नभ उतरू आलं - १

पलोमा

रविवारी सकाळी दादर स्टेशनला कोयनेत बसल्यापासनं छातीत धडधडायलंय. हा जॉब स्वीकारून मी बरोबर करतेय ना? कसे असतील पुढचे तीन महिने? इथपासून ते का जातेय मी परत? कसं काम होईल माझ्या हातून? आणि तो? तो काय विचार करत असेल? असे सतराशे साठ प्रश्न मनात ठाण मांडून डोकं बाद होण्यापूर्वी मी कानात इअरफोन्स खुपसले. विचार बंद!! Deep breath.. deep breath...

स्पॉटीफायवर 'जेमेल हिल इज अनबॉदर्ड' पॉडकास्ट सुरू केलं. आता दिवसभराची निश्चिंती!

सिडनी कार्टर नावाची एक बास्केटबॉल कोच बोलत असताना पुणं आलं. ट्रेन थांबताच घीवाला मधून ऑर्डर केलेली व्हेज बिर्याणी, रायता डिलिव्हरी आली. पहिल्याच घासाला इतकी सपक की काय सांगू! बॅगेतून चटणीची पुडी काढून थोडी चटणी शिप्पडल्यावर कुठे जिभेला थोडी चव आली. खाऊन झाल्यावर शेजारच्या एका गप्पिष्ट काकीने हातावर मस्त भाजलेली तीळ बडीशोप ठेवली. तेवढ्यासाठी तिची बडबड माफ! मग तिचा दुसरीतला लहाना त्याचं नवीन मॅग्नेटवालं बुद्धिबळ दाखवून खेळायलाच बसला. असल्या गोड बिटक्यांना 'नाही' नाही म्हणता येत बाबा . बराच उशीर करून शेवटी मला चेक मेट केल्यावर, पोरटा नाचत माझ्याकडे बघून ओरडला "आव्हान सप्पुष्टात!!" तेव्हा आख्खा डबा हसायला लागला! मिरजेला ते लोक उतरल्यानंतर जाऊन एक भलामोठा गरमागरम वडापाव आणि इडली चटणी हाणल्यावर कुठे नॉस्टॅल्जिया जरा विझला.

खाल्ल्यावर शांततेत जी झोप लागली ती पार कोल्हापूरची निळी फीत लावलेला पांढरा शंकरपाळा दिसल्यावरच जाग आली. गाडी सरकत सरकत स्टेशनच्या लाल उतरत्या छपरापुढचे पांढरे त्रिकोण दाखवत थांबली तेव्हा 'आपल्या ' गावात पोचल्याचं जाणवून घसा दाटूनच आला एकदम! नाही म्हणायला शेवटचं घरी येऊन वर्ष होत आलं होतं.

दोन मोठ्या बॅगा ओढत मी बाहेर आले तोच समोरच्या काचेवर आयपीएलचा लोगो चिकटवलेली होंडा सिटी येऊन थांबली. भारी काम आहे यार! ड्रायव्हरने बॅगा डिकीत ठेवीपर्यंत मी पुढचं दार उघडून बसले.

लगेच घरी जुईच्या मोबाईलवर फोन लावला.

"हॅलो, आलीस का तायडे?"

"जुई?"

"च्यक, जाई! जुई नेहमीसारखी पुस्तकातले दात बघत बसलीय." चिडवत बोलणारी जाई आणि चष्म्यातून रागाने बघणारी जुई लगेच माझ्या डोळ्यासमोर आल्या.

"मग? बघू दे, डेंटिस्ट होईल ती पुढच्या वर्षी! मी नीट पोचले. हांव, कारमध्ये आहे. मला जे घर दिलंय ना, सरनोबत वाडीत, तिथला पत्ता मेसेज केलाय. थोडं सामान वगैरे लावून झोपेन. सकाळी लवकर सेशन आहे, तेवढं झालं की घरी येतो." मी दमून हळूच जांभई दिली.

"ठिकाय. आल्यावर तुझ्यासाठी एक मज्जा सरप्राइज आहे. ये लवकर. सगळी राजारामपुरी तुझी वाट बघायलीय!" जाई जाम उत्साहात ओरडली.

"अरे वा, येतेच की. पप्पांना ट्रेनमधूनच कॉल केला होता. ते शुक्रवारी सुट्टी घेऊन येतील. शनवार - रव्वार सुट्टीच आहे बँकेला."

"आजीला देऊ काय फोन?"

"गुच्ची देईन एक! किऱ्यानिष्ट पोरगी!" मी फोन तोंडाशी धरून पुटपुटल्यावर तिकडे जाई फिदीफिदी हसत सुटली. "चल बाय, पोचले मी."

मोठ्या पांढऱ्या कंपाऊंड वॉलसमोर गाडी थांबली. मी आ वासून गेटपलीकडे दिसणाऱ्या लाल विटांच्या, काचेची बाल्कनी असलेल्या बंगल्याकडे बघतच राहिले. हायला, सरनोबतवाडी येवडी कधी सुधारली?! मेन गेटवरचा एक माणूस किल्ली घेऊन थांबला होता. थॅन्क्स म्हणून तो कटल्यावर मी गेट उघडलं. आत काळ्या फरशीचे अंगण आणि आजूबाजूला दोन, तीन पावसाने धुवून हिरवीगार झालेली पांढऱ्या चाफ्याची झाडे होती. पाणेरल्या काळ्या फरशीवर चार दोन चुकार फुले गळून पडली होती. सेफ्टी डोअरचे कुलूप उघडून मी आत शिरले. सगळं घर आधीच स्वच्छ करून ठेवलेलं होतं  हॉलमध्ये लाकडी फर्निचर, भिंतीवर मोठा टिव्ही, दोन बेडरूम्स, सुसज्ज किचन... घर रहायला सज्ज होतं. वॉव!  बॅगा बेडरूममध्ये ठेऊन मी आंघोळ करून आले. पजामा चढवून पडी टाकली. उशीला डोकं टेकताच अशी मस्त, बिनस्वप्नाची झोप लागली की बास्!

'इकडे कचरा, तिकडे कचरा
विसरून जाऊ बात होss'

डोळे चोळत मी उठून बसले.

'ओला कचरा, सुका कचरा
नवी करू सुरुवात होss '

माझे ओठ आता हसायला लागले. मी कोल्ल्हापूरात आहे!! पटकन बाल्कनीत जाऊन गाडीवाल्याला 'आज नाई ओss' सांगितल्यावर गाडी पुढे गेली.

शिट! सात वाजले!! मी पटापट आवरून तयार झाले. आयपॅड, पेन, नोटपॅड सगळं टेबलावर नीट मांडून ठेवलं. बाल्कनीत हाताशी आलेला एक चाफ्याचा घोस तोडून एका ग्लासात पाणी घालून ठेवला. सोफ्याची कव्हर्स हाताने नीट केली. खिडकीचे पडदे उघडले आणि सगळ्या हॉलवर एक नजर फिरवली.  आफ्टर ऑल, आय एम अ प्रोफेशनल.

हे भाड्याचं सुंदर घर मला मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलंय, कारण पुढचे तीन महिने मी त्यांच्या सुपरस्टार, अष्टपैलू क्रिकेटरबरोबर रादर त्याच्या डोक्यावर, त्याच्या विचारांवर काम करणार आहे. मी, डॉ. पलोमा फुलसुंदर, दिल्ली युनिवर्सिटीची सायकॉलॉजी टॉपर आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी मध्ये पीएचडी. कोल्हापूर, कारण हे त्याचं शहर आहे, जिथे तो जास्त रिलॅक्स असेल आणि माझंही. इथेच आम्ही दोघे लहानाचे मोठे झालो, बेस्टीज झालो, प्रेमात पडलो, फर्स्ट लव्ह, फर्स्ट किस, बरेच काय काय फर्स्टस आणि फर्स्ट ब्रेकअपसुद्धा. त्याला आता खूप वर्ष झाली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आमची पंचगंगा तरी आता पहिल्यासारखी कुठं राहिलीय! मला खरं तर हा जॉब नको होता. मी माझ्या बास्केटबॉल टीमबरोबर खूष होते पण ऑफर अशी आली की मी नाकारू शकले नाही. आफ्टर ऑल इट्स ह्यूज मनी. भरपूर पैसे, रेंट फ्री घर आणि माझ्या गावात, माझ्या कुटुंबाजवळ रहाणे! नाही म्हणायला चान्सच नव्हता. टेम्पररी आहे, तरीही मी हा जॉब स्वीकारला.

टीमचे कोच म्हणजे डी के घोरपडे मला काँटॅक्ट करताना म्हणाले होते की टीमबरोबर माझं पर्मनंट कॉन्ट्रॅक्ट होण्याचेसुद्धा चान्सेस आहेत. 'जर ' मी आत्ताच्या कामात यशस्वी झाले 'तर'! स्पोर्ट्स सायकॉलॉजी माझी पॅशन आहे कारण मला कायमच खेळात इंटरेस्ट आहे, शाळेत मी डिस्ट्रिक्ट लेव्हल ऍथलीट होते. गेम पूर्वी किंवा गेम सुरू असताना प्लेयर्स जो मेंटल गेम खेळतात त्याच्याबद्दल मला खूप जास्त कुतूहल होतं आणि आहे.

आता ह्या केसमध्ये बारावी नंतर लगेचच त्याला रणजी टीममध्ये घेतलं होतं आणि दोन वर्षात नॅशनल टीम. नंतर जेव्हा आयपीएल असेल तेव्हा त्यात असं अविरत, दमवून टाकणारं शेड्युल सुरू होतं. थोड्या इंज्यरीज आणि घोरपडे म्हणतात तसं टेंपररी बर्नआऊटमुळे तो सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. चिडचिडा झालाय आणि मॅच दरम्यान स्लेजिंगमुळे त्याची कॅप्टनशिप काढून दुसऱ्याला दिलीय. घोरपडे म्हणाल्याप्रमाणे मला त्याचं डोकं ताळ्यावर आणून गेमकडे वळवायचे आहे. त्यासाठी आधी मला माझे डोके ताळ्यावर ठेवावे लागेल. त्याच्याबरोर असताना प्रोफेशनल वागणे जामच कठीण आहे पण मी ते करू शकते.

टिंग!

बरोबर साडे आठावर काटा आला आणि बेल वाजली. मी केसांवरून एक हात फिरवला आणि जाताजाता आरशात डोकावले.

खोल श्वास. हम्म्म. आम्ही एकमेकांना समोरासमोर बघून य वर्ष झाली. ऑफकोर्स त्याचा फोटो खंडीभर मॅगझिन कव्हर्सवर नेहमीच झळकत असतो. त्याच्या सगळ्या मुलाखती मी पहात असते. इंस्टावर आम्ही एकमेकांना फॉलो करतो पण दोघेही लाईक किंवा कमेंट कधीच करत नाही. सेलिब्रिटी असल्यामुळे इतके वर्ष कायमच त्याच्या कुठल्या ना कुठल्या मॉडेल नाहीतर ॲक्ट्रेसबरोबर अफेअर्सच्या बातम्या, नाहीतर माध्यमांनी लिंक करणे तरी नेहमीच सुरू असते. मी त्याची प्रोफाईल म्यूट ठेवलीय कारण त्याला ह्या सगळ्या बायकांबरोबर बघून नाही म्हटलं तरी काळजात कुठेतरी टोचतंच.

आज त्याच्याबरोबर त्याचा ट्रेनर वेंडेल येईल. त्याच्याबरोबर बसून दोघांची सेशन्स शेड्युल करायची आहेत. घोरपड्यांनी मला काही एक्झॅक्ट आऊटलाईन दिली नाहीये पण त्याच्याबरोबर त्याच्या डेली रूटीनमध्ये सोबत राहून हळूहळू काम करायचे आहे. त्यासाठी त्यालाही माझ्या जवळच कुठेतरी घर दिलंय. बाकी कुणाचा डिस्टर्बन्स नको म्हणून शहरापासून जरा लांब.

दार उघडताना काचेतून बाहेर नजर गेली आणि माझा श्वास घशातच अडकला! बाहेर झगझगीत उजेडात तो उभा होता.

समर धैर्यशील सावंत.

त्याच्या वेव्ही केसांवर उन्हाचा कवडसा आला होता. त्याचे चमकते घारे डोळे माझ्याकडे पाहताच माझ्यात अडकून पडले. मी श्वास जरा हळू घेण्याच्या प्रयत्नात दरवाजा उघडला.

"पलोमा!" त्याचे ओठ ओळखीचं हसले.
त्याच्या नुसत्या एका करंगळीतसुद्धा एका अख्ख्या माणसाइतका चार्म आहे. अगदी लहानपणीसुद्धा तो कुणालाही आपल्या प्रेमात पाडू शकत असे. म्हणजे मोस्टली मलाच!

"हे! इट्स गुड टू सी यू!" अचानक कापणारा आवाज सावरत मी खोकले.

"आय गेस, तुला त्यांनी मला फिक्स करायला पाठवलंय. आर यू रेडी?" तो अचानक माझ्या कानाजवळ झुकून म्हणाला. माझ्या गालावर जरासं हुळहुळलं.

आईच्या गावात! इतक्या प्लेयर्सबरोबर काम करून मला कधीच असं फील झालं नव्हतं. आता तो माझ्याबरोबरचा मुलगा नव्हता. ही'ज अ मॅन नाऊ!

कॉन्फिडन्ट, सेक्सी, मस्क्युलर मॅन ज्याचा फ्रेश मिंटी, वूडी सुगंध थेट माझ्या नाकात घुसला. इतक्या सगळ्या प्रो ऍथलीटस् बरोबर काम करताना मी कायम कंट्रोलमध्ये होते. इतकं अनसेटल मला कोणीच केलं नव्हतं. पण आता म्हणजे माझा रिॲलिटीचा सेन्स पार बाद होत चाललाय. हेलो! बी प्रोफेशनल!! पटकन त्याच्यावरची नजर हटवून मी त्याच्यामागे पाहिले. मागचा मीठमिरी केसांचा क्रू कट केलेला, सावळासा टणक माणूस पुढे येऊन उभा राहीला. "हाय पलोमा, आयाम वेंडेल. हिज ट्रेनर. आय गेस वी विल बी वर्किंग टुगेदर." हसून त्याने हात पुढे केला.

"नाइस मीटिंग यू." मीही हसून हात मिळवला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle