलून दिलं. त्याने त्यांच्यापुढे खूप विनंती केली, पण दंडाची रक्कम मिळाल्याशिवाय ते त्याला सोडेचनात. मध्यरात्र झाली होती. शेवटी बेन घरी आला. आमच्या जवळ आम्ही काही पैसे साठवले होते त्यातले पैसे घेतले, मी नाही म्हणत असताना ही. पण तो पुन्हा गेलाच. तिथे पोहोचला तर स्टेशन मध्ये एका असिस्टंट शिवाय तिथे कोणीही नव्हते. त्याला ऑफिस च्या मागे बोलण्याचे काही आवाज आले. तिकडे जाऊन पाहतो तर ऑफिसपासून थोड्याशा अंतरावर दोन डिटेक्टिव्हस् खुर्च्यांवर बसून ड्रिंक करत होते. बेन थोडासा जवळ गेला तर त्याला तुमचे नाव ऐकल्यासारखे वाटले. कुतूहलाने तो एका झाडाआड उभं राहून ऐकू लागला. हेन्री हे नाव आता गावात जवळपास सगळ्यांना ठाऊक आहेच. पुढे बेन ने जे ऐकले त्याप्रमाणे हेन्रीला चार दिवस बाहेरगावी पाठवले गेले होते ते कामासाठी नसून त्याला तिथे मिस्टर विल्यम्स ने सांगितल्याप्रमाणे व्हिक्टोरियाशी ठरलेले लग्न मोडून, गाव सोडून कायमचा निघून जाण्यासाठी टॉर्चर केले गेले. तो काही केल्या ऐकेना. शेवटी त्याच्या आईला मारण्याची धमकी दिली तेव्हा त्याने मान्य केले. तरीही शेवटी त्याच्या आईचा खून केला गेला आणि त्यालाही संपवून टाकण्यात आले. तो पाण्यात पडला नव्हता, त्याला मारून तिथे टाकण्यात आले होते. इट वज अ मर्डर!
" हे सगळं खोटं आहे, माझे डॅड माझ्याशी असे कधीच वागू शकत नाहीत." व्हिक्टोरीया ओरडत म्हणाली. तिच्या आवाजाने बाळ जागे होऊन कुरकुरायला लागले.
"बेन ने जे काही ऐकले त्यावर त्याचा आणि माझा पूर्ण विश्वास आहे. मॅडम मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते. तुम्ही माझ्यासाठी इथे आलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे . माझी नोकरी सोडून, तुम्हाला खोटं सांगून मला काय मिळणार आहे? माझी फक्त तुम्हाला एक विनंती आहे. बेन ने कोणालाही ही गोष्ट कळू देऊ नको असे प्रॉमिस माझ्याकडून घेतले होते. काहीही झालं तरी आमच्यासारख्या गरीब माणसांचं यात नाव येऊ देऊ नका. आम्ही कायमचे उध्वस्त होऊ"
व्हिक्टोरिया च्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती वेड लागल्यासारखे डेझी कडे नुसतीच पहात राहीली.
"मॅडम प्लिज.. आय बेग यु" डेझी रडकुंडीला येत म्हणाली.
काहीही न बोलता व्हिक्टोरिया तडक त्या घरातून बाहेर पडली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle