कथाकथी - बालकथा - चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी 

ऑडीयो कथा इथे ऐकता येईल

कथा - स्वप्नाली मठकर

कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक

पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू

प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी

चिंगु आणि पिंगू नावाचे दोन चतुर भाऊ बहिण होते. दोघांचेही डोळे मोठ्ठे चकचकीत होते. पंख सुद्धा आईसारखेच सुंदर पारदर्शक होते. शेपुट मात्र अजून छोटुशीच होती. हो! अजून दोघे छोटेच होते ना. त्यामुळे त्यांची शेपटीही पिटुकलीच होती. कधी एकदा मोठे होऊ आणि छान आईसारखी लांब शेपटी होईल याची दोघे वाट बघत असत.

चिंगु होती निळ्याशार झळकदार रंगाची. उन्हात बसली कि तिचे अंग मोरपिसासारखे चमकायचे. काचेसारख्या चमकदार डोळ्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडल्यासारखे दिसायचे.

पिंगू होता लालबुंद ! संध्याकाळचे केशरी रंग याच्या अंगावर आणि डोळ्यांत उतरलेत की काय असेच वाटायचे.

तर हे दोघे खूप खूप खेळायचे. दिवसभर नुसते भटकत असायचे. कधी गवताच्या तुऱ्यावर झोका घ्यायचे. कधी कमळाच्या सुकलेल्या देठावर बसून टकमक सगळीकडे बघत राहायचे. कधी पाण्यावर हलकेच तरंगून आपले प्रतिबिंब पहायचे. तर कधी आपल्या पायांनी फुलांना गुदगुल्या करायचे. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूच्या नवनवीन गोष्टी बघताना दोघे अगदी हरखून जायचे.

असे नेहेमीचे खेळ खेळत एक दिवस दोघे चुकून मोठ्या रस्त्यावर आले.

"अरे हे बघ काय, इथे मधल्या जागेवर झाडच नाहीयेत! " रस्ता बघून चिंगुला खूप आश्चर्य वाटलं.

"अगं, हाच रस्ता असेल मग. माणसं जातात ना तो रस्ता!! " पिंगुने आईकडून रस्त्याबद्दल ऐकले होते.

दोघे जण असे बोलत असतानाच टूर्रऽ टूर्रऽऽ असा आवाज करत काहीतरी जोरात गेले.

"हे काय आणि नवीनच? आणि कित्ती जोरात गेले ना!?" पुन्हा एकदा चिंगुने विचारले.

"ही ना बहुतेक स्कूटर असणार. आई नव्हती का सांगत आधी. " पिंगू चिंगुला माहिती देत होता तेवढ्यात मागून पुन्हा एकदा तसाच आवाज झाला. दूर वरून अजून एक स्कूटर येत होती. यावेळी धीर करून चिंगु चक्क स्कूटर चालवणाऱ्याच्या टोपीवरच बसली. आणि काय आश्चर्य! त्या स्कूटर बरोबर चिंगुही जोरात पुढे जायला लागली. जोरात उडणाऱ्या वाऱ्यावर पंख सावरायची धावपळ झाली तरी चिंगुला मस्त मज्जा आली. मधेच चिंगु उडाली आणि पुन्हा मागे पिंगू होता त्याठिकाणी परत आली.

इथे पिंगुची मात्र घाबरगुंडी उडाली होती. चिंगु परत आलेली पहाताच त्याला जरा बरं वाटलं. मग चिंगुने आत्ता आलेली सगळी गम्मत पिंगुला सांगितली आणि त्यालाही पुढच्या वेळेसाठी तय्यार केलं.थोड्याच वेळात पुढची स्कूटर आली तशी चिंगुने पिंगुचे पंख धरत त्यालाही आपल्याबरोबर घेतलं आणि दोघे पटकन स्कूटरवाल्याच्या टोपीवर बसले. सुरुवातीला भीती वाटली तरी आता पिंगुला फार मज्जा यायला लागली.

"याऽहुऽऽऽ!!! काय मज्जा येतेय. "

"हो ना! जोरात उडाता येतंय आणि पंखही हलवायला लागत नाहीयेत! धम्मालच धम्माल!"

पायाने टोपी घट्ट पकडून दोघेही मज्जा करत होते. स्कूटर थोडी दूर जाताच पुन्हा उडून परत आधीच्या जागी थांबत होते आणि नवीन स्कूटर ची वाट बघत होते. दिवसभरात स्कुटरवरून जाणाऱ्या दोन टोप्यांवर, दोन मोठ्ठ्या मुंडाश्यांवर , तीन गजर्‍यांवर, एका गवताच्या भाऱ्यावर, एका घोंगडीवर बसून त्यांची गम्मत जमत चालू होती.

संध्याकाळ व्हायला लागली तशी दोघांची आईच त्यांना शोधत तिथपर्यंत आली. स्कूटरवर बसणाऱ्या माणसांच्या डोक्यावर बसणारी आपली मुलं पाहून तिला खूपच हसू आलं. आणि चक्क पुढच्या स्कूटरवर आई , चिंगु , पिंगू असे तिघेही बसले.

घरी परत जाताना आज काय काय गम्मत केली ते सांगताना पिल्लांचे डोळे आणि ऐकताना आईचे डोळे कधी नव्हे तेवढे चमकत होते. दुसऱ्या दिवशी परत यायचे ठरवत रात्री चतुराची पिल्लं आईजवळ झोपी गेली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle