तुर्की - खाना-पीना-जीना - २ येमेकलार (जेवण/मेन कोर्स)

एवेssट, आतापर्यंत इतका जड काहवाल्ती पचला असेल समजून जेवणाकडे वळूया. ब्रेकफास्ट इतका दमदार केल्यामुळे तुर्की जेवण तसं सोपं असतं. दुपार आणि रात्रीच्या जेवणातले पदार्थ तसे आलटून पालटून सारखेच असतात.

इस्तंबूलच्या कोपऱ्या कोपऱ्यावर मिळणारी डेलिकसी म्हणजे 'डोनर' उर्फ 'डोनर केबाप' (म्हणजे डोनरचे बाप नाही नुसतेच आपले कबाब :P ). हे मटन आणि चिकनचे ठेचलेले पातळ काप वेगवेगळ्या मसाल्यांनी सिझन करून डोंगरासारखे एका उभ्या स्क्युअरवर ग्रील करत लावलेले असतात. ऑर्डर दिल्यावर हे कडेकडेने तासून आपल्या प्लेटमध्ये येतात. (थँक गॉड, मी हे पुण्यात खाल्लं आहे :) ) हा तुर्कीचा राष्ट्रीय पदार्थ आहे.

डोनर
photo.jpg

असं म्हणतात की पदार्थ शिजवण्यासाठी आगीचा वापर सुरू झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मांस भाजून खाल्ले जाते ते म्हणजेच कबाब. सुमेरियन भाषेत 'कबूबा' म्हणजे निखाऱ्यावर भाजणे आणि अरेबिक अर्थ आहे तळलेले मांस. अठराव्या शतकात तुर्कीच्या बुरसा भागातल्या इस्केंदर एफेंदी नावाच्या माणसाने उभ्या काठीवर मांस भाजून डोनर कबाब बनवायला सुरुवात केली. 'डोनर' शब्दाचा अर्थ आहे फिरते (Rotating) कबाब.

डोनर बऱ्याच पद्धतींनी सर्व्ह केला जातो.

'डोनर कबाब': नुसते तासलेले मटन/बीफ/चिकन डोनरचे काप, साधा किंवा मसालेभात, तळलेले बटाटे आणि थोड्या सॅलड बरोबर एक पूर्ण प्लेट म्हणून रेस्ट्रॉंटमध्ये सर्व्ह करतात. घाईत पटकन खायचे असेल तर रस्त्याकडेच्या स्टँडवर फास्ट फूड म्हणून पिडे ब्रेडमध्ये भरून सँडविच सारखे हातात देतात.

डोनर प्लेट
efes-turkish-restaurant.jpg

'डोनर दुरूम': डोनरचे स्लाइस 'लवाश' नावाच्या पातळ पोळी सारख्या ब्रेडमध्ये गुंडाळून देतात. यात आपल्या आवडीचे मसाले, ग्रीन सॅलड, तळलेले बटाटे, मेयो, लोणची, टोमॅटो सॉस यापैकी काहीही कॉम्बो करता येते.

डोनर दुरूम
anatolia-turkish-grill.jpg

'इस्केंदर कबाब': हे डोनरच्या निर्मात्याच्या नावाचे कबाब एक स्पेशालिटी आहे. याला 'बुरसा केबाबी' असंही म्हणतात. यात पिडे ब्रेडच्या तुकडयांवर भरपूर लोणी लावून त्यावर डोनर पसरतात. सोबतीला दही आणि टोमॅटो सॉस असतो. शेजारी चवीपुरत्या तिखट तळलेल्या मिरच्या असतात.

इस्केंदर कबाब - किंग ऑफ कबाब
image1-430x241.jpg

डोनर सोडून अजून बऱ्याच प्रकारचे कबाब खाल्ले जातात. काही उदा. 'तावूक सिश' म्हणजे चिकन शीश कबाब, अदाना गावावरून नाव ठेवलेले 'अदाना कबाब' - यात मसालेदार, तिखट मटन खिम्याचा डोंगर कोळश्यावर भाजून त्याला कबाबचा आकार दिला जातो. (अदानाचे लोक बिनधास्त आणि गुंड म्हणून तुर्कीभर फेमस आहेत उदा. बिझिम हिकायेमधली चिचेक आणि तिचा नवरा! त्यामुळे धूर आणि जाळ असणाऱ्या खिमा कबाबाला त्यांच्या गावाचे नाव संयुक्तिकच आहे)

कोफ्ते: तुर्की लोकांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे कोफ्ते. हे हातगाडीपासून फॅन्सी रेस्ट्रॉंटपर्यंत सगळीकडे मिळतात. कोफ्ते म्हणजे ग्रील केलेली मटन/चिकन/बीफ खिमा पॅटीस. यात व्हेज पॅटीस (ची कोफ्ते) पण असतात. ची कोफ्ते आधी कच्च्या मांसाचे सारण भरून बनवले जायचे पण आता त्याच्यावर बंदी आल्यामुळे शाकाहारी बुलगुर, भात आणि भाज्यांचे सारण भरून बनवले जातात. कोफ्ते बनवण्यासाठी खिमा किंवा बारीक केलेल्या भाज्या त्यात मसाले, अंडी आणि ब्रेड घालून हाताने गोलाकार किंवा लांबट आकाराचे बनवतात. कोफ्ते ग्रील्ड, शॅलो फ्राय, डीप फ्राय किंवा स्टयूमध्ये घालून अश्या बऱ्याच प्रकारे खातात.

कोफ्ते
images_3.jpeg

मेन कोर्स म्हणून देताना प्लेटमध्ये साधा भात, 'बुलगुर पिलाफ' म्हणजे बुलगुरचा भाज्या घातलेला मसालेदार पुलाव (बुलगुर म्हणजे एक प्रकारच्या मेडिटरेनियन गव्हाचे दलियासारखे बारीक तुकडे असतात ते अर्धवट उकळून, सुकवून विकले जातात. हे धान्य शिजायला सगळ्यात सोपे समजले जाते), ग्रील केलेले टोमॅटो आणि भोपळी मिरच्या किंवा ग्रीन सॅलड किंवा 'पियाझ' म्हणजे उकडलेल्या व्हाईट बीन्स, उकडलेली अंडी, टोमॅटो, ग्रीन ऑलिव्ह, पार्सली आणि कांदे मिसळून केलेलं सॅलड याबरोबर कोफ्ते सर्व्ह करतात.

कोफ्ता प्लेट
plate.JPG

कोफ्ते लवाश ब्रेडमध्ये गुंडाळून सॉस आणि सॅलड बरोबर दुरूम स्टाईलनेसुद्धा खाता येतात. स्टयूमध्ये घातलेले कोफ्ते चमच्याने आणि स्टयूमध्ये ब्रेड बुडवून खातात.

कोफ्त्यांमधले राजे म्हणजे 'इचली कोफ्ते'! हा पदार्थ मूळ लेबनॉनमधून तुर्कीयेत आला आणि कानामागून येऊन तिखट झाला, लिटरली!! हे कोफ्ते बनवायला जरा कठीण असल्यामुळे कोणी सर्व्ह केले की तुर्की जनता त्यांच्या प्रेमात पडते (जसे काही उकडीचे मोदकच! Lol ). बुलगुर आणि रवा एकत्र मळून, त्याची पोळी लाटून त्यात भरपूर खिमा आणि मसाल्याचं सारण भरतात आणि करंजीसारखा बंद करून कोफ्ता डीप फ्राय करतात. कुरकुरीत इचली कोफ्ता हमस किंवा 'जजक' म्हणजे पुदिना चटणी घातलेलं दही आणि सॅलडबरोबर खायला देतात.
(ALA मध्ये हयातला ह्या कोफ्त्यांचे दिवसरात्र डोहाळे लागलेले असतात! Heehee )

इचली कोफ्ते
irmikli-icli-kofte.jpg

मुचवेर: मुचवेर हा मेन डिश किंवा चार वाजताच्या भुकेसाठी स्नॅक म्हणून कसाही खाल्ला जातो. मुचवेर म्हणजे झुकीनीचे वडे किंवा भजी :P यात श्रेडेड झुकीनी किंवा गाजर/कांदा/बटाटे किंवा सगळं एकत्रसुद्धा घालता येतं.
mucver-vegetarian-food-turkey-933x700.jpg

मंती/मंतु/मंता: हा एक पारंपरिक अनातोलीयन पदार्थ आणि तुर्कीभर प्रसिद्ध मेन कोर्स आहे. मंती म्हणजे आपल्या मोमोज सारखे तळलेले डंपलिंग्ज. मंतीमध्ये खिमा किंवा भाज्यांचे सारण भरलेले असते. मंतीवर पास्त्यासारखा टोमॅटोचा घट्ट रेड सॉस आणि दही घालून खाण्याची पद्धत आहे.
manti-vegetarian-food-turkey-933x700.jpg

'चोरबाsसं' अर्थात सूप : तुर्की किचनमधले स्टार म्हणजे वेगवेगळी चोरबासं उर्फ सूप्स! खूप थंडी असल्यामुळे तुर्कीत सूप कल्चर फारच आहे. सगळी सूप सांगता सांगता हा लेख संपेल म्हणून थोडीशीच देते आहे.

सगळ्यात बेसिक सूप आहे 'मेर्जीमेक चोरबासं' म्हणजे मसूर, गाजर, कांदा बटाटा सूप यात फ्लेवरसाठी मिरपूड किंवा चिकन स्टॉक घालतात. तुर्कीभर हे सूप इतकं प्रसिद्ध आहे की ब्रेकफास्ट, लंच ते डिनर प्रत्येक वेळी हे सूप पिता येतं.

'तरहाना' सूप : ही एक इन्स्टंट सूप पावडर आहे जी घरी बनवून ठेवतात आणि आयत्या वेळी त्यात पाणी, व्हेज/चिकन स्टॉक, टोमॅटो पेस्ट घालून सूप तयार करतात.

'यायला' सूप : हे आपल्या कढीसारखे दह्यापासून केलेले क्रिमी सूप आहे. यात मुख्य साहित्य दही, पुदिना आणि भात असतो. 'यायलालार' म्हणजे काळ्या समुद्रावरच्या डोंगरात असलेली गायी चरवण्याची जागा. तिथल्या उत्तम क्रिमी दह्याचे सूप म्हणून याला नाव पडलं, 'यायला' सूप! हे खूप पौष्टिक असल्यामुळे हॉस्पिटलच्या मेन्यूमध्येही असते.

यायला चोरबासं
Turkish-Yogurt-Soup-Yayla-Corbasi-12.jpg

डोलमा: डोलमा हा पदार्थ पूर्ण मेडिटरेनियनमध्ये सगळीकडे बनवला जातो. मध्यपूर्वेच्या सगळ्याच देशांमध्ये शतकानुशतके डोलमा तयार केला जातो. अर्थात डोलमा आमचा की तुमचा यावरून ग्रीस आणि टर्की सपोर्टर्समध्ये कायम वादावादी सुरू असते आणि जिंकत कोणीच नाही Lol ऐतिहासिक असल्यामुळे त्याचा युनेस्कोच्या कल्चरल हेरिटेज लिस्ट्मध्ये समावेश आहे तो 'अजरबैजान' देशाच्या नावे!! :ड असो! तुर्कीमध्ये याला डोलमा आणि सारमा अशी दोन नावे आहेत कारण तुर्की भाषेत डोलमाक म्हणजे सारण भरणे आणि सारमाक म्हणजे गुंडाळणे. ताज्या किंवा वाळवलेल्या भाज्या म्हणजे वांगी, भोपळी मिरच्या, झुकिनी, टोमॅटो, कांदे इ. आणि शिजवलेला भात किंवा बुलगूर एकत्र कालवून हे सारण द्राक्षवेलीच्या आंबवलेल्या पानात गुंडाळून तयार झालेले रोल्स वाफवले की डोलमा तयार! पण हा शाकाहारी डोलमा आहे तसाच वेगवेगळे मांस भरलेला डोलमाही असतो. त्यामुळे शाकाहारी डोलम्याला तुर्की भाषेत 'यलांज डोलमा' म्हणजे खोटा डोलमा असं नाव आहे :ड यात एक 'विशनेल यलांज डोलमा' नावाचा प्रकार आहे त्यात विशनेल म्हणजे आंबट चेरी आणि प्लमचा गर, दालचिनी, ऑलस्पाईस आणि पुदीना हे शिजलेल्या भाताबरोबर एकत्र करून त्याचे सारण भरले जाते. डोलमा बुडवून खाण्यासाठी वेगवेगळे डिप्स, सॉसेस बनवले जातात. त्यात मुख्य आहे 'ताजिकी' म्हणजे दही, किसलेली काकडी, लसूण पेस्ट, स्वादापुरता जरासा शेपू आणि मीठ घातलेला घट्टसर सॉस.

डोलमा
dolma.jpg

डोलमा वाफवण्याच्या दोन पद्धती आहेत एकीत (झेटनयाल) डोलम्यावर ऑलिव्ह ऑइल ओतून वाफवतात तर दुसरीत (सायाल) साजूक तूप ओतून वाफवतात. झेटनयाल डोलम्यात भाताचे सारण भरले जाते आणि तो शक्यतो गार करून वाढला जातो. सायाल डोलम्यामध्ये मांस असणारे सारण भरतात आणि तो गरमागरम सर्व्ह करतात.

गोझलेमे: हा तुर्की फिरायला जाणाऱ्या आपल्या भारतीय पर्यटकांचा तारणहार पदार्थ म्हणजे भाज्या आणि चीजचं सारण भरलेली पराठ्यासारखी पोळी. यात सारणाचे मुख्य तीन प्रकार आहेत, पालक आणि फेटा चीज, कांदा, बटाटा टोमॅटो आणि इतर भाज्या, चिकन किंवा खिमा. मैद्याची मोठी पातळ पोळी लाटून त्यात हे सारण भरून तव्यावर भाजून त्याचे पिझ्झासारखे तुकडे केले जातात.
turkish-gozleme-1.jpg

कार्नियारीक: इस्तंबूलमध्ये व्यापारी पेठांमधल्या रेस्ट्रॉंटमध्ये खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे 'कार्नियारीक'. एक लांबडं वांग भाजून त्यात खिमा मसाला आणि पार्सली भरून वर टोमॅटो सॉस ओतून भाताबरोबर सर्व्ह करतात.

कार्नियारीक
Turkish-Stuffed-eggplant-10.700px.jpg

कार्नियारिक सारखाच अजून एक वांग्याचा मसालेदार प्रकार आहे, नाव 'इमाम बयाल्द'. (इमाम- मशिदीत प्रार्थना म्हणून घेणारा पुजारी, बयाल्द - चक्कर येणे) मोठ्या लांबड्या वांग्यात कांदे, टोमॅटो, लसूण, बुलगूर, भात आणि इतर बर्‍याच भाज्या आणि मसाले यांचे सारण भरून ही वांगी अवनमध्ये भाजतात आणि पिलाफबरोबर सर्व्ह करतात. याच्या नावाबद्दल अनेक रंजक कहाण्या आहेत. त्यातली एक म्हणजे एका इमामाला जेव्हा ह्या डिशमध्ये वापरल्या जाणार्‍या पदार्थांच्या महागड्या किमती कळल्या तेव्हा तो जागीच बेशुद्ध पडला म्हणे! :P

इमाम बयाल्द
Iman-Bayildi.jpg

शेती एक महत्वाचा व्यवसाय असल्यामुळे तुर्कीमध्ये भाज्या, फळे आणि दुधाची रेलचेल आहे. भाज्यांचेही विविध प्रकार शक्यतो सूप करून किंवा शिजवून पिलाफच्या साथीने खाल्ले जातात.

त्यातलाच एक तुर्कांचा आवडता प्रकार म्हणजे 'ताजे फासूल्ये'(ताजे ग्रीन रनर बीन्स) (हमार हिरो का फेवरेट Heehee ). यांच्या नावात ताजे यासाठी आहे की खऱ्या तुर्की पद्धतीने ही डिश करायची असेल तर शेतातून रनर बीन्स तोडून आणल्यापासून तासाभरात ही भाजी केली जाते. याहून ताजे काय असू शकेल! :fadfad: आपण गवार निवडतो तश्या या रनर बीन्स निवडून ऑलिव्ह ऑईलमध्ये चिरलेल्या कांदा टोमॅटो आणि मसाल्याच्या घट्ट सॉसमध्ये अगदी मऊ होईपर्यंत शिजवतात. हे फासूल्ये पिलाफबरोबर सॅलड आणि घट्ट दह्याच्या साथीने साईड डिश म्हणून खाल्ले जाते.

ताजे फासूल्ये
images (1)_1.jpeg

फासूल्ये बऱ्याच प्रकारे बनवले जातात. 'झातिन्याली' म्हणजे ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवून, 'एटली फासूल्ये' म्हणजे मटन घातलेले, 'कियमा' म्हणजे खिमा घातलेले, 'कुरु फासूल्ये' म्हणजे व्हाइट बीन्स आणि खिमा, फासूल्ये वगैरे घालून केलेला stew.

कुरु फासूल्ये
images (2)_4.jpeg

गुवेच: गुवेच म्हणजे मातीच्या भांड्यात केलेला स्लो कूक/बेक केलेला थोडासा फ्रेंच रॅटाटूई किंवा इटालियन कॅपोनाटासारखा मिक्स व्हेज stew. यासाठी बाजारात खास तुर्की गुवेच पॉट उपलब्ध आहेत. गुवेचमध्ये शक्यतो बटाटा, वेगवेगळ्या शेंगा, वांगी, भेंडी वगैरे भाज्या आणि मसाले एकत्र शिजवले जातात (सेब्जली गुवेच). नॉनव्हेज गुवेचमध्ये चिकन, सीफूड किंवा इतर मांस वापरले जाते.

पारंपरीक गुवेच पॉट
images (7).jpeg

सेब्जेली गुवेच
images (8).jpeg

सॅलड आणि कोशिंबिरी: तुर्की खाण्याच्या प्रत्येक पदार्थाबरोबर एक तरी सॅलड किंवा डिप खाल्लेच जाते. त्यातील सगळ्यात लाडकं डिप आहे 'जजक' म्हणजे दह्यातली काकडी. भरपूर दही आणि थोडसं ऑलिव्ह ऑइल घोटून त्यात मोठी किसलेली काकडी, लसूण, चवीपुरता बारीक चिरलेला शेपू, पुदिना, मीठ, ओरेगॅनो आणि मिरपूड एकत्र केले की तयार झालं आपलं जजक! हे जेवणात आणि मुख्यत्वे कोफ्ते बुडवून खायला वापरतात.

जजक
images (3)_1.jpeg

मुहम्मरा: हे भाजलेली लाल भोपळी मिरची (रेड पेपर्स), अक्रोड आणि डाळींबाची काकवी मसाल्यांबरोबर एकत्र वाटून केलेलं थोडं आंबट-तिखट मसालेदार घट्टसर डिप आहे.
images (4)_0.jpeg

अजून बरीचशी मध्यपूर्वेतील बाबा गनूश, ताहिनी, हमस किंवा ग्रीक ताझिकी वगैरे डिप्स तुर्कीतही खाल्ली जातात.

किसर सलातस : हे सॅलड शिजवलेले बुलगुर, टोमॅटो आणि रंगीत मिरच्यांची पेस्ट, डाळींब काकवी आणि विविध हर्ब्स एकत्र करून बनवले जाते.

किसर सलातस
turkish-flavours-market-tour-istanbul-14-933x700.jpg

चोबान सलातस (शेफर्ड्स सॅलड): हे रोजच्या जेवणात खाल्ले जाणारे सगळ्यात कॉमन सॅलड आहे. काकडी, टोमॅटो, कांदा, ढब्बू मिरची, पार्सली यांचे चौकोनी बारीक तुकडे करून वरून मीठ मिरपूड आणि ऑलिव्ह ऑइल घालून लिंबू पिळलं की तयार!

चोबान सलातस
images (11).jpeg

येशल मर्जीमेक सलातस: हे मोड आणून वाफवलेले हिरवे मूग, कांदापात, लाल कांदा, टोमॅटो, पार्सली, लसूण वगैरे बारीक चिरून एकत्र करून ऑऑ, लिंबूरस आणि डाळिंब काकवी किंवा व्हिनेगर हे ड्रेसिंग वापरून तयार करतात.

येशल मर्जीमेक सलातस
images (13).jpeg

ऐतिहासिक पदार्थ: तुर्कांनी मॉडर्न होतानाच आपल्या ऑटोमन काळापासून चालत आलेल्या परंपरा, रीतिरिवाज आणि पारंपारिक पदार्थ, कपडे, डान्स इ. जपून ठेवले आहेत. जुन्या मशिदी वगैरे प्रार्थनास्थळे न ठेवता म्युझियम्स म्हणून पर्यटकांसाठी उघडलेली आहेत. अश्या बऱ्याच ठिकाणी 'दारुझियाफे' नावाने ऑटोमन काळातील पारंपरिक पदार्थ मिळणारी रेस्टॉरंटस आहेत. त्यात मिळणारे काही पारंपरिक पदार्थ जाणून घेऊ.

१. हूंकार बेएनदी (Sultan's delight):
नावाप्रमाणे हा सुलतानाचा आवडता पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकात सुलतान मुरात एका शिकारीहून परतताना त्यांना जंगलात एका गरीब घरी आसरा घ्यावा लागला आणि तिथे त्यांनी खाल्लेला हा पदार्थ त्यांच्या इतका पसंतीस उतरला की इस्तंबूलला परतल्यावर त्यांच्या शाही मुदपाकखान्यात त्याची वर्णी लागली.  'बेएनदी' शब्दाचा अर्थ होतो वांग्याचे भरीत. फक्त या भरतात भाजलेल्या वांग्याचा गर, मैदा, दूध, लोणी, चीज, लिंबूरस, मिरपूड आणि मीठ एकत्र करून त्याची घट्ट प्यूरी बनवली जाते. मग प्लेटमध्ये त्याची गादी बनवून वर मटण किंवा चिकन करी ओतली जाते. सुलतानाकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या मेजवानीमध्ये ह्या पदार्थाशिवाय पान की ताट हलायचं नाही म्हणे.

हूंकार बेएनदी
images_4.jpeg

२. सुलेमानिये चोरबास: इस्तंबूलमधील ग्रँड सुलेमानिये मशिदीच्या कॉम्प्लेक्समध्ये कित्येक शतकांपासून जनतेसाठी एक सूप किचन चालवले जात असे. आता त्या ठिकाणी 'दारुझियाफे' नावाचा पारंपरिक पदार्थ मिळणारा डायनिंग हॉल आहे. येथे तयार होणारा एक प्रसिद्ध चोरबा उर्फ सूप म्हणजे सुलेमानिये सूप.

हे बुलगुर आणि मटण/बीफ खिम्यापासून बनवलेले मीटबॉल्स मैद्यात घोळवून, लोण्यावर परतलेल्या गाजर,बटाटा, झुकीनी अश्या विविध भाज्यांच्या किसाबरोबर उकळत्या सुपमध्ये शिजवले जातात. हे खूप हेल्दी आणि पोटभरीचे सूप आहे.

सुलेमानिये चोरबा
images (1)_2.jpeg

३. युफकाल कोफ्ते: हे कोफ्ते बरेचसे आपल्या बाकरवडीसारखे दिसतात. खिमा, अंडी आणि भाज्यांचे मसालेदार सारण 'युफ्का' म्हणजे मैद्याच्या पातळ पोळीत गुंडाळून त्या रोलचे बाकरवडीसारखे तुकडे करून बेक करतात.

युफकाल कोफ्ते
images (4)_1.jpeg

४. एबंत कबाब: हे दिसायला साध्या कबाबांपेक्षा अगदी वेगळे असतात. मटण आणि कांदा, टोमॅटो, मशरूम, वाटाणे वगैरे भाज्यांचे तुकडे मॅरीनेट करून पोखरलेल्या लांबड्या वांग्याच्या होडीत बसवतात, वर भरपूर चीज पेरतातआणि ह्या होड्या बेक करतात की कबाब रेडी!

एबंत कबाब
images (3)_2.jpeg

४. फुकारा केश्कुलू उर्फ केश्कुल ए फुकारा: हे एक पक्वान्न आहे. उकळून सोललेल्या बदामांची पूड, दूध, पिठीसाखर आणि घट्टपणासाठी कॉर्नफ्लोर हे सगळे एकत्र आटवून, फ्रीजमध्ये गार करून हे घट्ट खिरीसारखे पुडिंग सर्व्ह करतात.

फुकारा केश्कुलू
images (2)_5.jpeg

मासे (बलंक): सगळी गावे, शहरे काळा समुद्र, लाल समुद्र, बॉस्फरस, नद्या, खाड्या यांच्या किनाऱ्यावर वसल्यामुळे मासे भरपूर खाल्ले जातात. शहरांमधून छंद म्हणून फिशिंग करून तिथेच ते मासे विकून टाकण्याचीही पद्धत आहे.  मासे शक्यतो ग्रील, फ्राय किंवा 'बुउलामा' म्हणजे फक्त लेमन, पार्सले घालून मंद आच ठेवून वाफेवर शिजवणे या पद्धतींनी करतात.  कांदा आणि बऱ्याच भाज्यांबरोबर अव्हनमध्ये शिजवलेल्या माश्याना 'पिलाकी' म्हणतात. काळ्या समुद्राच्या परिसरात माश्याना कॉर्नफ्लोरच्या घट्ट आवरणात तळून खातात. धुरावून (इसलेमे) सुकवून (चिरोझ) किंवा खारवून (लकेरदा) इ. पद्धती वापरून मासे साठवून ठेवतात. 'पझिदा लेवरेक' ही एक सीफूड स्पेशालिटी आहे ज्यात बास मासा चार्डच्या पानात गुंडाळून शिजवला जातो.

पझिदा लेवरेक
Pazıda-Levrek-Mantar-Kekik-Limon-Sos.jpg

समुद्राकाठच्या स्ट्रीट फुडमध्ये भरलेले आणि तळलेले मसल्स वरून फक्त लिंबाचा रस शिंपडून खातात, तळलेली कालामार अर्थात squid हे लेबनिज टाराटोर सॉस (यात ताहिनी पेस्ट, लिंबूरस, लसूण आणि पार्सली एकत्र वाटलेले असतात) बरोबर खातात. तुर्की टाराटोर सॉसमध्ये बऱ्याच वेळा ताहिनी पेस्टऐवजी अक्रोडाची पेस्ट वापरतात. (हयात-मुरात पहिल्या डेटवर जातात तेव्हा ती बीचवर बेट लावून दहा बारा प्लेट मसल्स हादडते, अगदी आपल्या पाणीपुरीसारखे Heehee )

मसल्स
5bab36b2d3806c21980922b0_0.jpg

तसाच इस्तंबूल फिरायला येणाऱ्या लोकांचा आवडता स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणजे 'बलंक एकमेक'. ग्रील्ड मासे, कांदा आणि सॅलड घातलेलं सँडविच. बलंक = मासा आणि एकमेक = ब्रेड. बॉस्फरस किनारी सगळीकडे लहान लहान स्टॉल्सवर हे सँडविच अगदी ताजे पकडलेले मासे ग्रिल करून बनवले आणि विकले जाते.

बलक एकमेक
ekmek.jpg

बाकी मग आपले नेहमीचे 'तावूक तंदिर' म्हणजे तंदूरी चिकन, 'कुझू तंदिर' म्हणजे तंदूरी मटन, चिकन आणि छोले घातलेला तांदूळ किंवा बुलगुरचा पुलाव उर्फ पिलाफ, अंड्याचे मेनेमेन, गोट चीज आणि मांस किंवा मश्रूम्स/भाज्या भरलेले पिडे, मुरवलेले आंबट गोड गाजर, जांभळा कोबी इत्यादी भाज्यांचे तुर्कीश सॅलड आणि मलईदार दही ह्या गोष्टींशिवाय तुर्की जेवण संपत नाही. हे सगळं संपवताना वाईच घोट घोट प्यायला 'आयरन' म्हणजे खूप घुसळलेलं, फेसाळ, खारं ताक हवंच!

आफियेत ओल्सून! (enjoy your meal)

आयरन
a9ee61f719c09f37458ff9c2672eabf6.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle