ऐल पैल 7 - Sway!

"मीनू... आज संध्याकाळी काकांना कॉल करायचं लक्षात ठेव"
नुकत्याच झोपेतून उठलेल्या मीनाक्षी ला हलवत त्रिशा घराबाहेर पडली. शुक्रवारी कॅज्युअल डे असल्यामुळे तिने आज कॉटन चा प्लेन पोपटी शॉर्ट स्लीवलेस टॉप आणि डार्क ब्लु जीन्स घातलेली होती. आईला कॉल लावून जिने उतरत त्रिशा बिल्डिंग च्या बाहेर पडली. सकाळ आणि त्यातल्या त्यात ही सात-सव्वा सात ची वेळ सोसायटीतले बारके आणि त्यांना बस मध्ये बसवून देण्यासाठी आलेले त्याचे पालक यांच्या गडबडीची असायची. इस्त्रीड कपड्यांमधली, दप्तर वॉटरबॅग सांभाळत चाललेली उत्साही बुटकी मंडळी आणि त्यांना जाईपर्यंत सूचना करणारे त्यांचे आई बाबा किंवा आजी आजोबा हे दृश्य रोज तेच असलं तरी पाहताना तेवढीच मजा येत असायची.
त्रिशा ती परेड पहात आणि एकीकडे आईशी एक दोन दिवसाआड होत असणाऱ्या रुटीन कॉल वर बोलत चालली होती. ती चालत गेटजवळ आली आणि तिला सावंत काकूंबरोबर गप्पा मारत, खिदळत चालत येणारा नकुल दिसला! काय अजब मुलगा आहे! तिने विचार केला. त्या ह्याच काकू ज्यांना नकुल ने काल परवा पहिल्याच भेटीत फटकन बोलून गप्प केलं होतं आणि आज जर तो त्यांच्या घरी जेवताना दिसला तरी नवल वाटणार नाही असा एकंदर माहोल होता. चुकून आपण त्यांना असं काही बोललो असतो आणि आज त्या अशा समोरून येताना दिसल्या असत्या तर आपण तर रस्ता बदलून गेलो असतो! आईच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली. बोलून झालं म्हणून तिने फोन ठेवला तोवर समोरून नकुल आणि काकू बोलत बोलत तिच्या पुढे आले. त्याला पाहून ती ऑकवर्ड झाली. तरीही एका क्विक लूक ने तिने त्याच्या चेहऱ्यावरचे चे भाव तपासले.
"गुड मॉर्निंग त्रिशा! ऑफिसला का?"
त्रिशाच्या मनात आज कुठलंही आडवं उत्तर आलं नाही
"हो! तुमचा वॉक झाला?"
नकुल त्याच्या बर्म्युडा च्या खिशात हात घालून त्रिशा सोडून बाकी सगळी कडे बघत होता, चेहऱ्यावर राग, अटीट्युड नव्हता, काकूंशी जसा बोलत असताना जसा होता तसेच भाव ठेवत शांत उभा राहिलेला होता. आतापर्यंतच्या त्यांच्या भेटीत त्याला एवढं स्थिर ती पहिल्यांदा पहात होती तिला ते चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.
"हे काय झालाच. येता येता जरा दुकानातून ब्रेड घेतला आणि हा भेटला"
त्रिशाने यावर फक्त हसून प्रतिक्रिया दिली आणि पुन्हा चटकन नकुलकडे पाहून घेतले.
"काकू, मी जातो पुढे"
नकुल त्यांचं पुढचं बोलणं तोडत म्हणाला.
" हं हो, जा जा बेटा"
याच काकू परवा त्याला बेरकी नजरेने पहात होत्या! त्रिशाला गंमत वाटली. तोवर नकुल चार पावलं पुढेपण गेला होता.
काकूंना बाय करून त्रिशा निघाली. काल रात्रीचे सुलह बद्दलचे तिचे विचार तिला आठवले.

काल ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिसातून येताना त्रिशा 'Sway' डान्स स्टुडिओत गेली. तिच्या नशिबाने नवी बॅच उद्यापासूनच चालू होणार होती. डान्स च्या बाबतीत फक्त मनापासून आवड सोडली तर ती बाकी शून्य होती. लहानपणी टिव्हीत नाचणाऱ्या हिरॉइन्स ची नक्कल करणे आणि आता घरातल्या घरात गाणे वाजत असेल काहीतरी अर्ध्या मूर्ध्या स्टेप्स करणे एवढाच तिचा डान्सानुभव. त्यात साल्सा चे तिने फक्त यु ट्यूब वर व्हिडीओज पाहिले होते. मूड असेल तर एखादेवेळी त्यातले बिगीनर्स टुटोरियल्स ही तिने ट्राय करून पाहिले होते, पण तेही फक्त टाईमपास म्हणून. यात एक गोष्ट मात्र बरी होती की तिला रोज कार्डिओ आणि स्ट्रेचिंग ची सवय असल्याने ती बऱ्यापैकी फ्लेक्सीबल होती. हेही आधीच आपण थोडेसे चबी आणि त्यात शॉर्ट आहोत म्हणून तिने कायम ठेवले होते. कधी कंटाळा आलाच तर समोर यातलं काही एक न करता शिडशिडीत असणारी आणि उंच मीनाक्षी होतीच!

तिने तिच्या सगळ्या शंका ट्रेनरशी बोलून दूर केल्या. ट्रेनर ने त्याचे मार्केटिंग स्किल्स वापरून त्रिशाला एवढ्या झाडावर चढवलं की पुढच्या महिन्यातच आपण डान्स इंडिया डान्स मध्ये भाग घेऊ शकतो असं तिला वाटलं! शेवटी फी भरण्याचा प्रश्न आला आणि ती पुन्हा अडखळली. तिने आजवर फक्त स्वतःसाठी गरजेच्या गोष्टी सोडून क्वचितच खर्च केलेला होता. करू शकत नव्हती असं नव्हतं पण सेव्हिंग तिची प्रायोरिटी होती आणि त्यात ती असे थोडे फार खर्च ही टाळत असे. अखेर हे पहिलं आणि शेवटचं असा विचार करत तिने अडमिशन करून घेतलं. Sway चं पँफ्लेट घेऊन ती छान मूड घेऊन बाहेर पडली.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle