तुर्की - खाना-पीना-जीना - ३ इचेजेक्लार (पेय)

पीss लूं!!

नाही नाही, इम्रान हाश्मी अंगात आला नाहीये अजून! एवढं ओरडतेय फक्त ड्रिंक्ससाठी. आज जरा घसा ओला करूया. तुर्क अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही प्रकारची पेये पितात. आधी नॉन-अल्कोहोलिक पासून सुरू करू:

चाय: तुर्की चायबद्दल सगळं काही आधीच ब्रेकफास्टच्या भागात सांगून झालं आहे. येता, जाता, बसता, उठता चाय पित राहणे हे तुर्की जीवनाचे सार आहे!

काssहवे: सबाह सबाह चाय बरोबर काहवालती झाल्यावर पुढच्या ब्रेकमध्ये किंवा जेवणानंतर काहवे म्हणजे तुर्की कॉफी पिणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. तुर्की कॉफीला स्वतःचा एक मोठा इतिहास आहे. सीरियन व्यापाऱ्यांनी १५५५ साली इस्तंबूलमध्ये पहिली कॉफी आणली. तुर्कांच्यात ती एवढी प्रसिद्ध झाली की लोक कॉफीला प्रेमाने 'मिल्क ऑफ चेस प्लेयर्स अँड थिंकर्स' म्हणू लागले. होता होता सतराव्या शतकापर्यंत कॉफीने ऑटोमन सुलतानांच्या दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले. कॉफी पिण्याची एक ठराविक सेरेमनी तयार झाली.

'काहवेजी उस्ता' म्हणजे कॉफी बनवणारे मास्टर्स आपल्या चाळीसेक मदतनीसांना हाताशी घेऊन ऑटोमन सुलतानासाठी कॉफी बनवण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम करत असत. सुलतानांच्या हेरममधल्या बायकांनाही चांगली कॉफी बनवून सुलतानाला रिझवण्याचे ट्रेनिंग दिले जाई. अगदी लग्न ठरवतानाही मुलीचे कॉफी मेकिंग स्किल बघूनच लग्न ठरवले जात असे.

साधारण सोळाव्या शतकापासूनच तुर्की कॉफी हाऊसेस भरपूर गजबजलेली असतात. मित्रांना भेटीगाठी, राजकारणावर गप्पा, बॅकगॅमन आणि बुद्धीबळ खेळण्यासाठी कॅफेजचा भरपूर उपयोग केला जायचा. तुर्की laid back कल्चरमध्ये अजूनही बदल झाला नाहीये. आताही रस्तोरस्ती छोटेछोटे क्यूटसे कॅफे दिसतात आणि आत बसलेले लोकही तसेच आनंदी, गप्पीष्ट, चर्चेला आणि बुद्धीबळ/पत्ते खेळायला उत्सुक असतात.

बारीक दळलेल्या अरेबिका बीनपासून तुर्की कॉफी बनवली जाते. काहीवेळा दळताना त्यात सुवासिक वेलदोडा मिसळतात ज्यामुळे कॉफीला वेगळा फ्लेवर येतो. काहीजण कॉफी उकळताना अख्या बीन्स वापरतात ज्या सर्व्ह करताना कॉफीवर तरंगतात. कॉफी जसजशी उकळेल तसतशी फेसाळ होत जाते. कॉफी पिण्याच्या सेरेमनीचा नियमच आहे की कॉफीवर फेस नाही म्हणजे सर्व्ह करणाऱ्या यजमानांना दाखवायला फेस (तोंड) राहिला नाही :)

तुर्की कॉफीत गोडपणाच्या अति गोड ते बिनसाखरेची कडू अश्या सहा स्टेजेस असतात. एकदा कॉफी सर्व्ह केल्यानंतर साखर घालत नाहीत म्हणून बरोबर चमचाही देत नाहीत.  गरमागरम काssहवे 'जेझ्वे' नावाच्या स्पेशल भांड्यातून सिरॅमिकच्या मिनिएचर कॉफी कप्समध्ये सर्व्ह करतात. उकळल्यामुळे कपाच्या तळाशी कॉफी ग्राऊंडसचा खूप गाळ उरतो, पण नाही, तो प्यायचा नाही. परंपरेनुसार पाहुण्याने कॉफी संपवली की कप बशीत उलटा करून ठेवायचा आणि कप गार झाला की यजमानीण बाई त्यातल्या कॉफीच्या गाळाचा पॅटर्न बघून पाहुण्याचे भविष्य सांगतात.

जेझ्वे आणि तुर्की काहवे
images (2)_3.jpeg

आता अश्या सेरेमनी होत नसल्या तरी बायका मिळून ग्रुपने मजा म्हणून कॉफीतून एकमेकींची भविष्य बघतात. (उदा. फिलीसची आजी) बाकी सगळं मॉडर्न झालं तरी दोन तुर्की परंपरा टिकून आहेत; एक म्हणजे अजूनही लग्न ठरवताना मुलीला चांगली कॉफी बनवता येते का हे घरातली म्हातारी माणसं बघतात. (आठवा: मुरातची आजी मॉडेल दिदमला कॉफी करायला सांगते तेव्हाची तिची फजिती) आणि दुसरं म्हणजे मुलगा मुलीचा हात मागायला तिच्या घरी येतो तेव्हा लग्न टाळायला मुलगी त्याला साखरेऐवजी मीठ घातलेली खारट कॉफी देते. (आठवा: बरीस आयसेलआजीकडे फिलीसबरोबर लग्नाची बोलणी करायला आल्यावर फिलीस त्याला खारट कॉफी देते) अर्थात आता ही परंपरा मजा म्हणून पाळतात, आपल्या कानपिळीसारखी! कानपिळीवरून अवांतर: परंपरेनुसार तुर्की नवरी लग्न लागल्यावर नवऱ्याच्या पायावर जोरात पाय देते, मला खूष नाही ठेवलंस तर बघच म्हणून! (हे गुंडी फिलीस जोरातच करते :) )

तुर्कांच्या म्हणण्याप्रमाणे एकत्र प्यायलेला तुर्की कॉफीचा एक कप म्हणजे कमीतकमी पुढच्या चाळीस वर्षांच्या मैत्रीची गॅरंटीच! :) आमेन!

बोझा: हे क्रिमी, पिवळट रंगाचं पेय थंडीत पिण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात अजिबात मिळणार नाही. इस्तंबूलच्या कुडकुडत्या रात्री फेरीवाले रस्तोरस्ती बोssझाss असे हाकारे देत हे पेय विकताना दिसतील पण हे जरा जपूनच प्या कारण हे पटकन आवडणार नाही. ही चव आवडून घ्यावी लागते. फर्मेंटेड मिलेट, बार्ली, बुलगुर, तांदूळ, साखर, यीस्ट आणि पाणी एकत्र करून हे पेय बनवतात. काचेच्या ग्लासमध्ये घट्टसर बोझा ओतून वर भरपूर दालचिनी पावडर आणि त्यावर साताठ भाजलेले 'लेब्लेबी' म्हणजे छोले असं हे ड्रिंक सर्व्ह करतात. तुर्कांच्या मते बोझा प्यायल्याने अंगात ताकद आणि मर्दानगी येते पण अजूनतरी तसा कुठला सायंटिफिक रिपोर्ट नाही. :P

बोझा
Traditional-Winter-Drink-Boza-3.jpg

शिरा: हे थोड्या फर्मेंटेड द्राक्षे किंवा सफरचंदापासून बनवतात. फ्रुक्टोस लेवल खूप जास्त असल्यामुळे शिरा खूप गोड असते. शक्यतो कबाब आणि खासकरून इस्केंदर कबाबच्या जोडीला ही प्यायली जाते. इस्केंदर कबाब जिथे उदयाला आले त्या बुरसा गावातील आद्य रेस्टरन्टमध्ये स्वतःची शिरा बनवली जाते ज्यात मनीसामधली वाळवलेली काळी द्राक्षे वापरतात. तयार शिरा मलबेरीच्या लाकडी पिंपात एज करत ठेवली जाते.

शिरा
images (4).jpeg

बोझा आणि शिरा ही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स असली तरी तेवढीही निरागस नाहीत. दोन्हीत फरमेंटेशन असल्यामुळे दोन्ही थोडयाशा चढू शकतात. बोझा ही माईल्ड बीअर आणि शिरा माईल्ड वाईनसारखी असते. ऑटोमन साम्राज्य मुस्लिम असल्यामुळे तेव्हा अल्कोहोल चालत नसे म्हणून त्या कालखंडात ऑटोमन्स बोझा आणि शिरा मोठ्या प्रमाणात पीत असत. म्हणजे दारू तर दिसत नाही पण काम तेच होतं. म्हणूनच एक तुर्की म्हण आहे 'बोझाजिनिन शाहिदी शिराजी' म्हणजे बोझा बनवणाऱ्याला शिरा बनवणारा साक्ष! थोडक्यात आपलं उंदराला मांजर साक्ष तसंच आहे हे.

हल्लीच्या काळात टर्कीमध्ये दोन प्रकारच्या बोझा विक्रीला उपलब्ध आहेत. एक आहे 'तातली बोझा' म्हणजे गोड बोझा जी पिण्यासाठी सेफ आहे. दुसरी आहे 'एकशी बोझा' जी कमी प्रतीची समजली जाते आणि देशी दारू टाईप ठेक्यांवर विकली जाते. (BH 2 मध्ये फिक्रीचे लिव्हर बदलल्यावर तो बीअर न पिता सारखी बोझाची मागणी करत असतो) एकशी बोझा चुकूनही पिऊ नये! कुठलीही शिरा पिणे त्यामानाने सेफ आहे.

सालेप: तुर्कीच्या जंगलांमध्ये किंवा अगदी रस्त्याच्या कडेलासुद्धा सुंदर, एक्झॉटिक जंगली ऑर्किडसना बहर येतो. या फक्त फुलांनाच मागणी नाही तर त्यांचे कंदमूळ म्हणजेच 'सालेप' दळून त्याचे पीठ सालेप पेय तयार करण्यासाठी वापरतात. सालेपचे कंद धुवून, उकळून, सोलून, वाळवून, दळून मग त्याचं पीठ करून ठेवतात. साधारण एक हजार कंदांपासून फक्त एक किलो पीठ तयार होते. या पिठाला एक नाविन्यपूर्ण अर्दी, क्रीमी फ्लेवर असतो.

सालेपचे पीठ घालून दूध आणि साखर घट्टसर होईपर्यंत उकळतात. हे दूध मगमध्ये ओतून वरून भरपूर दालचिनी पावडर भुरभुरून गरमागरम सालेप पितात. बोझाप्रमाणेच सालेपही फक्त थंडीतच पिता येतं.

सालेप
turkish-salep-or-sahlep-with-cinnamon-sticks---christmas-eggnog-637238302-5b06ff4e3128340037a4d7d0.jpg

वाईल्ड ऑर्किड्स
Salep-3.jpg

वाईट बातमी म्हणजे हवामानातल्या बदलांमुळे आता ऑर्किड कमी फुलतात त्यामुळे सालेपचा एक्स्पोर्ट बंद झाला आहे आणि नवीन तुर्की जनरेशनमध्ये या पेयाची आवडही कमी झाली त्यामुळे हल्ली सालेपमध्ये ऑर्किडच्या पिठाऐवजी गव्हाचा स्टार्च वापरतात. हौशी लोकांनी स्पेशली ऑर्किडचे सालेप मागितले तरच मिळू शकते, तेही फक्त टर्कीत असाल तरच!

शलगम: हे पारंपरिक तुर्कीश पेय लाल टर्निप (शलगम) आणि जांभळया गाजरांपासून बनवतात. थंडगार शलगम काचेच्या उंच ग्लासात ओतून पिकल्ड जांभळ्या गाजरांबरोबर सर्व्ह करतात. याची स्ट्रॉंग आंबटसर चव असते त्यामुळे मसालेदार कबाबबरोबर प्यायला चांगले लागते. राकी पिताना दारू जास्त चढू नये, हँगओव्हर येऊ नये म्हणून सोबत किंवा नंतर पिण्यासाठी टेबलवर शलगमचे ग्लास ठेवलेले असतात.

शलगम
5-amazing-turkish-drinks.jpg

आयरन: याबद्दल जेवणाच्या लेखात विस्तृत लिहिले आहे. आयरन म्हणजे थंड, फेसाळ, खारट ताक. हे शक्यतो उन्हाळ्यात जेवणाबरोबर प्यायले जाते

लेमोनेड (लिमोनाता) आणि ऑटोमन शेरबेत : ही उन्हाळ्यात प्यायची फ्रूटी, थंड सरबते आहेत. तुर्की खेड्यापाड्यांमध्ये लिंबे सालासकट उकडून, थंड करून त्याचे पिवळेधम्मक लेमोनेड म्हणजे 'लिमोनाता' बनवतात. हे घरगुती लिमोनाता बर्फाळ ग्रानिटा मशीनमध्ये ठेवतात.  हे विकणारे लोक दिवसभर सायकलवरून लिमोनाता विकत असतात. शेरबेत म्हणजे फळांचे युनिक फ्लेवर असणारी सरबते. ही टिकाऊ सरबते काँसंट्रेट स्वरूपात बनवून ठेवतात आणि पिण्याच्या वेळी साखर पाणी घालून सर्व्ह करतात. यात लेमन, रोझ, डाळींब आणि चिंचेचा फ्लेवर प्रसिद्ध आहे.

लिमोनाता
36087313_10160484421005641_2586550513923260416_n.jpg

शेरबेत
images (3)_0.jpeg

अल्कोहोलिक ड्रिंक्स:

राकी: राकी हे तुर्कीचे अनऑफिशिअल राष्ट्रीय पेय आणि एक संस्कृतीच आहे. प्रेसिडेंट एर्दोगानने मुस्लिम परंपरेनुसार अल्कोहोलला फाटा देऊन 'आयरन' म्हणजे ताकाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा दिला असला तरी अस्सल तुर्कांच्या रक्तात राकीच वाहते. राकी ही वाइन नाही तर वोडकासारखी पारदर्शक दारू आहे. राकीमध्ये थंड पाणी मिसळून विरल करून ती प्यायली जाते. राकीमध्ये पाणी मिसळले की तिचा रंग बदलून दुधी पांढरा होतो. म्हणून राकीसाठी तुर्कांचं आवडतं पेटनेम आहे lions milk!

राकी
http___cdn.cnn_.com_cnnnext_dam_assets_151012215802-raki-5.jpg

राकी ही दोनदा डिस्टील केलेली द्राक्षे आणि बडीशेपेपासून बनवतात. राकी पिण्याला तुर्कीमध्ये फार सिरियसली घेतले जाते. वाढदिवस साजरा करायचा असो वा तुटलेल्या हृदयावर फुंकर घालायची असो तुर्कांच्या सगळ्या वाटा राकीकडेच जातात. पण.. पण.. असं असलं तरीही राकी कशीही, कुठेही प्यायची नसते. राकी पिण्यासाठीही एक सिक्रेट कोड ऑफ कंडक्ट आहे. जर तुम्ही वाढदिवस किंवा लग्न असा मोठा इव्हेंट सेलिब्रेट करत असाल तर कमीत कमी २० - २५ लोक जमलेले असतात. असा इव्हेंट एखाद्या मोठ्या पबमध्ये क्लासिकल टर्किश संगीत आळवत सुरू होतो आणि मध्यरात्रीपर्यंत बेली डान्स पर्यंत पोहोचून पहाटेपर्यंत संपतो. अश्या पब्समध्ये 'फसील एकीबी' नावाचा ट्रॅडिशनल लाईव्ह बँड असतो ज्यात नेय (रीड फ्लूट), साज आणि कनून ही दोन तंतूवाद्ये असतात. सेलिब्रेशनसाठी जमलेले लोक राकी एकदा का डोक्यापर्यंत पोचली की नाचता नाचता खुर्ची, टेबलेही कव्हर करतात. याउलट दिलजले आशिक, भग्न हृदयावर फुंकर घालायला एक दोन जवळच्या मित्रांबरोबर शांत पार्श्वसंगीत सुरू असणाऱ्या लहान कॅफेमध्ये राकी पितपित गप्पा करत असतात. जर मित्र नसेल तर बारटेंडरलाच मित्र बनवून राकीचे शॉट्स मारत हाल-ए-दिल बयां करत सुटतात. (आठवा: दिलजल्या हयात आणि फिलीस, तुफान आणि बरीसच्या राकीसोबत आपापल्या बायकांच्या तक्रारी सांगत नंतर जेमीलला हाणण्याच्या गप्पा!) थोडक्यात राकी पिऊन सगळ्यात रिझर्व्हड माणसंही मनमोकळी बडबड करायला लागतात.

राकीबरोबर 'मेझे' म्हणजे एपिटायझर्स खातात. टेबलवर पहिले मेझे येतात ते म्हणजे फेटा चीज आणि मेलन्स. सुरुवातीला कोल्ड मेझे येतात उदा. मासे आणि भाज्या असलेल्या डिश फावा, पिलाकी वगैरे. नंतर हळूहळू गरम (सिजाकलार) मेझे यायला सुरुवात होते. उदा. बोरेक (चीज भरलेली पेस्ट्री), करीदेस गुवेज (लोण्यावर तळलेली कोलंबी) वगैरे. प्रत्येकी 4cl चा शॉट म्हणजे एक 'टेक' या प्रमाणात गार पाणी घातलेले राकी शॉट्स पितात. अस्सल पिणारे लोक त्यात बर्फ घालत नाहीत कारण त्याने ड्रिंकचा फ्लेवर निघून जातो.

मेझे
http___cdn.cnn_.com_cnnnext_dam_assets_151012215819-raki-6.jpg

टोस्टिंगच्या वेळी ग्लास बॉटम्स क्लिक करतात, जर टॉप क्लिक केला तर समोरच्याला मी तुझ्यापेक्षा भारी आहे असं दाखवून त्याचा अपमान होतो. टोस्ट केल्यानंतर या प्रसंगी इथे कोणी असायला हवे होते त्यांच्या आठवणीत ग्लास हळूच टेबलवर आपटतात. (मला हे नंतर क्लिक झालं की मुरात हयातच्या आठवणीत टेबलवर असा ग्लास आपटत असतो)

बॉटम्स क्लिक
http___cdn.cnn_.com_cnnnext_dam_assets_151012215835-raki1.jpg

हृदयाच्या तारा छेडणाऱ्या गप्पा आणि टेबलवर येणारे मेझे हे सगळंच राकीच्या साथीने एकमेकांबरोबर शेअर करायचं असतं.

बीअर आणि वाइन: राकीएवढया प्रसिद्ध नाहीत पण बऱ्यापैकी बीअर (बिरा) आणि वेगवेगळ्या वाईन्ससुद्धा तुर्कीत बनवल्या आणि प्यायल्या जातात.

शेरेफिनिझे! (Cheers)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle