नभ उतरू आलं - २

"ओके! सो.. मला तुम्हा दोघांना आधी भेटवायचं होतं म्हणजे तुम्ही एकत्र बसून आपापलं शेड्यूल मॅच कराल. तुमचं झालं की वेंडी हॉटेलवर परत जाईल, आमचा सकाळचा वर्कआऊट झालाय. आता दिवसभर त्याला काही काम नाही." समरने माझ्यावरची नजर न हटवता सांगितले.

"हम्म, तशीही मी कायम तुझ्या डोक्याजवळच आहे. 24 बाय 7 ऑन कॉल. कोचचा आदेश! सो, मी तुमच्या चालू शेड्यूलशी जुळवून घेईन." मी खांदे उडवले. आय मीन, मला एवढी मोठी रक्कम फक्त तीन महिन्यांसाठी मिळते आहे तर माझा फोकस पूर्णपणे तूच असणार आहेस. तुला जेव्हाही गरज पडेल, मी अ‍ॅव्हेलेबल आहेच.

शक्स, नॉट लाईक दॅट!! मी स्वत:ला मनातच एक टपली मारली.

मी त्यांना डायनिंग टेबलवर बसवून समोर पाण्याचे ग्लास ठेवले. वेंडेलबरोबर बसून असं शेड्यूल बनवलं की ज्यात तो समरला रोज सकाळी आणि अल्टरनेट डेज सकाळ - संध्याकाळ ट्रेन करेल आणि मी ती वर्कआऊट सेशन्स फक्त निरीक्षण करण्यासाठी अटेंड करेन. रोज माझी वेगळी वन-ऑन-वन सेशन्स होतील. ते दोघे आठवड्याचे सातही दिवस वर्कआउट करतात कारण जेव्हा तुमच्या फिटनेससाठी लाखोंनी पैसे लागलेले असतात, तेव्हा रिझल्ट द्यावाच लागतो.

बस का राव! एका सीझनसाठी मला कोणी तीन कोटी दिले तर मीसुद्धा रोज एवढा वर्कआऊट करेन!

समर काही बोलला नसला तरी घोरपडेनी मला सांगितलं होतं. तो पुढचं अजून एक वर्ष खेळावा म्हणून त्यात 50% हाईक द्यायलाही ओनर्स तयार होते म्हणे. त्यांना नक्कीच माझ्यावर प्रेशर टाकायचं होतं. हे ऑक्शन वगैरे पब्लिकली होतात पण मला त्यात अजिबातच रस नसल्यामुळे मी पूर्वी कधी वाचलं किंवा बघितलं नव्हतं. पण आता तिकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आता खेळाडूंचे पे चेक्स जितके मोठे तितकी माझ्या अपॉइंटमेंटची शक्यता जास्त असेल.

वेंडेल खुर्ची सरकवून उभा राहिला. आमच्याहून थोडासाच मोठा वाटतो. मेबी लेट थर्टीज. समरपेक्षा बुटका आहे पण एकदम टणक! "ऑल राईट. तो अब्बी मैं निकलता.. दिनभर थोडा रेस्ट करता हूं, फिर इवनिंग मे कॉल करता हालचाल के लिये."

समरने मान हलवली. "थॅन्क्स मॅन, सी यू टुमॉरो."

मी दार लावायला वेंडेलमागे गेले. "सी यू."

"पलोमा, हमको बहोत काम करना है. मेनली तुमको!" समर माझ्यामागे येत नाही ना चेक करून तो हळूच म्हणाला. "ही इज लाईक अ बुल! लेकीन अभी उसका अ‍ग्रेशन, अंदर का फायर थोडा बुझ गया है. गेम से ज्यादा गेम मे जो पॉलिटिक्स है उस्से वो थोडा हिल गया है. दिमागमें, यू नो! अँड एव्हरीवन इज होपिंग यू विल ब्रिंग द फायर बॅक..."

मी मान हलवली. ऑफ कोर्स मी तेच करायला इथे आलीय. त्याचा गेमवरचा फोकस आणि आत्मविश्वास अढळ रहायला हवा. त्याचं खेळावरचं प्रेम कमी झालं असेल किंवा त्यातल्या लोकांशी पटत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण खेळताना त्याने १००% दिलेच पाहिजेत. "आज मैं उससे बात करुंगी. लेट्स गेट द बॉल रोलिंग."

वेंडेल किंचित हसला. "सी यू अ‍ॅट द प्रॅक्टिस टुमॉरो!"

तो वळल्यावर मी दरवाजा बंद करून परत किचनमध्ये गेले. समर फोनवर काहीतरी टाईप करत होता. मेबी कोणी गर्लफ्रेंड असेल.

मी घसा खाकरला. "हे!" तो माझ्याकडे बघून हसला. माझ्या हृदयाचे ठोके जरा वाढले.

मी त्याच्या समोरची खुर्ची ओढून बसले. "हाय!"

"तुला भेटून बरं वाटतंय पलो. तुझ्या डोळ्यातून मी केलेले कुठलेच किडे सुटायचे नाहीत आणि तुझं मिरचीसारखी जीभ चालवून मला सुनावणं! आय मिस्ड इट ऑल." नुकताच शॉवर घेऊन आल्यामुळे त्याचे ओलसर काळेभोर केस विस्कटलेले होते. घाऱ्या डोळ्यांना लांब काळ्या पापण्या आधीसारख्याच झाकून टाकत होत्या. ह्या एका बाबतीत मी कायमच त्याच्यावर जेलस होते. त्याच्या कातीव जॉ लाईनवर अगदी सेक्सी दिसेल एवढीच स्टबल होती. तो समोर असल्यामुळे माझ्या श्वासांवर परिणाम झालाच होता.

एक तप उलटून गेलं तरीही.

"आय गेस आता तुला तसं कोणी सुनवत नसेल.." मी शांतपणे म्हणाले.

"शक्यय का!" तो नाक आक्रसून किंचित हसला. हम्म्म... ह्या लूकवरच तर लाखो मुली फिदा आहेत.

मी आयपॅड घ्यायला हात पुढे करतेय तोच त्याने माझा हात धरून थांबवला. "नाही पलो. तू मला सायकोअ‍ॅनालाईज करावं म्हणून मी तुझ्याबरोबर काम करायला हो नाही म्हणालो. आत्ता लगेच आपण नोट्स वगैरे नको घेऊया. आपण एकमेकांना बघून कितीतरी वर्ष झालीत. मला मायक्रोस्कोपखाली न जाता तुझ्याशी नॉर्मल गप्पा मारायच्या आहेत. म्हणून मी कोल्हापुरात यायला तयार होतो. तुझ्यासोबत काम करायला."

मी मान हलवली. नाही म्हटलं तरी त्याच्या आवाजात जाणवलेल्या थोड्याशा कंपाने मी हलले होते. त्याने वरवर कितीही कॉन्फिडन्स आणि वांड अ‍ॅटिट्यूड दाखवला तरी आता त्यामागे जराशी भीती, थोडा राग, थोडा नर्व्हसनेस जाणवत होता.

"ओके. मग मला सांग तू माझ्याबरोबर काम करायला तयार का झालास?" मी आयपॅड बाजूला सरकवलं.

"कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. जरी तू माझं हार्ट ब्रेक केलं तरीही." तो स्वतःशीच हसला. पण त्या हसण्याआड काहीतरी होतं. राग, हर्ट, कदाचित थोडी निराशा. "मी तुला ओळखतो."

मी पटकन श्वास घेतला आणि नकारार्थी मान हलवली. "मी काही तुझ्या हृदयाचे तुकडे वगैरे केलेले नाही. आणि समज केले असले तरी तू त्यातून पटकन उठून उभारला होताच की!"

मला म्हाईताय हे अनप्रोफेशनल आहे पण मला त्याच्या डोक्यात शिरायचं आहे. सुरुवात करायला आम्हाला एका समान जागी असायला हवं. आमचा एक इतिहास आहे, नाहीये असं म्हणूच शकत नाही. सो, हे बोलणं गरजेचं आहे.

त्याने डोळे चोळले आणि नजर उचलून माझ्याकडे बघितलं. "नव्हतो. बट आय सर्वाईव्हड. नेहमीप्रमाणे. पण मी म्हटलं तसं मी तुला ओळखतो. मला हे समजलं, की मला कोणी बरं करू शकत असेल, तर ती तू असशील."

"ते का?" मी भरून येणारे डोळे रोखत विचारलं. त्याला फक्त बघून मी इतकी इमोशनल होईन असं वाटलं नव्हतं. पण त्याच्या समोर बसून, त्या सगळ्या जुन्या फीलिंग्ज परत आल्या.

समर सावंत माझं पहिलं प्रेम होता आणि शेवटचंही. एनीवे, लव्ह इज ओव्हररेटेड!

माझं आयुष्य मस्त सुरू आहे. चांगलं करिअर, अर्थात त्यासाठी मी तेवढीच मेहनत घेतली आहे. माझ्यावर प्रेम करणारी माझी फॅमिली, पप्पा, तीन बहिणी आणि प्रेम न करणारी आजी.

मी आतापर्यंत दिल्लीत आणि मुंबईत बऱ्याच हँडसम बंद्यांना डेट केलं पण सिरियस व्हायच्या आत सोडूनही दिलं. इट वर्क्स फॉर मी.

"कारण तू मला ह्या सगळ्याच्या आधीपासून ओळखतेस. चौथीत असताना आपण बारक्या निळ्या चड्ड्या घालून, शाहू स्टेडियमवर पाटील सरांच्या क्लासमध्ये फुटबॉल खेळायचो, तेव्हापासून!"

"न्यू मॉडेल विरुध्द पद्माराजे." मी बोटाने डोळ्यातलं पाणी निपटत म्हणाले.

"हम्म. बिफोर आय बिकेम धिस मॅन विथ शिटलोड ऑफ रिस्पॉन्सीबीलीटी. मला वाटलं तू एकदा माझे तुकडे केले आहेस तर तूच ते गोळा करू शकतेस." तो हाताची घडी घालून खुर्चीत मागे टेकला आणि माझ्या गालावर पाण्याचा एक थेंब ओघळलाच.

हे ऐकायला लागू नये म्हणूनच मी त्याला इतकी वर्ष टाळत होते. कारण खरं सांगायचं तर मी आमच्या दोघांचेही तुकडे केले होते. आणि आम्ही दोघेही त्यातून सावरलो. आता मला फक्त पुन्हा त्याच्या जवळ असण्यातून स्वतःला सावरायचं होतं.

"नॉट फेअर!" मी उगीच पोनिटेल घट्ट करत जरा ताळ्यावर येत म्हणाले.

"लाईफ इज नॉट फेअर!"

"काहीही. तू टीमचा कॅप्टन होतास, वर्षाला तुला इतक्या कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आहे. इतके सगळे ब्रँड्स एंडॉर्स करतोस, एवढ्या फेमस आणि सुंदर बायका तुझ्यापुढे गोंडा घोळत असतात. मस्त चाललंय की तुझं."

एक भुवई वर करून तो पुढे झुकला. "चांगला डोळा ठेवलाईस की माझ्यावर!"

"कायपण! लई शायनिंग करू नको. तुझ्यापासून लपणं अवघड आहे. एकतर तुझा चेहरा सगळीकडे असतो, छापील नाहीतर डिजिटल आणि प्रायव्हेट लाईफ काय तुमचं पब्लिकच असतं." मी चेहरा गंभीर ठेवायचा प्रयत्न करत म्हणाले.

"मी क्रिकेट प्लेयर आहे, शारुख नाही. माझं प्रायव्हेट लाईफ हवं असेल तर शोधावं लागतं." त्याच्या ओठांचा कोपरा वर उचलला गेला आणि मी नजर वळवली. "तू मला इतकी वर्ष अव्हॉइड करत होतीस, म्हणून मी समजलो की तुला माझ्या पर्सनल लाईफशी काही देणंघेणं नसेल."

"मी तुला अजिबात अव्हॉइड करत नव्हते." मी ठोकून दिलं.

"तर तर! काय वडिंग्यासनं आलेला वाटलो काय! तुला खरंच मला मदत करायची आहे ना?" त्याने दोन्ही हात टेबलवर ठेवले.

"ऑफ कोर्स."

"मग खरं सांग. तू मला सोडून गेलीस आणि नंतर इतकी वर्ष तू मला टाळत होतीस. हे तरी कबूल?"

मी मान हलवली. "बरं. मी तुला टाळत होते. मान्य. पण मी अजून काही सांगण्यापूर्वी तू मला तुझ्या डोक्यात सध्या काय सुरू आहे, तू कश्यामुळे त्रासला आहेस ते सगळं सांगणार आहेस. डील?" मी त्याच्या डोळ्यात बघत विचारलं.

"डील!" त्याने हात पुढे केला. मी हात मिळवल्यावर तो उठून उभा राहिला. "दुखलं?" माझ्या तोंडाकडे बघून त्याने विचारलं.

"अम्म, हो, जरासं." लहानपणी तो असाच करायचा.

तो मोठ्याने हसला. "आजच्यासाठी एवढं बास. सी यू टुमॉरो. तुझा नंबर शाळेच्या ग्रुपमध्ये आहे तोच आहे ना?"

"आमच्या शाळेचा ग्रुप तुला काय माहीत?" मी वर त्याच्याकडे बघितलं. त्याने खांदे उडवले.

"तोच आहे." मी ओठ सरळ ठेवत म्हणाले. त्याला नंबर माहीत होता पण त्याने इतक्या वर्षात कधी काँटॅक्ट केला नव्हता.

"उद्या किती वाजता भेटायचं ते मी टेक्स्ट करतो. तुला पिक करेन." आणि तो सरळ दाराबाहेर गेला.

हे सोपं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.

पण मला वाटलं होतं की निदान माझं हृदय मी अखंड ठेवू शकेन.

पण ह्या क्षणी मला त्याबद्दल शंकाच आहे.

कारण समरने अजूनही माझ्या हृदयाचे बरेचसे तुकडे धरून ठेवले आहेत.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle