आठवते ना, आठवते ना! - इयत्ता आठवी

आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी! त्याशिवाय आम्ही चारुता ताईंबरोबर सहाध्याय दिनाला निवारा वृद्धाश्रमात देखील गेलो होतो.

तसं एकदा कधीतरी आम्ही एका एका ताई आणि सरांना आमच्या बरोबर मधल्या सुट्टीत डबा खायला बोलावलं होतं. मधल्या सुट्टीत आम्ही वरच्या उपासना मंदिरात डबा खायचो. दर आठवड्याला दोन मुली वर्ग रक्षक असायच्या. म्हणजे प्रार्थनेच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत त्यांनी वर्गातच थांबायचं. तशी रक्षण करण्याची खास गरज नव्हतीच पण ती एक जबाबदारी होती जी आम्ही घ्यायला शिकलो. डबा खाण्यापूर्वी वदनी कवळ घेता (नवीन) म्हणायचो आणि सहना ववतु ह्या श्लोकाने शेवट करून मग खायला सुरुवात करायचो.

आठवीत वर्षा सहलीला यु.वि. तल्या तायांबरोबर तिकोन्याला गेलो होतो. आधी रस्ता चुकलो मग बरोबर रस्त्याने वर गेलो. वर पोहोचताना इतका जोराचा वारा सुटला होता की काही अंतर अक्षरशः रांगून गेलो नाहीतर वाऱ्याने उडून गेलो असतो! पाऊस सुरु झालाच! रेनकोट शोभेलाच उरला होता. पाण्याच्या डबक्याच्या मधोमध उडी मारून इतरांच्या अंगावर चिखल उडवत चाललो होतो. शेवटच्या पायऱ्या खूप निसरड्या झाल्या होत्या. त्या चढून वर पोचलो आणि खाली पवना धरणाचे पसरलेलं पाणी पाहून साऱ्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं! गडाच्या माथ्यावर ढग उतरले होते त्यामुळे भारी वाटत होतं. गड उतरलो आणि डोळ्यापुढून एसटी निघून गेली! मग एक टेम्पो केला. त्यात उभ्या राहून सगळ्या दुसऱ्या एसटी स्टँडवर पोचलो आणि मग तिथून बस पकडली. भरपूर भिजलो आणि भरपूर मजा केली. वर्षा सहल म्हणजे दुसरं काय असतं!

आठवीत गणेशोत्सवात पहिल्यांदा बरच्या केल्या! मुख्य मिरवणुकीत नाचलो. मिरवणुकीच्या सुरुवातीचा गजर ते शेवटचं रिंगण आणि ह्या दोन्ही मधला काळ सारं intoxicating! ह्याशिवाय गणपतीच्या काळात वेगवेगळ्या मंडळांसमोर आम्ही पथनाट्य करायचो. गणपतीआधी त्याची तयारी असायची. ही पथनाट्य पथकशः असायची. ह्या निमित्ताने पुण्याच्या अनेक वस्त्यांमध्ये जायचो. शाळेचा गणपती हा घरचाच असायचा. रोज सकाळी आरती, प्रसाद असायचा. शाळेत एकदम मंगलमय वातावरण असायचं!

आठवी आणि नववीत शांतला ताईंच्या मार्गदर्शनाखाली केलेले शास्त्र विषयातले प्रकल्प खूप लक्षात आहेत. चौघी/पाच जणींच्या गटाने मिळून हे प्रकल्प केले होते. Brainstorming करून प्रकल्पाचा विषय ठरवायचा, मग ताईंशी चर्चा करून त्याची उद्दिष्ट आणि साधारण पद्धत ठरवायची आणि मग कामाला लागायचं. अनंत अडचणी येणारच असायच्या पण त्याने उत्साह आजीबात कमी व्हायचा नाही! आम्ही नैसर्गिक वाळवी प्रतिबंधक कोणते ह्यावर प्रकल्प केला होता. त्यासाठी पुणे विद्यापीठात जाऊन एका प्राध्यापकांना भेटलो होतो. वाळवीच्या स्लाईडस सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या होत्या. त्या सरांनी आम्हाला विद्यापीठाच्या परिसरात फिरवून वाळवीची मोठाली वारुळं दाखवली होती. ह्या वारुळांचा जमिनीच्या वर जेवढा विस्तार असतो त्याच्या दुप्पट तिप्पट जमिनीखाली असतो असे सांगितले होते. दुसरा प्रकल्प गांडूळ खताचा केला होता. ह्या सर्व प्रकल्पाचा report लिहायचो आणि वर्गापुढे त्यावर presentation ही द्यायचो. आमचे प्रकल्प खूप ground breaking नव्हते पण संशोधनाची मुलभूत तत्वे आम्ही त्यातून शिकलो. गटात काम करायला शिकलो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप मज्जा केली!

आमच्या वर्गाला पुस्तकं वाचायला खूप आवडायची. आठवीत इतिहासाच्या तासाला वॉलाँग (ले.कर्नल श्याम चव्हाण) आणि जंग ए काश्मीर अशी दोन पुस्तकं, आणि मराठीला अरुण खोरे यांचे पोरके दिवस हे आत्मचरित्र वाचले होते. ह्याशिवाय आठवीत टीमवी, गणित प्रज्ञा परीक्षा, MTS अशा परीक्षा देखील दिल्या होत्या. आठवीत इंग्रजी शिकवायला राजगुरू सर होते. ते एकदम आजोबांसारखे होते. एकदम बेस्ट शिकवायचे. शेवटच्या तासाला त्यांनी आमच्यासाठी मोतीचुराच्या लाडूंचा एक अख्खा करंडा आणला होता! CBSE ची इंग्रजीची पुस्तके अत्यंत सुरेख असतात. त्यातील literary reader मी बराच काळ जपून ठेवले होते.

एक प्रयोग म्हणून आठवीत आम्हाला अलगुज नावाची सुरेख दैनंदिनी दिली होती. त्यात बरीच वेगवेगळी पानं होती. मी ती अजूनही जपून ठेवली आहे. डायरी ऑफ अॅन फ्रँक वाचल्यापासून मी अधूनमधून डायरी लिहित असे. पण तरी माझी आणि बाकी अनेकींची अलगुज मात्र बरीचशी रिकामीच राहिली! The idea was great but somehow it did not fly.
आठवीत आम्ही भूगोलाचा प्रकल्प केला होता ज्यात भारताचा भूगोल अभ्यासला होता. वर्गात चार ओळी होत्या एका ओळीतल्या मुलींनी एक दिशा असं ठरवून भारताच्या चार दिशांची राज्यं वाटून घेतली होती. ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात कोणताही लिहिलेला रिपोर्ट द्यायचा नव्हता. आम्ही जे जे काही करू त्या साऱ्याचं शाळेसमोर प्रदर्शन मांडायचं होतं. आम्हाला कळलेला भारत तिथे न लिहिता दाखवायचा होता. कसा ते आमच्या कल्पकतेवर अवलंबून होतं. मग आम्ही audio clips बनवल्या. तिथल्या लोक कलांचे नमुने जमवले. तिथल्या पाककृती बनवून/आणून ठेवल्या. तिथल्या भाषेची ओळख करून दिली. असं अभिनव प्रदर्शन होतं ते! फार मजा आली हा प्रकल्प करायला! भारताची चार भागांत विभागणी देखील सोपी नव्हती! त्यावरून वल्लभभाई पटेल यांना किती कठीण गेलं असेल ह्याची आपल्याला कल्पना येतेय असं आमचं conclusion निघालं!

ह्या भूगोलाच्या प्रकल्पाच्या प्रदर्शनाच्या शनिवारी मी आणि अजून तिघी जणी नव्हतोच! आम्ही गेलो होतो थेऊरला! साखरशाळेत शिकवायला. त्यावेळी प्रबोधिनीच्या प्रचितीतर्फे उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा चालवल्या जायच्या. ह्या साखर शाळेत आम्ही आठवी आणि नववीमध्ये चार चार दिवस शिकवायला गेलो होतो. मला वाटतं मुलांचा वर्ग मांजरीच्या साखरशाळेत तर मुलींचा वर्ग थेऊरला अशी विभागणी होती. हा एक खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. बहुतांश उसतोडणी कामगार हे स्थलांतरीत मजूर असतात. उसाच्या सीझनमध्ये ४/६ महिने सहकुटुंब इकडे येतात (साधारण जानेवारी ते एप्रिल). त्यांच्या मुलांची शाळा तेव्हा बुडतेच. आता नेमकी एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा असते. अर्थात ती बुडाल्याने मुलं पास होत नाहीत. पुन्हा गावी परत गेल्यावर परत त्याच इयत्तेत बसावं लागतं. हे असं कसं चालणार? मग शाळा सुटतेच. ती सुटू नये म्हणून ही १०० दिवसांची साखर शाळा प्रचितीतर्फे चालवली जायची. गीतांजली ताई त्याचं काम बघत होती. साखर शाळेतली मुलं साधारण पहिली ते चौथी मधली असायची. त्यांना शिकवायला खूप मजा यायची. कारण ती बऱ्यापैकी शार्प असायची! एका मुलीने मला खूप आश्चर्यचकित केलं होतं. आम्ही काही मोठ्या मुलांना इंग्रजी शिकवत होतो. त्यांना मुळाक्षरं येत होती. मग स्पेलिंग्स शिकवत होतो. Cat, dog, man असे सोपे शब्द. मग उच्चारावरून त्या शब्दाचे स्पेलिंग काय असेल असा खेळ सुरु झाला. ती मुलगी म्हणाली, “ताई, मी तुझं नाव लिहिणार!” मी म्हटलं, “माझं नाव अवघड आहे कशाला?” पण ती म्हटली मी प्रयत्न करते. काही वेळाने ती पाटी घेऊन आली. त्यावर लिहिलं होतं Ig…. मी तिला विचारलं की, अगं, माझं नाव G पासून नाही J पासून सुरु होतं पण तू आधी I का लिहिलास? त्यावर तिने जे उत्तर दिलं ते इतकं भारी होतं की I was blown away! ती म्हणाली, “ताई तुझ्या नावाच्या सुरुवातीचा जि ह्रस्व आहे ना म्हणून पहिली वेलांटी काढली म्हणून I आधी लिहिला!” I still remember I was speechless! अतिशय हुशार, अतिशय खोडकर आणि खूप जीव लावणारी मुलं होती ती सगळी! त्यांना शिकवताना आम्हीच बरंच काही शिकलो!

थेऊरला वातावरणात सतत मळीचा एक आंबूसगोड वास भरून राहिलेला असायचा. पहिल्यांदा कसेतरी व्हायचे मग त्या वासाची सवय होऊन जायची. आम्ही चार दिवस कारखान्याच्या कामगारांच्या एका बैठ्या चाळीतल्या दोन खोल्यात राहायचो. साखर शाळेत शिकवणारे शिक्षकही त्याच चाळीत राहायचे. बरेचदा गीतांजली ताई तिथेच असायची. आम्ही मिळून स्वयंपाक पण करायचो. सकाळी आणि संध्याकाळी साखर शाळेतल्या मुलांबरोबर भरपूर खेळायचं. दिवसा शाळा. रस्त्याने जाता येता उसाच्या गाड्या भरून चाललेल्या असत. त्यांना मागितलं की उसाची एकदोन कांडकी मिळायची. मग तो उस खात खात गावात भटकायचं, गणपतीच्या मंदिरात, नदीच्या घाटावर! रात्री शाळेतल्या सरांबरोबर गप्पा चालायच्या. एकदा सिनेमाचा विषय निघाला. ती आमची शेवटची रात्र होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सरांबरोबरच पुण्याला येणार होतो. तर रात्री आमच्या सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या त्या आम्ही झोपताना लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचेपर्यंत खेळत होतो! धमाल आली होती!

एके दिवशी ह्या मुलांबरोबर त्यांच्या पालावर गेलो होतो. आमच्यासारख्या मुलांना देखील डोकं वाकून आत जायला लागेल असं बुटकं दार आणि आत बराचसा अंधार! सकाळी सकाळी गेलो होतो तर एक मुलगा सांगत आला की त्यांना पहाटे तीन कोल्ह्याची पिल्लं मिळाली आहेत. मग उसाच्या शेतात ती पिल्लं पहायला गेलो. चॉकलेट ब्राऊन रंगाची ती पिल्लं अगदी कुत्रासारखी फक्त लांबूडकं तोंड असलेली होती. आणि त्यांच्या अंगावर खूप मऊ फर होती. आम्ही मुलांच्या घरी आलो होतो. मग चहा तरी प्या असा आग्रह झाला. तेव्हा खूप गूळ घातलेला कोरा चहा प्यायला होता. पण तो चहा फक्त गुळाने इतका गोड लागत होता असं आता वाटत नाही. त्यात मुलांच्या प्रेमाचा खूप मोठा वाटा होता! पुण्याला घरी आलो आणि आपण किती privileged आहोत ह्याची जाणीव झाली. अशा अनेक जाणीवा प्रबोधिनीतल्या उपक्रमांनी नकळत रुजवल्या. हे खूप मोठे संस्कार प्रबोधिनीने आमच्यावर केले.

तसा आठवीत डिसेंबरमध्ये आमचा एक मोठा संस्कार सोहळा पार पडला तो म्हणजे विद्याव्रत संस्कार. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंज! म्हणजे पारंपारिक मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींना फाटा देऊन, मुंजीच्या मूळ उद्देशाला धरून केला जाणारा हा संस्कार. प्रबोधिनीत होणाऱ्या सर्व समारंभांच्या पुस्तिका छापलेल्या आहेत. मात्र विद्याव्रत संस्कार हा केवळ दोन तास चालणारा विधी नव्हता. त्यापूर्वी आम्ही एक महिनाभर त्याच्यासाठी तयारी करत होतो. दर शनिवारी एक अशी पाच व्याख्यानं आम्ही ऐकली. ती ह्याक्रमाने होती – शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, आत्मिक विकसन आणि शेवटचे राष्ट्र अर्चना. ही व्याख्याने आम्हाला प्रबोधिनीच्याच व्यक्तींनी दिली होती. नावाप्रमाणे प्रत्येक व्याख्यानामध्ये व्यक्तिमत्वाच्या त्या त्या पैलूवर लक्ष केंद्रित केलं होतं. फार सुंदर व्याख्यानं झाली होती. मुख्य विद्याव्रत संस्कार हा देखील फार सुंदर सोहोळा असतो. एक दिवस मुलांचा आणि एक दिवस मुलींचा विद्याव्रत संस्काराचा कार्यक्रम होतो. मुलामुलींचे आई वडील देखील ह्या संस्काराच्या वेळी उपस्थित असतात. विद्याव्रतानंतर शनिवारी करण्याची उपासना थोडीशी वेगळी आहे. ह्याची पूर्वतयारी नववी दहावीची मुलंमुली करतात. उपासना मंदिर छान फुलांनी सजवलेलं असतं. आठवीची मुलंमुली उत्सवमूर्ती असतात! ह्या साऱ्याच्या खूप प्रसन्न आठवणी आहेत.
खरंतर मुंज ही मुलं ८-९ वर्षांची असताना केली जाते. पण प्रबोधिनीत पाचवीतच का करत नाहीत विद्याव्रत संस्कार? आता विचार करताना लक्षात येते की पाचवीत वय असलं तरी हा संस्कार करून घेण्याइतकी मानसिक आणि बौद्धिक तयारी झालेली नसते. आठवीत येईपर्यंत प्रबोधिनीत तोवर घेतलेल्या अनुभवांनी एक पाया रचला जातो. ज्यामुळे ह्या संस्काराचा मूळ उद्देश साध्य व्हायला मदत होते.

ह्या संस्कारानंतर मग आम्ही दर शनिवारी खालच्या उपासना मंदिरात उपासनेसाठी जाऊ लागलो. ह्या उपासनेनंतर बरेचदा प्रबोधिनीचे संचालक मा. गिरीशराव आम्हाला मार्गदर्शन करत असत. गिरीशराव खूप सुंदर बोलतात, ऐकत राहावं असं. गिरीशराव विविध विषयांवर बोलत असत. इतिहास, विज्ञान, भाषा किंवा चालू घडामोडी. मला आठवतंय एकदा त्यांनी पोलिओ लसीच्या शोधाची गोष्ट सांगितली होती. Placebo, double blind trial experiments ह्याविषयी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. मला ही शनिवारची वैचारिक मेजवानी फार आवडत असे.

आमच्या नंतरच्या तुकड्यांसाठी सज्जनगडावर एक विद्याव्रत संस्कार शिबीर घेतलं गेलं. जी व्याख्यानं आम्ही दर शनिवारी ऐकली त्यांची शिबिरात सत्र घेतली गेली. जरी आमची वेळची व्याख्यानं खूप छान झाली होती तरी मला अशाप्रकारे विद्याव्रत शिबिराची संकल्पना खूप आवडली. इथे ‘अनेक वर्षांनी मग आम्ही त्या न झालेल्या शिबिराची भरपाई केली’ असं नोंदवून ठेवते J

आमचं त्या वेळी विद्याव्रत संस्कार शिबीर झालं नाही तरी एक अद्भूत शिबीर लगेचच झालं. आठवी आणि नववीच्या मुलींचं तंबूतलं शिबीर. सांगवी गावाजवळ युवती विभागाने ८ दिवसाचं शिबीर घेतलं होतं. आयोजनापासून स्वयंपाकापर्यंत सगळी जबाबदारी ह्या तायांनी पार पाडली होती. अक्षरशः तंबू ठोकून राहिलो होतो. कंदील आणि टॉर्चच्या प्रकाशात. हे शिबीर पथकशः झालं होतं. प्रत्येक पथकाचा वेगळा तंबू. भल्या पहाटे उठायचं, ब्रश केलं की उपासना. अंधारात उपासनेला सुरुवात व्हायची पण शेवटचा ओंकार संपवून डोळे उघडले की सभोवताली उजेड असायचा. अशी दिवसाची प्रसन्न सुरुवात. मग चहा, आन्हिकं झाली की खेळ. सकाळच्या सत्रात आम्ही बेसबॉल खेळायला शिकलो होतो. मग नाश्ता, मग दिवसभराचे जे उपक्रम असतील ते. वेगवेगळी सत्र असायची. संध्याकाळी पुन्हा खेळाचे सत्र. त्यात अत्यंत चुरशीच्या पथकशः स्पर्धा झाल्या होत्या. मग अंधार पडल्यावर एखादे पद्य सत्र, जेवणे आणि शेवटी प्रार्थना. रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात बाकी सर्वत्र अंधार भरून राहिलेला असताना “मातृमंदिर में चलो” ही प्रार्थना म्हणताना खूप शांत वाटायचं. तंबूतल्या शिबिरात खूप धमाल केली. अनुभवकथनाच्या सत्रांना एक दिवस सुवर्णा ताईंनी बचत गटाच्या कामाविषयी सांगितलं, एक दिवस बागेश्री ताईंनी त्यांच्या दारूबंदीच्या कामाचे थरारक अनुभव सांगितले. एक सत्र पोंक्षे सरांनी पण घेतलं होतं. पण ते कशावर होतं ते आठवत नाहीये.

उद्योग तर असंख्य केले. तिथल्याच एका झाडावर मचाण बांधलं होतं, एक दिवस प्रत्येक पथकाला चूल बांधून त्यावर दिलेल्या शिध्यातून स्वयंपाक करायचा होता. एक भाजी, खिचडी आणि पापड (त्याचा आम्ही मसाला पापड केला). आणि ही स्पर्धा होती! वेळेचं बंधन असलेली. चुलीसाठी दगड शोधण्यापासून सुरुवात होती. मी माझ्या ड्रेसला निखाऱ्यावर गेल्याने भोक पाडून ठेवले होते. मज्जा आली होती. एक दिवस तायांनी जाहीर केले. आज दुपारचा स्वयंपाक नाही. मग जेवायचे काय? तर आम्ही जवळच्या गावांत जायचे. काम करायचे आणि कामाच्या बदल्यात जेवण करून यायचे! मग काय आम्ही जवळच्या एका छोट्या वाडीवर गेलो. तिथे आमचा हा प्रस्ताव मांडला. एक बाई बाहेर भांडी घासत होती. तिने सांगितले ठीक आहे, भांडी घासा. तासभर त्यांची ती जड पितळी भांडी मन लावून घासली. मग कळले की आज त्यांच्या घरी nonveg चा बेत होता! मी आणि अजून एक दोन जणी पडलो शाकाहारी! आता काय करायचं? मग तिची शेजारीण धावून आली. म्हणाली काळजी नको, आमच्याकडे खा! पण मग काम न करता कसं खायचं? मग आधी जेवलो आणि नंतर तिला शेणाने अंगण सारवायला मदत केली. तिथेच पलीकडे काही छोट्या मुली शाळेच्या गॅदरिंगसाठी नाच बसवत होत्या. मग आमच्यातल्या उत्साही मुलींनी तिथे जाऊन लगेच choreographer ची भूमिका निभावली! तिथल्याच एकीचे निरेचे दुकान होते. मग तिथे जाऊन नीरा प्यायलो. तोवर संध्याकाळ झाली होती. मग तिथल्या सगळ्यांचा निरोप घेऊन, संध्याकाळपर्यंत बाहेर ठेवलेली असल्याने आपण नीरा प्यायलो की ताडी असे गहन डिस्कशन करत शिबिरात परत आलो J खरं सांगायचं तर तेव्हा आम्हाला शिबीरच चढलं होतं!

एके दिवशी जवळच्या एका वीटभट्टीवर गेलो. तिथल्या बायकांकडून वीट कशी पडतात हे शिकलो आणि स्वतः काही विटा पाडून बघितल्या. तो साचा माती भरल्यावर भयंकर जड होतो. तो डोक्यावर घेऊन जाणे आणि ओतणे हे किती कष्टाचे काम आहे ह्याची जाणीव झाली. ह्या श्रमाच्या कामाचे दिवसाचे फक्त २० रुपये मिळतात आणि पुरुषांना बायकांपेक्षा जास्ती पैसे मिळतात (जरी सारख्या विटा पाडल्या तरी) हे ही तिथल्या बायकांकडून ऐकलं. आपल्या समाजात काय प्रश्न आहेत हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवांतून असं समजत होतं.

एक दिवस गटचर्चा आणि model making अशी सत्रं होती. गटचर्चेला वेगवेगळे विषय होते. नंतर model making साठी आदर्श गाव असा विषय होता. थोडे फार साहित्य दिले होते. मग आम्ही खपून एक गावाचे मॉडेल तयार केले. मॉडेल खाली जमिनीवरच. त्यातील प्रत्येक जागेवर एक काडी खोचून ही जागा आदर्श कशी अशी एक चिठ्ठी टाकली होती! मला वाटतं सुवर्णा ताई परीक्षक म्हणून होत्या. मग आमच्या त्या अति- आदर्श गावाचे मॉडेल बघताना त्यांनी विचारले, “जर गावातले सगळे लोक इतके चांगले, सज्जन असतील तर मग गावात पोलीस स्टेशन कशासाठी?” आमच्यातल्या एकीचे डोके तेवढ्यात चालले, “ताई, गावातले लोक सज्जन असले तरी बाहेरून चोर येऊ शकतात ना! म्हणून पोलीस स्टेशन!” हे उत्तर ऐकून सुवर्णा ताईंबरोबर आम्ही सगळ्या सुद्धा हसत सुटलो! कल्पक जाहिराती, नाटके रचणे अशी बरीच मजेशीर सत्र आम्ही त्यावेळी केली. एका संध्याकाळी एका क्षितिजावर मावळता सूर्य आणि त्याच्या बरोब्बर उलट दिशेच्या क्षितिजावर उगवता चंद्र असा नजारा पाहिला होता. एका रात्री शिबिराच्या जागी चोर आला! आम्ही रात्रीच्या रक्षणाच्या वेळा वाटून घेतल्या होत्या. रोज एक ताई आणि काही मुली दोन दोन तासांच्या गस्तीवर जाग्या राहायच्या. मध्ये शेकोटी पेटवलेली असायची. तर अशा एका रात्री चोर आला होता. तो माणूस दिसल्याने गस्तीवरच्या मुलींनी आरडाओरडा केला आणि चोर चोरी न करताच पळून गेला! दुसऱ्या दिवशी तो चर्चेचा विषय!

Toilets साठी जरा दूर चर खणले होते आणि आडोसा तयार केला होता. आंघोळीला सुट्टीच होती. फक्त हात पाय तोंड स्वच्छ धुणे ह्यावर काम चालू होतं! पिण्याचं पाणी असंच छोट्याश्या तळ्यातून घेऊन, शुद्ध करून वापरत होतो. कोणत्याही शहरी सुखसोयींशिवाय आणि पूर्णपणे निसर्गाच्या सहवासात ते सात दिवस घालवले होते. शिबिरात एक शब्द एकदम हिट झाला होता – भंजाळणे! कोणत्याही प्रसंगी, सजीव निर्जीव कशालाही फिट बसणारा असा भापो शब्द! थोडक्यात आम्ही सगळ्याच भंजाळलो होतो. एका संध्याकाळी आमचे तंबू गुंडाळून जड मनाने पुणे शहरात परत आलो. संध्याकाळचे सात वाजले असतील. शहरातल्या विजेने झळाळून उठलेल्या लक्ष्मी रस्त्यावरून बस शाळेकडे येत होती आणि अंधाराची सवय झालेले आमचे डोळे तो प्रकाश पाहून भंजाळून गेले! तेव्हा आम्हाला भंजाळणेचा एक नवीन अर्थ कळला!
मला वाटते आठवीत (की नववीत?) पुन्हा एकदा आमची क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती! त्याच्या तयारीसाठी एक क्रीडा शिबीर झाले होते. म्हणजे सात दिवस फक्त खेळ..शाळा, अभ्यासाचे तास काही नाही. तेव्हा एस पी च्या मैदानावर पडीक असायचो. भरपूर नवीन पद्य शिकलो होतो.

ह्या साऱ्या उपक्रमांबरोबर नेहमीचा अभ्यास, युनिट टेस्टस, अवांतर वाचन ह्या गोष्टी चालू होत्याच! आता विचार करताना वाटतं की केवढ्या गोष्टी करत होतो आपण एका वेळी! त्या मानाने आत्ताचं आयुष्य एकदम एकारलेलं आणि एकसुरी वाटू लागतं! मग आठवीत अनुराधा ताईंनी शिकवलेल्या वि. म. कुलकर्णी यांच्या “आठवते ना” कवितेच्या ओळी आठवतात.

मला तरी नित आठवते गा, आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये या उबगुनी जाता देह आणि मन!

आठवते ना, आठवते ना!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle