बदतमीज़ दिल - २८

अनिशला मी माझ्यापासून लांब ठेवतेय कारण मी एक जबाबदार आणि प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. मी स्वतःला कायम सांगतेय की तू स्वप्नं काहीही बघ पण त्यांच्या आहारी जाऊ नको. मला माझ्या भविष्याचा आणि नेहाच्याही भल्याचा विचार करायचा आहे. आत्ताच काही काळापूर्वी माझी नोकरी जाणार होती. त्यावेळची दुसरा जॉब मिळेपर्यंतची अनिश्चितता आणि अस्वस्थपणा मी विसरू शकत नाही. फक्त माझ्या मनाला वाटतं म्हणून मी स्वतःला असं मोकळं सोडू शकत नाही. आय डोन्ट हॅव दॅट लग्झरी. सायरा अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत होती.

पुढचा सगळा आठवडा टॉर्चर होता. रोज सर्जरी शेड्युल्ड होत्या आणि रोज त्याचं दर्शन होत होतं. तो अजूनही स्क्रब्जमध्ये तेवढाच हॉट दिसतोय आणि त्या 'बेडहेड', 'बेडरूम आईज' अश्या टर्म्स मॉडर्न डिक्शनरीतून खोडून टाकल्या पाहिजेत म्हणजे त्याला बघून मनात येणार नाहीत.

त्याचीही अवस्था तिच्याहून फारशी वेगळी नव्हती. वरवर तो ठरवल्याप्रमाणे सगळ्यांशी बरं बोलायचा प्रयत्न करत असला तरी आतून तो उकळत असणार. आता तो सगळ्यांवर ओरडून ऑर्डर्स सोडत नाही पण जगावर चिडल्यासारखा पाय आपटत फिरतो.

ओटीमधून बाहेर आल्यावर ती त्याच्यापासून चार हात लांबच रहात होती जेणेकरून पुन्हा लिफ्ट किंवा स्टोरेजची भीती नको. पण दिवसभर त्याला चुकवणे खूप कठीण आहे. सारखं मागे वळून तो जवळ नाही ना बघणं आणि कुठेही त्याचा आवाज येत नाही हे चेक करत रहाणं यामुळे तिला ऑलमोस्ट PTSD झाला होता. रोज ती दमून गारद होत होती आणि त्यात भर म्हणून सारखे नेहाचे तिला प्रश्न. आता तिने घरी ग्रेज बघण्यावर बंदी आणली तर नेहा सारखी रोमान्स नॉवेल्स वाचत होती आणि मनानेच तिला आणि अनिशला रोमान्सचे हिरो हिरॉईन ठरवून टाकले होते. नेहाचे प्रश्न वरवर साधे वाटत असतील पण तिला तिच्या ट्रिक्स माहिती होत्या. प्रत्येक प्रश्नातून नेहा तिला टेस्ट करत होती.

आजची सर्जरी कशी झाली?

व्यवस्थित.

"तिथे डॉ. पै होते का?"

हो, obv!

ते स्क्रब्जमध्ये हँडसम दिसत असतील ना?

हो, मग?

प्रत्येक वेळी नेहाने तिला पकडायला टाकलेला गळ ती चुकवते, तिला काही फरक पडत नाही असं दाखवत.

फक्त झोपताना पांघरूण ओढलं की तिला तिचा एकटीचा वेळ मिळतो. तेव्हा ती दिवसभर अनिशबरोबर घालवलेल्या क्षणांचा पेटारा उघडते. त्याने तिच्याकडे टाकलेला प्रत्येक कटाक्ष, तिला उद्देशून म्हटलेला प्रत्येक शब्द ती पुन्हा एकदा जगते आणि हे सगळं एका वेगळ्या जगात घडत असतं तर.. अशी स्वप्न रेखाटते.

स्टोरेजच्या घटनेला आता काही आठवडे उलटून गेले होते. हॉलमधून जाताना तिला त्याचा आवाज आला. समोर शुभदाच्या डेस्कपाशी तो उत्साहात बोलत होता. ती उत्सुकतेने जागीच थांबली. त्याने हातातला कागद शुभदासमोर वाचण्यासाठी धरला. त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू होतं. इतक्या आनंदात तिने त्याला कधीच बघितलं नव्हतं. ती स्तब्ध होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती, जवळपास संमोहित होऊन. हसणं माणसाचा चेहरा इतका बदलून टाकतं?!

हॅलो हार्ट? इट्स मी, ब्रेन! कंट्रोल युअरसेल्फ!

"ग्रँट कमिटीका ईमेल है." तो अभिमानाने शुभदाला सांगत होता. "कमिटीने दो प्रपोजल्स फायनल किए है, एक मेरा और दुसरा वेल्लोरका एक डॉक्टर है."

"ओह, दॅट्स ग्रेट!! काँग्रॅट्स डॉक्टर!" शुभदाने त्याचा हात धरून जोरजोरात हलवला. "फायनल डिसीजन कब आएगा?"

"होपफूली, दिवालीके पहले." त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम होतं.

ओह, त्याने खूप मेहनत घेऊन प्रपोजल बनवलं होतं ती ही ग्रँट असणार. मला त्याबद्दल फार कमी माहिती आहे पण त्याच्या डोक्यावर याचा खूप दबाव होता. फायनल टू मध्ये येणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिला पुढे होऊन त्याचं अभिनंदन करून ईमेल बघाविशी वाटली. पण तेवढ्यात त्याने समोर तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर तिच्यावर आपटली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरून गेलं, त्याचे हसरे डोळे कठोर झाले आणि तिची त्याचं अभिनंदन करायची इच्छा आतल्याआत मरुन गेली. ती रस्ता बदलून वळली आणि मागच्या बाजूचा जिना चढू लागली. वाईट दिसलं तरी चालेल पण त्याच्या शेजारून जाण्यापेक्षा बरं!

दिवाळीची तीही मनापासून वाट बघत होती पण एकीकडे तिला खूप उदासही वाटत होतं. ह्या आठवड्याच्या शेवटी दिवाळीची पाच दिवस सुट्टी होती, प्रत्येक डिपार्टमेंटचे थोडेसेच लोक एक्स्ट्रा इंसेंटिव्ह घेऊन हॉस्पिटलमध्ये थांबतील. त्याआधीच्या संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे हॉस्पिटलकडून स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळी पार्टी असेल. कुठलं तरी फॅन्सी हॉटेल आणि चविष्ट मेनू! इतके वर्ष फक्त तेवढ्यासाठी ती आणि तिच्या मैत्रिणी पार्टी अटेंड करायच्या. डॉ. पै कधीच त्या पार्टीत दिसले नव्हते आणि मोस्टली या वर्षीही नसतील.

त्याच्याबद्दल काय वाटतंय हे तिला नक्की ठरवता येत नव्हतं पण त्याला बघितल्याशिवाय चार पाच दिवस काढणं खूप कठीण होतं. आत्तापेक्षा फार काही वेगळे दिवस नसतील कारण ओटीबाहेर अजूनही ते दोघे बोलत नव्हते. गेले काही आठवडे ती तिला बाकी कलिग्जसारखंच वागवत होता. तो जेव्हाही काही बोलेल ते कामाबद्दलच असतं. हल्ली तो रूड वागत नाहीये पण त्याच्यात काही दिवसांपूर्वी आलेली मृदूता पुरती हरवलीय.

आत्ताही ती चंदाबरोबर लाऊंजमध्ये बसली होती. मनातली खिन्नता चेहऱ्यावर न दाखवायचा प्रयत्न करत तिने समोरच्या कोरड्या व्हेज सँडविचचा बारीकसा घास घेतला. इतक्यात चंदाने तिला कोपर मारलं. "समोर बघ!" तिने मान उचलून समोर पाहिलं तर दारात डॉ. पै. आज ब्लू शर्टवर पांढरा कोट. हातात दोन तीन फाईल्स आणि फोल्डरचा गठ्ठा. तो सरळ तिच्याकडे बघत होता, आता पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने ती घाबरली. ती उठून पटकन दरवाज्याकडे गेली. "मायराला काही होतंय का?" तिने काळजीने विचारले. सकाळीच मायराची सर्जरी झाली होती.

तो कसल्यातरी गहन विचारात होता. "नाही, ती ठीक आहे. आत्ताच एक नवीन केस आलीय आणि मला तिच्याबद्दल तुझ्याशी बोलायचंय."

तिने रोखून धरलेला श्वास सोडला. "ओह, ओके. मी लंचचं सगळं आवरून येते.

"त्याची गरज नाही, तू लंच कर. मी लंच पॅक करून आणलाय, बसून बोलू." त्याने आत पाऊल ठेवलं आणि आजूबाजूचे सगळे लोक धक्का बसल्यासारखे त्याच्याकडे बघू लागले. डॉक्टर्स इथे जेवत नाहीत, त्यांच्यासाठी सिरॅमिक प्लेट्स,  स्पेशल केटरिंग विथ सर्व्हिस असते. आमच्याकडे स्टीलची ताटं, पोळी भाजी आणि मॅगी कप्पा नूडल्स असतात.

त्याला लोक बघतायत हे कळलं तरी त्याची फिकीर नव्हती. तो सरळ कोपऱ्यातल्या रिकाम्या टेबलवर जाऊन बसला. हातातल्या फाईल्स, फॉईल पार्सलचा बॉक्स टेबलावर ठेवला आणि पाय लांब केले. ती आपला लंच घेऊन त्या टेबलापाशी जाईपर्यंत लोकांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या. हे काय चाललंय त्यांना कळत नव्हतं. लोकांचा विचार सोडून तिने त्याच्याकडे लक्ष दिले. तो इतक्या घाईत तिच्याशी बोलायला आला म्हणजे नक्कीच ही खूप महत्त्वाची केस असणार. ती त्याच्याशेजारची खुर्ची ओढून बसली. त्याने आधीच फोल्डर उघडून काही कागद बाहेर काढले होते.

"बंगलोरच्या एका मित्राने मला सकाळीच ह्या इमर्जन्सी केसबद्दल ईमेल पाठवली होती. " तो लगेच कामाचं बोलायला लागला. "ही सोनल सतरा वर्षांची आहे. तिला जन्मतः एबस्टाइन्स अनॉमली आहे. म्हणजे हार्टची डावी बाजू नीट डेव्हलप झाली नाही आणि रक्ताभिसरण वेगळ्या मार्गाने सुरू आहे. रक्तात ऑक्सिजन खूप कमी पोचतो. तिला त्यावेळी फार सिम्प्टम्स नव्हते आणि गावात डिलिव्हरी झाली म्हणून कोणाच्या लक्षात आलं नाही. पण आता तिला साधी हालचालही करता येत नाही. दोन्ही आर्टरीज अरुंद झाल्यात. बऱ्याच वर्षांपूर्वीच तिची सर्जरी व्हायला हवी होती पण तिच्या पालकांनी बाकी हेल्थ इश्यूजना प्राधान्य दिले."

"बाकी हेल्थ इश्यूज म्हणजे?" तिने फाईलमध्ये बघत विचारले.

"ल्युकेमिया."
तिचा श्वास अडकला, तिने एकदम वर बघितले. त्याने मान हलवली. "त्यांनी हार्टकडे दुर्लक्ष केले नव्हते, औषधं सुरू होती. ती आठेक वर्षाची असताना एक सर्जरी झाली होती पण त्याचा फार उपयोग झाला नाही.

"आता तिचं वय जास्त आहे.."

"हम्म, पण आता इमर्जन्सी सर्जरी करण्यावाचून पर्याय नाही. तिची मोटर फंक्शन्स हळूहळू बंद पडत चालली आहेत."

ओह, आधी कँसरवर मात केली आणि आता हे.. तिचं शरीर किती झेलू शकेल? सायराला वाईट वाटत होतं.

"सो, तुमच्या मित्राकडे ही केस आहे?"

"त्याची स्पेशालिटी वेगळी आहे, तो ऑनकॉलॉजिस्ट आहे. तिचं शरीर आत्ताच केमो आणि रेडिएशनच्या माऱ्यातून बाहेर आलंय. खूप ऍडिशनल रिस्कस आहेत. म्हणून कोणी सर्जन्स ह्या केसला हात लावायला तयार नाहीत."

पण अनिश ही केस घेईल. नो डाऊट.

त्याने तिच्याकडे बघितलं, ती काय विचार करतेय ते जाणवून त्याने मान हलवली. "तिचे आईवडील पुढच्या फ्लाईटने तिला इथे घेऊन येतायत. आपण हे करणार असू तर मला तुझी मदत लागेल."

"हो, ऑफ कोर्स." तिने मान हलवली. तिला नक्की काय मदत करायची आहे याची कल्पना नव्हती. तिने हो म्हणताच तो सगळं आवरून उठला आणि तिला घेऊन बाहेर पडला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle