नभ उतरू आलं - ११

"मग ती इथे का आली होती?" मी न राहवून विचारलंच. डेस्पो वाटेल पण मला उत्तर हवंच होतं. माझा एक्स फेमस क्रिकेटर असणं मी दहा वर्ष चालवून नेलं होतं. मासिकांमध्ये, सोशल मीडियावर त्याला कायम वेगवेगळ्या बायकांबरोबर बघून हर्ट व्हायचं पण प्रत्यक्ष समोर बघण्याइतकं कधीच झालं नव्हतं.

हे म्हणजे हृदयात सुरा खुपसल्यासारखं होतं आणि ही जखम जबरदस्त दुखत होती.

पंधराव्या वर्षी मला माझा सोलमेट का मिळाला होता? नॉट फेअर यार! त्यामुळे मला पुढचं सगळं बिघडवायला एवढा वेळ मिळाला. मला माहिती होतं समरसारखा कोणी मला पुन्हा कधीच मिळू शकत नाही आणि मिळालाही नाही. तसाही मला नकोच होता कारण मला पुन्हा इतकं जास्त, इतकं खोल प्रेम करायचं नव्हतं.

समोर बसलेला माणूस मला काय टाळायचं आहे त्याचा रिमायंडर आहे.

"तिला माझी आठवण आली आणि नेमकी ती कोल्हापुरात होती, बस."

मी पुढचा तुकडा मोडत मान हलवली. "मग तू त्या इव्हेंटला जाणारैस का?"

"तिला गरज असेल तर येऊ म्हणलं." त्याने सरळ उत्तर दिलं पण तो मला पूर्णपणे काही सांगत नव्हता. मीच जास्तीत जास्त खोदून विचारावं असा त्याचा प्रयत्न वाटतोय. हम्म..

"कधीपर्यंत आहे ती कोल्हापुरात?"

त्याने डोळे फिरवले. "ती पहाटेच गेली. अजून काही चौकशी?"

मी जोरात मान हलवली आणि श्वास सोडला. खरं सांगायचं तर माझ्याकडे अजून भरपूर प्रश्न आहेत. मला खरं विचारायचं होतं की ती त्याच्या घरी राहिली का, पण मी ऑलरेडी जास्तच विचारलंय, आता बास. हे इतकं कठीण का आहे? मी एवढ्या गोष्टी केल्यात.. दोन मॅराथॉन पळले, दिल्लीत असताना हिमालयात कठीण कठीण ट्रेक केले, मुंबईत आल्यावर एकदा कळसूबाईसुद्धा केला.

पण समरबरोबरचा प्रत्येक क्षण.. टॉर्चर आहे. चांगल्या वाईट दोन्ही अर्थानी.

"मग उचकी क्वीन! कपडे घाल, आपल्याला वेंडीला भेटायचं आहे."

मी पळतच बेडरूमकडे गेले आणि दारातून तोंड बाहेर काढून ओरडले. "ती फक्त एक उचकी होती!"

मी पटकन केस विंचरून डोक्यावर मेसी बन घातला. ट्रेगिंग्ज आणि पातळसा टीशर्ट घातला. आज मि. हॉटशॉट काय करायला लावतील, देव जाणे! मी बाहेर येऊन माझा मग सिंकमध्ये ठेवायला गेले. वळले आणि मागून येणाऱ्या समरवर अख्खी धडकले. "सॉरी!" मी हळूच म्हणाले. "ते ठिकाय, मला वाटलं परत किस करतेय की काय!" त्याचा हसण्याचा आवाज किचनच्या भिंतींमध्ये घुमला.

"मी नाही, तू केलं होतं किस." मी हाताची घडी घालून म्हणाले.

"तुला स्वत:ला काय सांगायचं असेल ते सांग, स्वीट हार्ट!" त्याने भुवया उंचावल्या आणि मला स्कॉर्पिओकडे घेऊन गेला.

आजचा दिवस संपता संपणार नव्हता.

---

पुढचा आठवडा अगदी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या स्पीडने निघून गेला. समर आणि मला आता आमची एक लय सापडली आहे. आमचा बराचसा दिवस एकत्र जातो. सकाळी मी त्याची प्रॅक्टिस बघते, संध्याकाळी रनिंग आणि स्विमिंग आणि बऱ्याच वेळा एकत्र जेवण. तो त्याचं डाएट फूड खातो आणि मी माझं घरी केलेलं काहीतरी. नशिबाने हल्ली त्याने त्या किसचा उल्लेख केला नाहीय. माझ्यासाठी तो एक मोमेंट ऑफ वीकनेस होता, इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे आलेला.

ऑफ कोर्स मला तो रिपीट करावासा वाटत होता, मी माणूसच आहे आणि समोरचा माणूस लैच सेक्सी आहे!

पण.. पण मी खूप वर्षांपूर्वीच हे शिकलेय की समरवर प्रेम करणं माझ्यासाठी ' अती' आहे. अती इंटेन्स, ताटातूट झाली तर पुन्हा सहन होणार नाही असं काहीतरी. स्वत:हून आगीत चालत गेल्यासारखं.

दिवसातून दोनदा आमचे सेशन्स सुरू होते आणि बऱ्यापैकी प्रगती दिसत होती. तो हळूहळू ओपन अप होत होता. घोरपडे मला रोज रात्री कॉल करून अपडेट घेत होते. मला त्यांची फारशी फिकीर नव्हती. दहा वर्षांपूर्वी समरला सिलेक्ट करायला आले होते, तेव्हाही ते मला आवडले नव्हते आणि आताही नाही. समरला काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी त्यांना काहीच कंसर्न नव्हता, त्यांना फक्त येत्या सिझनमध्ये समरने कॉन्ट्रॅक्ट एक्स्टेंड करून परफेक्ट खेळावं एवढंच हवं होतं.

"समर झाला का जाग्यावर आता?"

"वेल, असं इतक्या पटकन होत नसतं. आय थिंक आम्ही सगळ्या गोष्टींच्या मुळाशी पोचतो आहोत. त्याच्यावर खूप प्रेशर.."

माझं वाक्य संपायच्या आत त्यांनी तोडले. "त्याला त्या प्रेशरच्या बदल्यात खूप पैसा मिळतोय. तू त्याला टफ बनव नाहीतर काहीतरी आउटलेट दे. दॅटस् व्हॉट आय हायर्ड यू फॉर. माझा इंटरेस्ट एवढाच आहे की तू त्याला फिल्डवर परत आणू शकतेस की नाही." ते त्या घाणेरड्या घोगरट आवाजात म्हणाले. खूप पिऊन होतो तश्या.

"आय'ल कीप यू पोस्टेड." म्हणून मी कॉल बंद केला. त्यांच्या प्लेयरच्या मनात काय चालले आहे ते त्यांना नकोय. त्यांना फक्त एक विनिंग सीझन हवाय आणि तो समरने मिळवून आणायला हवाय.

माझी पर्सनल असेसमेंट? समर ठीक आहे. खूप दमलाय, थोडा बर्नआउट म्हणता येईल. फिजीकली तो आत्ता त्याच्या बेस्ट शेप मध्ये आहे, मेंटली मजबूत आहे पण थोडा कन्फ्युज आहे. येत्या सिझनमध्ये त्याला मेंटली, फिजीकली मैदानात उतरता येईल का हा प्रश्न नाहीये, तर त्याला उतरायचं आहे का हा खरा प्रश्न आहे. त्याच्यावरच सध्या आम्ही काम करतो आहोत. त्याला खेळण्यात इंटरेस्ट का वाटत नाही याबद्दल आम्ही जे तासन तास बोललो त्या सगळ्याचे लॉग्ज मी नीट फाईल केले आहेत. आम्ही स्टेडियममध्येही खूप वेळा गेलो. लोकांना कळून गर्दी जमायला लागली की आम्हाला तिथून निघावंच लागतं. आजही बाहेर पडता पडता विक्रम समोर आला, इथल्या जुन्या ग्राऊंड्समनचा मुलगा. "निघालात होय समरदा!  तुम्ही रोज येत जावा, तुमच्यामुळं बरीच न्हान पोरं कोचिंग विचारायला यायला लागली बघा."

"येऊ, येऊ." म्हणत समरने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि आम्ही निघालो. अजयने दुपारी जेवायला बोलावलं होतं. आज केटरिंगसाठी मुर्ग मुसल्लम आणि चिकन पुलाव्याची ऑर्डर होती. दोन्ही भारी झालं म्हणून तो जेवायला बोलवत होता. आम्ही दाराबाहेर गाडी लावून उतरलो तर आत सगळी मंडळी जमून हसण्या खिदळण्याचे आवाज आधीच येत होते.

आम्ही आत जाताच सगळ्यांनी समरचा ताबा घेतला. प्रत्येकाचे प्रश्न, किस्से, गप्पा, सेल्फी सगळं आरामात सुरू झालं. मी थोडी दिदीबरोबर बोलत बसले. पंगत बसून सगळ्यांची जोरदार जेवणं झाल्यावर पुन्हा आम्ही जरा सैलावून इकडे तिकडे बसलो.

"मग इंडियन्स आपल्या पलोमाला कायमची अपॉइंट करणार का नुसतंच लटकून ठेवलंय?" बोलता बोलता अजयने समरला विचारलं. दिदीने अजयला बडीशेप देताना अचानक पोट दुखल्यासारखा पोटावर हात ठेवला. अजयने लगेच तिच्याकडे काळजीनं बघितलं. ती हसलेली बघून त्याने प्रेमाने अलगद तिच्या पोटावरून हात फिरवला. माझी नजर त्यांच्यावर खिळली आणि मी समरकडे पाहिलं तर तो माझ्याकडेच पहात होता. त्याने डोळे बारीक करून माझं निरिक्षण केलं आणि पुन्हा अजयकडे वळला.

"काय सांगू नाही शकत. आधीच ते स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्टची काही गरज नाही म्हणत होते, पण मी पलोमाला ऑन बोर्ड आणण्यासाठी बरंच पुश केलं." समरने हे म्हणताच माझं तोंड उघडंच राहिलं.

"हे मला माहीत नव्हतं."

"मी तुला सांगितलं होतं, मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. कारण तू माझ्यासाठी बेस्ट आहेस." तो किंचित खांदे उडवत म्हणाला.

"पण मला वाटलं ते बऱ्याच जणांचा इंटरव्ह्यू घेऊन मग सिलेक्ट करणार होते. तरी तू मला घेण्यासाठी पुश केलं?" मी बडीशेप तोंडात टाकत विचारलं.

"तुला काहीही वाटत असतं, पलो!" त्याने म्हटल्यावर सगळे हसले.

"अरे, येत्या रविवारी पार्टी करू. काय म्हणता? तंदूर प्लस रस्सामंडळ!" अजयने पटकन विषय बदलत विचारले.

"पळतंय की!" समर म्हणाल्यावर सगळे होच म्हणाले.

आणि जस्ट लाईक दॅट, हा माणूस पुन्हा माझ्या आयुष्यात सगळीकडून घुसखोरी करायलाय.

आणि मला ते हवंहवंसं वाटतंय.

समर

"तू अजूनच फास्ट होत चाललीस..." धापा टाकत तळ्याच्या काठावर बसताना मी म्हणालो. पोहून दोघांची हवा गेली होती. सकाळी वेंडीने पण लै घामटं काढून जोरदार वर्कआऊट करून घेतला होता. आता ते जरा जाणवत होतं.

"आता तू मला सारखं इथे आणून रेस लावत राहिलास तर हे होणारच आहे!" पलोमाने ओले केस पिळून, चेहरा मागे टाकून डोळे मिटले. परतीच्या उन्हाचे कवडसे तिच्या तोंडावर पसरले होते. तिचे मिटलेले डोळे बघून मी पटकन तिच्यावर नजर फिरवली. आता ती स्विमिंगसाठी प्रिपेअर होऊन येत होती.  स्विमिंग शॉर्ट्स, वेगळा टँक टॉप वगैरे.

आम्ही खूप वेळ एकत्र घालवत होतो आणि मला ते आवडत होतं. रोज उठल्यावर तिला बघण्यासाठी मी उत्सुक असतो, पण हे खूप डेंजरस कॉम्बो आहे! "अजयने मेसेज केलाय, आज रात्रीच्या पार्टीसाठी." डोक्यातले विषय टाळत मी म्हणालो.

"हो, आपण एकत्र जायचं?

"चालतंय. जाईचा प्रयोग आहे ना उद्या?"

"हम्म.. ती त्या थिएटर ग्रुपबरोबर आहे पण तिला नक्की काय करायचं आहे त्याची खात्री नाहीय. बघू, काहीतरी मार्ग शोधून काढेलच ती."

"तू काढला तसा प्रत्येकाला इझीली मार्ग काढता येत नाही." मी हातानी केसातील पाणी झटकत म्हणालो.

"टेक्स वन टू नो वन!" ती हसली.

"हम्म, आपण लकी आहोत. आपल्याला काय करायचं आहे ते मोठे होतानाच माहिती होतं, कधी शंकाच नव्हती. पण कधीकधी लकी ठरण्याआधी तुम्ही काही गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. थोड्या चुकापण झाल्या पाहिजेत." ह्या शब्दांमध्ये जास्त अर्थ होता हे मला बोलून झाल्यावर जाणवलं.

पलोमा मला लहानपणी भेटली आणि तेव्हापासून माझ्यासाठी तीच आहे. काही काळ मी ही तिच्यासाठी तसच होतो. पण आयुष्याने अशी गुगली टाकली की आम्ही वेगवेगळ्या वाटा पकडल्या. मला वाटतं तेव्हापासून आम्ही दोघेही एकमेकांना शोधत आहोत.

"ती म्हणाली, दिदीकडे ती तुझ्याशी ह्या विषयावर बोलली. काय म्हणत होती?"

"तिने फक्त विचारलं की क्रिकेट खेळायचं असं मला पहिल्यापासून माहीत होतं का? मला वाटतं तिचं ग्रॅज्यूएशन झालं आणि अजून पुढचं काहीच ठरलं नाही म्हणून ती थोडी बावचळलीय."

"तू काय सांगितलं तिला?" तिने डोळ्यावर हात घेत  विचारलं.

"मी तिला म्हटलं, तुला आधीपासून सगळं माहीत असायची गरज नाही. प्रत्येक वेळी प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी होतीलच असं नाही. वेळ योग्य असेल तेव्हा तुझं तुलाच आपोआप कळेल."

"तू कायम तुझ्या गट फीलिंगवर विश्वास ठेवलास, हो ना?"

"इट नेव्हर फेल्ड मी!" मी खांदे उडवले. "तुझं काय? तुला तुझं काम आवडतंच. लाईफ मध्ये अजून काही मिसींग वाटतं?" प्रत्येकाला आयुष्यात सगळंच हवं असतं का? मला तरी हवंय, सगळंच! क्रिकेट, जिंकणे, आनंद, प्रेम.. सगळंच!

"मला माझं काम आवडतं आणि त्यात खूप फोकस्ड असते. पण मला तुझं म्हणणं पटतय.. चालता चालता रस्ता शोधणेसुद्धा बरोबर आहे. मीपण काय सगळंच फिगर आउट केलं नव्हतं."

"नाही? मला धक्का बसला!"

तिने पाण्यावर लांबवर नजर टाकली आणि माझ्याकडे वळली. "माझा कायम प्लॅन तयार होता, माहितीये? आणि मग कॅन्सर आमच्या आयुष्यात आला. आई आजारी पडली, सगळं इतकं भराभर झालं आणि ती आमच्या आयुष्यातून निघून गेली. सो मला तेव्हा जी काही माझी, जगाची समज होती ती पूर्ण बदलली.. एका क्षणात सगळ्याच गोष्टी बदलल्या."

"पण तुला DU मध्ये हवी असलेली ॲडमिशन मिळाली. स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट होण्याचं तुझं स्वप्न तू पूर्ण केलं.. तेही चांगल्या ग्रेड्स मिळवून."

"हो, पण मी पर्सनल लेव्हलवर बोलतेय. आपण कधी वेगळे होऊ असं मला वाटलं नव्हतं आणि मी घरी यायचं कधी टाळेन असंही वाटलं नव्हतं.  मी कायम सगळ्यांना मला भेटायला बोलवत होते, इथे येणं टाळून."

मला तिच्या डोळ्यात भरून येणारं दुःख दिसत होतं. मी खाली अंथरलेल्या टॉवेलवर तीच्याशेजारी माझा हात ठेवला आणि अलगद तिच्या बोटात बोटं गुंतवली. "तू दुःखात होतीस."

"माझ्या बहिणीपण दुःखात होत्या. पण त्यांच्याकडे बघ, त्या पळून नाही गेल्या."

"तू लांब गेली असशील, पण तुला त्यांची काळजी होती. मला माहिती आहे. तू कायम त्यांच्या काँटॅक्टमध्ये होतीस. मदत करत होतीस. तू मनाने इथेच होतीस, तुला फक्त सावरायला वेळ हवा होता."

"मला वाटत होतं, मी निघून गेल्यामुळे तुमचं भलं होईल. त्यांचं आणि स्पेशली तुझं."

"कसं काय?" मी आवाज नॉर्मल ठेवला, तिला पुन्हा गप्प होऊ द्यायचं नव्हतं.

"आपण बुडत असताना आसपासच्या लोकांच्या गळ्याला मिठी घालून त्यांना आपल्याबरोबर बुडवण्यात काय अर्थ आहे, है ना? सो, मी तरंगायला टायर शोधला आणि श्वासापुरती वर आले."

"मला कळतंय पलो, खरंच. त्यावेळी तुला जे बरोबर वाटलं ते तू केलंस."

"हे, इथे सायकॉलॉजीस्ट मी आहे!!" ती गालावरचा एकच अश्रू पुसत हसली.

"हे, क्रिकेटर्स डीप फिल्डींग करू शकतात." मी तिला खांद्याने धक्का दिला आणि हात काढून घेतला.

ती माझ्याजवळ मोकळेपणाने बोलली याने मी खुश आहे. हर्ट होणाऱ्या सगळ्या गोष्टी उघडून दाखवणे. इन अ वे, हे माझ्यासाठी पण क्लोझर आहे. इतक्या वर्षांपूर्वी ती माझ्याशी असं का वागली हे मला कळतंय. ती माझ्यापासून पळत नव्हती, तिच्यामते ती मला प्रोटेक्ट करत होती. मला हे पटलं नाही तरी समजत होतं.

"आजच्यासाठी एवढं बस. घोरपडे मला एवढे भरपूर पैसे स्वत:बद्दल बोलण्यासाठी देत नाहीयेत." म्हणत ती उठली. "आणि आपल्याला जेवायला जायचंय. एवढं पोहून पोटात कावळे बोंबलाय लागलेत!"

मी उडी मारुन उठलो आणि ओरडत खाली टॉवेलवर बसलेला बारका बेडूक झटकला.

ती मान मागे टाकून खळखळून हसत सुटली.

माझा जगात सगळ्यात आवडता आवाज. कायमच होता. आम्ही लहानपणापासून ह्या तलावावर एवढा वेळ घालवला होता... तिच्याबरोबर इथे असताना, ते सगळे क्षण उडी मारुन पुन्हा बाहेर येत होते.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle