वेडींग ड्रेस - 8

जमिनीवर आपले पाय मरगळल्या सारखे पडताहेत, कोणीतरी आपल्याला धरून चालवत नेत आहे असं काहीसं ग्लानीत असलेल्या व्हिक्टोरियाला जाणवत होतं. कोणीतरी आपल्याला गाडीत बसवत आहे असं वाटत असताना ती घाबरून थोडीशी भानावर आली. तिच्या अंगावर घातलेल्या कोटाने तिला थोडीशी उब वाटत होती. तो माणूस तिचे डॅड आहेत हे पाहून तिला धीर आला.
"डॅड, तुम्ही कधी आलात? त्या नदीत कोणीतरी वाहून.. त्याचा चेहरा"
" विकी शांत हो बाळा, सावकाश बोलू आपण सगळं" विल्यम्स ने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले.
"मी खूप घाबरलो होतो बेटा. संध्याकाळ उलटून गेली तरी तू घरी नाहीस असं मला कार्व्हर ने फोन करून कळवलं. तो म्हणाला की तूच त्याला सांगितलंस की येताना तू स्वतः येशील म्हणून , हे खरं आहे?"
" हो डॅड. कारण मी हेन्री ला .. डॅड मी नदीत वाहून जाताना काहीतरी बघितलं"
" विकी, that's enough. तू बेशुद्ध होऊन पडली होती पावसात कितीतरी वेळ. जरा आराम कर , आपण नंतर बोलू"
"ठीक आहे , पण तुम्ही हेन्री ची चौकशी कराल असं प्रॉमिस करा"
"ओके मी करतो"
व्हिक्टोरिया विल्यम्स च्या खांद्यावर डोके ठेऊन डोळे मिटून बसली. थंडीने ती पूर्ण काकडली होती. तिच्या डोळ्यामोरुन तो अंधुकपणे दिसलेला चेहरा जात नव्हता. नदीकाठचा अंधार, तिथलं वातावरण सगळ्याचा तिने धसका घेतला होता. मनात नको नको ते विचार येत होते. ती घरी कधी गेली, कपडे कधी बदलले आणि बेडवर जाऊन कधी झोपली हे अर्ध्या जागेपणी, अर्ध्या ग्लानीतल्या अवस्थेत तिलाच कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी तिला बरीच उशिराने जाग आली. झोपेत वेगवेगळी, विचित्र स्वप्न पडत होती. उशिरा उठली खरी पण झोप शांत लागली नसल्याने सकाळी उठल्यावर तिचे डोके जड झाले होते. झोपेतून उठल्याबरोबर कालची सगळी घटना तिच्या डोळ्यांसमोरून विजेसारखी चमकून गेली. तिला राहवेना. ती लगेचच तिच्या वडिलांना शोधत खाली आली. विल्यम्स च्या स्टडी हॉल मध्ये कुठल्याशा मिटिंग्ज मध्ये सगळे व्यस्त दिसत होते. मधल्या मोठ्या टेबलावर भलामोठा मॅप पसरवून विल्यम्स सगळ्यांना काहीतरी सांगत होता. कशाचाही विचार न करता ती तडक आत गेली.
" डॅड, काल तुम्ही प्रॉमिस केलं होतं"
स्टडी मधलं शांत गंभीर वातावरण तिच्या अचानक आलेल्या आवाजाने ढवळून निघालं. विल्यम्ससकट सगळ्यांनी चमकून तिच्याकडे पाहीलं. नुकतेच झोपेतून उठल्यामुळे विकटलेले केस्, झोपताना घालायचे काहीसे चुरगळलेले कपडे अशा वेशात ती सगळ्यांसमोर आल्यामुळे विल्यम्स ला संताप आला. पण मुलीची मनस्थिती पाहता चिडून उपयोग नव्हता म्हणून त्याने स्वतःला सावरले.

" व्हिक्टोरिया, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन थांब. मी लगेचच येतो"
" नाही डॅड, मला आता जाणून घ्यायचं आहे, हेन्री बद्दल तुम्ही चौकशी केली का" व्हिक्टोरिया चा एकंदर आवेश बघून
विल्यम्सला मिटिंग सोडल्याशिवाय पर्याय नव्हता.
" एस्क्यूज मी जंटलमेन, आय विल बी राईट बॅक " म्हणत तो व्हिक्टोरिया चा दंड धरत तिला हॉल बाहेर घेऊन गेला आणि तिला स्वतःच्या खोलीत नेले.

" मला हे अजिबात आवडलं व्हिक्टोरिया. मॅनर्स कुठे गेले तुझे? "
" डॅड, तुम्ही हेन्री ची चौकशी केलीत का?" व्हिक्टोरिया शांत पण ठाम आवाजात विल्यम्स च्या डोळ्यात डोळे रुतवून म्हणाली.
विल्यम्स चा आवेश ओसरला.
" बस बेटा तू आधी खाली"
दोघेही विल्यम्स च्या रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर बसले.
" मला सांग, तू काल हेन्री ला भेटीला नदीकाठी जाणार आहेस हे मला का सांगितलं नव्हतं?"
" आम्ही तिथे नेहमीच भेटतो डॅड, काय झालंय , मला खूप भीती वाटतेय आता, सांगा प्लिज"
" विकी, हेन्री काल नदीत पडून गेला. काल रात्री मला हे कळलं पण तूझी अवस्था.. तू वाहून जाताना पाहीलं तो.."
ते एकेक शब्द व्हिक्टोरियाच्या कानांच्या पडद्याला काट्यांसारखे टोचले, नदीत वाहून जाणारी आकृती डोळ्यासमोर आली. पण तिला त्या कशावरच विश्वास बसेना.
" काय बोलताहात तुम्ही डॅड, असा कसा मरु शकतो तो? पाण्यात पडून? त्याला पोहता येतं डॅड.. आणि म्हणजे तो तिथे आला होता मग मला का भेटला नाही?? "
" त्याची बॉडी सापडली तेव्हा त्याच्या डोक्यावर मार बसल्याचा खुणा होत्या. तू येण्याआधीच तो तिथे आला असावा. प्रवाहात पडल्यावर नदीतल्या खडकामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असावा असं डिटेक्टिव्ह सांगत होते. कदाचित त्यामुळे तो. . नंतर पावसाने ही जोर धरला होता. वाहत जाऊन कुठल्याशा जाळ्यात अडकून बसलेली ती बॉडी तिथे जवळ राहणाऱ्या माणसाला दिसली आणि त्यानेच डिटेक्टिव्ह ऑफिस ला कळवले" विल्यम्स एकेक वाक्य जमेल तेवढ्या सावकाशपणे उच्चारत म्हणाला.
व्हिक्टोरिया ला बसल्या जागी घेरी आली.
" त्याची बॉडी? कुठेय आता ती ? "
" त्याच्या शेजाऱ्याने त्याच्या घराच्या आवारात ठेवली आहे . त्याची आई येईपर्यंत. मला कळल्याबरोबर मी स्वतः काही तिथे गेलो , त्याच्या आईचे सांत्वन करायला. पण शेजारच्या लोकांकडून कळलं की ती काल सकाळीच कुठेतरी गावाला गेली आहे. मी तिथे थोडावेळ थांबलो पण मला आजच्या मीटिंगसाठी अर्जंटली परत यावं लागलं" सांगताना विल्यम च्या चेहरा पडला होता.
तेरेसा ने हेन्री आणि व्हिक्टोरिया चे लग्न ठरल्यापासून विल्यम्स च्या घरचे काम सोडले होते. हेन्री नोकरी करायला लागल्यापासून केवळ वेळ जावा म्हणून जवळच्या शेतात ती अधूनमधून कामावर जात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिची आणि व्हिक्टोरिया ची भेट नव्हती. व्हिक्टोरियाच्या मनात भीती, दुःख, राग सगळ्या भावना एकवटल्या.
" नो डॅड, नो " म्हणत तिने विल्यम्स च्या अंगावर स्वतः ला ढकलून दिले. विल्यम्स पुढचा अर्धा तास काही न बोलता तिला थोपटत राहीला. त्याने ने मिटिंग पोस्टपोन केली. दोघेही हेन्री च्या घराकडं निघाले. संपूर्ण प्रवासात व्हिक्टोरिया प्रेतवत बसून राहीली. एवढया छोटयाशा कालावधीत तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती. हेन्रीच्या घराच्या आवारात पोहोचल्यावर बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत ते आत गेले. हेन्री च्या आईचा अजूनही पत्ता नव्हता. व्हिक्टोरिया ने हेन्री च्या बॉडी वरचे पांढरे पांघरून काढले. पाण्यात पडल्याने आणि खूप वेळ उलटून गेल्याने शरीर फुगलेले होते, चेहरा विद्रुप दिसत होतं. तो हेन्रीच आहे यावर तिचा विश्वास बसेना. व्हिक्टोरिया चा बांध पुन्हा फुटला.
शेवटी सगळ्यांच्या मते अजून फार उशीर न करता हेन्रीवर अंत्यसंस्कार करून घेण्याचे ठरले. नदीकाठाजवळच त्याला पुरण्यात आले. थरथरत्या हाताने व्हिक्टोरियाने त्याच्यावर शेवटची मूठभर माती टाकली.

पुढचे जवळपास पंधरा दिवस असेच गेले. आधीचे काही दिवस रडून रडून व्हिक्टोरियाचा चेहरा, डोळे कायम सुजलेले असत. तिचे कशातच लक्ष नसे. एवढ्या दिवसांत स्वतःच्या रूम च्या बाहेर ती क्वचितच आली होती.
एका सकाळी डेझी तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेली.
डेझीला पाहून ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली.
"डेझी?" एवढ्या दिवसांत पहिल्यांदा व्हिक्टोरिया स्वतःहून काहीतरी बोलली होती.
" त्या दिवशी तू मला हेन्री चं पत्र दिलं होतं ते तुझ्याकडे कोणी दिलं होतं ?"
" मिस्टर लिटल, मॅडम"
"ओके.. थँक यु. तू जाऊ शकतेस"
" अम् मॅडम , तुमचा वेडींग ड्रेस.. " डेझी पापण्यांची उघडझाप करत खाली पाहत म्हणाली.
व्हिक्टोरिया ला एकदम आठवले. ज्या दिवशी हेन्रीला भेटायला ती गेली त्याच दिवशी तो मिळणार होता. पण नंतर दुर्दैवाने ज्यासाठी तो खास बनवून घेतला ते आता कधीच होणार नव्हतं.
" मला तो आणून दे"
फक्त मानेनेच होकार देत डेझी निघून गेली. पाचच मिनिटात हातात एक सुंदर कोरीव काम असलेली लाकडी पेटी घेउन आली आणि व्हिक्टोरिया च्या हातात देऊन पुन्हा निघून गेली. व्हिक्टोरिया ने एकदा पेटीवरून हात फिरवला पण न उघडता च तो तिच्या कपाटात ठेऊन दिला. आता ती दुःखातून हळुहळु सावरू लागली होती. डोळ्यातले पाणी आटले होते. एका क्षणी एकदम तिला हेन्रीच्या आईची आठवण झाली. त्या परत आल्यानंतर त्यांच्या एकुलत्या एक तरुण मुलाचा एवढा वाईट अंत झालेला झालेला ऐकून त्यांना काय वाटले असेल? त्यांना त्याच्या मृत शरीराला देखील पाहता आले नाही. त्या कशा असतील? कदाचित डॅड ना माहीत असेल. पण नको कोणालाही विचारण्याच्या भानगडीत न पडता आता थेट हेन्री च्या घरी जाऊया. असा विचार करत तिने ब्रेकफास्ट न करता पटकन कपडे बदलले आणि कार्व्हर ला बोलावून घेतले. कार्व्हर ने कॅरीज तयार केली आणि दोघे हेन्री च्या घरी निघाले. रस्त्यात तिला नदीकाठाकडे जाणारा रस्ता दिसला. तिकडे चटकन दुसरीकडे तोंड वळवले. काही मिनिटांच्या प्रवासानंतर ते घरापाशी पोहोचले. पण त्या दिवशी प्रमाणे आजही हेन्री चे घर बंद होते. तिला आश्चर्य वाटले. कॅरीज आणि घोड्यांच्या टापांचा, फुरफुरण्याचा आवाज ऐकून कोण आलं आहे हे बघायला कुतूहलाने हेन्री च्या शेजारच्या घरातून एक मध्यमवयीन मनुष्य बाहेर आला. त्याला पाहून व्हिक्टोरिया त्यांच्या गेट बाहेर येऊन थांबली.
" एस्क्यूज मी सर, मी आत येऊ शकते का? "
" ओह, तुम्ही मिस विल्यम्स ना ? प्लिज या"
" थँक यु, तुमचे नाव?"
" डेव्हिड, डेव्हिड रसेल"
व्हिक्टोरिया त्यांच्या घरात गेली. छोट्याशा हॉल मध्ये लाकडी सोफा आणि दोन खुर्च्या मांडल्या होत्या. दोघे दोन खुर्च्यांवर बसले.
"मिस्टर रसेल, तुम्ही त्या दिवशी हेन्री ची बॉडी तुमच्याकडे.. " व्हिक्टोरिया ला पुढे बोलवेना
" तुम्ही हेन्री साठी जे काही केले, त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानते"
" प्लिज, मिस विल्यम्स, ते माझे शेजारी होते आणि मी केलं ते काहीच नव्हतं"
" तुम्ही होते असे का म्हणालात? हेन्री ची आई? ती इथेच राहते ना अजून. मी त्यांनाच भेटायला आले होते.अजूनही त्या कशा आल्या नाहीत?"
रसेल ने आश्रयाने व्हिक्टोरिया कडे पाहीले.
" म्हणजे तुम्हाला माहीत नाही? मला वाटलं तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितले असेल"
व्हिक्टोरिया काहीच कळत नसल्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन रसेल कडे पाहत राहिली. डॅड ने काय सांगितलं नसावं?
" खरंतर, त्या घटनेपासून मी घरातल्या लोकांशी अगदी गरजेपुरतं बोलतेय. इन फॅक्ट मी माझ्या रूम मधून आजच बाहेर पडलेय. कदाचित मला अजून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी याबाबत मला काहीही सांगितले नसावे. ते माझी जरा जास्तच काळजी करतात."
" असू शकेल. मिस विल्यम्स , त्या घटनेनंतर तीनेक दिवसांनी मिसेस तेरेसा चे आम्हाला एक पत्र आले. त्यांना आता या घरात, या गावात पायही ठेवायचा नाहीये. जिथे त्यांच्या मुलाला त्यांना शेवटचे भेटताही आले नाही , त्या जागेशी त्यांना काही एक संबंध ठेवायचा नाहीये. हेन्री ला जिथे पुरले तिथे येऊन तशाच त्या निघून गेल्या. त्या आता पुन्हा कधीच परत येणार नाहीत , असे त्यांनी लिहिले आहे"
" काय? तुमच्याकडे ते पत्र आहे? तुमची हरकत नसेल तर मला पाहता येईल?"
" हो, का नाही"
रसेल कडून ते पत्र घेऊन व्हिक्टोरिया पुन्हा एकदा त्याचे आभार मानून बाहेर पडली. जाता जाता एकदा तिने हेन्री च्या घराकडे नजर टाकली. तिलाही आता इकडे येण्यासारखे काहीच उरले नव्हते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle