आठवते ना, आठवते ना!

२०१५- २०१६ हे वर्ष ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय वि. वि. पेंडसे (आप्पा पेंडसे) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी. ह्या विशेष स्मृती वर्षात आपल्याला काय करता येईल असा विचार करताना प्रशालेतील पाचवी ते दहावी मधल्या वर्षांच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात आली. दरम्यान मायबोलीवर शाळेच्या आठवणींचा एक धागा सुरु झाला आणि आठवणी लिहून काढायला निमित्त मिळाले! तिथे लिहिलेल्या आठवणी एकत्रित स्वरुपात राहाव्यात म्हणून इथे प्रसिद्ध करत आहे.

जुजबी प्राथमिक माहिती: (ज्यांना प्रबोधिनी आजीबात माहिती नाही त्यांच्यासाठी)

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : ५१०, सदाशिव पेठ पुणे -३० ह्या स्थानी असलेल्या वास्तूत ही शाळा भरते. शाळा १९६२ साली सुरु झाली. शाळेत पाचवी ते दहावी ह्या सहा इयत्ता आणि प्रत्येक इयत्तेत (कमाल) चाळीस वर्गसंख्येच्या दोन तुकड्या – एक मुलांची आणि एक मुलींची. एकूण पाचशेच्या आतली पटसंख्या म्हणजे फारच छोटुकली शाळा आहे. शाळेत मुलांचे सर्व वर्ग एका मजल्यावर आणि मुलींचे वेगळ्या मजल्यावर. म्हणजे मुलामुलींची शाळा असली तरी प्रबोधिनी co-ed नाही. शाळेत पाचवीत प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश परीक्षा आहे (लिखित + मुलाखत). ही साधारणतः चौथीच्या स्कॉलरशिपच्या धर्तीवर असते. परीक्षेतील प्रश्न हे MENSA (https://www.mensa.org/) च्या कसोट्या लावून तयार केले जातात. शाळेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातली मुले प्रवेश घेऊ शकतात. शाळेचे शैक्षणिक माध्यम हे CBSE board आहे. मी शाळेत असताना मिश्र (इंग्रजी + हिंदी) माध्यमाची शाळा होती. म्हणजे सामाजिक शास्त्र, हिंदी आणि संस्कृत हे विषय हिंदीमध्ये तर गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय इंग्रजीतून. आता बदलून पूर्ण इंग्रजी माध्यम झाल्याचं नुकतच समजलं. आम्हाला आठवीपर्यंत मराठी भाषा होती. नववी आणि दहावीमध्ये मात्र सामाजिक शास्त्र, संस्कृत, विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे पाच विषय होते. म्हणजे पाचवी ते आठवी मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या चारही भाषा higher level च्या असायच्या. अर्थात हे काही वेगळं आहे असं त्यावेळी आजीबात जाणवलं नाही. आता ही अगदी तोंडओळख म्हणता येईल. कारण प्रबोधिनीचं प्रबोधिनीपण हे तिथे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाने नाही. पण ज्यांनी ह्याआधी ज्ञान प्रबोधिनी शाळेबद्दल काहीच ऐकलं नसेल त्यांच्याकरीता ही जुजबी ओळख.

शाळेच्या आठवणी लिहिताना एक disclaimer देणे जरुरी आहे. प्रत्येकालाच आपली शाळा ग्रेट आहे असे वाटत असते. त्यामुळे माझ्या पुढच्या लिहिण्यात प्रबोधिनी कशी भारी अशा पध्दतीचे उल्लेख आले तर ती तुलना नसून शाळेबद्दल असणाऱ्या प्रेमातून येणारा शब्दप्रयोग आहे असे समजावे! त्याशिवाय शाळेतले उपक्रम दर वर्षी अभिनव पद्धतीने पार पडत असतात. त्यामुळे प्रत्येक माजी विद्यार्थ्याकडे सारख्याच आठवणी फार कमी असतात!

­­आज मागे वळून बघताना आत्तापर्यंतच्या आयुष्यात जर जीवन बदलून टाकणारी किंवा वेगळी दिशा देणारी घटना कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझं उत्तर निःसंशयपणे मला प्रबोधिनीत प्रवेश मिळणे असे असेल. आज मी जी काही आहे त्यात माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त सर्वाधिक मोठा वाटा हा माझ्या शाळेचा आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा पिंड प्रबोधिनीत घडला आहे (Made in Prabodhini).

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle