कथाकथी - बालकथा - चिमण्या आणि डोंगर ( ऑडीयो कथा )

ऑडीयो कथा इथे ऐकता येईल

कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू

निसर्गकथा : चिमण्या आणि डोंगर

हिवाळा सरत आला तसं चिमण्यांची दाणे शोधायची ठिकाणं दूरदूर व्हायला लागली. आसपासची सगळ्या शेतांची कापणी झाली. कुरणातले दाणेही संपत आले. म्हणजे अगदीच काही संपले नाहीत पण जास्त चिमण्या आल्या तर मात्र पावसाळा सुरु होई पर्यंत पुरले नसते. दूर दूर जाऊन खरंतर छोट्या चिमण्या दमून जायच्या.  आता जवळच्या जवळ एखादी खाण्याची सोय करायला हवी हे सगळ्यांनाच वाटत  होतं.    

खरंतर जवळच एक छान डोंगर होता, सदा सर्वदा हिरवागार. अमाप फळफुलं असलेला.  पण केव्हातरी माणसांना आपली घरं बांधण्यासाठी तिथले दगड हवे झाले. त्यांनी तिथे दगड माती काढण्यासाठी खणायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता डोंगर पार ओसाड झाला.  त्या भागातली माती नेहेमी काढल्याने तिथे आता साधे गवतही उगवत नव्हते. आता काढता येण्यासारखी माती संपली आणि माणसांनी ही खाण वापरायचीही बंद केली. त्यांना काय , दुसरीकडचे डोंगर होतेच पोखरायला!! 

आपल्या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी मग मोठ्या शहाण्या चिमण्यांनी एक सभा घेतली. काही चिडक्या चिमण्या माणसांवर खूप चिडल्या. अगदी कलकल करून त्यांनी सभाच डोक्यावर घेतली. पण मोठ्या शहाण्या चिमण्यांनी त्यांना शांत केलं, समजावलं की आता नुसता दोष देऊन काय उपयोग? त्यापेक्षा काहितरी उपाय केला पाहिजे.  मग या सभेत चिमण्यांनी ठरवलं की त्या ओसाड जागी  रोज थोडे दाणे , आणि जमतील त्या बिया नेऊन पेरायच्या.   झालं! आता रोज चिमण्या स्वत:साठी आणि  पिलांसाठी दाणे टिपायच्याच पण काही दाणे ओसाड डोंगरावर टाकण्यासाठीही आणायच्या.  आणलेल्या दाण्यातल्या रुजतील अशा बिया त्या आठवणीने जाऊन डोंगरावर टाकायच्या. त्यावर चोचीने थोडीशी मातीही उकरून घालायच्या. कधी कधी मुद्दामहून फळांच्या बिया शोधूनही त्या डोंगरावर पेरायच्या.  इतकं जास्तीचं काम करायचा छोट्या चिमण्यांना कंटाळाच यायचा कधी कधी. पण मोठ्या चिमण्या मात्र त्यांना समजावून तर कधी थोडेसे दरडावून या कामाला लावायच्याच. पूर्ण उन्हाळाभर चिमण्या आपले ठरलेले काम इमानेइतबारे करत राहिल्या.   

होता होता पावसाळा आला. पहिल्या पावसाचे टप्पोरे थेंब सुकलेल्या जमिनीवर पडले आणि मातीचा घमघमाट सुटला.  चिमण्याही खूप आनंदल्या. आपले पंख पसरून पहिल्या पावसात भिजल्या. चोचीत ताजे पाणी भरून प्यायल्या.  हळुहळू काही दिवसात जोरदार पाऊस सुरु झाला.   आता चिमण्यांना ओसाड डोंगराकडे  रोज जाता येत नव्हते. मात्र क्वचित केव्हातरी जाऊन त्या पहाणी करून येत.   ओसाड डोंगरावरही पाऊस धबाधबा कोसळत होता. पण चिमण्यांची मेहेनतही कारणी लागल्याचे दिसत होते. कुठे कुठे इवलाली रोपं डुलायला लागली होती. गवततर चांगलंच वाढायला लागलं होतं.  ही हिरवाई बघून चिमण्या खुश व्हायच्या. 

पण चिमण्या हुशार होत्या. इतकेच काम या डोंगरासाठी पुरेसे नाही हे त्यांना पक्के माहित होते.  पावसाळा संपला तेव्हा आपले दाणे आणि बिया पेरायचे काम चिमण्यांनी पुन्हा चालू केले. असं होता होता अनेक वर्षं गेली. चिमण्यांच्याही अनेक पिढ्या निघून गेल्या होत्या. त्या ओसाड डोंगराचा तर नामोनिशाण शिल्लक नव्हता. त्याजागी एक हिरवागार गवताने आणि जंगलाने वेढलेला सुंदर डोंगर दिसायला लागला होता. अनेक वर्षापूर्वी चिमण्यांनी पेरलेल्या फळांच्या बियांचे आता मोठे वृक्ष झाले होते.  दगड काढून झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठून छान तळेहि झाले होते.   चिमण्यांना आसरा आणि दाणे, पाणी सगळेच जवळपास मिळत होते.  घरटी बांधायला नवनव्या जागा मिळाल्या होत्या.  चिमण्या आनंदी होत्या. पण त्या ओसाड डोंगराची गोष्टं मात्र विसरल्या नव्हत्या.  मोठ्या चिमण्या आपल्या पिल्लांना झोपताना माणसांची आणि त्यांच्या घरापायी ओसाड झालेल्या डोंगराची गोष्टं आठवणीने सांगायाच्या. आपल्या पूर्वजांनी कशा बिया पेरल्या त्याची वर्णनं ऐकवायच्या. मग  पंख फुटलेली पिल्लं घेऊन पुन्हा एखाद्या माणसाने ओसाड केलेल्या जागी नव्याने जंगल वसवायचं काम इमाने इतबारे सुरु करायच्या.  

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle