ऐल पैल 1- सुरुवात

तुम्ही लोक खरंच निघून चालला आहात, मला विश्वासच बसत नाहीये. आम्हाला अजिबात करमणार नाही " त्रिशा सुमंत काकूंचा हात हातात घेत म्हणाली.
"काकू खरंच.. रद्द करा शिफ्टिंग बिफ्टिंग, तुमचं घर आमच्यासाठी सेकंड होम आहे! काका, तुम्ही, अजय, दिशा तुम्ही सगळे फॅमिली आहात. मी तर नाही जाऊ देणार तुम्हाला, बस ठरलं" मीनाक्षी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
"पोरींनो आता मी काय करणार, इथून पुढे जिकडे अजय, तिकडे आम्ही. मला मेलीला तरी कुठे सोडावं वाटतंय हे घर, तीस वर्षे राहिलीये मी या शहरात आणि या घरात पंधरा वर्षे. तुम्ही दोघी पोरी आल्यापासून तर मला मुलीच मिळाल्या" काकू म्हणाल्या
" अजय ला मी सांगते, तुला जिकडे जायचंय तिकडे खुशाल जा, आमचे काका काकू आम्हाला हवेत, दिशालाही ठेवून घ्यावं म्हणतेय मी तर" मीनाक्षी तणतणत बोलत होती
त्रिशा आणि काकू दोघी एकमेकींकडे बघत मोठ्याने हसल्या.
" काकू तुम्हा लोकांचं निघून जाणं आमच्या आईबाबांनाही झेपणार नाहीये. आम्ही अजूनही पहिल्यांदा घराबाहेर राहणाऱ्या मुली आहोत त्यांच्यासाठी! आमच्या बाबतीत तुमच्या फार भरवशावर असतात ते ." त्रिशा काकूंनी समोर ठेवलेल्या चकलीकडे नुसतंच बघत म्हणाली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी बँगलोर ला स्थायिक होण्याची कल्पना दिली होती पण आज त्यांच्या निघून जाण्याचा ठरलेला दिवस कळल्यानंतर तिचा मूडच गेला होता.नाहीतर एरव्ही चकली तीही काकूंच्या हातची, तिच्याकडून धीर धरणं म्हणजे अशक्य गोष्ट होती.
" मला तर वैतागल्येय आई! तिने कुठला पदार्थ केला की माझं पहिलं वाक्य "काकू हे असं करतात!" हातातला चिमटा/ लाटणं/ उचटणे जे काही असेल ते फेकून मारते की काय असं वाटतं मला खूपदा. " मीनाक्षी नेहमीप्रमाणे सायलेंट एकपात्री प्रयोगातल्या पात्राने पटापट हावभाव बदलावेत तशी रडक्या मग चिडक्या आणि मग पुन्हा नॉर्मल मोड आली होती.
"अगं बाई! मेले आईला कशाला सल्ले द्यायला जायचं मग , मी तर म्हणते मारायलाच हवं होतं ते फेकून एकदा"
"काकू तुमचं नाव घ्यायचे म्हणून काही वाटायचं नाही तिला, दुसऱ्या कोणाचं असतं तर मारलंच असतं"
"तुला मार द्यायचाच असेल तर हेच कारण कशाला हवंय मीने, दिवसभरात अजून बरेच उद्योग करत असशील तू" त्रिशा बळच मूड लपवत संभाषण चालू ठेवत होती. मनातल्या मनात काका काकू सोडून गेल्यानंतर या मजल्यावर आपल्याला किती एकटं वाटेल याचंच तिला वाईट वाटत होतं. या दोघी राहतात तो फ्लॅट त्रिशा आणि मीनाक्षी गेल्या चार वर्षांपासून शेअर करत होत्या. फ्लॅटचे मालक त्रिशा च्या बाबांचे मित्रच, त्यामुळे कुठल्याही अग्रीमेंट शिवाय हव्या तितक्या काळासाठी त्यांनी त्रिशाला हा 1 bhk फ्लॅट रेंटवर देऊन टाकला होता. त्रिशा पी जी करून हॉस्टेल मधून बाहेर पडली तशी इथे रहायला आली होती. सुरवातीला तिच्या कॉलेज मधलीच एक मैत्रीण तिच्याबरोबर रहायची. नंतर ती सोडून गेली आणि ओळखिंच्या साखळीतुन मीनाक्षी तिथे रहायला आली. तेव्हापासून गेल्या चार वर्षांत दोघींच्या नोकऱ्या, पहिले प्रमोशन्स याच फ्लॅट मध्ये झाले. सुमंत कुटुंब रहायला यांच्या समोरच. तेव्हापासून या सगळ्यांमध्ये जवळीक होती. आता अजयला बँगलोर चं पोस्टिंग मिळालं म्हणून त्यांना सोडून जावं लागणार होतं. पुण्यात त्यांचं अजून एक नवं घर होतं त्यामुळे बँगलोर ला जाण्याआधी हे जुनं घर त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला होता. सेफ्टी गेट च्या आवाजाने त्रिशा विचारांतून बाहेर आली.
दारातून भाजीची पिशवी घेऊन काकांचा प्रवेश झाला.
"काय म्हणतोय अड्डा ? आज कसला ज्वलंत विषय?"
"तुमच्याशी तर बोलायचंय नाहीये मला" मीनाक्षी ताडकन खुर्चीवरून उठली आणि थेट घराबाहेर पडली.
" बापरे, ह्या हिडिंबे ला काय झालं आता" काका मीनाक्षीच्या अशा धाडधुडीने चक्रावलेच.
" काका तिची चूक नाही, तुम्ही लोक आठ दिवसांनी इथे नसणार आहात, हे आज कळतंय आम्हाला. पण मला तुमची काळजी जास्त वाटतेय. अर्ध्या पेक्षा जास्त आयुष्य तुमचं इथे गेलं, आता एकाएकी सोडून जाऊन तिथे परत नव्याने सगळं सुरू करायचं म्हणजेच मोठ्ठा बदल असणार आहे तुमच्यासाठी. मला कळतंय, हे तुमच्यासाठी हे सगळं जरा कठीण असेल, पण उगीच माझं शहर माझे लोक करत बसू नका, नवीन नवीन मित्र मैत्रिणी करा. दक्षिण भारत फिरून या. काकू तुम्ही तिथल्या बायकांशी गट्टी जुळवा आणि भरपूर नवीन डिशेस शिका हा" त्रिशा स्वतःलाच धीर देत म्हणाली.
" हो हो हो , किती सूचना देशील!तुम्हा पोरींची फार आठवण येईल आम्हाला. पोरींनो आम्हा म्हाताऱ्यांकडे चक्कर मारा बरं का एखादी"
" काका नक्की येऊ आम्ही, खास तुम्हा दोघांसाठी.
बरं काका, कोणत्या फॅमिलीला हा फ्लॅट विकला आहे म्हणाला होता तुम्ही? "
समदरीया. ते नवरा बायको दोघे कदाचित एवढ्यात रहायला येणार नाहीत, पण त्यांचा मुलगा येईल एकटा."
"ओह" ऐकूनच त्रिशाला एकदम कसंतरी झालं. काका काकूंच्या घरात दुसरं कोणी राहणार आहे, त्यात तो कोणी बॅचलर मुलगा आहे ही कल्पनाच नको वाटली तिला. डोळ्यांसमोर एकदम अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, न झाडलेल्या रूम्स, न धुतलेले सॉक्स, दोन तीन दिवसांची खरकटी भांडी, सिगारेट्स ची थोटकं, इ जेवढ्या गोष्टी तिने आजवर पाहिल्या होत्या आणि कोणा कोणा कडून ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांसमोर आल्या. स्वतःशीच मान हलवत ती उठली.
" बरं तुम्ही दोघेपण, पॅकिंग, आवराआवरीला सुरुवात केली की आवाज द्या. उद्या परवा मी रिकामटेकडी असते, परवा रविवारी मिनू पण.
चला येते मी"

पाहता पाहता आठ दिवस निघून गेले. सुमंतांच्या शिफ्टिंग च्या तयारीत त्रिशा मीनाक्षीने भरपूर मदत केली. निघण्याचा दिवस आला. त्या दिवशी सोमवारचा दिवस होता पण दोघींनी सुट्टी घेऊन दुपारच्या जेवणासाठी सुमंतांना बोलावून घेतले. छोले भटोरे, काकडीची कोशिंबीर, व्हेज पुलाव आणि गुलाबजामाचा बेत केला. यापूर्वी कित्येकदा त्यांनी अशी एकत्र जेवणं केली होती, आता पुन्हा असं जमायला लवकर मिळणार नव्हतं. गप्पा टप्पा, जुन्या आठवणींना उत आला.जेवणं उरकल्यानंतर त्रिशा मीनाक्षी ने आठवण आणि नव्या घरासाठी म्हणून भिंतीवरचे एक अँटिक डिझाइन असलेले घड्याळ आणि एक चांदीचा गणपती काका काकूंना भेट म्हणून दिले.
" मुलींनो, आता हे तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट , तुमच्या काकुकडून"
काकू एकेक कापडी पिशवी दोघींच्या हातात देत म्हणाल्या.
" या वेळेला ही फॉर्मालिटी अगदी चालेल आम्हाला, तुमची एखादी आठवण म्हणून" त्रिशा म्हणाली
"बघा तरी काढून काय आहे ते"
दोघींनी एकदमच दोन पर्पल रंगाचे हातांनी विणलेले स्लीवलेस क्रोशे जॅकेट्स बाहेर काढले.
" आहा, काकू तुम्ही विणलेत हे? कधी केलंत हे सगळं ? किती सुंदर आहेत !!"म्हणत मीनाक्षी काकूंच्या गळ्यात पडली.
" बऱ्याच दिवसांआधी सुरुवात केली होती. मुद्दामच लपवून ठेवलं होतं. तुमचे असतात तसे फॅशनेबल आहेत ना गं, नाहीतर तुमच्या मैत्रिणी म्हणतील हे काय घातलंय" काकू मीनक्षीच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या.
" काकू खूप सुंदर झालेत हे , अगदी वापरावेत की नाही असं वाटेल. थॅंक्यु काकू" काकूंना मिठी मारताना त्रिशाने हळूच डोळ्यातून ओघळलेला पाण्याचा थेंब पुसला.

काकूंची सून दिशा सगळे निघून गेले तरी थोडा वेळ तिथेच रेंगाळली. दिशा ब्युटीशीयन होती. त्रिशा आणि मीनाक्षी रहायला आल्यापासून ती दोघींची मैत्रिण आणि पर्सनल ब्युटीशीयन झाली होती. अर्थात त्रिशा फारशी त्या वाटेला जाणारी मुलगी नव्हती. महिना दीड महिन्यांनी एक नेहमीची वारी आणि दुसऱ्यांनी दाखवून दिल्यानंतर हेअरकट या शिवाय तिच्या आयुष्यात दुसरा पार्लर टाईम नव्हता. मीनाक्षीचं पाहून कधीतरी लग्न, पार्टी वगैरे कार्यक्रम असतील तर दिशा कडून ती घरच्या घरी हेअर आणि मेकअप करून घेत असे, तिला त्याचे पैसे पण देत असे आणि तिच्या शिव्या खात असे. त्रिशा अशीच होती. जबाबदार, व्यवहारी, मॅच्युअर, स्वच्छता नाझी, काहीशी गंभीर आणि ऑकवर्ड.
तिघी जणी त्रिशा मीनाक्षीच्या बेडरूम मध्ये जाऊन बसल्या. त्रिशाने तिघींसाठी कॉफी करून आणली. अर्ध्या तासात मीनाक्षीचा बॉयफ्रेंड, सगळ्यांचे सेलेब्रिटी क्रश ते ग्लोबल वोर्मिंग पर्यंत सगळे विषय निघाले आणि त्या दिवशीचा त्यांच्या गप्पांचा कोटा त्यांनी पूर्ण केला. तिघी आतापासूनच एकमेकींना मिस करू लागल्या होत्या पण तिघींनी ही मुद्दाम तो विषय काढला नाही. मूव्हर्स पॅकर्स आले तेव्हा बळच त्या बाहेर आल्या. जाताना प्रत्येकाला भरून आलं होतं.
सुमंतांचा सगळा संसार एकेक करून घराबाहेर हलवण्यात आला आणि फ्लॅट सुना सुना झाला. शेवटचं सगळं एकमेकांशी बोलून सुमंत कुटूंब कार मध्ये बसून सामनाच्या गाडी बरोबर निघून गेलं. आता घरात फक्त अस्ताव्यस्त पडलेले काही कागद, सुतळ्यांचे तुकडे, लहानसहान खोके, थोडीफार धूळ एवढंच काय ते बाकी राहिलं.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle