ऐल पैल 5 - पीजे

त्रिशा जिना उतरत बिल्डिंग मधून बाहेर पडली. जून नुकताच लागलेला होता. उरल्यासुरल्या उन्हाळ्यातल्या रात्रीचा आणि अजून सुरू न झालेल्या मान्सूनची चाहूल असलेला असा मिश्र सुखद, गार, नॉस्टॅलजीक वारा होता. उगाचच आपल्या क्रशची, ब्रेकअप ची, किंवा शाळेत असताना या काळात सुरू असलेल्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा! खाली रोजच्यासारखे , रोजचे ठरलेले सोसायटीकर फिरताना दिसत होते. सोसायटी खूप मोठी होती. ए बी सी पुन्हा त्यात ए 1, 2,3 अशा बिल्डिंगस् च्या रांगा होत्या, त्यामुळे मधला आवार कडेकडेने गाड्या पार्क करूनही लांबी रुंदीला मोठा रहात होता. मध्यभागी डिव्हायडर सारखा उपयोग होईल असा एक मोठा, दोन तीन पायऱ्या चढून वर जावं लागेल असा आयत केलेला होता. त्या आयतातच थोडसं लॉन आणि मुलांसाठी दोन घसरगुंड्या , दोन झोके ठेवलेले होते. त्रिशा केसांची हाय पोनी घट्ट करत आजूबाजूचं निरीक्षण करत निघाली. नेहमीच्या एक दोन ओळखीच्या तोंडाना स्माईल केलं.
थोडीशी पुढं जाते तोच तिच्या दिशेने तोंड करून उभा काळा टी शर्ट आणि शेवाळी बरमुडातला क्रू कट एक हात कमरेवर ठेऊन फोनवर बोलत असलेला दिसला. दोघांची काही सेकंद नजरानजर झाली. अचानक त्याला असं समोर पाहून त्रिशा सेकंदभरासाठी थबकली पण सावरून नजर खाली करून पुन्हा चालायला लागली. ती त्याच्या शेजारून जाऊ लागली तसं तो ही त्याच दिशेला वळला आणि एक नजर तिच्याकडे टाकत फोन वर बोलत तिच्या बरोबर चालू लागला. त्रिशाने गोंधळून शेजारी पाहीले.
"जेवण झालं मगाशीच, तू काय केलं होतंस आज" तो बोलत होता.
त्रिशा पुन्हा सरळ बघत कपाळाला आठ्या पाडत चालू लागली, त्याने तिच्याकडे एकदा हसून पाहिलं, चालत राहिला.
"नाही उद्या नाही , पुढच्या विकेंडला येईल, आताच तर शिफ्ट झालोय" तो तिच्याबरोबर चालतच होता.
वैतागून त्रिशा शेवटी थांबली , दोन्ही हात कंबरेवर ठेऊन त्याच्या दिशेने वळाली. ती अचानक थांबलेली त्याच्या पटकन लक्षात आलं नाही, तो जरासा पुढे गेला आणि तिला थांबलेलं पाहून "चल ठेऊ मग, बाय" म्हणत मागे येत पुन्हा तिच्यासमोर येऊन तिची नक्कल करत तसाच कमरेवर हात देऊन उभा राहीला. त्रिशाला त्याच्याकडे पाहण्यासाठी मानेचा विशाल कोन करावा लागला.
"काय चाललंय हे?" तिने जरासं रागात विचारलं
"कुठे काय, तुला शतपावली करायला कंपनी देत होतो" म्हणत त्याने फेक इनोसंट स्माईल केली.
"मी विचारलं?"
" नाही पण तू एकटीच आहेस तर.."
त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत ती ताडताड चालू लागली. तो दोन मोठे पावलं टाकत पुन्हा तिच्या रेषेत येऊन चालू लागला. त्रिशाने स्वतःशीस मान हलवून मोठा उसासा टाकला
"काय शेजारी मिळालेत, झालं का शिफ्टिंग, काही गरज असेल तर सांगा वगैरे सोडाच पण साधी ओळख सुद्धा दाखवत नाहीत!"
"मी नाहीच ओळखत तुला आणि हे सगळं आधीच घराच्या मालकाला विचारून झालंय माझं.
आणि हो, तू शेजारी नाहीयेस, समोर राहतोस"
तो मान वर करत खळखळून हसला.
"गुड वन"
आपण याच्यासमोर या वेळेला पीजे कसाकाय मारला हे त्रिशाला स्वतःलाच समजलं नाही.
"मग, मीनाक्षी नाही आली खाली?"
"ती अजून घरीच आली नाहीये" त्रिशा शक्य तितकं जेवढ्यास तेवढं बोलत होती. तो भेटला तसा सतत तिची खेचतोय हे तिला कळत होतं आणि इरिटेट ही होत होतं. पण तरीही त्याला एकदाच समज द्यावी असा पर्फेक्ट चान्सच तिला मिळत नव्हता. तोवर तिला त्याच्यामुळे इरिटेट होतंय हेही तिला दिसू द्यायचं नव्हतं.
"एवढा वेळ ऑफिस? बराच उशीर झालाय आता" तो हातातलं काळं जी शॉक बघत म्हणाला. घड्याळाच्या खालून मनगटाच्या उजव्या कडेला पीसा चा लाल काळा टॅटू डोकावत होता.
त्रिशा त्याच्या प्रश्नावर गप्प राहीली.
"तू फार कमी बोलतेस असं दिसतंय"
" मला फार बडबड करायला आवडत नाही, जास्त बोलणारे लोकही आवडत नाहीत" दुसरं वाक्य त्रिशा त्याच्याकडे पहात म्हणाली.
यावर तो फक्त मान डोलवत समोर पहात चालत राहिला.
दोघे चालत असताना समोरून सावंत आणि पाटील काकू गप्पा मारत येताना दिसल्या. त्यांना पाहून सावंत काकू पाटील काकूंच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बोलताहेत हे त्रिशाने पाहीलं. झालं, या बायकांना आता हॉट रुमरच मिळाली. अर्थात या काकवांच्या सवयी तिला चांगल्या ठाऊक होत्या आणि तिला त्याने काहीही फरक पडणार नव्हता. जोपर्यंत आपल्यापर्यंत काही गंभीर येत नाही तोवर दुर्लक्ष करत रहायचं ती शिकली होती. त्या हळूहळू जवळ आल्या तशा सावंत काकूंनी आधी नकुल कडे रोखून बघत मग हसून त्रिशाला ओळख दिली.
"काय, शतपावली चाललेय का?"
नाही स्विमिंग करतेय! त्रिशाने जिभेवर आलेले शब्द गिळून टाकले.
"हो, तुमचं झालं जेवण?" काहीतरी विचारायचं म्हणून ती म्हणाली.
"हे काय मघाशीच. हे कोण? नवीन शेजारी वाटतं" नकुलकडे पाहत त्या म्हणाल्या. त्रिशा उत्तर द्यायला तोंड उघडणार तोच नकुल म्हणाला.
"शेजारी नाही, समोर राहतो मी त्यांच्या" काकवांना यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचेना. त्रिशाला करंट लागला, बाजूला बघत तिने बळच हसू दाबलं.
" हाss, म्हणजे सुमंतांच्या फ्लॅट मध्येच ना" सावंत काकू गोंधळत म्हणाल्या.
" हो तिथेच. जुनी सोसायटी छानच होती आमची पण तिथल्या काकवा महा भोचक. शेवटी कंटाळून इकडे आलो. आता इथे कोणी असं भेटू नये म्हणजे झालं"
त्रिशा आता तोंडावर हात ठेवून उभी होती आणि सावंत काकूंचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.
"ठिकेय मग, फिरा तुम्ही" कसंनुसं हसत त्या पुढे निघून गेल्या.
पुढे सोसायटीचं गेट येईपर्यंत दोघांपैकी कोणीच बोललं नाही. ती मागे वळाली तसा तोही वळाला. पुढे परत शांतता. एवढ्या लवकर आपल्या बोलण्याचा परिणाम होईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. पण अजून हा पिच्छा सोडायला तयार नाहीये. पूर्ण दुर्लक्ष केलं की हा एकदाचा कंटाळून निघून जाईल अशा विचारात चालत असताना चपलेखाली मोठा खडा येऊन ती अडखळली की थेट डोकं नकुलच्या खांद्यावर आदळलं.
"मी एकदम ठीक आहे, डोन्ट वरी"
त्रिशाने डोळे घट्ट दाबून राग आवरला.
एवढ्यात वर जाऊन पुन्हा एकटंच बसावं लागेल त्यापेक्षा अजून थोडे मिनिटं खालीच थांबुयात असा विचार करून ती आयताच्या पायरीवर बसली. ती बसली की तोही बसला. त्रिशाने डोळे फिरवले.
" हेट चेंजेस" आजूबाजूला कमी आवाजात चाललेल्या गप्पा, बूट चपला, मधूनच ऐकू येणाऱ्या लहान मुलांच्या उत्साही बडबडीची शांतता भंग करत नकुल म्हणाला.
तो कशाबद्दल बोलतोय हे न विचारता त्रिशा म्हणाली,
" हम्म. मलापण जड जातंय. समोर तुमच्याआधी जे सुमंत कुटुंब राहायचं त्यांच्याशी आमची खूप जवळीक होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले."आता घरी आलं की दुसरीकडेच कुठेतरी आलेय असं वाटतं"
"ओह, असं आहे तर" नकुल त्याच्या पूर्ण उंचीवर उठत म्हणाला."पण जसं तुला माहीतच आहे, आम्ही त्यांना घालवलेलं नाही. ते गेले म्हणून आम्ही रहायला आलो. "
त्रिशा यावर काहीच बोलली नाही.
"हॅपी सफरिंग इन सायलन्स" तो त्याची ठरलेली मोठी स्माईल करत दोन बोट कपाळाला लावून फेक सल्युट करत निघून गेला.
त्रिशा तो जाताना बघतच राहीली. आपण चक्क याला कटवण्यात यशस्वी झालो यावर तिचा विश्वासच बसेना. त्याच्या सो कॉल्ड कूलनेसला आपण हेअर लाईन का असेना पण क्रॅक दिला म्हणून तिचा मूड एकदम खुलला. उभा राहून तिने आधी हात वर करत , मग एकेका बाजूने कंबरेत वाकत स्ट्रेच करून घेतलं. चालताना पजमाला दोन्ही बाजूने हात टाकून चालायला खिसे हवे होते असं तिला वाटलं.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle