बदतमीज़ दिल - ३०

रात्रीचे तीन वाजत आलेत. एव्हाना मेंदूची अक्षरशः चाळण झालीय. खिडकीबाहेर रस्ताही किर्रर्र अंधारात बुडालाय. त्याने हात वर करून आळोखे पिळोखे देत बाहेर बघितलं. समोर सायरा ब्लॅंकेटमध्ये गुरगुटून झोपली होती. सकाळ होण्यापूर्वी थोड्या तरी झोपेची त्याला नितांत गरज होती. एवढीशी असून पसरून झोपल्यामुळे तिने सोफ्यावर खूपच जागा व्यापली होती. त्याने शूज काढले आणि लॅपटॉप मिटून खाली ठेवला. तिने ब्लॅंकेट अजून गुंडाळून घेत थोडी हालचाल केली. तिचं ब्लॅंकेट ओढून घ्यायचं विसरून जा! तो खाली कार्पेटवर झोपू शकला असता पण दुसऱ्या दिवशी पाठ भयंकर दुखली असती, आज ते परवडण्यातलं नाही. शेवटी त्याने तिला सोफ्याच्या थोडं कडेला सरकवून स्वतः आतल्या बाजूला आडवा झाला. तिचे गुढघे त्याच्या डोक्याजवळ होते. तिला जाग येईल म्हणून तो जपून हालचाल करत होता पण ती ढिम्म होती.

ती सोफ्यावरून गडगडू नये म्हणून एका हाताने त्याने तिचे पाय धरून ठेवले आणि एक हात उशीसारखा डोक्याखाली घेतला. हे फार कम्फर्टेबल नव्हतं पण ठीक होतं.. ही केस घेतल्यापासून पहिल्यांदा त्याला डोकं थोडं शांत झाल्यासारखं वाटलं. सकाळी त्याची हॉस्पिटलच्या लीगल टीमबरोबर मीटिंग होती. त्याने ही केस घेतल्याची खबर लीगल टीमला मिळाली आणि सर्जरी होण्याआधी त्यांना काही इश्यूजवर चर्चा करायची होती. तो काय सांगेल ते कदाचित त्यांना पटणार नाही, पण सकाळच्या गोष्टी सकाळी बघू म्हणून त्याने ते विचार झटकून टाकले.

सायरा डोळे चोळत उठून बसली. "अनिश?" तिच्या डोळ्यात अजून झोप होती.

"हम्म?" तो आडवाच होता.

"यू ओके? ब्लॅंकेट हवंय?" तिने ब्लॅंकेट काढून त्याच्या अंगावर घातलं. "हे दोघांना पुरणार नाही. मी घरी जाते." ती सोफ्यावरून उतरायच्या तयारीत होती.

"नको जाऊ." त्याने तिचे पाय तसेच धरून ठेवले. ती थांबली आणि त्याची नजर तिच्या ओठांवरून प्रश्नार्थक डोळ्यांकडे गेली. खूप उशीर झालाय. आत्ता माझ्या डोक्यात भलते सलते विचार यायला नकोत पण ते येतायत. त्याची नजर पुन्हा तिच्या ओठांवर स्थिरावली.

"तुम्ही असं बघणार असाल तर मी थांबणार नाही." ती मान हलवत म्हणाली. त्याने भुवई उंचावली. "ओके, फाईन! आय नो, उशीर झालाय. ठीक आहे, मग मी उलटी झोपते, मेबी माझ्या पायांना वास येत असेल." ती जीभ चावत म्हणाली.

तो हसला पण त्याने विरोध केला नाही. ती पलटून झोपताना त्याने ब्लॅंकेट उघडून धरलं. तिचं डोकं त्याच्या छातीपर्यंत येत होतं. तिने थोडं अंतर ठेवायचा प्रयत्न केला पण सोफा इतकाही पसरट नव्हता. त्याने हात पुढे करून तिला जवळ घेतलं. आता तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं. एवढं चिकटून झोपल्यावर त्याला काही मिनिटांपूर्वी येणारी झोप पार उडून गेली. ती पडू नये म्हणून त्याने तिच्या कंबरेवरून पाठीवर हात ठेवला होता. तिचे सॉफ्ट कर्व्हज आणि त्याच्या छातीवर ठेवलेला तिचा हात यांनी त्याचं उष्ण रक्त सळसळत होतं.

तिने नर्व्हस होत मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं. दुसऱ्या एखाद्या वेळी, जर ती झोपेच्या इतक्या अंमलाखाली नसती तर तिने नक्कीच दूर व्हायचा, लांब जाऊन झोपायचा प्रयत्न केला असता. त्याला आपण तिचा फायदा घेत असल्यासारखं वाटलं. पण ती स्वतःच तर थांबली, तिला कोणी फोर्स केला नव्हता. कितीही आकर्षण वाटले तरी तो पुढे काही करणार नव्हता. त्याचे हात होते तिथेच थांबले आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला परत झोपी जायला सांगितले.

"गुड नाईट अनिश.." तिचा आवाज पाकात बुडवल्यासारखा होता.

तिचे डोळे मिटल्यानंतरही तो खूप वेळ जागा होता. तिच्या चेहऱ्याचे आकार उकार बघता बघता तिच्या हृदयाचे ठोके त्याचं धडधडणारं हृदय शांतवत होते. ती त्याच्या मिठीत असणंच त्याच्यासाठी पुरेसं होतं. ह्याच शांत वाटण्याची त्याला गरज होती. त्याच्या आयुष्यातून ही शांतता कधीच नाहीशी झाली होती, कदाचित अम्मा गेल्यापासूनच. शेजारी तन्वी असतानाही त्याला कधी असं वाटलं नव्हतं. त्या वेळी तो तन्वीबरोबर जे वागला त्याचं त्याला वाईट वाटत होतं पण ते वेगळे होणं हा दोघांसाठी चांगला निर्णय होता. तन्वीबरोबर असताना कधीही त्याला तिच्या शेजारी जागं राहून फक्त ती त्याच्या जवळ असण्याबद्दल कृतज्ञ वाटेल असं कधीही झालं नव्हतं.

सायराची पोनीटेल लूज होऊन केस त्याच्या खांद्यावर पसरले होते. तिच्या शॅम्पूच्या मंद गोडसर वासाने त्याच्या पोटात उमाळा दाटून येत होता. उद्या इतक्या महत्त्वाच्या कामाचा दिवस नसता तर... त्याने तिला समोर बसवून तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल विचारलं असतं. अकाली प्रौढ होऊन गेली कितीतरी वर्ष तिला उपसावे लागलेले कष्ट, बहिणीची जबाबदारी घेतल्यावर वाटणारी भीती, जवळ आईवडील नसल्याचं दुःख.

झोपेत ती खूप निरागस आणि लहान दिसतेय. त्याला अचानक तिची काळजी घ्यावीशी वाटली, जशी ती तिच्या बहिणीची घेते.

तुझी काळजी कोण घेतं सायरा?

हू'ज युअर गार्डीयन?!

---

ती नेहमीप्रमाणे साडेपाचला उठून बसली. त्याचा हात बाजूला करून ती अलगद खाली उतरली. लॅपटॉप टेबलावर ठेऊन फाईल्स नीट रचत असतानाच तिला तो सोफ्यावर कोपर टेकून तिच्याकडे बघत असल्याची जाणीव झाली. "गुड मॉर्निंग!" तो पुन्हा डोळे मिटत म्हणाला.

"मॉर्निंग! हरी अप. तुमच्या कपड्यांचं काय?" तिने पोनीटेल नव्याने बांधत विचारले.

"डोन्ट वरी, इथल्या कपाटात कपड्यांचा एक स्पेअर सेट असतो. मी काही पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये थांबलो नाहीये." उठून ब्लॅंकेटची घडी घालत तो म्हणाला.

"ओके, मी लाऊंजमध्ये पळते."

"प्लीज मला एक ब्लॅक कॉफी पाठव, डबल शॉट."

त्याला अंगठा दाखवून ती बाहेर पडली.

इतकी चांगली सुरू झालेली सकाळ अचानक एक वाईट वळण घेत त्याच्या अंगावर आली. कॉन्फरन्स रूममध्ये दहा वाजता लीगल टीमबरोबर त्याची मीटिंग सुरू होती. चार आंबट चेहरा केलेले लोक चष्मे आणि कडक इस्त्रीचे शर्ट घालून टेबलापलीकडे बसले होते. इतक्या वर्षात त्याचा त्यांच्याशी काधीही संबंध आला नव्हता. त्यांना सर्जन्स आणि हॉस्पिटल स्टाफला वाचवण्यासाठीच नेमलेले होते पण या क्षणी ते अनिश आणि त्याच्या पेशंटच्या आड येत होते. ते लोक पुन्हा पुन्हा एकच गोष्ट फिरवून सांगत होते. ही केस म्हणजे हॉस्पिटलसाठी लीगल नाईटमेर आहे.

"ही लायाबलिटी पेशंटला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा खूप जास्त आहे. जर सर्जरीत काही चूक झाली तर हॉस्पिटलचा मालप्रॅक्टिस इन्शुरन्स होणार्‍या कोर्ट केसेसचा खर्च देणार नाही. तुमच्या कलीग्जनी ही केस घेण्याच्या विरोधात मत दिलंय." लीगल टीममधील एक खप्पड माणूस बोलला. ओह येस.. माझेच तीन कलीग्ज. डॉ. शेंडे, डॉ. गांधी आणि डॉ. यलगुंतीवार. द थ्री स्टूजेस! ज्यांना पेशंटचा जीव हळूहळू गेला तरी चालेल पण हॉस्पिटलचं नाव महत्त्वाचं आहे. आज डॉ. आनंद असते तर निदान एक मत माझ्या बाजूचं असतं. ते तिघेही पांढरे कोट घालून टेबलाच्या शेजारी बसलेत, खरंतर तो कोट आत्ता ते मुळीच डिझर्व करत नाहीत. त्यांच्यापैकी एकातही त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मत नव्हती. त्याला शक्य असतं तर त्याने एकेकाची गचांडी धरली असती.

"अच्छा! माझ्या कलीग्जनी ह्या केसचा एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास केल्याचं मला माहितच नव्हतं. नॉट टू मेन्शन, धिस केस इज नॉट देअर स्पेशालिटी. मी माझ्या स्पेशालिटीचे डझनभर लोक फोनवर आणून माझा निर्णय कसा बरोबर आहे हे प्रूव्ह करू शकतो."

"डॉ. पै तुम्ही पूर्ण विचार केला नाहीये. दिल से मत सोचो यार." डॉ. शेंडेला आवाज फुटला.

अनिशच्या एकाच जळजळीत कटाक्षाने तो गारद झाला.

"कमॉन डॉ. पै! सोचो सक्सेसके चान्सेस टेन परसेन्ट है लेकीन बाकी नाइंटी परसेन्ट का क्या? वी विल लूज द पेशंट." डॉ. यलगुंतीवार आपल्या मित्राची बाजू घेत म्हणाले.

"वी डोन्ट नीड पब्लिसिटी लाईक दॅट. त्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी सोशल मीडियावर पेज आहे, आता ती सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. ही केस आपलं हॉस्पिटल घेणार म्हणून आत्ताच पत्रकार बाहेर ठाण मांडून बसलेत. आत्ता ते तुम्हाला हिरो म्हणत आहेत पण तुम्ही हरलात तर काय? तुमचं नाव किती खराब होईल. ह्याचा विचार केलाय?" डॉ. गांधी म्हणाले.

तो संतापाने उकळत होता. थोडा विरोध होण्याची त्याला अपेक्षा होती पण त्याचे सहकारीच हे प्रकरण इतकं टोकाला नेतील असं वाटलं नव्हतं.

शेवटी तो उभा राहिला. चेहऱ्यावर एक खोटं हसू चिकटवून त्याने बोलायला सुरुवात केली. "थँक्स फॉर द इन्फर्मेशन जेंटलमेन. माझी पेशंट आणि तिचे आईवडील कुठल्याही क्षणी इथे पोचतील. इफ यू विल एक्स्क्यूज मी, आय डोन्ट वॉन्ट टू कीप देम वेटिंग." आणि तो कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. "डॉ. पैss" मागून शेंडेच्या हाकेनेही तो थांबला नाही.

लिफ्टमध्ये तो चिडून थरथरत होता. लिफ्टचं दार उघडताच तो मुठी आवळून शुभदाच्या टेबलकडे आला. समोरच आंघोळ करून, नवे स्क्रब्ज घालून ताजीतवानी सायरा उभी होती. तो दिसताच ती हसत पुढे आली. "सोनल इज हिअर! आत्ताच शुभदा तिच्या आईवडिलांना दुसऱ्या कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन गेली. ते तुमची वाट बघतायत."

तिच्या डोळ्यातली आशेची चमक बघून त्याचा राग अजून वाढला.

"गुड!" तो कोरड्या आवाजात म्हणाला. "ते अगदी वेळेत आलेत. सर्जरी होणार नाही हे ऐकायला."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle