चांदणचुरा - १३

तो काय करतोय हे पुरतं कळेपर्यंत ती उठून उभी राहिली होती. अंगठी फेकताच ती उघड्या दारातून जोरदार वादळात मुसंडी मारून सरळ पळत सुटली. झाडांपर्यंत पोचल्यावर तिला कसाबसा श्वास घेता येत होता. बर्फात ओली होऊन कुडकुडत ती गुडघे टेकून बसली. बर्फाचे पाणी डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते. हाताने सगळा नव्याने भुरभुरलेला फुसका बर्फ बाजूला करत, मध्येच हाताला टोचणाऱ्या बारीक काटे, काटक्यांमधून हात फिरवत ती शोधत राहिली. एव्हाना तिच्या केसांमध्ये बर्फाचे कण जमू लागले होते. किती वेळ गेला कोण जाणे पण तिचे हात पाय तिलाच जाणवेनासे झाले तेव्हा ती उठली आणि वाऱ्यातून जोर लावून कशीबशी दारापर्यंत पोहोचली. दार उघडे होते पण तो दारात नव्हता. सीडर दाराबाहेर येऊन जोरजोरात भुंकत होता. ती जवळ आल्यावर तो शांत होऊन तिच्या मागोमाग आत आला.

घोंगावणाऱ्या वाऱ्यात अंगातली सगळी शक्ती लावत जीव खाऊन तिने ते दार बंद केले. शेवटी दमून तिला श्वास येईनासा झाला. धपापत ती दारालाच टेकून उभी राहिली. तो दाराकडे पाठ करून खुर्चीत बसला होता.

"किती बेपर्वा माणूस आहेस तू? तुला जराही काही वाटलं नाही?" थोडा श्वास घेतल्यावर ती ओरडली.

"जर माझ्या आईने तिच्या लग्नाची कधी पर्वा केली नाही तर त्या नुसत्या रिंगची पर्वा मी कशाला करू?" तो शांतपणे म्हणाला.

ती डोअरनॉबला धरून कशीबशी उभी होती. हात आणि सगळे शरीर गारठून बधिर झाले होते. हळूहळू पायांच्या मुंग्या गेल्यावर ती कोपऱ्यात आगीसमोर जाऊन बसली. धगीसमोर हात, पाय शेकवल्यावर तिच्या जरा जीवात जीव आला.

"ती रिंग तुझ्या वडिलांची होती" ती आगीत बघत म्हणाली. तिला वाटले होते निदान बाबांची आठवण म्हणून तो ती अंगठी स्वतःकडे जपून ठेवेल.

"माझ्या वडिलांनी ती अंगठी आईला परत केली होती. जर त्यांना त्या अंगठी जपून ठेवावीशी वाटली नाही तर मी का ठेवू."

"पण तुझ्या आईने तरी ती जपून ठेवली होती. यावरून काहीतरी कळायला हवं होतं तुला." ती त्याच्या आईची एवढी वकिली का करत होती तिला समजत नव्हतं. एका अर्थी ती जगातल्या सगळ्या स्त्रियांची बाजू मांडतेय असं तिला कुठेतरी वाटत होतं.

"माझ्या मते बायका फक्त पुरुषांकडून त्यांना हवी असलेली गोष्ट मिळवायला बघतात. त्यासाठी त्या काहीही मार्ग वापरतील, कुणालाही दुखावतील. एकदा का त्यांना ती गोष्ट मिळाली की ज्यांना चिरडून त्या पुढे गेल्या त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. एकदा प्रेम करून मी चूक केली पण आता नाही, अजिबात नाही."

तीने एकदम वळून त्याच्याकडे पाहिले.  "बायका? सगळ्या बायका? हे काय विचित्र जनरलायझेशन आहे?" तिला त्याचं बोलणंच काही कळत नव्हतं. "तुला बायकांवर विश्वास नाही, बायका स्वार्थी वाटतात कारण फक्त तुझी आई तुला सोडून गेली आणि काल तूच मला सांगत होतास की लोकांनी सोडून जाण्याबद्दल तुला काहीच इशूज नाहीत." तिला आता हसू येत होतं. कसला नमुना आहे हा!

"तुला हे फक्त आईबद्दल वाटतंय, तुला बाकी काही माहिती नाही अजून."

"मग सांग मला." ती आता हाताची घडी घालून कपाटाला टेकून उभी होती.

"नताशा." तो पुटपुटला. "धडा नं. दोन."

"हूं! झालं तर मग. एका मुलीपायी तू अख्या स्त्री जातीला नावं ठेवतो आहेस. किती क्लिशे! काय झालं होतं? नताशाला ह्या जंगलात रहायला आवडलं नाही? सेम तुझ्या आईची स्टोरी?

"तुला काय करायचंय!"

"बरोबर. मला काय करायचंय! मी फक्त एक गोष्ट सांगते नंतर काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस. आदित्य! ह्या सगळ्याच्या पलीकडे विचार कर."

पुढचा श्वास घेण्याच्या आत आदित्यचा चेहरा तिच्या चेहऱ्यासामोर दोन इंचावर होता. जराही हालचाल केली तर त्याचं भलंमोठं नाक तिच्या नाकाला लागेल इतक्या जवळ. कपाटावर तिच्या चेहऱ्याच्या बाजूला हात ठेवून खुनशीने तिच्या डोळ्यात बघत तो उभा होता त्यामुळे कुठूनही पळायला जागा नव्हती.

त्याच्या पायाशी येऊन सीडर लोळण घेऊन भुंकत होता. दोघांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

"मी नताशाला आम्ही दोघेही बालवाडीत असल्यापासून ओळखत होतो. किंवा असं म्हटलं पाहिजे की मी ओळखतो असं मी समजत होतो. नंतर दिल्लीला कॉलेजमध्ये एकत्र होतो. मग मी बाबाला मदत करायला इकडे आलो आणि ती मास्टर्ससाठी बँगलोरला गेली. इतकी वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ती इथे आली की आम्ही नेहमी एकत्र असायचो, तिचं मास्टर्स संपून नोकरीही तिकडेच सुरू झाली होती. मी तिला सरप्राईज करायला एकदा न सांगता बँगलोरला गेलो. आणि मलाच सगळ्यात वाईट सरप्राईज  मिळालं.

तिथे जाऊन मला कळलं की ती कोणा रुममेट बरोबर रहात नव्हती तर तिने तिच्या बॅचच्याच एका मुलाशी लग्न केलं होतं. तो ऑलरेडी कॅनडात गेला होता आणि ही व्हिसा मिळेपर्यंत इथे थांबली होती. मी तिच्यासाठी फक्त इथे असेपर्यंत वापरायचं एक खेळणं होतो. शी वॉज टोटली प्लेइंग मी! सो, माझ्या आयुष्यात कोणीही बाई नकोय मला. गॉट इट? माझी आई निघून गेल्यावर माझ्या वडिलांची झालेली हालत मी माझ्या डोळ्यांनी बघितलीय. आणि त्याच कडू औषधाचा जरा कमी प्रमाणात मीही डोस घेतलाय. म्हणून माझ्या आयुष्यात मला आता कुणीही नकोय. बॅक ऑफ! समजलं?"

आवंढा गिळून तिच्या ओठातून बारीकसं 'हो' निघालं. त्याने जसा काय खोलीतला सगळा ऑक्सिजन शोषून घेतल्यासारखा तिचा श्वास रोखला होता. तिच्या हातांवर, मानेवर काटा आला होता आणि ती तळहात कपाटावर घट्ट चिकटवून उभी होती. तो तिथून गेल्यावर काही सेकंदानी तिला पहिल्यासारखा श्वास घ्यायला जमला.

तो तरातरा जाऊन टोकाला असलेल्या लॅपटॉप टेबलापाशी बसला होता जसं काही त्याला तिच्यापासून शक्य तितक्या लांब राहायचं होतं.

तिने खाली बसून घाबरून विव्हळणाऱ्या सीडरच्या कानामागे, मानेवर खाजवत त्याला शांत केलं. आता सगळा ताण कमी झाल्यावर तिला जाणवलं की ती पूर्ण वेळ थरथरत होती.
इतकं कडवट बोलूनही तिला आदित्यसाठी वाईट वाटत होतं. ना ती नताशाला ओळखत होती ना त्यांच्यातील रिलेशनशिपबद्दल तिला काही माहीत होतं, पण आदित्यला झालेला आणि होत राहिलेला त्रास तिला दिसत होता.

"माझ्या कॉलेजमधल्या बॉयफ्रेंडने मला डंप केलं." तिचा आवाज अजूनही थरथरत होता.

"ओह रिअली? मग? तू 'सगळ्याच्या पलीकडला' विचार केलाच असशील. नो बिग डील!" तो थंड आवाजात म्हणाला.

"खरं सांगायचं तर, नाही. मी माझ्या पहिल्या असाईनमेंटसाठी एक वर्ष दिल्लीला होते आणि तो मुंबईला. आम्हाला लॉंग डिस्टन्स जमणार नाही हे त्यानेच ठरवून माझ्याशी ब्रेकअप केलं आणि पुढच्या सहाच महिन्यात माझ्याच बेस्ट फ्रेंडशी लग्न! मी मला काहीच फरक पडत नाही असं दाखवत त्यांच्या रिसेप्शनलाही हजर होते!"

तो मान वळवून तिच्याकडे रोखून बघत, ती खरं सांगतेय का याचा अंदाज घेत होता. तीही काही सेकंद त्याच्याकडे पहात राहिली आणि शेवटी किचनमधल्या खुर्चीत जाऊन बसली. खाली मान घालून थरथरणारा ओठ दातांनी चावत ती कशीबशी रडायला येणं थांबवत होती.

सीडर थोडा वेळ त्याच्या पायाशी बसून, वाट पाहूनही तो लाड करत नाही दिसल्यावर उठून तिच्याकडे आला. तिच्या खुर्चीशेजारी उभा राहून दोन पाय उचलून त्याने तिच्या मांडीवर ठेवले. डोळ्यांच्या कोपऱ्यात गोळा झालेला जाडा थेंब पुसून ती सिडरकडे बघून हसली आणि त्याचे पाय हातात घेऊन त्याच्याशी खेळायला लागली. पण तरीही त्यांच्यामध्ये तणाव पसरलेला होताच. हा ताण नाहीसा करण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत होती.

तो अजूनही तिच्याकडे पाठ करून खुर्चीत पाय हलवत बसला होता.

"सो. आपण दोघेही हर्ट झालोय पण हा काही जगाचा अंतबिंत नाही. हे डिस्कशन विसरून जाऊ आपण. लेट्स मूव्ह ऑन."

ऐकून तो फक्त ओठांचा कोपरा वाकडा करत हसला आणि बेफिकिरपणे खांदे उडवले.

"इथे चेसबोर्ड आहे?"

नाही.

"स्क्रॅबल?"

नाही.

"सापशिडी, लुडो?" तिने डोळे फिरवत विचारले.

नाही.

"मग काय खेळू शकतो?"

"फुलीगोळा!" या ऑप्शनवर त्यालाच हसायला येत होते.

"डन. सो फुलीगोळा इट इज!" ती हसत उठून उभी रहात म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle