आठवते ना, आठवते ना! - इयत्ता नववी

नववीच्या खूप आठवणी आहेत पण एक आठवण आहे जी सगळ्या आठवणींपेक्षा सर्वात जास्ती ठळक आणि लाडकी आहे आम्हा सगळ्यांचीच! म्हणून मी ती सगळ्यात शेवटी सांगणार आहे!

नववीत आणि दहावीत इंग्रजीसाठी लक्ष्मी मॅडम शिकवायला होत्या. She was the best teacher for English! सगळ्यात मजेची गोष्ट अशी की त्यांना स्वतःला फक्त इंग्रजीच उत्तम येत होतं. हिंदी खूप जुजबी आणि मराठी नही के बराबर! त्यामुळे आमची सुरुवातीला थोडी पंचाईत झाली! पण लवकरच लक्षात आलं की it was rather a blessing in disguise! तसं आम्हाला इंग्रजी बोलता येत होतं. पण इंग्रजी बोलण्याची फारशी गरज भासत नसल्याने आम्ही बोलत नव्हतो. नाही म्हणायला सातवीत की आठवीत एकदा आमच्या वर्गाच्या डोक्यात भाषा सप्ताह पाळण्याची कल्पना येऊन ती राबवून झाली होती. म्हणजे एक आठवडा फक्त त्याच भाषेत एकमेकींशी बोलायचं! आता मात्र लक्ष्मी मॅडमशी इंग्रजीतून बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. लक्ष्मी मॅडम शिस्तीच्या होत्या पण लवकरच त्यांच्याशी आमच्या वर्गाची गट्टी जुळली आणि मग त्या किती प्रेमळ आहेत हे पण लक्षात आलं. मग त्यांच्याशी बोलताना जास्ती बेधडक बोलायला लागलो आणि त्याने आमचं इंग्रजी सुधारायला खूप मदत झाली! लक्ष्मी मॅडम खूप सुरेख शिकवायच्या! आमची इंग्रजीची पुस्तकं पण अतिशय वाचनीय होती. Wordsworth, W. Somerset Maugham, Charles Dickens, O. Henry, Shakespear, Rudyard Kipling अशा अभिजात लेखकांपासून ते Anita Desai, Vikram Seth अशा नव्या फळीच्या लेखकांपर्यंत सर्व साहित्याची ओळख ह्या पुस्तकांतून झाली. लक्ष्मी मॅडमनी शिकवलेल्या दोन कविता माझ्या अजूनही खूप चांगल्या लक्षात आहेत. The frog and the nightingale by Vikram Seth आणि The Rime of the Ancient Mariner by Samuel Taylor Coleridge. ह्या दोन्ही कवितांची फक्त काही कडवी आम्हाला क्रमिक पुस्तकांत होती. पण आम्हाला कविता नीट समजाव्यात म्हणून त्या दोन्ही कविता आम्ही पूर्ण शिकलो. Ancient Mariner ही खूप म्हणजे खूप मोठी कविता आहे. ती खरंतर एक मिनी कादंबरी आहे. फार मजा आली होती ती शिकताना! मी अनेक कारणांसाठी पुन्हा नववीत जायला तयार आहे त्यातलं एक कारण म्हणजे इंग्रजीचे तास! खरतर शाळेत असताना माझं इंग्रजी अवांतर वाचन Enid Blyton - Fantastic four च्या पुढे गेलं नाही. ह्याउलट मराठी वाचन खूप चौफेर होत होतं. त्यात अनेक अनुवादित पुस्तकं देखील होती. पण ह्या इतक्या सुरेख इंग्रजीच्या पुस्तकांनी इंग्रजी साहित्य विश्वाची एक सुंदर ओळख करून दिली. मग कॉलेजमध्ये गेल्यावर भरपूर इंग्रजी पुस्तकं वाचली गेली.

नववीत (सुदैवाने) मला अचानक गणिताची गोडी उत्पन्न झाली होती असं आठवतंय! कारण trigonometry आणि log tables! गणिताला जोशी सर होते. आम्ही नववीत गणिताचा एक छान प्रकल्प केला होता. पुण्यातल्या महत्वाच्या स्थानांची/इमारतींची models बनवली होती आणि त्यांचे प्रदर्शन मांडले होते. आमच्या गटाने शिवाजी नगर रेल्वे स्टेशन बनवले होते. त्यासाठी शाळेच्या वेळात शिवाजी नगर स्टेशनला जाऊन सगळी मापे घेऊन आलो होतो. असं शाळेच्या वेळात आपली प्रकल्पाची कामं करायला बाहेर जाणे फार सहज होत असे. ह्या प्रकल्पात पण खूप मजा आली होती. संस्कृत शिकवायला भाग्यश्री ताई होत्या आणि संस्कृत व्याकरण शिकवायला विसुभाऊ. विसुभाऊ खूप खोलात जाऊन व्याकरण शिकवायचे (म्हणजे बाराखडीतल्या प्रत्येक व्यंजनाचा उच्चार कसा करायचा आणि तो तसाच का करायचा वगैरे) आणि त्यावेळी आपल्याला कळतंय की नाही असं वाटत होतं पण शाळा संपल्यावर जवळपास १० वर्षांनी माझ्या एका भाच्याला संस्कृत व्याकरण शिकवायची वेळ आली आणि पुस्तक पाहिल्या क्षणी सगळं लख्ख आठवलं तेव्हा खूप आनंद झाला!

नववीतली अजून एक खास आठवण म्हणजे क्रिकेट वर्ल्डकप! आमच्या वर्गाला क्रिकेटचं भारी वेड! आधीच्या वर्ल्डकपच्या वेळी आम्ही वर्गात writing pad आणि छोट्या बॉलने भारत विरुद्ध इंडिया अशा मॅचेस खेळलो होतो (कारण भारताच्या टीमशिवाय दुसऱ्या कुठल्याच टीममध्ये कोणी जायला तयार नव्हतं!). नववीच्या आमच्या वर्गाच्या खिडक्या ज्या एका बाजूला उघडायच्या तिथे मागे एक बिल्डींग होती. त्यातल्या एका फ्लॅटची गच्ची त्या खिडकी समोर यायची. त्या घरातले आजोबा आणि त्यांचा नातू हे आम्हाला सामील होते. ज्या दिवशी मॅच सुरु असेल त्या दिवशी दर दोन तासांच्या मध्ये त्यांना खिडकीतून हाक मारायची मग ते येऊन आम्हाला स्कोर सांगायचे! असं सेटिंग होतं! एकदा अशीच मॅच सुरु होती. शेवटचा तास आणि तिकडे मॅचच्या शेवटच्या ओव्हर्स. आमचं कोणाचंच वर्गात लक्ष नव्हतं! आणि इतक्यात बाहेरून फटाक्यांची माळ फुटल्याचे आवाज आले आणि आम्ही सगळ्याजणी “इय्ये! जिंकलो!!” असं जोरात ओरडलो होतो आणि टाळ्या वाजवल्या होत्या! मला वाटतं ताईंना कळलंच नव्हतं की अचानक काय झालं ते!

नववीत आम्ही जे प्रकल्प केले त्यात बरीच विविधता होती. कारण आमच्या whatsapp वरच्या चर्चेत आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी आठवत आहेत! काही जणी भविष्यवेध (futurology) प्रकल्पात होत्या. ह्यात एखादा विषय घेऊन त्याच्या भविष्यातील शक्यतांचा अभ्यास करायचा होता. त्यात एका गटाने मराठी कथेचे भविष्य असा विषय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी थेट शांता शेळके यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली होती! आमच्या प्रत्येकीकडे अशा बऱ्याच संस्मरणीय आठवणी आहेत! काश आम्ही सगळ्या मिळून इथे लिहू शकलो असतो!

आमच्या गटाने समाजशास्त्र विषयात प्रकल्प केला होता. आमचा विषय होता –ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण. मला आठवतंय की त्यासाठी एकदा आम्ही तिघी जणी शाळेतून थेट वेल्ह्याला राहायला गेलो होतो. म्हणजे घरी जाऊन थोडे कपडे/इतर आवश्यक सामान घेऊन आलो आणि स्वारगेटला गेलो. एसटीत बसलो आणि आमच्या बडबडीला सुरुवात झाली. त्या नादात आम्ही तिकीट काढायचे विसरलो! आणि नेमके त्या गाडीत तिकीट चेकर आले! त्यांनी आम्हाला पकडले. सुदैवाने तोवर आमचा स्टॉप आला होता त्यामुळे तिथेच उतरवून चौकशीला सुरुवात झाली! आम्ही त्यांना सांगत होतो की तिकिटाचे पैसे आमच्या हातातच होते पण कंडक्टरने विचारलेच नाही! काही झालं तरी तिघींच्या दंडाचे पैसे काही आमच्याकडे नव्हते (घरून इतके पैसे घेऊन आलो नव्हतो). आम्ही थोड्या घाबरलो होतो पण तरी आमची बाजू आम्ही मांडली. शेवटी त्या भल्या चेकरने केवळ तिकिटाचे पैसे घेऊन आम्हाला सोडून दिले! त्यावेळी आम्हाला इतक्या काय गप्पा मारायच्या असायच्या आता आठवत पण नाही पण ह्या गोड गप्पांमुळे आम्ही चांगल्याच अडचणीत आलो होतो! ती वेल्ह्यातली रात्र चांगलीच लक्षात आहे. वेल्हे म्हणजे प्रबोधिनीचे गाव! त्यामुळे सगळीकडे आम्हाला खूप सहकार्य आणि प्रेम मिळाले. त्या रात्री खचाखच चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहिलं होतं. आणि गावात चक्री भजन सप्ताह सुरु असल्याने रात्री झोपू शकलो नव्हतो!

नववीत (आणि आठवीत पण बहुतेक) विज्ञान दिनाला NCL, DRDO, IUCAA अशा संस्थांमध्ये गेलो होतो. त्या भेटी खूप नीट लक्षात आहेत. NCL मध्ये glass blowing, polyers, liquid nitrogen वगैरे गोष्टी पाहिल्या होत्या. काही शनिवार आयुकामध्ये खगोल शास्त्रावरची व्याख्याने ऐकायला देखील जात होतो.

नववीमध्ये शांतला ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही सहाध्याय दिनाला सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. त्याच्या आधी का नंतर शाळेत किरण पुरंदरे यांचं पक्षी निरीक्षण आणि त्यांचे अनुभव ह्यावर व्याख्यान झालं होतं. अशी सुंदर व्याख्यानं ह्या ना त्या निमित्ताने शाळेत होत असायची. नववीत असताना डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अभय बंग यांची व्याख्यानं झाली होती (मला हे आजीबात आठवत नाहीये!). कारगिल युद्ध त्यावेळी सुरु होतं तेव्हा प्रबोधिनीचे एक माजी विद्यार्थी जे सैन्यात होते त्यांचे अनुभव कथन झाले होते.
पोंक्षे सर आम्हाला physics शिकवायला होते. पण त्याशिवाय त्यांनी आमचे परिस्थिती ज्ञानाचे तास घेतले होते. मला वाटतं आठवी ते दहावीला आठवड्यातून एकदा परिस्थिती ज्ञानाचा तास असायचा. ह्या तासाला त्या वेळेच्या चालू घडामोडींवर चर्चा, त्याची माहिती अशा गोष्टी असायच्या. हा नेहमी शेवटचा तास असायचा. एका प.ज्ञा.च्या तासाला पोंक्षे सर एक पुस्तक घेऊन आले आणि म्हणाले छोटंसं पुस्तक आहे. आपण वाचायला सुरुवात करू, नाही संपलं तर पुढच्या तासाला संपवू. असं प्रास्ताविक करून सरांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली. पोंक्षे सर अति-उत्कृष्ट अभिवाचन करतात! ते पुस्तक होतं – Richard Bach चं Jonathan Livingston Seagull! तास संपला आणि शाळा सुटल्याची घंटा वाजली तेव्हा गोष्ट अशा ठिकाणी आली होती की कोणीही जागचं हललं नाही. ५ मिनिटं थांबून आम्ही बाकीच्या वर्गांना जाऊ दिलं (कारण खूप गोंधळ होता आणि त्यामुळे ऐकू येत नव्हतं) आणि मग सरांनी पुढे वाचायला सुरुवात केली. त्या दिवशी आम्हाला सरांनी अख्खं पुस्तक वाचून दाखवलं! आज ही एका टेबलावर बसून पुस्तक वाचणारे सर आणि नीट ऐकू यावं म्हणून खुर्च्या पुढे ओढून त्यांच्या भोवती कोंडाळं करून बसलेल्या आम्ही असं चित्र माझ्या डोळ्यांपुढे आहे.

पोंक्षे सरांनी आमच्या वर्गाचे खूप लाड केले आहेत! As a class, we share some of the best memories of our lives with him. Rather he is the sole reason behind creating those memories!! We are truly BLESSED to have him as our mentor. प्रबोधिनीत असणं हेच एक स्पेशल असल्याचं फिलिंग असायचं पण त्याही पलीकडे जाऊन आपला वर्ग काहीतरी सुपर स्पेशल आहे असं वाटायला लावणारी घटना नववीत घडली. ती म्हणजे आमचं पंचनदीचं शिबीर! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आमचा वर्ग, युवती विभागाच्या दोन ताया आणि पोंक्षे सर, सविता ताई आणि अस्मिता ताई असे सगळेजण चार दिवस कोकणातल्या पंचनदी ह्या सुंदर चिमुकल्या गावात राहायला गेलो होतो. तिथल्या एका वाडीत आमची रहायची व्यवस्था होती. हे आमच्या वर्गाचं एकमेव शिबीर ज्यात आम्ही सगळ्या ३६ जणी उपस्थित होतो. ह्या शिबिराचे संयोजन करण्यात आणि तिथे मार्गदर्शन करण्यात श्री. दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा ताई ह्या दोघांचा खूप मोठा वाटा होता. ह्या शिबिराच्या दोन दिवसांची दैनंदिनी लिहिलेली पाने मला नुकतीच घरी आवराआवरी करताना सापडली! त्यावरून शिबिराचे नाव प्रेरणा शिबीर होते असे कळले!

आम्ही पुणे स्टेशनहून दापोलीच्या बसमध्ये चढलो. सलग रिझर्वेशन नव्हतं म्हणून बसमध्ये एकत्र बसलो नव्हतो. काही वेळाने कळलं की ७ सीट्सचं डबल रिझर्वेशन झालंय! मग तो गोंधळ निस्तरून नव्याने बसायला जागा मिळवल्या आणि धमाल करायला सुरुवात झाली. गाणी म्हणत, यक्षप्रश्न सारखे खेळ खेळत दापोलीला पोचलो आणि तिथून एका टेम्पोने पंचनदीला पोचलो. इथे एका सुंदर वाडीतल्या प्रशस्त घरात आमची रहायची सोय होती. ती वाडी, कोकणातली लाल माती आणि प्रसन्न, शुद्ध हवा ह्यामुळे एक जादुई मूड सेट झाला. आता असं वाटतं की हे शिबीर इतकं खास होतं कारण आमच्या वर्गाचं हे असं शिबीर पहिल्यांदाच होत होतं. त्यामुळे अत्यंत बेसिक नियम आणि सूचनांवर शिबीर झालं! आम्ही सगळेच जण सर, ताई यांच्या सकट एकदम निवांत होतो! त्या हवेतच एक सुकून होता जो आमच्या मनात आपोआप उतरून आला.

आम्ही संध्याकाळी पोचलो होतो. फ्रेश झाल्यावर नेहमीप्रमाणे उपासनेने शिबिराला सुरुवात झाली. त्यानंतर जवळच्या कोळथरच्या समुद्र किनारी गेलो. तिथे जायचा रस्ता फार सुंदर आहे. त्या रस्त्यावरून नंतरच्या चार दिवसांत आम्ही खूप हुंदडलो. समुद्रावर गेलो. एक कुठलं तरी इंग्रजी गाणं होतं nursery rhyme सारखं. ते गात गात हातात हात घालून रस्त्यावरून zigzag पावलं टाकत चालायचं, चार पावलं पुढे जायचं आणि एक पाउल मागे अशी काहीतरी वेडी पद्धत वापरून चालायचो आम्ही! पंचनदी ते कोळथर अख्खा रस्ता रिकामा असायचा! समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि तिथे आम्ही सोडून कोणीही नाही! मनसोक्त समुद्रात डुंबलो, वाळूत खेळलो. अक्षरशः लहान मुलांसारखी मज्जा केली! समुद्रावरून परत आल्यावर मस्त आंघोळी केल्या आणि पुढच्या सत्रासाठी पडवीत जमलो. त्यात सरांनी आम्हाला चक्र (जयवंत दळवी?) ही दीर्घकथा वाचून दाखवली. महाभारताकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला लावणारी कथा! मग जेवलो, प्रार्थना म्हटली आणि झोपी गेलो!

दुसऱ्या दिवशी लवकर उठून दिलीप सरांबरोबर निसर्ग वाचनाच्या सत्रासाठी वाडीत हिंडायला गेलो. सरांना सगळी झाडं माहिती होती. मग त्यांच्याकडची माहिती ऐकत ऐकत हिंडलो. निसर्गाचं चक्र कसं चालतं ह्याची जाणीव आम्हाला त्यावेळी झाली. ह्या शिबिरात सगळे दिवस दिलीप सर आमच्या बरोबर होते. आम्हाला भरभरून ज्ञान देत होते.

फक्त चार दिवस होतो आम्ही तिथे पण इतक्या वर्षांनी देखील मला तिथले रस्ते, घरं सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आठवत आहेत. घरातून बाहेर आलं की वाडीतल्या मातीच्या रस्त्याने खाली यायचं आणि मुख्य डांबरी रस्त्याला लागायचं. उजवीकडे गेलं की शाळा, मग पुढे गाव वगैरे. आम्ही मात्र डावीकडे कोळथरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळायचो. त्या रस्त्याने पुढे गेलं की सप्तेश्वराचं मंदिर होतं. बाहेर आवारात दीपमाळ आणि आत मंडप असं देखणं मंदिर होतं ते. ह्या मंदिरात आम्ही बराच काळ पडीक असायचो. आमच्यासाठी येताना पुण्याहून खूप सुंदर सुंदर पुस्तकं आणली होती. दुपारच्या सत्रात त्या मंदिरात आपली एक जागा पकडून आम्ही सगळे जण पुस्तक वाचनात गढून गेलो आहोत असं एक सुंदर चित्र डोळ्यापुढे आहे.

त्या वाडीत एक गावठी कुत्रा होता. तो सतत आमच्या बरोबर हिंडायचा. आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं चंपू J एक दिवस सकाळपासून चंपू काहीतरी विचित्र आवाज काढतोय असं आम्हाला वाटलं. आमचं expert diagnosis ठरलं की चंपूला खोकला झाला असावा. मग सर्वानुमते त्याला व्हिक्सची गोळी खायला देण्यात आली. जी त्याने चघळली आणि बाहेर टाकून दिली. ह्यामुळे आम्ही फार disappoint झालो होतो! अशी मजा मजा चालू होती आमची!

एका सकाळच्या सत्रात दिलीप सरांचं अनुभवकथन झालं. पुण्यात शिक्षण, घर, इंजिनियर झाल्यावर टेल्कोमध्ये नोकरी, लग्न, संसार, मुलं, छंद म्हणून वैदिक गणिताचे क्लासेस घेणं असं सगळं समाजमान्य आयुष्य सुरु असताना दिलीप सर आणि पौर्णिमा ताई यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगण्याचा निर्णय घेतला आणि आपला पुण्यातला संसार गुंडाळून इथे कोकणात कुडावळे ह्या छोट्याशा ठिकाणी नव्याने सुरुवात केली. हा निर्णय का घेतला, हे असं जगताना काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली आणि ह्या साऱ्यातून काय मिळवलं असं सगळं दिलीप सरांनी मोकळेपणाने सांगितलं. मला दिलीप सरांनी दिलेलं उदाहरण आजही आठवतंय. आपली प्रश्नांना उत्तर शोधण्याची आधुनिक पद्धत झाडाच्या फांद्यांसारखी आहे. एका प्रश्नाला उत्तर शोधतो आणि त्या उत्तरातून अजून नवीन प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नांच्या फांद्या आणि पर्यायाने झाड वाढत राहते. आमच्यासाठी हे सत्र म्हणजे एक eye opener होतं. हा असा पर्यावरणाचा आणि जीवनशैलीचा एकत्रित विचार आमच्यासाठी नवीन होता. आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी आपण कशी नष्ट करत आहोत आणि ह्या अधिकातून अधिकाकडे अशा विकासाचे प्रारूप अंतिमतः विनाशाकडे कसे नेईल ही दृष्टी आम्हाला तेव्हा मिळाली. आज आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. हा विकास शाश्वत नाही ह्याची जाणीव जगभर होऊ लागली आहे पण ह्या साऱ्याची जाणीव १५ वर्षांपूर्वी आम्हाला ह्या शिबिरात दिलीप सरांनी करून दिली. तेव्हा गतिमान संतुलन (दिलीप सरांनी चालू केलेलं मासिक) सुरु झालं नव्हतं. ह्या शिबिरानंतर आमच्यापैकी अनेक जणी ह्या ना त्या माध्यमातून पर्यावरणस्नेही चळवळींशी जोडल्या गेल्या. माझ्यासाठी हे शिबीर आणि अनिल अवचट यांचं कार्यरत हे पुस्तक ह्या दोन गोष्टींनी माझा प्रगतीविषयीचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला. I owe a lot to this Shibir.

दिलीप सरांबरोबर आम्ही रोज सकाळी फिरायला जायचो. एक दिवस आम्ही खाडीलगतच्या खारफुटीच्या जंगलात गेलो. तिथे मग ही खारफुटीची झाडं कशी वाढतात. ही सगळी परिसंस्था (ecosystem) कशी काम करते. ह्या साऱ्याची माहिती मिळाली. नंतर चालत चालत आम्ही खाडीच्या तोंडाशी आलो आणि तिथल्या उथळ पाण्यातून तरीने (तर = छोटी नाव) पलीकडच्या किनाऱ्यावर गेलो. आमच्या तरींपैकी एक तर त्या किनाऱ्याला पोचल्यावर सगळे उतरायच्या आधी पाण्यातच उलटली आणि त्या तरीतल्या सगळ्या जणी पाण्यात! आम्हा सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती!

एका दुपारी आम्ही सत्यजित रे यांचा पाथेर पांचाली पाहिला. नंतर त्या सिनेमाचं पोंक्षे सरांनी सुंदर रसग्रहण केलं होतं. त्यामध्ये ह्या सिनेमाच्या trialogy बद्दल सांगितल्याचं आठवतंय. त्या सिनेमाचा एक उदास प्रभाव आमच्यावर दिवसभर राहिला. एका रात्री सविता ताईंनी खूप सुंदर कविता वाचन केलं होतं. तेव्हा ऐकलेली ती फुलराणी अजून आठवतेय. एका दुपारी आमच्यासाठी खास फणसाच्या भाजीचा बेत केला होता. ह्या खास बेतामुळे त्या दिवशी जेवायला उशीर झाला. आम्हाला सगळ्यांना जाम भूक लागली होती. मग वेळ जाण्यासाठी “दिव्य ध्येय की ओर तपस्वी” हे पद्य शिकलो. अशी कडकडून लागलेली भूक आणि चविष्ट फणसाची भाजी! आम्ही जेवणावर ताव मारला! आम्ही रोज आळीपाळीने वाढपाची आणि मागच्या आवराआवरीच्या कामांची जबाबदारी घेत होतो. ज्यांच्यावर ही जबाबदारी असायची त्या सगळ्या मुली नंतर जेवायच्या. आज मात्र आधीच जेवायला उशीर झाला होता. त्यावेळी मग वाढणाऱ्या मुलींना आम्ही आमच्या ताटातले घास भरवले होते असं आठवतंय! Sheer joys of friendship and innocence! ह्या शिबिरात पंगतींमध्ये वाढताना कसं वाढतात आणि वाढणाऱ्या माणसाने भुकेल्या पोटी वाढायचं असतं हे सगळं आम्ही शिकलो होतो.

एक दिवस आम्ही बसने दाभोळला गेलो होतो. एन्रॉनचा प्रकल्प बघायला. आम्ही तो प्रकल्प दुरूनच पाहिला पण तो प्रवास फार अविस्मरणीय आहे! आमच्या परतीच्या बसची वाट पाहत आम्ही बसलो होतो. हा वेळ कसा घालवणार मग त्यावेळी श्रद्धा ताईने गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिची आणि तिच्या मैत्रिणीची खरीखरी गोष्ट! बस आली त्यावेळी आम्ही त्या गोष्टीत पार रंगून गेलो होतो. बसमध्ये तिच्या भोवती कोंडाळं करून आम्ही जीवाचे कान करून गोष्ट ऐकत होतो. त्या गोष्टीचा शेवट फार दुःखी होता. आमचं उतरण्याचं ठिकाण आलं तेव्हा आम्ही सगळ्या रडत होतो. मग आमची ही अवस्था बघून शेवटी श्रद्धा ताईने सांगितलं की मुलींनो रडू नका! ही खरी गोष्ट नाही! It is the best story telling I have ever heard! पण ती मैत्रीची खोटीखोटी गोष्ट ऐकताना आमची खरी मैत्री खूप घट्ट झाली!

शिबिराच्या शेवटच्या रात्री आम्ही सगळ्या खजिना शोध खेळलो. त्याला धमाल आली होती. रात्रीची वेळ, तसा अनोळखी परिसर आणि आमच्याकडे ६ जणीत फक्त २ टॉर्चेस. मला आठवतंय त्या वाडीतून बाहेर जाण्याच्या अंधाऱ्या वाटेवर सगळ्या जणी मला सोडून पुढे निघून गेल्या. मिट्ट काळोख काही दिसत नव्हतं. मी आता पुढे जाऊ की मागे फिरू असा विचार करत होते. तेवढ्यात माझ्या पायाशी आवाज झाला. घाबरून पाहिलं तर चंपू! तो बिचारा माझ्या सोबत थांबला होता! मग मी त्याच्या सोबतीने वाडीबाहेर रस्त्यावर आले. तिथे लाईट होते. चंपूनी मला खूप मदत केली त्या रात्री!

दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याला आम्ही घरून आणलेला खाऊ संपवला. आम्हाला निरोप द्यायला दिलीप सर, पौर्णिमा ताई आणि त्यांची दोन्ही छोटी मुलं असे सगळे आले होते. त्यांचा आणि पंचनदीचा निरोप घेऊन आम्ही सगळे पुण्यात परत आलो. मी ह्या शिबिराबद्दल लिहिलंय खरं पण माझं समाधान झालेलं नाही. कारण पंचनदीचं शिबीर हा शब्दात धरून ठेवता येण्यासारखा अनुभव नव्हता. खरं सांगायचं तर ह्या एका शिबिराने आमच्या नववीच्या वर्षातल्या बाकी आठवणी खूप फिक्कट करून टाकल्या आहेत. कारण नववी म्हटली की डोळ्यापुढे तेच चार दिवस नाचायला लागतात! चारच दिवस होतो आम्ही तिथे पण अतिशय दवणीय भाषेचा आधार घेत सांगायचं तर नववीच्या आकाशातला पौर्णिमेचा चंद्र म्हणजे हे आमचं शिबीर! ज्याच्या चांदण्याची शीतलता आजही आमच्या मनात आम्ही सगळ्यांनी जपलेली आहे!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle