ऐल पैल 9 - वुडन क्लिप

आशिषने सांगितल्याप्रमाणे त्रिशा आणि मीनाक्षी त्यांच्या घरातून आशिषचं रॅप केलेलं गिफ्ट घेऊन बाहेर पडल्या. त्रिशाने वाइड, फ्रिल्ड नेक असलेला आणि कोपरापर्यंत स्लीवज्ला नेकसारखंच फ्रिल असलेला पिस्ता कलर्ड टॉप आणि नेव्ही ब्लु कप्रि जीन्स घातली होती. हलकासा मेकप आणि तिच्याकडे असलेली एकुलती एक मॅट कँडी पिंक लिपस्टिक तिने हो-नाही करत अखेर लावून टाकली होती. केसांचं मिडल पार्टिशन करून दोन्हीकडून एकेक बट ट्विस्ट करून मागे छोटीशी आडवी वुडन क्लिप लावली होती. मीनाक्षीच्या आवडत्या ब्लड रेड लिपस्टिकमुळे तिच्या फ्लोरल ग्रे ड्रेसकडे चुकूनच लक्ष जात होतं. दोघींनी घरात पाय टाकला आणि एकमेकींकडे बघून मोठ्याने हसायला लागल्या. भिंतीवर लहान मुलांच्या वाढदिवशी लावलेले असतात चक्क तसे फुगे आणि कागदी रिबीनींची सजावट केली होती. हॅपी बर्थडेचं साइन पण टांगलेलं होतं! हा सगळा कोणाचा उद्योग असावा, याचा अंदाज लावण्याचीही गरज नव्हती. त्रिशा मीनक्षीच्या कानात "आय होप ड्रिंक म्हणून त्यांनी रसना ठेवला नसावा" म्हणाली आणि दोघी पुन्हा खुसखुसल्या.
आशिषने त्यांना पाहून "असंच असतं हे"चे एक्सप्रेशन्स दिले. वेल बिल्ट, गोरा घारा बर्थडे बॉय आशिष बॉटल ग्रीन प्लेन टी शर्ट आणि फेडेड जीन्समध्ये आणखीनच गोरा दिसत होता. पार्टी नवीन घराचीही होती, म्हणून दोघींनी ठरवून सकाळी बारीक पांढऱ्या फुलांची डिझाइन असलेल्या काचेचा थ्री पेंडंट्स सिलिंग लॅम्प आणला होता. दोघींनी त्याला गिफ्ट देऊन विश केलं.
डावीकडे मांडलेल्या दोन खुर्च्यांवर मित्र-मैत्रिणीची एक जोडी आधीच येऊन सेटल झालेली दिसत होती. आशिषने दोघींना बसायला सांगितलं. दुसरे दोघे बसले होते त्यांच्या जवळच ठेवलेल्या सोफ्यावर त्या बसल्या. काही दिवसांपूर्वी दोघी साफसफाई करत होत्या, त्यानंतर पहिल्यांदाच त्या या घरात आल्या होत्या. आशिष म्हणाला होता त्याप्रमाणे त्यांचं सामान अगदी कमी होतं. हॉलमध्ये टीव्ही, सोफा, कॉफी टेबल आणि एक पुस्तके किंवा इतर काही गोष्टीं ठेवण्यासाठीचं शेल्फ एवढंच सामान असल्यामुळे हॉल मोठा मोठा वाटत होता. बाल्कनी, आधी जिथे सिंगल झोका असायचा तीही रिकामीच होती. त्रिशाचं सगळीकडे बघून होतंय तोवर मीनाक्षीच्या बाकी तिघांमध्ये मिसळून गप्पा सुरु झाल्या होत्या. त्रिशानेही तिच्याबाजूने थोडीफार भर घातली. पाच-दहा मिनिटे गेली आणि त्रिशा तिथे बोअर होऊ लागली. सोफ्यावरून उठून आतून बाहेर आलेल्या आशिषकडे ती गेली.
"तुम्हाला कशात काही मदत हवीये?"
"नाही अजिबात नाही, तू बस निवांत, आम्ही केलंय सगळं मॅनेज"
"मला बसून कंटाळा आलाय म्हणून विचारतेय" त्रिशा गप्पा मारणाऱ्यांकडे पाहून अगदी हळूच म्हणाली.
"ओके" आशिष हसत म्हणाला. "आतमध्ये नकुल मसाला पाव बनवतोय, त्याला विचारून बघ."
त्रिशा स्वयंपाकघराच्या दारापर्यंत गेली आणि आत हळूच डोकावून पाहिलं. तिथे जाईपर्यंत तिचा हाय असलेला कॉन्फिडन्स त्याला पाठमोरा उभा बघून सपाट झाला. आपल्याला इथे पाहून त्याची काय प्रतिक्रिया असेल, याचा विचार करत ती पुन्हा बाहेर आली, मोठा श्वास घेतला आणि परत मांजरीच्या पावलांनी आत गेली.
लांब उभा राहून तिने अखेर त्याला विचारले.
"तुला काही मदत हवीये? "
प्लेन ग्रे टीशर्टवर घातलेल्या ओपन बटन रेड ब्लु चेक्स शर्टच्या बाह्या वर करता करता त्याने आवाजाच्या दिशेने मान वळवली दोन-तीन सेकंद त्याने त्रिशाला निरखून पाहीले.
"नाही, थँक्स" म्हणत परत पुन्हा पुढे बघून लादीतले पाव वेगळे करू लागला.
"अकच्युली, बाहेरच्या नवीन लोकांशी माझी ओळख नाहीये. तरी मी ट्राय केलं पण मला बोअर होतंय"
त्रिशा जरा धीर एकवटून एकेक पावलं टाकत पुढे येत म्हणाली.
"मग तुला इथेही थांबणं जमणार नाही, मी ही अनोळखीच आहे" दोनेक दिवसांपूर्वी त्रिशा त्याला असं म्हणाली होती ते तिला लगेच आठवलं. आता पुढे बोलून काही उपयोग नाही असा विचार करत ती मान खाली घालून बाहेर जाण्यासाठी वळाली.

नकुल! डोन्ट पुश इट, ती चांगल्या शब्दांत विचारतेय!
नकुल मनाशी म्हणाला.
मोठा श्वास सोडून खाली मान घालत तो म्हणाला
"ठीक आहे"
त्याचा आवाज ऐकून ती गर्रकन मागे वळाली.
"फार काही नाहीये, तुला करायचंच असेल तर मी पाव भाजतोय, तू त्यात मसाला भर"
"ओके" म्हणून ती सिंकमध्ये हात धुवून त्याच्या शेजारी जाऊन उभी राहीली. आफ्टर शेव्हचा जरा डार्क पण हवासा, धुंद करणारा वास आल्यावर तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहून घेतले. क्लीन शेव्हड! तिला मी दि त्री वरचे चॅटस् आठवून हसू आलं. त्याने गॅसवर ठेवलेल्या पॅनवर चमचाभर बटर टाकलं. त्याचा चर्रर्र आवाज त्यांच्यातली शांतता चिरत गेली. तोवर बाहेर कोणीतरी मडोनाचं 'ला इज्ला बोनीता' चालू केलं होतं. तिला तिच्या साल्सा क्लासचा माहौल आठवला. नकुलने एका वेळी तीन चार पाव पॅनवर टाकले होते.
"आय होप तुम्ही खाण्यासाठी अजून काही मागवलं असेल, एवढं तर मी आणि मीनाक्षीच संपवून टाकू" त्याचे पाव भाजून होईपर्यंत ती रिकामीच होती. बर्फ तोडण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली.
"पिझ्झा मागवले आहेत" तेवढं बोलून तो गप्प झाला.
"मग ठिके"
या किचनमध्ये ती आधी कित्येकदा येऊन गेली होती. आता ते तेव्हासारखं भरगच्च आणि फॅमिली टच असलेलं नसलं तरी स्वच्छ, नीटनेटकं होतं.
"तुला माहितीये, म्हणजे.. आपण नव्या घरी रहायला आलो आणि कधीतरी आपलं लहानपण जिकडे गेलंय त्या घरात गेलो किंवा आजोळी गेलो की कसं वाटतं..." तो ऐकतोय की नाही त्याची तिने मान वर करून खात्री करून घेतली. "तसं आता मला इथे आलं की वाटतंय. म्हणजे इथे आधी जे कुटुंब होतं, आम्ही फार अटॅच होतो त्यांच्याशी. ते गेल्यानंतर मी खूप उदास झाले होते. एकानंतर एक गोष्टी होत गेल्या आणि मी तुला..."
"ज्यांना बोलायला आवडत नाही अशा लोकांच्या मानाने तू खूप जास्त बोलतेयस आज" म्हणत त्याने तिच्याकडे रोखून पाहीले.
त्याचा शांत, बेस असलेला आवाज तिला टोचला. ती एकदम गप्प झाली. इथून पळून जावं असं तिला वाटायला लागलं. फक्त एवढ्याशा बोलण्यावरून इतकं हलून जायला आपण एवढे दुबळे कधीपासून झालो असं तिला वाटलं.
तिला बोलून तो पुन्हा त्याच्या कामाकडे वळला होता. पुढचे मिनीट दोन मिनीट कोणी काही बोललं नाही. त्याने तिच्यासमोर ठेवलेल्या पावांच्या लॉटमधून एकेक पाव घेत त्यात मसाला भरू लागली. एवढं होऊन पण तिने पाय रोवून आपली बाजू लढवण्याचे ठरवले.
"मसाल्याचा वास मस्त येतोय" तिच्या सगळ्या भावना लपवत ती म्हणाली.
एव्हाना त्याचे पाव भाजून झाले होते. तो सिंकजवळ गेला, हात धुतले, ट्रॉलीच्या दाराला अडकवलेल्या फडक्याला पुसले आणि "तू कँटीन्यू कर" म्हणत जायला निघाला.
तिला त्यावर काहीच उत्तर द्यावेसे वाटले नाही. ती तशीच दुखावल्या अवस्थेत तिचं काम करत राहिली. तो किचनच्या दारापाशी जाऊन पुन्हा वळला आणि म्हणाला,
"तुझं झालं की ते सगळं तिथंच राहू दे"
आवाज ऐकून तिने समोरच्या शेगडीवरच्या टाईल्सकडे नजर उचलून पाहिले.
"पसाऱ्यासहित. मी नंतर येऊन आवरतो, तू गेस्ट आहेस आमची"
तिने यावर मागे सुद्धा पाहीलं नाही.
तिचं झाल्यानंतर नकुलने बजावलं होतं तसं सगळं तसंच ठेऊन ती हात पुसत बाहेर आली.

बाहेर अजून दोन गेस्ट वाढले होते आणि त्यांनीही हसतच एन्ट्री केलेली तिला आतपर्यंत ऐकू आली होती. नवीन पाहुण्यांमुळे गप्पांना पुन्हा जोर चढला. पूर्ण वेळ नकुल इतरांना कळणार नाही असं तिला इग्नोर करत राहिला. तिथं थांबणं आणि त्याचं वागणं दोन्ही तिला असह्य झालं होतं. बाकीच्यांना विचित्र वाटू नये म्हणून खाणंपिणं चालू होईपर्यंत ती बळंच थांबली. पार्टीत आशिषच्या बर्थडे बम्पस्शिवाय कुठल्याही नेहमीच्या गोष्टी झाल्या नव्हत्या. मागवलेला केक त्यांनी फक्त खाण्यासाठी ठेवला होता. कुठलीही फॉर्मालिटी नसलेली, कोझी पार्टी तिला एकीकडे आवडत होती. पण तिची पूर्ण एनर्जी आपला चेहरा पडलेला दिसू नये यातच चालली होती. तिला अपमानामुळे, भांडण न मिटल्यामुळे, की नकुल ती सोडून सगळ्यांबरोबर अगदी हसून खेळून 'नकुल'सारखा वागतोय म्हणून वाईट वाटतंय, हे तिला कळत नव्हतं.
शेवटी ती तिथून उठलीच. आईला फोन करायचाय असं कारण देण्यासाठी ती मीनक्षीच्या कानापाशी झुकली. नकुल तिच्याशी बोलत नसला तरी तिच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होता. त्यानेही ते पाहिलं. आशिषला पुन्हा एकदा विश करून ती तिथून बाहेर पडली. मीनाक्षी नेहमीप्रमाणे गप्पात गुंग होती. ती घरात आली आणि बेडरूममध्ये गेली. कपडे बदलून ती बेडवर बसून राहीली. नेहमीच्या कपड्यात तिला जरा हलकं वाटलं. पिझ्झाचे कसेबसे दोनच तुकडे तिने इच्छा नसताना खाल्ले होते, मसाला पावाला तर हातसुद्धा लावला नव्हता. भूक भागली नव्हती, म्हणून तिने तिच्यासाठी मग भरून दूध गरम करून घेतलं.

इकडे पार्टीत गप्पांच्या ओघात आपापल्या गावांचा विषय निघाला होता. त्रिशा मीनाक्षी सोडून बाकी सगळे एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे हा प्रश्न मीनाक्षीसाठी होता.
आशिषने मीनक्षीला सहज त्रिशाबद्दलही विचारलं. नकुलने कान टवकारले.
"त्रिशाच्या घरी फलटणला आई आणि एक लहान बहीण असते. तिचे बाबा चारेक वर्षांपूर्वीच गेले. पण प्लिज त्याबद्दल बोललेलं तिला आवडत नाही. मी ही आजवर फार बोलले नाहीये. अजूनही ती त्यांना खूप मिस करते. त्यांच्या घराची जबाबदारी आता एकप्रकारे तिच्यावरच असते"
हे सगळं ऐकून नकुलला धक्का बसला. त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याच्या आणि त्रिशामध्ये एखादी गोष्ट कॉमन असू शकते आणि ती ही असेल! तो स्वतः शाळेत असताना त्याचे वडील गेले होते. तेव्हापासून एखाद्याला आई किंवा बाबा नसणं, ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मॅटर करणारी होती. त्रिशा आतमध्ये असताना त्याला सुमंत कुटुंबांबद्दल, या जागेबद्दल सांगत होती, तेही सगळं त्याने याला जोडून पाहिलं. त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. तिच्याबद्दलचे सगळे समज दूर होऊन नवीनच त्रिशा त्याच्या मनात तयार होऊ लागली होती.

रात्र वाढत गेली तसे सगळे आपापल्या घरी जायला निघाले. मीनाक्षीही घरी आली. त्रिशा बेडरूममधल्या टेबल खुर्चीत बसून वाचण्याचा बळंच प्रयत्न करत होती. नेहमीप्रमाणे मीनाक्षी त्रिशाला ती निघून आल्यानंतर पार्टीत घडलेल्या सगळ्या काही गमतीच्या डिटेल्स सांगू लागली. त्रिशाला ते ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती.
"मीनू, मी जरा खाली जाऊन येते, माझं पोट एवढं भरलंय, जरा फिरल्याशिवाय झोपच येणार नाही."
"ओके, मी खूप थकलेय, आता पडले की झोपूनच जाईन"
"तू झोप, मी बाहेरून लॉक करून जाते"
"गुड आयडिया. अरे हो, काय म्हणत होत्या काकू?"
"काही विशेष नाही. शलाकाच बोलली, तिला टेस्टचं टेन्शन आलं होतं म्हणून बराच वेळ बोलत बसली होती" त्रिशाने मनाला येईल ते सांगितलं.

त्रिशा खाली आली.
सगळीकडे थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या. हवा पण दमट वाटत होती. आपण कोणाला दिसू नये आणि कोणी ओळखीचं आपल्याशी बोलायला येऊ नये म्हणून अंधार पाहून ती पार्किंग लॉटच्या कट्टयावर बसली. त्याच त्या गोष्टींचा विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. रडावंसं वाटतंय पण रडू येईना, अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती. ती दोन्ही हात दोन बाजुंनी कट्टयावर ठेवून मान खाली घालून बसली.
दहा पंधरा मिनिटे तशीच गेली.
..
.
"हाय"
तो आवाज तिला ओळखीचा वाटला.
तिने वर पाहिले तर नकुल तिच्या समोर उभा होता. नेहमीप्रमाणे हात खिशात नव्हते.
ती त्याला एकदम आलेलं पाहून गोंधळलेल्या अवस्थेत उठून उभी राहिली. तो गंभीर दिसत होता आणि तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असल्यासारखा तिच्याकडे पहात उभा होता.
तिला एकदम अवघडल्यासारखं झालं. काहीतरी बोलायचं म्हणून तिने विचारलं,
"गेले सगळे घरी?"
त्याने एक मोठा श्वास घेऊन सोडला.
खाली मान घालून काहीतरी ठरवल्यासारखं करत तिच्याकडं पाहीलं.
"मला चुकीचं समजू नकोस, ओके? याचा काहीच अर्थ नाहीये."
तो काय म्हणाला ते तिला कळण्याआधीच त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं. ती प्रचंड गडबडली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला हात तिच्या पाठीवरून फिरवावासा वाटत होता पण त्याने ती इच्छा आवरली आणि तिच्या खांद्यावर थोपटू लागला. तिच्याकडून तिचं सगळं नियंत्रण सुटत चाललंय, असं तिला वाटलं. फार विचार न करता तिने दोन्ही हात त्याच्याभोवती आवळले. तिच्या एका हाताच्या बोटात धरलेली किल्ली किणकिणली. त्याने ओढल्यानंतर छातीवर लँड झालेलं तिचं डोकं तिने तसंच तिथे घुसळलं. ती कशी रिऍक्ट होईल याबद्दल नकुलला अजिबात खात्री नव्हती, तोवर तो अगदी ताठ, अंग चोरून उभा होता, तिच्या हातांची पकड जाणवताच तो रिलॅक्स झाला. त्याची हनुवटी त्याने तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिच्या डोक्यावर हात नेला. हाताला वुडन क्लिपचा स्पर्श झाला तसा तिचे ट्विस्टस् विस्कटतील असं वाटून त्याने हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला. मघापासून अडलेले अश्रू तिच्या गालावर ओघळले. अशीच थांबले तर इथेच रडायला लागेन, असं वाटून तिने अजिबात इच्छा नसताना त्याच्याभोवतीचे हात काढून घेतले. ते जाणवताच तो तिच्यापासून दूर झाला.
डोळे पुसत, श्वास घेत ती सरळ उभी राहिली. त्याच्याही डोळ्यात पाणी भरलं होतं.
"सो वी गुड?" तिने फुसफूस करत विचारलं.
"वी गुड" घसा साफ करत तो म्हणाला. "चला, वर जाऊयात. राखण करायला आपल्याकडे वॉचमन काका आहेत"
तिला खुदकन हसू आलं.
दोघे जिन्यापाशी आले तेव्हा त्याने तिला विचारले.
"लिफ्ट?"
"नाही, मी जिनाच वापरते"
"चला, आपल्यात एक तरी गोष्ट कॉमन आहे" तो हसत म्हणाला.
त्याचवेळी दोघांच्या बाबांबद्दलचा विचार त्याचा डोक्यात आला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle