बदतमीज़ दिल - २७

त्याने फोन ठेवताच तिने नेहाबरोबर बसून पूर्ण कॉलचं सगळ्या बाजूंनी डिसेक्शन केलं.

कदाचित त्याला खरंच त्या नीट घरी पोचल्याची खात्री करायची असेल.

कदाचित त्याला महत्त्वाचं काही सांगायचं असेल पण ऐनवेळी त्याने पाऊल मागे घेतलं.

कदाचित हा नुसता फ्रेंडली कॉल होता.

फ्रेंडली! फ्रेंड्स! फ्रेंडशिप! अचानक ह्या सगळया शब्दांचा तिला प्रचंड राग येत होता.

तिने अक्खा रविवार त्याच्या विचारात घालवला. त्याने तिला लवकर निघायची परवानगी देऊन वर आणखी कार ऑफर करणं.. इतका मृदू मनाचा कधी झाला हा?! फोनवरचा त्याचा सेक्सी आवाज तिला पुनःपुन्हा आठवत होता. तिने न राहवून घरी डच ट्रफल पेस्ट्रीसुद्धा बेक केली. कारण ती खाताना तिला तो आठवत होता. किती मूर्खपणा! आय नो! ती खाताखाता काल तो तिच्याकडे बघत असतानाचे डोळे आठवत होती. त्या पेस्ट्रीचा शेवटचा तुकडा नेहाने रात्री संपवला तेव्हा तिला रडू येणंच बाकी होतं.

मला बहुतेक वेड लागतंय.

सेक्शुअल अट्रॅक्शन खूप वेळ दाबून टाकल्यामुळे माणसं वेडी होत असतील का? होतातच बहुतेक.

खरं सांगायचं तर, तो ते ऍग्रीमेंट इतकं सिरीयसली पाळेल माहिती असतं तर कदाचित मी ते बनवताना सतरा वेळा विचार केला असता! इतक्या कमी वेळात एवढ्या सगळ्या घटना घडत गेल्या की मी जरा गांगरून गेले होते. मला थोडा शांत डोक्याने विचार करायचा होता, पण डोकं शांत सोडून सगळं काही आहे. उलट त्यात विचारांची रस्सीखेच सुरू आहे. अनिशचे विचार, तो किस आणि तो ते ऍग्रीमेंट खरं मानून पाळतोय ह्याचा त्रास, डोक्यात कल्लोळ सुरू आहे.

सोमवार उगवला. सर्जरीत ते समोरासमोर होते. ती स्टेप बाय स्टेप त्याला हत्यारे देत होती. हे काम डोळे मिटूनही जमणारं होतं त्यामुळे तिचे विचार जरा नको तिकडे भरकटले. अनिशने रविवारी काय केलं ते तिला जाणून घ्यायचं होतं. तो इतका हँडसम आहे. स्क्रब्जसारख्या डल कपड्यांमधूनही त्याची मस्क्यूलीन स्ट्रेंथ जाणवतेय. स्मोकिंग हॉट! OT मध्ये तो साक्षात देव आहे. बाहेरच्या जगात बायका त्याच्याबद्दल काय विचार करत असतील, तिला उत्सुकता होती. तो जर एकटा बारमध्ये गेला तर डेफिनेटली त्याला कोणी ना कोणी भेटेल. ह्या विचारानेच तिच्या पोटात कसंतरी झालं. तो कधी बाऊन्समध्ये जातो का? हॉस्पिटलच्या समोरच तर आहे. नक्कीच जात असेल, त्या दिवशी शर्विलने त्याला तिथेच तर बोलावलं होतं.

अनिश आता सर्जरीच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर आला होता.

"तुमचा संडे कसा होता डॉ. पै? गुड?" अचानक तिने विचारलेच.

त्याने पटकन तिच्याकडे बघितले. त्याचे रोखून बघणारे डोळे सर्जिकल ग्लासेसही थांबवू शकत नव्हते. "फाईन! प्रॉडक्टिव!"

ओह नो, प्रॉडक्टिव?! म्हणजे काय.

"अच्छा! म्हणजे भरपूर काम केलं का?"

"हम्म."

एकच शब्द. मला राग येतोय.

"बोवी प्लीज."

तिने बोवी उचलून हात पुढे केला. सर्जरी संपेपर्यंत ती गप्पच राहिली. एव्हाना तिची जळून हालत खराब झाली होती. त्याला कोणाची कंपनी मिळाली असेल तर.. तिला जाणून घ्यायचं होतं.

नाही, मला नकोय ती माहिती. मी त्याच्याकडून ऍग्रीमेंट साइन करून घेतलं की आमच्यात टचिंग,फ्लर्टिंग, किसिंग काही होणार नाही आणि तो दुसऱ्या कुठल्या बाईबरोबर हे सगळं करेल म्हणून आता मी चिडतेय, नॉट फेअर! ती जोरजोरात स्क्रब करताना स्वतःवरच चिडत होती. स्क्रबिंग संपवून ती बाहेर आली तेव्हा तो नेमका पॅसेजमध्ये एका सुंदर नर्सशी बोलत होता.

ओह गॉड! मला उलटी येईल आता.

नर्स सुंदर होतीच पण तिने सायरा कधीही करू शकत नाही असा छान सटल मेकअप केला होता. लिपस्टिक, भरपूर मस्कारा. त्यांच्या दिशेने चालताना तिने पोनीटेल घट्ट केली. तिला खरं उलट फिरून मागे जायचं होतं पण लिफ्ट त्यांच्याच दिशेला होती. तिने मन घट्ट केलं, खांदे ताठ केले आणि लिफ्टकडे चालत राहिली.

नर्स त्याच्या जवळ जाऊन काहीतरी बोलली आणि अनिश नर्सकडे बघून हसला हे तिच्या डोळ्यांनी टिपले. त्यांनी एकत्र घालवलेल्या इतक्या महिन्यात तो तिच्याकडे बघून हसलेलं हाताच्या बोटावर मोजता येईल! तिला भिंतीवर एक पंच मारावासा वाटला. तिने चालण्याची गती वाढवली. लिफ्ट अजून का येत नाहीये! ती त्यांच्या शेजारून जाताना नर्सचा साखर पेरलेला आवाज आला. "तुम्ही तिथे भेटाल असं वाटलं नव्हतं."

त्यावर त्याचं उत्तर तिला ऐकू आलं नाही.

तिच्या हातांच्या मुठी वळल्या. ती सरळ लिफ्टसमोर जाऊन थांबली आणि बटन इतक्या जोरात दाबलं की तिचा अंगठा दुखायला लागला.
कमॉन.. कमॉन... पुटपुटत अजून दहा वेळा ती बटन दाबतच राहिली.

अचानक शेजारी कुणीतरी येऊन उभं असल्याचं तिला जाणवलं आणि पाठोपाठ त्याच्या मस्की सुगंधाने तिचं डोकं बंद पडलं. तो असायला हवा त्यापेक्षा ज..रासा जास्त जवळ उभा होता. तिने नजर समोर ठेवली आणि स्टीलच्या भिंतीवर दिसणाऱ्या त्यांच्या वेड्यावाकड्या प्रतिबिंबाकडे बघत राहिली. तो स्तब्ध उभा होता. सगळीकडे शांतता होती. कदाचित या शांततेत त्याला तिची चिडचिड जाणवत असेल. तिने आवळलेल्या मुठी सोडल्या. समोर नंबर्स बदलत लिफ्ट खाली आली आणि शेवटी लिफ्टचं दार उघडलं.

ती आत शिरली, मागोमाग तोही. दरवाजे झूप्प करून बंद झाले आणि जणू आतला ऑक्सिजनच संपून गेला. लिफ्टमध्ये ते दोघेच होते. तिने बाराव्या मजल्याचे बटन दाबले, त्याने काहीच हालचाल केली नाही. ती हाताची घडी घालून कोपऱ्यात भिंतीला चिकटून, समोर बघत उभी राहिली. तोही वळल्यामुळे तिला फक्त त्याची पाठ दिसत होती. तो अगदीच रिलॅक्स दिसतोय, नक्कीच त्या नर्सचा विचार करत असणार.

ती जळून खाक होत होती. याआधी तिला असं कधीच झालं नव्हतं. एवढया छोट्याश्या गोष्टीने ती इतकी चिडेल, इतका त्रास होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हे सगळं अश्या माणसासाठी जो साधं वळून तिच्याकडे बघतही नाहीये.

तिने दात आवळले आणि चिडून करवादली. "तुम्हाला हॉस्पिटल स्टाफबरोबर फ्लर्ट करायचं असेल तर निदान कुठेतरी एकांतात करु शकाल का? इथे कोणीही तुम्हाला बघू शकतं. इट्स रिअली नॉट दॅट प्रोफेशनल."

त्याने फक्त हसून मान आडवी हलवली. वळून बघितलंसुद्धा नाही.

अच्छा, माझे शब्द उत्तर देण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत तर.

"तुम्ही 'कुठे' भेटाल असं वाटलं नव्हतं तिला?" तिने तरीही विचारलंच.

अचानक डिंग वाजून लिफ्ट थांबली आणि दार उघडलं. तीन चार जण आत आले. अजून सातवाच मजला होता पण त्यांचा एकांत नाहीसा झाला होता. तिचा प्रश्न तसाच हवेत राहिला, आता काही उत्तर मिळणार नाही. तिच्या छातीत धडधडत होतं. त्यांच्यातलं टेन्शन नक्कीच बाकी लोकांना कळत असेल. तिच्याकडे बघणाऱ्या एका माणसाकडे तिने वैतागून बघितले.

शेवटी एकदाचा बारावा मजला आला. दार उघडताच ती सुटका झाल्यासारखी पटकन बाहेर पडली आणि मोकळा श्वास घेतला. तेवढ्यात तिच्या कोपरावर एक मजबूत हात पडला आणि ती ओरडायच्या आत त्याने तिला भराभर एका दारामागे नेले. ती स्टोरेजची चिंचोळी जागा होती. त्याने दार आपटलं आणि कोणी उघडू नये म्हणून आतून एक मॉप दारावर तिरका ठेवला.

"तू मला ते ऍग्रीमेंट साइन करायला लावलंस, सायरा." तो जवळ येत म्हणाला. "तूच सांगितलंस की तुला माझ्याबरोबर काही करायचं नाहीये, मग असं का वागते आहेस? जेलस असल्यासारखं."

तिचे डोळे विस्फारले. "मी असं काहीही करत नाहीये." हे तिने बोललेलं सगळ्यात वाईट खोटं होतं. कोणीही सांगेल.

"तू मला रविवारबद्दल विचारत होतीस. काय कारण?"

"असंच, मी सहज तुमची चौकशी करत होते." ती खाली बघत म्हणाली.

"खोटं बोलतेयस." त्याचा आवाज गंभीर होता. "मग ऐक. काल ती नर्स मला फळवाल्याकडे भेटली होती. तिच्या आठ वर्षाच्या मुलाबरोबर होती, ज्या मुलाची तो बाळ असताना मी सर्जरी केली होती."

तिचे गाल शरमून तापले. ह्या काळोखात त्याला तेवढं तरी दिसू नये म्हणून ती प्रार्थना करत होती.

त्याने तिच्याकडे अजून एक पाऊल टाकलं आणि तिने त्याला थांबवायला हात वर केले.

"मी समजले तुम्ही दोघं फ्लर्ट करताय." शेवटी तिला कबूल करावंच लागलं.

"आणि करत असलो तर.." त्याचा आवाज अजूनही मऊ झाला नव्हता.

ती मागे सरकत आता मागच्या लोखंडी शेल्फला टेकली होती आणि त्याचा काठ तिच्या पाठीत घुसत होता. कुठल्याही क्षणी कोणी इथे फिनेल घ्यायला येऊ शकतं. दार उघडेल आणि.. तिचा जीव अर्धा होत होता.

"अनिश!" ती आता अगदीच वितळली होती. "आय एम सॉरी. एवढ्याश्या गोष्टीने मी हायपर व्हायला नको होतं. मला कळतंय, मी बालिशपणे वागले. आता प्लीज मला जाऊदे, मी पुन्हा अजिबात असं वागणार नाही." ती मनापासून माफी मागत होती.

त्याच्या ओठाचा कोपरा वाकडा झाला. तिचं पाणी पाणी झालं.

"सायरा" त्याने पुढे होत बोटाने तिची हनुवटी वर केली. तिचं डोकं किंचित मागे झुकवलं जेणेकरून त्याचा चेहरा तिच्या जवळ येईल. ती टेन्स होऊन थरथरत होती. त्याने किस करायला नको, ती अजून पहिल्यातूनच सावरली नव्हती.

"मी आत्ता, इथे तुला किस करू शकतो.." तो बोलत असताना तिचा ऊर धपापत होता. कितीही श्वास घेतले तरी ते कमीच पडत होते. " मी फक्त थोडासा वाकलो, असा.." त्याने खाली ओठ तिच्या जवळ आणले. ओठांना किंचित स्पर्श झालेला तिला जाणवला. तिच्या अंगावर काटा फुलला. तिने दोन्ही हातानी मागचा शेल्फ धरला, नाहीतर ती तिथेच कोसळली असती.

"आय नो, तुला काय हवंय..तुझी प्रत्येक इच्छा तुझ्या चेहऱ्यावर दिसते. ह्या चेहऱ्यावर." त्याने हलकेच बोट फिरवत तिच्या गालापासून जॉ लाईन ट्रेस केली. त्याचं बोट हळूहळू तिच्या गळ्यापर्यंत गेल्यावर ती स्तब्ध झाली. आत्ता जर त्याने पूर्ण तळवा टेकवला तर तिच्या हृदयानेसुद्धा मान्य केले असते.

"तू लाल झालीयेस." त्याचा आवाज जरा मृदू होता.

"यू आर रॉन्ग. तुम्हाला वाटतंय मला तुम्ही किस करायला हवंय? पण मी घाबरलेय!" ती बोलत राहिली. "यू हॅव ऑल द पॉवर. हे जर वर्कआऊट झालं नाही तर मला जबरदस्तीने दुसरा जॉब शोधावा लागेल. सगळीकडे आपल्याबद्दल गॉसिप पसरलं तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण मला नक्कीच सगळे चालू असिस्टंट म्हणतील. मला ह्या वाटेला जायचं नाही, जोपर्यंत माझी खात्री होत नाही की मला हेच हवंय."

"आणि माझं काय? जर मला हे सगळं हवं असेल तर?" त्याचा हात गळ्याभोवती येऊन अंगठा तिच्या थडथड उडणाऱ्या पल्सवर जाऊन थांबला.
आश्चर्य म्हणजे हे त्याने घाबरवल्यासारखं नव्हे तर नाजूकपणे केलं. तिला वाटलं तो आता तिला काहीतरी सेन्सिबल सांगेल पण तो गप्प राहिला. त्याचे डोळे तिच्या डोळ्यात अडकले आणि त्यात शंभर भाव तरळून गेले. पुन्हा त्याचा चेहरा तिच्या जवळ आल्यावर ती हलूच शकली नाही.

पण त्याच्या ओठांचा तिला स्पर्श होण्याच्या आत तो बाजूला झाला आणि त्याने कपाळ शेजारच्या भिंतीला टेकले. त्याने डोळे घट्ट मिटून कुठेतरी दुखल्यासारखं तिचं नाव घेतलं. लगेच जोरात दार ढकलून तो बाहेर पडला. त्याने भिरकावलेला मॉप भिंतीच्या कडेला कुठेतरी आपटून पडला होता.

ती अजूनही थरथरत होती. तिला तिच्यावर नेम धरून डागलेली गोळी कानाशेजारून गेल्यासारखं वाटलं.

आता तिला सुटल्यासारखं, मोकळं वाटायला हवं पण जास्त निराशच वाटत होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle