चांदणचुरा - ३४

"अगर उसे बात करनी है, तो वो मुझे कॉल कर सकता है." ती शांतपणे म्हणाली.

"ये मै तो उसे नही कहनेवाला."

हम्म बरोबर, तो कुणाचे सल्ले ऐकतच नसणार.

"तुम जो उसका इंटरव्ह्यू लेने गयी थी, ये सब उसके बारेमे तो नही है? क्यूँकी वो कल, मैने उसे एक चान्स दिया था, उसका करियर सेट हो जाता लेकीन उसने ना कहां.. ऐसे कुछ बडबडा रहा था. मेरी कुछ समझमे नही आया."

"हम्म, उसीके बारेमे है सब. मै अभी सब तो बता नही सकती लेकीन तुम्हे पॉसिबल हुआ तो उसे मेरा इक मेसेज जरूर दे देना. उससे कहना मै एक भी वर्ड तब लिखुंगी जब वो मेरे सामने बैठकर मुझे फेस टू फेस आन्सर्स देगा. नही तो फर्गेट इट."

"तो ये फायनल है?" फतेने विचारले.

"हाँ!" म्हणून तिने कॉल कट केला.

कित्येक दिवसांत पहिल्यांदा ती स्वतःशीच मनापासून हसली.

आठवणीने लिस्ट पुन्हा पुन्हा बघत दोन तास फिरून तिने शॉपिंग पूर्ण केली. घरात सगळे डबे रिकामे बघून आईने गदारोळ माजवला असता. तेवढ्यात फोन पिंग झाला, आईने रस्त्यात कुठेतरी पोचल्याचा मेसेज केला असेल म्हणून तिने लगेच पाहिला नाही. एस्कलेटरवरून खाली जाताना सामानाच्या पिशव्या एका हातात धरून तिने फोन काढला. आदित्यचा टेक्स्ट! ती इतकी शॉक झाली की फोनच हातातून उडून पलीकडे पडला. वर जाणाऱ्या जिन्यातल्या बाईने पटकन दोन पायऱ्या वर जात तो उचलला आणि तिला आणून दिला.

"थँक यू सो मच, यू सेव्हड मी!" ती हुश्श करत म्हणाली. ती बाई गेल्यावर सामान खाली ठेवत धडधडत्या हृदयाने तिने मेसेज उघडला.

A: Why won't you write that article?

U: I would love to write. लिहिताना तिची बोटं आनंदाने सळसळत होती.

A: nice.

U: once you give me an interview. Face to face. तिचा आत्मविश्वास परत आला होता.

A: Not gonna happen. त्याचा लगेच रिप्लाय आला.

U: Then find someone else.

रिप्लाय येणार नाही हे तिला अपेक्षितच होतं. त्याचा भडका उडाला असणार. तो समोरासमोर मुलाखतीला कधीच तयार होणार नाही. कारण तिच्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण असेल आणि तिला परत मुंबईला पाठवणे त्याहून महाकठीण.

ती पिशव्या उचलून बाहेर येऊन ऑटोत बसली. घरी पोहोचून पाणी प्यायला आत गेली तोच फोन पुन्हा पिंग झाला. तिने पळत बाहेर येऊन मेसेज उघडला.

A: why are you being so difficult?

पटापट टाईप करताना तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू पसरलं होतं.

U: Coz you lied to me. Fact is you love me.

त्याचा हो किंवा नाही काहीच रिप्लाय आला नाही. तिला ते अपेक्षितही नव्हतं. तिने थोडा वेळ वाट बघून फोन टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सामान लावायला सुरुवात केली. तिच्या हृदयातली कळ परत आली होती. कारण हे संभाषण कदाचित त्यांच्यात शेवटचं ठरू शकतं हे तिला जाणवत होतं.

तेवढ्यात खालून हॉर्न वाजला. आले वाटतं, म्हणून ती लिफ्टमधून उतरून पळत पार्किंगमध्ये गेली. बाबा कार पार्क करून बॅगा काढतच होते. तिने पटकन त्यांच्या हातातली मोठी बॅग घेतली. "आई, एवढ्या तीन तीन बॅग कशाला आणल्या? इथे कपाटभर कपडे आहेत तुझे."

"बघ मी तिला कधीचा सांगतोय एवढ्या सामानाची गरज नाही, तरी लाडक्या लेकीसाठी तिने बॅग भरून काय काय पदार्थ करून आणलेत." बाबा कंटाळून म्हणाले.

"मग लागतातच ते आणायला, बघा माझी लेक किती वाळली ते." आई तिचं निरीक्षण करत म्हणाली.

"अरे हो हो.. आधी वर तर चला, मग भांडा किती भांडायचं ते." उर्वी हसत म्हणाली. तिचा पन्नास टक्के ताण कमी झाला होता.

वर आल्याआल्या हातपाय धुवून आईने बॅगमधून छोले, पुऱ्या, दही, लसूण चटणी आणि आम्रखंड वगैरे सगळं काढून त्यांना जेवायलाच बसवलं.

"उर्वी, आत्ता तू जास्तच बारीक झालीस हं, आता ते डायटिंग फियटिंग पूर्ण बंद काही दिवस. खूप झालं, आता काही दिवसांनी दिसेनाशी होशील. आणि तोंड बघ कसं झालंय. जाग्रण वगैरे सगळं बंद. जाईपर्यंत बघ तुला कशी टामटूमित करून जाते."

आईची बडबड ऐकताना ती आणि बाबा मिळून जाम हसत होते.

दुपारची झोप आणि चहा झाल्यावर आईने आपली सिरीयल लावली आणि उर्वीला भाज्या निवडायला बसवले. तिने वाकडं तोंड करून मेथी निवडायला घेतली.

"एवढया पिशवीभर भाज्या आणायची काही गरज? एवढ्या पालेभाज्या, एकेक किलो मटार, ओले हरभरे, वांगी, टोमॅटो आणि हा भलामोठा फ्लॉवर! गावजेवण आहे की काय!"

"अग काल गंगेवरच्या बाजारात गेले होते ना, एवढ्या छान टवटवीत भाज्या दिसल्या. तिथे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून येतात हल्ली. म्हटलं आठवडाभराच्या घेऊन जाते. इथे कुठे अश्या मिळायला. इथे नुसते ते गटारांवर उगवलेले पालक!"

"ओ हॅलो, आई? तू लहानपणापासून तेच पालक खाऊन मोठी झाली आहेस. आत्ता कुठे नाशिकला गेलीस म्हणजे काय तिथलीच झालीस का!" ती खुसखुसत म्हणाली.

"तू निवडायचं काम कर!" आई हसू दाबत रिमोट उचलत म्हणाली.

---

रात्री जेवणं झाल्यावर टीव्ही बघता बघता आई तिच्या डोक्याला तेल लावून मसाज करत होती. बाबाही शेजारच्या खुर्चीत बसले होते. आदित्य निघून गेल्याच्या दिवशीच ती आईला फोन करून खूप रडली होती, अर्थात काही डिटेल्स वगळून. बाबांनीही फोनवर तिला खूप समजावले होते.

"खरंच किती वाळली आहेस उर्वी! गाल आत गेलेत, डोळ्याखाली केवढं काळं झालंय.. झोपत नसणार तू नीट.. हे सगळं आदित्यमुळे ना?" आई म्हणाली.

"उर्वी हे बघ मला सांग, आम्ही जाऊन त्याच्या आईला भेटू का?" बाबांनी पुस्ती जोडली.

"बाबा! प्लीज. तो त्याच्या आईशी बोलत नाही, सांगितलं ना मी. तो मलाच परत भेटेल की नाही तेसुद्धा माहीत नाहीये." ती म्हणाली.

"हा संत मला कुठे भेटला ना तर उलटा टांगून फटकवेन त्याला." बाबा म्हणाले.

"बाबा!" कल्पना करून उर्वी आणि आई हसत सुटल्या.

"अहो, पण तुमचा आवडता लेखक आहे ना तो?" आई मुद्दाम चिडवत म्हणाली.

"लेखक असला म्हणून काय झालं! माझ्या मुलीला त्रास देतोय तो!"

"हो, हो बाबा. कळलं आम्हाला. शांत व्हा आता. मी तुमचे पाय चेपून देऊ का? खूप वेळ ड्राईव्ह करून दुखतात ना?" उर्वीने विचारले.

"बघ बघ कसा विषय बदलतेय!" ते हसत बायकोकडे बघून म्हणाले.

"बाबा, तुम्ही दोघं उद्या घरीच आहात ना? मी कार घेऊन जाऊ?"

"तू काय तिकडे बर्फात वगैरे पळून नाही ना जाणार?" बाबांनी डोळे मोठे करत विचारले.

"अहो!" आईने डोळे दाखवून त्यांना गप्प करायचा प्रयत्न केला.

"हुं! अजिबात नाही. दोन तीन तासांचंच काम आहे. मला ट्रेनने जायचा कंटाळा आलाय."

"पण मी काय म्हणतो, जर हिला त्याच्याशी ब्रेकअप करायचाच आहे तर आधी एकदा आम्हाला भेटव तरी! मग कर काय करायचं ते ब्रेकअप." ते डोळा मारत म्हणाले.

"बाबा, प्लीज चिडवू नका ना."  तिने पाय चेपताना हळूच लहानपणीसारख्या त्यांच्या तळपायांना गुदगुल्या केल्या.

थोड्या वेळाने गुड नाईट म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. आता न राहवून शेवटी तिने कपाटातले गिफ्ट बाहेर काढलेच. उत्सुकतेने थरथरत्या बोटांनी तिने रिबनची गाठ सोडली. आत बॉक्समध्ये स्नो ग्लोबसारखं काहीतरी होतं. तिने तो तळहातात मावणारा काचेचा गोल उचलून पाहिला. तळाशी एक काळ्या ओबडधोबड दगडाचा बेस होता, त्याच्यावर हिरव्या गवताची पाती, मधोमध एक छोटंसं खोड आणि त्याच्या मुळाशी एकमेकांना टेकलेल्या दोन खारकांसारखं काहीतरी होतं. ह्या सगळ्या देखाव्यावर ओतलेली घट्ट, धुरकट गोल काच होती, ज्यामुळे धुक्याचा भास व्हावा. तिने तो ग्लोब उलटा करून पाहिला तर त्या दगडावर स्वर्लिंग लेटर्समध्ये काहीतरी कोरलेलं होतं. तिने ग्लोब जवळ धरून ते वाचलं.

You are summer
    to my winter heart

शेवटी तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलंच. डोळे पुसत तिने त्या काचेवर ओठ टेकले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle