बदतमीज़ दिल - २

"दीss द, अजिबात टच करू नको. रिंकल्स पडतील.." नेहा तिचा गालाकडे जाणारा हात धरत ओरडली.

ओके ओके...  म्हणत तिने दोन्ही हात पुन्हा मांडीतल्या उशीवर ठेवले आणि समोर लॅपटॉपवर स्क्रब्ज घालून किस करणाऱ्या डॉक्टरांकडे लक्ष दिलं. किस जरा जास्तच स्टीमी व्हायला लागल्यावर तिने स्क्रीन खाली केली.

"नेहा, खरं तर मी तुला ग्रेज दाखवायला नको होती. एज अप्रोप्रिएट नाहीये. तुझे कोणी फ्रेंड्स बघतात का ग्रेज?"

"कमॉन दी! मी एटीन प्लस झाले आता. आपण हे सगळे सिझन्स हजारो वेळा बघितलेत. आणि तसेही याहून जास्त गोष्टी माझे क्लासमेट्स रिअल मध्ये करतात." नेहा नाक उडवत म्हणाली.

"नाक जास्त उडवू नको, रिंकल्स येतील!" म्हणून ती गालात हसायला लागली. "पण सिरियसली प्रॉमिस मी, कॉलेज संपेपर्यंत तू असं काही करणार नाही."

"उफ! यू नोs मी दीदा! पिंकी प्रॉमिस" म्हणत तिने लहानपणीसारखी करंगळी टेकवली.

"गुड!" दोघींच्याही तोंडावरचा नेहाने इंस्टावर बघून, हळद, कोरफड आणि बऱ्याच कायकाय गोष्टी घालून केलेला पिवळा, लिबलिबित पॅक आता वाळत आला होता. ह्याने जर पिंपल्स आल्या तर ते तोंड घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं तिला टेन्शन आलं होतं. अजून वेळ न घालवता ती उठून बेसिनकडे गेली. तोंड धुवून समोर आरशात बघताच मागे नेहा हजर होतीच.

" तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी मॅकड्रीमी, स्टिमी वगैरे असतील ना!" नळ पकडत नेहा मध्ये घुसली. "आणि असं होतं का, लॉकर रूममध्ये किसेस, सर्जरीमध्ये नजरोसे मिली नजरे वगैरे?"

"पळ! एकतर तिथे मोस्टली सगळे सर्जन म्हातारे आहेत. सगळे इतके बिझी असतात की किस काय स्माईल करायला वेळ नसतो आणि ग्रेज वगैरे सगळं स्क्रिप्ट आहे. टीव्हीसाठी फेक ड्रामा. असं काही खरंखरं होत नसतं."

"हम्म, तरीच तू सिंगल आहेस!" नेहा तिला वेडावून मारून पळाल्यावर ती किचनमध्ये गेली. "थांब तुला आज उपाशीच ठेवते." ती मोठ्याने म्हणाली.

"सॉरी दी, प्लीज तो अंडा मसाला कर ना.." नेहा चष्मा लावून लॅपटॉप पुन्हा उघडत ओरडली.

तिने एव्हाना गार झालेली अंडी सोलायला घेतली.

"पण सिरियसली, एकही मॅकड्रीमी नाही?"

"एक आहे तसा.. " कवचाचा टोकदार तुकडा नखात जाऊ न देण्याच्या प्रयत्नात तिच्या तोंडून निघून गेलं.

"कोण? कोण??" पटकन आत येऊन तिच्या हातातलं अंडं बाजूला ठेवत नेहा ओरडलीच.

"मला नाव नाही माहीत." पहिलं खोटं.

"कसा दिसतो? " नेहाने चष्म्यातून उत्सुकतेने डोळे मोठे करत विचारलं.

"ठीकठाक! उंच. ब्राऊनिश केस ब्राऊनिश डोळे.." तिने खांदे उडवले. दुसरं खोटं. प्रचंड हँडसम हे म्हणायचं तिने टाळलं. आणि प्रचंड उद्धट आणि खत्रूड हे शब्द कसेबसे तोंडाबाहेर येऊ दिले नाहीत.

"नेम? सरनेम?"

नाही माहीत. परत खोटं.

एव्हाना नेहा हॉस्पिटलची वेबसाईट उघडून प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर्स चेक करत होती.

"कुठलं डिपार्टमेंट?"

आता एकच हत्यार, डायव्हर्जन. "नेहा, तुझ्यासाठी मीठ मिरी घालून दोन अंडी वेगळी ठेवलीत. पटकन खा."

नेहा लॅपटॉप उचलून आतच आली आणि टेबलवर ठेऊन बसली. तिचे हात बटनांवर वेगात चालत होते. आणि शूअर इनफ जोरात श्वास घेतल्याचा आवाज आला. "सापडला!!" तिच्या पोटात खड्डा पडला.

"डॉ. अनिश पै" नेहा बायो वाचत सुटली. "ग्रँट मेडिकल मधून एम बी बी एस आणि एम एस पण तिथेच. नंतर अमेरिकेत जाऊन पण एकदोन डिग्री आहेत. ब्ला ब्ला. मला काय करायचंय.. पासपोर्ट सोडून दुसरा फोटो पण नाहीये."

"डॉ. पै? हम्म, असेल मेबी.." ती अभिनयाची परमावधी साधत म्हणाली.

"कार्डिऍकमध्येच आहे. आणि तुला माहीत नाही? गंडवू नको दी!"

नेहा डिटेक्टिव्ह बनून खणतच सुटली होती. ती इतकी मागे लागण्याचे कारणही तिला माहिती होते. बारावीच्या परीक्षेनंतर झालेला पपांचा अपघात, ते गेल्यावर मम्मी कोलमडून जाणं, त्यामुळे अचानक आलेले आर्थिक संकट, मेडिकलसाठी फीचे पैसे नसल्यामुळे बदललेला तिच्या शिक्षणाचा ट्रॅक. मेडिकल एन्ट्रन्सला परफेक्ट मार्क्स पडूनसुद्धा तिने बी एस्सी सर्जिकल टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेतली आणि डिग्री मिळताच हॉस्पिटल जॉईन करून कमावती झाली. मम्मी अशीच विझत विझत शेवटी गेलीच पपांना भेटायला वर. त्यानंतर गेली सहा वर्ष नेहाला तिचे मम्मीपप्पा दोन्ही होऊन वाढवण्यात घातल्यामुळे ना तिला काही सोशल लाईफ उरलं होतं, ना रिलेशनशिप्स. नेहाला या गोष्टींचं वाईट वाटत होतं की तिच्यामुळे मोठ्या बहिणीचं आयुष्य उदास होत चाललं आहे.

पण तिला असं वाटत नव्हतं, मम्मी पपा गेल्यानंतर तिच्यासाठी नेहाला व्यवस्थित वाढवणं एवढीच गोष्ट अग्रस्थानी होती. भले त्यामुळे तिला कोणी मित्र मैत्रिणी उरले नव्हते. तिचा सगळा वेळ हॉस्पिटल शिफ्टस आणि स्वयंपाक, कपडे, भांडी, किराणा, सफाई, बिले भरणे यातच संपत होता. एकच गोष्ट बरी आहे ती म्हणजे मुंबईत हे स्वतःचे लहानसे चार खोल्यांचे घर जे बाबा त्यांच्यासाठी ठेऊन गेले, निदान घरभाडं वाचलं.

पपांचे सेव्हिंग आणि इन्शुरन्सचे पैसे सगळे मम्मीची ट्रीटमेंट आणि तिच्या शिक्षणातच संपून गेले होते. आता तिचा पगार चांगला असला तरी बराचसा लोनचे इएमाय, इन्शुरन्स, नेहाच्या फीज, सेव्हिंग यातच संपून जात होता. तिच्या मते रोमान्स, रिलेशनशिप वगैरे सोडता तिचं चांगलं चाललं होतं. डॉक्टर झाली नाही तरी तिचं फिल्ड तिला आवडत होतं...

"इंस्टावर नाही.. च्च, सक्स! आणि ग्रँट मेडिकलच्या वेबसाईटवरपण कुठे फोटो नाही." म्हणत नेहाने पासपोर्ट फोटोच झूम केला.

तिने मुद्दाम डोळे चकणे करून फोटोकडे पाहिले.

"दिss दी! तुझ्यात थोडी जरी हिम्मत असेल ना तर ह्या माणसाला उद्या डेटसाठी विचार." नेहा हाताची घडी घालत म्हणाली.

"व्हॉट?!" ती हसायलाच लागली. "डॉक्टर्स वेगळ्या लीगमध्ये असतात आणि आम्ही वेगळ्या. मध्ये एक मोठी बॉर्डर असते. भारत पाकिस्तानसारखीच."

जेवण होऊन तिने कपड्यांचा मोठा लोड मशीनला लावला तरी तिला नेहाच्या बोलण्यावर हसू येत होतं. विचार करता करता पाठीवर रुळणारे रेशमी केस धरून तिने घट्ट हाय पोनीत अडकवून टाकले.

डॉ. पैना मी माहितीसुद्धा नाहीये. ते हॉस्पिटलमधले सगळ्यात तरुण आणि हुशार सर्जन आहेत पण तेवढेच रूड आणि अग्रेसिव्ह आहेत. त्यांना विचारण्यापेक्षा खुद्द मॅकड्रीमीला डेट करणंही सोपं आहे.

----

"बाssय! दुपारी कॉलेजमधून आल्यावर जेऊन घे, दार नीट लाव. झोपा काढू नको" शूज घालता घालता ती दारातून ओरडली आणि दाराबाहेरची ऍक्टिवा काढून निघालीसुद्धा. स्टाफ पार्किंग सहा वाजताही भरलेलं होतं. गाडी पार्क करून गुणगुणत ती लिफ्टमध्ये शिरली.

सकाळी आठच्या सर्जरीसाठी तिची शिफ्ट सहाला सुरू झाली. समोर असलेल्या दोन तीन नर्सेसना हाय म्हणत नेहमीप्रमाणे फोनवर बिझी असलेल्या शुभदाला हसून हात दाखवून ती आत गेली. स्टाफ लाऊंजमध्ये तिने कपडे बदलून नेव्ही ब्लू स्क्रब्ज चढवले. लांब पोनिटेल गुंडाळून घट्ट अंबाडा बांधून वर बारीक फ्लोरल डिझाईनची सर्जिकल कॅप घातली. कपडे लॉकरमध्ये टाकताना तिचं लक्ष समोर नोटिसबोर्डकडे गेलं. डॉ. पैंच्या फोटोला लाल मार्करने काढलेली शिंग नि शेपूट चमकत होते. दोन दिवसांपूर्वी लंच करता करता रडणाऱ्या सुबोधला शांत करत तिनेच केलेला उद्योग तिला आठवला आणि ओठ चावून ती वळली. दाराजवळ जाऊन स्टाफ बोर्डवर

सायरा देशमुख, सर्जिकल असिस्टंट

समोरचं हिरवं बटन दाबलं आणि ती बाहेर पडली.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle