बदतमीज़ दिल - ३१

आम्ही इथे असण्याची काहीच शक्यता नव्हती पण आम्ही होतो! आम्ही ओटीमध्ये होतो, सोनलची सर्जरी आता कुठल्याही क्षणी सुरू होणार होती. खोलीभर एक तणावाने भरलेली शांतता होती. वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज आणि मधेच ऐकू येणारे बीपबीप एवढेच काय ते शांती भंग करत होते. ती पूर्ण तयारीनिशी अनिशच्या इशाऱ्याची वाट बघत होती. आज ऑपरेशन टेबलसमोर ते दोघेच नव्हते. त्यांच्याबरोबर अजून एक कंजेनिअल हार्ट सर्जन होते. MS करताना अनिशला ज्युनियर असलेले डॉ. शिंदे. ते नाशिकहून सकाळीच इथे पोचले आणि ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते, रादर ते सगळेच ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते. अजून एक सर्जन दिल्लीहून येणार होत्या पण फ्लाईट डीले झाल्यामुळे त्या अजून पोचल्या नव्हत्या.

आज काचेच्या भिंतीमागे फक्त लीगल टीम आणि तिघे डॉक्टर्स घारीच्या नजरेने लक्ष ठेऊन होते. आश्चर्य आहे, डॉ. पैंची इतकी हॉलमार्क ठरणारी केस असून कोणी रेसिडेंटस, स्टुडंट्स कोणीच कसं नाहीये..

अनिशने ती कुठे बघतेय ते पाहिलं. तिच्या डोक्यात चाललेले विचार जाणवून त्याने मान हलवली. "आज मी जर फेल झालो तर ते बघायला त्यांना प्रेक्षक नको आहेत." तो तिरकस हसला. "त्यांच्यामते जेवढे कमी विटनेस असतील तेवढं बरं."

"डॉ. पै, आर यू रेडी?" मागून भूलतज्ञांचा आवाज आला.

सगळ्यांनी आधीच रोल कॉल केला होता, तिच्यामते आता अजून थांबण्याची गरज नव्हती. पण ती म्हणजे डॉ. पै नव्हती. ह्या केसमुळे तिचं करियर धोक्यात नव्हतं. काही चूक झाली तर तिचं नाव खराब होणार नव्हतं, सोनलला काही झालं तर तिला सोनलच्या आशेवर असलेल्या आई वडिलांना तोंड दाखवावं लागणार नव्हतं.

शेवटी अनिशने घसा खाकरला आणि वर घड्याळात पाहिलं. "ओके! इफ एव्हरीवन्स रेडी, लेट्स बिगीन. सायरा, टेन ब्लेड." त्याचा हात पुढे झाला.

सोनलला तिचे आईवडील हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तेव्हा त्यांना सगळ्यात आधी सायराच भेटली होती. शुभदा फोनवर बिझी होती त्यामुळे तिलाच पुढे व्हावं लागलं. सोनल व्हीलचेअरवर बसूनसुद्धा आनंदी दिसत होती. आणि बारीक. खूप बारीक, इतकी की वाऱ्यानेसुद्धा उडून जाईल. पण सोनलच्या डोळ्यात एक घट्ट निर्धार होता जो तिच्या चांगला परिचयाचा होता.

कॉन्फरन्स रूममध्ये अनिश तिच्या पालकांना सर्जरीत येऊ शकणारे धोके आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही किती महागडी सर्जरी होऊ शकते त्याबद्दल समजावून सांगत होता. वर्षानुवर्षे कॅन्सर ट्रीटमेंटवर झालेल्या खर्चाने तिचे आईवडील पार धुतले गेले होते. कर्नाटकातल्या एका खेड्यात सरकारी शिक्षक असणाऱ्या वडिलांनी शक्य तो सगळा खर्च केला होता, जमीन विकून आणखी त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं. सोशल मीडियावरून काही प्रमाणात पैसे जमा झाले होते पण गरजेपेक्षा खूपच कमी. आताही त्यांनी फेसबुकवर सोनलचा नवा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यांच्याकडे आता काही शिल्लक नव्हती पण ही गोष्ट अनिशला थांबवू शकणार नव्हतीच.

अजून हॉस्पिटलची परमिशन मिळायची बाकी होतीच. ती अनिश आणि शुभदाबरोबर त्याच्या केबिनमध्ये चर्चा करत होती. असा उपाय हवा होता ज्याने हॉस्पिटलकडून अनिशवर कोर्ट केस होणार नाही. शेवटी तिने साधी सरळ गोष्ट सुचवून पाहिली. "सोनलला भेटायला लीगल टीमलाच सांगू. जे लोक सर्जरी नको म्हणतायत त्यांनाच तिला सर्जरी होणार नाही हे सांगू दे." त्यांनी लीगल टीम आणि तिन्ही सर्जन्सना कसंबसं तयार करून कॉन्फरन्स रूममध्ये जमवलं. अनिश सर्जिकल डिपार्टमेंटच्या हेडनाही घेऊन आला. हाच माणूस अंतिम निर्णय देऊ शकत होता.

सोनल त्या लोकांशी बोलताना ती आणि डॉ. पै काचेबाहेरून बघत होते. सोनलच्या शरीराने दगा दिला तरी मन तितकंच घट्ट होतं. ती तिच्या बरं होण्याचा हक्क सांगत असताना तिचे डोळे भरून आले होते पण एक टिपूसही खाली पडला नाही.

बर्‍याच वेळाने सगळेजण बाहेर पडून लिफ्टकडे गेले. त्यांच्या खाली घातलेल्या माना आणि सुस्कारे यावरून निर्णय बऱ्यापैकी कळलाच होता. सगळ्यात शेवटी डिपार्टमेंट हेड बाहेर आले. "ह्या सर्जरीची कॉस्ट हॉस्पिटल बेअर करणार नाही." ते सरळच म्हणाले.

अनिशला तो जिंकल्याचं जाणवलं. "मी असं कधीच म्हटलं नाही. मी टीम जमवली आहे, सगळे लोक फ्री काम करतील. आय'ल कव्हर द कॉस्ट ऑफ सप्लाइज अँड डिव्हायसेस."

त्यांनी हरल्यासारखं डोकं हलवलं आणि निघून गेले.

तिला हवेत एक पंच मारावासा वाटला, येस्स! तिने आणि अनिशने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. होली शिट! वी डिड इट!! त्यांचे डोळे बोलत होते. त्याच क्षणी तिला पुढे होऊन त्याला कडकडून मिठी माराविशी वाटली.

सोनलची सर्जरी खूप मोठी आणि किचकट होती. तिने याआधीही अनिशबरोबर खूप वेळखाऊ सर्जरीज केल्या होत्या पण ही वेळ वेगळीच होती. अनिश इतक्या तणावात तिला आधी कधीच दिसला नव्हता. तो डोळ्यात तेल घालून काम करत असला तरी आज त्याचा स्वतःवरचा विश्वास जरा ढळला होता. त्याच्या मध्येच थांबून खांदे गोल फिरवणे आणि मान वरखाली मोडण्यातून तिला ते जाणवत होतं. बाकी लोकांचा अविश्वास त्याच्या डोक्यात शिरला होता. काहीतरी चुकेल म्हणून तो काळजीत होता. तिला त्याला हलवून आठवण करून द्यावीशी वाटली, तू डॉ. अनिश पै आहेस, MS, M Ch. द ओन्ली सुपरहिरो, आय हॅव एव्हर सीन!

पण त्याऐवजी ती शांत राहून लक्षपूर्वक काम करत राहिली. काही चूक झाली तर ती माझ्यामुळे नक्कीच होऊ देणार नाही.

सहा तास होऊन गेल्यावर त्याने तिला ब्रेक घेऊन काहीतरी खाऊन यायला सांगितले. तिला विरोध करायचा होता, पण तेवढ्यासाठी त्याचा वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नव्हती. ती गुपचूप दुसऱ्या असिस्टंटकडे इन्स्ट्रुमेंट ट्रे देऊन बाहेर पडली. अनिशने ब्रेक घेतला नव्हता, घेता आला तरीही तो घेणार नाही याची तिला खात्री होती. हे काम करण्यासाठीच तो बनला होता, त्याने स्वतःचं शरीर सलग काम करत रहाण्यासाठी ट्रेन केलं होतं. सोनल बाहेर पडल्याशिवाय तो बाहेर येणार नाही.

विचार करत तिने वॉशरूममध्येच दोन स्निकर्स खाल्ल्या. बाहेर आल्यावर पॅसेजमध्ये तिला सोनलचे आईवडील दिसले. तिला वाटलं तरी आत्ता ती त्यांच्याशी बोलू शकत नव्हती. सोनलच्या आईचं तिच्याकडे लक्ष जाताच ती किंचित हसून लिफ्टमध्ये घुसली. लिफ्टचं दार उघडून बाहेर पाऊल टाकताच तिला ओटीमधून आरडाओरड ऐकू आली आणि जाणवलं अरे हा तर अनिशचा आवाज आहे! ती पळत सुटली.

ओटीचं दार ढकलताच त्याचा आवाज आला. "इट्स PE! PE! वास्क्यूलर सर्जन पाहिजे. डॉ. दास पोचल्या नसतील तर डॉ. गांधींना बोलवा. क्विक." शिट! पल्मोनरी एम्बॉलिझम. रक्ताची गुठळी मानेत तयार होऊन काही सेकंदात हृदयाजवळ पोचली होती. सोनल पूर्ण घामाने भिजली होती. "नॅन्सी, कीप द हेपारीन गोइंग." नर्सने पटकन आयव्हीमधून हेपारीनचा पुढचा डोस सुरू केला. ती पटकन स्क्रब झाली, नर्सने तिचा गाऊन बांधला आणि हातात स्टराइल ग्लव्हस सरकवले. डॉ. शिंदेंच्या हातातलं सक्शन हँडल तिने काढून घेतलं म्हणजे त्यांना अनिशला जास्त मदत करता येईल. ओटी मधली सगळी मशिन्स ओरडून ओरडून त्यांना काहीतरी करायला सांगत होती. त्याने न थांबता फुगलेल्या धमनीवर कट देऊन एम्बोलेक्टमी सुरू केली. नर्सने रक्ताची अजून एक पिशवी सुरू केली.

तेवढ्यात टेबलाभोवतीचे लोक पांगले आणि वास्क्यूलर सर्जन आत आल्या. बाकी लोकांच्या मानाने त्या खूप शांत होत्या. कदाचित अश्या स्पेशालिटीचे लोक स्वतःला शांत राहण्यासाठी ट्रेन करत असणार. अनिशने श्वास सोडला. एका नर्सने पटकन त्यांना एप्रन, ग्लव्हज वगैरे चढवून तयार केले. "डॉ. दास, इट्स PE. आय हॅव स्टार्टेड विथ एम्बोलेक्टमी." अनिश बाजूला झाला. डॉ. दास पुढे झाल्या आणि कॅथेटर लावायची प्रोसिजर सुरू केली. कॅथेटरमधून ब्लड क्लॉट काढण्याचं डिव्हाईस टाकून त्यांनी हळूहळू पण अचूकपणे स्टेंट घालून क्लॉट बाहेर काढला. आता सगळीकडे रक्त पसरू लागले होते. त्यांनी डोकं तिरकं करून हेडलॅंपचा उजेड एका ठिकाणी नीट पडला. काही वेळ काम करून पुन्हा त्यांचा आवाज आला. "द वेसल इज क्लँप्ड." त्यांनी मान वर करून सायराकडे पाहिलं. "यू! सक्शन राईट हिअर अनटील आय टेल यू टू स्टॉप. आय नीड द एरिया क्लिअर." सायराने लगेच सांगितल्याप्रमाणे काम सुरू केले आणि त्यांनी मान डोलवून टाके घातले. "आय एम सरप्राईज्ड डॉ. पै, ये काम तुमने खुद क्यू नही किया?" डॉ. दास टाके घालता घालता अनिशला म्हणाल्या.

"इस केस मे मुझे कोई चान्सेस नहीं लेने थे." अनिशने उत्तर दिले. "वी न्यू द रिस्क. कँसर प्लस फ्लाईट, ये होने ही वाला था. हमने सब प्रिकॉशन्स लिये थे. हेपारीन, पैरोमे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स, सब था. फिर भी सडनली उपरसे क्लॉट आया, विच इज व्हेरी रेअर. हर बॉडी इज नॉट अ टेक्स्ट्बुक." हे तो थोडं स्वतःला आणि थोडं बरोबर काम करणार्‍या रेसिडेंटना सांगत होता. सायराने त्याच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न केला पण त्याचं पूर्ण लक्ष सोनलकडे होतं. अजून आम्ही लढाई जिंकली नाही, अजून अर्ध्यातच आहोत. काय होईल काहीच सांगता येत नाही.. पण तिने विचार बदलला, मला पॉझिटिव्ह रहायला हवं. सोनल इज अ फायटर, सगळं चांगलंच होईल.

सर्जरी पुढे सुरूच होती. अनिशबरोबर ही सर्जरी करताना तिला एक गोष्ट मात्र समजली. आठ तासांहून मोठी सर्जरी करताना विचार करायला खूप वेळ होता. तुम्ही तुमच्या अख्ख्या आयुष्याचा आणि तुम्ही ज्या वाटेवर आहात ती बरोबर आहे की बदलायची आहे याचा नीट विचार करू शकता.

तिला आता हे कळून चुकलं होतं की तिला कितीही नको वाटल्या तरी त्याच्याबद्दल तिच्या मनात असलेल्या भावना कधीही नाहीश्या होणार नाहीत.

त्याच्याबरोबर काम करण्यामुळे बऱ्याच गोष्टींचा गुंता होतो आणि एकत्र काम करताना त्याला बघून थोडी तरी हिरो वर्शिप होतेच. एक हुषार सर्जन म्हणून त्याच्यावर क्रश आहेच पण ओआरबाहेरही एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. ओके, हे लवकर कळत नाही कारण वरवर त्याचं कडक वागणं, इगो, टफ गाय इमेज वगैरे दिसते. पण आतून तो किती मऊ आहे ते तिला आता कळलं होतं. असा माणूस जो स्वतः लढू शकत नाहीत अशा लहान मुलांसाठी लढतो, स्वतःचा वेळ आणि पैसा दोन्ही दान करतो, कोणी नावाजण्यासाठी नाही तर त्याला आतून हे करण्याची गरज वाटते म्हणून. तिने इतका निस्वार्थी माणूस आजपर्यंत तरी कोणी पाहिला नव्हता.

अचानक तिला जाणीव झाली की तिला तो हवाय, ओ आरमध्ये आणि बाहेरसुद्धा!

क्रमशः
बदतमीज़ दिल (लेखमालिका - २)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle