रूपेरी वाळूत - १२

अचानक वाजलेल्या मोबाईलच्या रिंगने नोरा विचारचक्रातून खडबडून बाहेर आली. पोटाशी धरून ठेवलेली उशी बाजूला ठेऊन तिने फोन उचलला. अनोळखी नंबर बघून कपाळावर आठ्या आल्या तरी तिने तो उचलला.

"हॅलो नोरा.." त्याचा काही तासापूर्वीचा कॉन्फिडन्ट आवाज आणि आताचा तिचा अंदाज घेणारा शांत आवाज तिला समजला.

"हाय. पलाश?" तिने विचारले.

"हम्म. मी कॉल का केला त्याचं कारण एव्हाना तुला कळलंच असेल." तो म्हणाला.

"हो. घरात राडो सुरू आसा. तुका माजो नंबर खंय मेळलो ?" नोराला आता त्याचाही राग येऊ लागला.

"वहिनीकडून घेतला. आत्ता तुला भेटून काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या पण आता आपण भेटलो तर अजून मोठं स्कँडल व्हायचं म्हणून कॉल केला. आय होप तुला चालेल." पलाशकडून इतका मवाळ आवाज अशक्य होता.

"हम्म! माकापण ह्या कोणी केला हेचो शोध लावचो आसा. तू आधी सांग, तुझी काय ती गझालं? " ती घाईत म्हणाली.

"कोणी केलं हे शोधायच्या आधी आपल्याला दुसरी गोष्ट फेस करावी लागेल. घाबरू नको, शांतपणे ऐक. अप्पांनी तुला आणि तुझ्या डॅडींना संध्याकाळी भेटायला बोलावलं आहे. ते काय बोलणार माहीत नाही पण गावात आपली खूप बदनामी झालीय आणि मी आपल्या दोघांचं खराब झालेलं नाव सुधारलं नाही तर ते रिसॉर्ट माझ्याकडून काढून घेतील. मी माझे सगळे पैसे, सगळे कष्ट रिसॉर्टसाठी घातले आहेत, मी ते कुठल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही." तो ठामपणे म्हणाला.

"मगे?" काहीच न सुचून ती म्हणाली.

"माझ्यामते आपली बदनामी थांबवायचं त्यांच्याकडे एकच सोल्युशन आहे. लग्न!" तो वैतागून म्हणाला.

"व्हॉsssट! नो शिट?!" आता किंचाळायची पाळी तिची होती.

"येस. शिट!" तो म्हणाला. "मला लग्न करायचं नाही. म्हणजे तुझ्याशीअसं नाही, कुणाशीच! ते भेटायच्या आधी आपण काहीतरी सोल्युशन काढू म्हणून मी कॉल केला."

"डिट्टो! पण मला थोडा वेळ हवाय. मी विचार करून मागीर तुका फोन लावतंय." तिच्या डोक्यात आधीच विचारचक्र सुरू झालं होतं.

"ओके." त्याने कॉल कट केला.

तिचा मेंदू हा अचानक पडलेला बॉम्ब प्रोसेस करू शकत नव्हता. तिने किचनमध्ये जाऊन कॉफी करून घेतली. कॉफी भरलेला मग घेऊन तिच्या खोलीत जाताना हॉलमध्ये ममाने तिच्याकडे पाहिले तोच तिने हात दाखवून "ममा प्लीज नंतर!" म्हणून पटकन खोलीत जाऊन दार लावले. गरम कॉफीचे घोट घेतल्यावर तिचं डोकं चालू लागलं.

जरासं हसून त्याचा नंबर सेव्ह करताना तिने Five Star लिहून सेव्ह केला. ममा आणि डॅडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ममा आरडाओरड करेल, डॅडी शांतपणे सांगतील पण त्यांचा डिसीजन एकच असेल. सपोज आम्ही लग्न केलं तरी त्याला काय अर्थ आहे. आम्ही कधीच एकमेकांना टॉलरेट करू शकत नाही. पलाशसारख्या माजोरड्या, खडूस माणसाशी मी पटवूनही घेणार नाही. पण हे लग्न कसे टाळता येईल... ती विचार करत राहिली आणि तिला अचानक काहीतरी सुचलं.

फोन वाजताक्षणी त्याने उचलला.
"पलाश!" तिचा आवाज आला.

"हम्म ऐकतोय.." अजूनही हा खडूसपणाच करतोय, तिने नाक मुरडलं.

"आय हॅव अ सोल्युशन!" ती उत्साहाने म्हणाली.

"काय?"

"लेट्स गेट मॅरीड!" ती पुढे म्हणाली.

"मॅड ऑर व्हॉट!!" हिला खरंच वेड लागलेलं दिसतंय. "तुझं डोकं ठीक आहे ना, नाहीतर माझ्या ओळखीचा एक साकायट्रिस्ट आहे."

"तर? तुझ्या ओळखीचो आसतलोच!" तिने बाण मारायचा सोडला नाही. "माकाय तुझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाय आसा. काय सांगतंय ता आधी आईक. माझ्या घरान सगळे माझ्या लग्नाच्या मागे आसत, आणि मका लग्न करूचा नाय. आय हॅव माय ओन प्रॉब्लेम्स. त्येंका कायव करून माझो सौसार बघुचो आसा सो मोस्ट प्रॉबब्ली डॅडी अप्पांक होय म्हणतले. आयुष्यभर कोणाच्या ट्रॅपमध्ये माका अडकूचा नाय. सो आपण लग्न करूया, दोनय पेरेन्ट्सना खुश करूया आणि एक वर्षान सेपरेट होवया. होपफुली तेवढ्या वेळात जमीन तुझ्या नावावर होईत. एक वर्षान माझी बदली ड्यू आसा ती करून मी दुसऱ्या गावाक जाईन." ती घडाघडा बोलून थांबली.

तो थक्क होऊन ऐकत राहिला. त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हे त्याच्या अगदीच फायद्याचं होतं. "ओके, बट देअर विल बी रुल्स!" तो म्हणाला.

"ऑफ कोर्स. ते आपण भेटल्यावर ठरवू." ती म्हणाली.

"ठीक आहे मग भेटू संध्याकाळी. आय रिअली होप तू ह्यातून माघार घेणार नाहीस." तो जरा काळजीने म्हणाला.

"नोप! बाय." म्हणून तिने फोन ठेवला.

पलाशला सध्या तरी लग्नात काही इंटरेस्ट नव्हता, रिसॉर्टकडे पूर्ण लक्ष देऊन ते वाढवणे एवढंच टार्गेट त्याने स्वतःपुढे ठेवलं होतं. अप्पा आणि आईच्या लग्न करून सेटल हो म्हणून मागे लागण्याला तो फारच कंटाळला होता. त्यामुळेच नोराचे प्रपोजल त्याच्यासाठी अगदी देवाने पाठवल्यासारखे होते.

---

संध्याकाळी नोराने काळजीपूर्वक पांढऱ्या लेगिंग्सवर अबोली कुर्ता घातला. एका खांद्यावरून क्रश केलेली सुती पांढरी ओढणी घेतली. केस नेहमीप्रमाणे उंच पोनिटेलमध्ये बांधले. डोळ्यात काजळ पेन्सिल रेखून आणि ओठांवर चेरी टिंटेड लिप बाम फिरवून ती तयार झाली. घरापासून नाईकांच्या घराची पायरी चढेपर्यंत डॅडी तिच्याशी एक शब्दही बोलले नाहीत याचं तिला जास्त वाईट वाटत होतं. ना त्यांनी कसलं कारण मागितलं, ना काही आरोप केले. ते फक्त दुःखी होते.

डॅडीनी नेहमीचा उभ्या रेषांचा हाफ शर्ट आणि थोड्या सुटलेल्या पोटावर ओढलेली ढगळ पॅन्ट घातली होती. डोक्यावरचे केसांचे पुंजके आता बऱ्यापैकी पांढरे झाले होते. पलाश माडीवरच्या खिडकीत उभा होता. अचानक धडधडत बुलेट अंगणात येऊन थांबली आणि नोरा डॅडींचा हात धरून पायऱ्या चढू लागली. चुडीदारमध्ये ती त्याला वेगळीच गोड, निरागस, सगळ्या जगापासून हिला वाचवायची गरज आहे अशी वाटली. काय पलाश! स्टे पुट..म्हणून त्याने स्वतःलाच चिमटा काढला.

तिला वाटलं नव्हतं पण अप्पांनी त्यांचं मोकळ्या मनाने स्वागत केलं. आधी त्या दिवशी गाय सोडवल्याबद्दल डॅडींजवळ तिचं खूप कौतुक केलं आणि मग मुद्द्याला हात घातला.

"अंतोन, मी ज्या कारणासाठी तुम्हाला बोलावलं ते तं तुम्हाला माहितीच आहे. आपल्या मुलांकडून असं काही होईल वाटलं नव्हतं पण ते झालं." ते गंभीरपणे बोलत होते. पलाश आणि नोराने आपोआप एकमेकांकडे बघून मान हलवली.

"हम्म. अप्पा, माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे पण गावात वाटेल ते बोलणाऱ्या चार तोंडाना मी थांबवू शकत नाही." डॅडीनी सुस्कारा सोडला. नोराच्या चेहरा थोडा का होईना खुलला.

"मला वाटतं ह्यांचं लग्न झालं तर लोकांची तोंडं आपोआप बंद होतील. नाहीतर अफवा काय कुठच्यापण लेव्हलला जाऊ शकतात, पण शेवटी निर्णय त्याना दोघांना घ्यायचा आहे." अप्पा सरळच म्हणाले. शिरिषदादाने त्यांच्या शेजारीच बसून मान डोलावली. गार्गी आतून पळत येऊन त्याच्या मांडीवर चढून बसली.

"तुमचं म्हणणं बरोबर आहे पण जातीधर्माचे काय? लोक तसेपण बोलतील" डॅडी म्हणाले.

"जातीधर्माचा विचार करायची आता वेळ नाही. नोरा आमच्या घरात आली तर आम्ही तिच्या धार्मिक गोष्टी थांबवणार नाही. आमच्यात तिला हौसेने सामील व्हायचं असेल तरी थांबवणार नाही. तिला हवं तसं तिने वागावं फक्त पलाश इतकाच तिने आमचा आदर करावा एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी हे घर तिचेच असेल, वेगळं काही नाही." अप्पा तिच्याकडे बघून जरा हसून म्हणाले.

नोरा वरवर हसली खरी पण आपण जे करणार आहोत त्याची तिला थोडी लाजही वाटली.

आतून शर्वरी वहिनी चहा घेऊन आली आणि तिने सगळ्यांच्या हातात कपबश्या दिल्या. आई मधल्या दारात उभी होती. अप्पांची आणि तिची नजरानजर झाली.

"तुम्ही दोघा ठरवताय ता ठीक आसा पण ह्या दोघांकनी ठरवूनदे एकदा काय ता." आई पलाशकडे बघत म्हणाली. त्याने तिच्याकडे हसून बघत ओठांनीच थॅंक्यू म्हटले.

"बरं, तुम्हाला काय बोलायचं असेल तर आत जाऊन बोला." अप्पा म्हणाले.

पलाश खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याला अजूनही हे सगळं खरंच घडत असल्यासारखे वाटत नव्हते.

नोराचीही तीच अवस्था होती. आपण ठरवलंय खरं पण आता मागे हटणंसुद्धा शक्य नाही ह्या विचारात ती होती. पलाशने जरासा घसा खाकरल्यावर तिने चमकून त्याच्याकडे बघितले.

"पलाश, तुम्ही दोघे वर जाऊन बोला, मी चहा तिकडेच पाठवते." वहिनी दोघांकडे हसून बघत म्हणाली.

पलाश पुढे होऊन जीना चढू लागला, नोरा त्याच्या मागे होती. त्याने मागे वळून तिच्याकडे बघितले. काचेच्या कौलातून मावळतीच्या उन्हाची एक लालसर तिरीप त्याच्या चेहऱ्यावर पडली होती. आज सेट न केलेले त्याचे चमकते केस, मधाळ डोळे, गालावर उगवलेली दोन दिवसांची बारीक स्टबल आणि नेहमीचं डॅझलिंग स्माईल! तिला अजूनही स्वप्नात असल्यासारखंच वाटत होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle