बदतमीज़ दिल - १

लायझॉलच्या फेक लॅव्हेंडर वासाने हवा भरून टाकत सफाईवाल्याचा मॉप पुढे सरकला. जिकडे तिकडे फक्त नर्सेसच्या चटचट चालणाऱ्या पावलांचा आवाज वगळता शांतता पसरली होती. कोपऱ्यातील एकुलत्या पामच्या झाडानेही दमून पाने जमिनीकडे झुकवली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना डॉक्टरांच्या केबिन्स होता. एकेक दार पास करत सुबोध त्याला हव्या त्या दारासमोर थांबला आणि समोरच्या स्टील नेमप्लेटकडे बघून एक खोल श्वास घेतला.

Dr. Anish Pai
MS (Gen Surg.) M.Ch (Cardiovascular & Thoracic)

थरथरत्या हाताने त्याने दारावर हळूच नॉक केले.

"येस?" आतून आवाज आल्यावर कोरड्या पडलेल्या ओठांवर जीभ फिरवून तो आत शिरला.

"गुड मॉर्निं.. अं सॉरी... गुड आफ्टरनून डॉक्टर." त्याने बोलायला सुरुवात केली.

अनिशने फाईलमध्ये लिहिता लिहिता थांबून त्याच्याकडे पाहिले.

"अम्म्म, मला अ‍ॅक्चुली... रिझाईन करायचं आहे."

अनिशने आता मान नीट वर करून त्याच्या नव्या सर्जिकल असिस्टंटकडे निरखून बघितले.

"का?"

सुबोधच्या कपाळावरून घामाचा एक थेंब ओघळला. उत्तराची खरं गरजच नव्हती.

पण अनिशच्या मते त्यांचं बरं चाललं होतं. हा आधीच्या असिस्टंटइतका रडलाही नव्हता.

"तुम्ही एक चांगले सर्जन आहात."

अनिशच्या भुवया उंचावल्या.

"आय मीन बेस्ट सर्जन! खरंच. म्हणूनच मी हा जॉब स्वीकारला होता. मला निदान काही महिन्यांचा चांगला एक्सपिरीयन्स मिळेल म्हणून. तुम्ही किती टफ बॉस आहात, सगळे असिस्टंट तुम्हाला घाबरून असतात ते माहीत होतं."

"गेट टू द पॉईंट!"

त्याच्या कपाळावरच्या आठीकडे बघत सुबोधने आवंढा गिळला. "पॉईंट इज.. मी आता हे प्रेशर, एवढा स्ट्रेस सहन नाही करू शकत. मला रात्री झोप लागत नाही. मला वाटत होतं मला काम जमेल पण शक्य नाहीये." त्याने थांबून जमिनीकडे नजर टाकली.  "ही माझी टू वीक नोटीस" त्याने हातातला कागद डेस्कवर ठेवला.

काही बोलण्याआधीच सुबोधच्या मागे शुभदा हातात फाईल घेऊन येत उभी राहिली. ओह, म्हणजे पुढचा पेशंट हजर आहे. दोन वर्षांचा विहान. तो सहा महिन्यांचा असताना डॉ. अनिशनेच त्याच्या हृदयात शंट प्रोसिजरने रक्ताभिसरण सुरू ठेवले होते. आता विहान मोठा झाल्यावर ओपन हार्ट सर्जरी करून तो शंट बंद करायचा होता.

"दे आर इन कॉन्फरन्स रूम थ्री." ती नाकावरचा चष्मा वर करत म्हणाली. जाताजाता तिने सुबोधकडे रोखून पाहिले. अनिशने हॉस्पिटल जॉईन केल्यापासून शुभदा त्याची विश्वासू सेक्रेटरी होती. तिच्याइतकी एफिशियंट सेक्रेटरी आख्या हॉस्पिटलमध्ये कोणीही नव्हती.

"थँक्स शुभदा." अनिशने मान हलवली आणि खुर्ची मागे सरकवून उभा राहिला.

"डॉक्टर प्ली ssज मला रिलीज लेटरमध्ये चांगला रिव्ह्यू द्याल ना?" घाईत दार उघडून तो बाहेर पडताच सुबोध मागून ओरडला.

अनिश उत्तर देण्याची तसदी न घेता फाईल वाचत पुढे गेला. विहानचे रिसेन्ट स्कॅन रिपोर्टस काही कॉम्प्लिकेशन्स दाखवत होते. आधीच दोन डॉक्टरांनी त्याला ट्रीट करायला नकार दिला होता. तो कॉन्फरन्स रूमचा दरवाजा ढकलून आत गेला. विहानचे आईवडील जरा घाबरूनच बसले होते. त्याच्या आईच्या फिकुटलेल्या चेहऱ्यावर डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. तिचा हात धरून विहानचे वडील तिला धीर देत होते. शेजारच्या खुर्चीत विहानला बसवलं होतं, त्याच्या नाकाखाली ऑक्सिजनची नळी होती.

"हॅलो डॉक्टर" त्याला बघून विहानचे वडील किंचित उठत म्हणाले. "विहान, बघ बघ डॉक्टरकाका आले!" विहान खुर्चीत सरळ होत त्याच्याकडे बघून खळी पाडून हसला पण तेवढ्यानेही त्याच्या श्वासाची घरघर वाढली. अनिशच्या मनात कालवा कालव झाली. गेल्या दहा वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्याने अश्या बऱ्याच केसेस हँडल केल्या होत्या तरी अजूनही लहान मुलांच्या केससाठी त्याच्या मनात ओलावा टिकून होता. यू डिझर्व समवन फायटिंग फॉर यू, मी करेन. सुबोधसारख्या घाबरटांची गरज नाही. मी नवीन चांगला असिस्टंट शोधून काढेन. जास्तीत जास्त चार दिवस!

----

विहानच्या अपॉइंटमेंटनंतर त्याला लंचसाठी वेळ मिळाला. डॉक्टर्स लाऊंजमध्ये जाऊन त्याने थोडं ग्रील्ड चिकन, करी आणि राईस वाढून घेतला आणि कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसला. डॉक्टर्स लाऊंज म्हणजे कॉलेज कँटीनचंच लग्झरी रूप होतं. एक भाग डायनिंग रूम आणि दुसरा भाग आराम करण्यासाठी बेड ठेवलेली चेंबर्स होती. ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पंधरा स्पेशालिटी कव्हर करणारे पन्नासेक सर्जन होते आणि प्रत्येकाची काही ना काही खोडी होती. इव्हन अनिश! तो पार्ट मासोशीस्ट आणि पार्ट परफेक्शनिस्ट आहे. त्याला स्वतःचा एक हिरो कॉम्प्लेक्स आणि भरपूर इगो आहे. जो प्रत्येक सर्जनला असावाच लागतो. नाहीतर कोणी आपलं हृदय दुरुस्त करायला एखाद्या डळमळीत माणसाहाती कशाला देईल.

"व्हॉट्स अप पै? परत असिस्टंट गायब?" डॉ. शेंडे त्याच्याजवळून पास होता होता थांबला. "मी ऐकलं त्या मुलाची केस तू घेतोयस, मी बघितले त्याचे रिपोर्ट्स. नॉट प्रिटी!"

शेंडे फक्त वयाने त्याच्या जवळपास होता पण बाकी त्यांच्यात काहीही साम्य नव्हतं. शेंडेचा पूर्ण फोकस जास्तीत जास्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणे एवढाच होता आणि कार्स आणि त्याची ती प्लास्टिक बायको.

अनिशने फक्त खांदे उडवले. हातातल्या आयफोनवर तो विहानसारख्या जुन्या केसेस वाचत होता.

"मग असिस्टंटशिवाय सर्जरीचं काय?" शेंडेने अजून नाक खुपसले. अनिश लक्ष देत नाही बघून तो बाकीच्या ग्रुपकडे वळून हसला. "तुम्हाला माहितीये, स्टाफ लाऊंजमध्ये डॉ. पैंच्या फोटोला डेव्हील हॉर्नस आणि शेपूट काढून नोटीस बोर्डवर लावलाय!"

"प्लेझर इज माईन, ऑलवेज." त्यांच्या हसण्यात हसू मिसळून अनिश उद्गारला.

कोपऱ्यात बसलेले डॉ. आनंद उठून त्याच्याशेजारी खुर्ची ओढून बसले. "माईंड इफ आय लुक?" ते टेबलवरच्या फाईलकडे बघत म्हणाले.

"गो अहेड." अनिश खाता खाता म्हणाला.

"यू इंटिमिडेट हिम! मुझे ये कहना नही चाहीये लेकिन इंटर्नशिप के लिये हमने उसे रिजेक्ट करके तुम्हे लिया था तबसेही उसे तुमसे प्रॉब्लेम है!" डॉ. आनंद त्यांच्या जाडजूड पांढऱ्या मिशीवरून हात फिरवत म्हणाले.

" आय डोन्ट नीड थेरपी डॉक्!" तो भुवया उंचावून बघत म्हणाला.

"ओके ओके!" ते हसत पुढे बोलू लागले. "ठीक है. फिर तुम्हारा दुसरा प्रॉब्लेम. इस साल कितने सर्जिकल असिस्टंटने धूल चाट ली? तीन?"

पाच. अनिश मनात म्हणाला.

"मेरे सर्जरीमे लास्ट सिक्स यर्ससे एकही असिस्टंट है. OT मे मुझे क्या चाहीये उसे पहले ही पता चल जाता है. बहोत पंक्चुअल अँड व्हेरी शार्प! दॅट मेक्स मी अ बेटर सर्जन. गेट माय ड्रिफ्ट?"

अनिशने कंटाळून त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. ते हॉस्पिटलमध्ये सिनियर असतील पण त्याचे बॉस नव्हते.

त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते बोलतच राहिले. "एक लॉयल टीम होना बहुत जरुरी है. तुम लोगोंको ट्रेन करनेमे कितना टाइम वेस्ट करोगे? सोचो फिक्स टीमके साथ तुम कितना कुछ अचीव्ह कर सकते हो."

अनिश आता वैतागला. त्यांचा मुद्दा बरोबर होता. त्यालाही तेच वाटत होतं पण प्रॉब्लेम तिथेच होता. त्याच्याबरोबर टिकणारा असिस्टंट त्याला अजून मिळायचा होता.

क्रमशः

--

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle