नभ उतरू आलं - १०

कश्मीरा तिला काही कॉल करायचे आहेत सांगून टेरेसमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसली. आम्ही झब्बू सुरू केला. पलोमा नेहमीप्रमाणे पटकन सुटत होती. मध्येच पप्पांनी जमुना उघडायची टूम काढली. "गेली तीन चार वर्ष त्यांना हे नवीन खूळ चढलंय." आई पलोमाला सांगत होती. "घरगुती वाईन! द्राक्ष म्हणू नको, अननस म्हणू नको, आंबा म्हणू नको एक फळ म्हणून शिल्लक ठेवलं नाही त्यांनी."

"हातभट्टी म्हण! एवढं अल्कोहोल असतं त्यांच्या वाइनमध्ये." मी पत्ते जमवत म्हणालो.

"ही जांभळाची आहे. म्हणून जमुना! टेस्ट तर करून बघा.." पप्पांनी सगळ्यांसमोर अर्धे भरलेले मोठे वाईन ग्लासेस ठेवले. कश्मीराने कार्बस नको म्हणून आधीच वाईन नको सांगितलं होतं.

"एवढीच बास!" मी आणि आई एकदम म्हणालो.
"काका मी देते कंपनी तुम्हाला. जमुना बेश्टे एकदम!" पिता पिता अंगठा दाखवत पलोमा म्हणाली.

"जरा मूड बनवतो, थांबा" म्हणत त्यांनी रिमोट उचलून म्युझिक प्लेअर ऑन केला. मी आणि आईने पलोमाकडे काही खरं नाही! असा लूक दिला.

अली सेठी गात होता.

चाँदनी रात
बड़ी देर, के बाद आई है
लब पे इक बात
बड़ी देर, के बाद आई है...

आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितलं.

ना खुले आँख
अगर ख्वाब है, तो ख्वाब सही
ये मुलाकात
बड़ी देर, के बाद आई है
चाँदनी रात
बड़ी देर, के बाद आई है...

मी हळूच माझा अर्धा ग्लास पपांच्या ग्लासात ओतला. आमचे एकावर एक डाव सुरूच होते.

शेवटी खेळता खेळता आम्ही दोघेच उरलो आणि शेवटच्या क्षणी तिने सगळे पत्ते टाकून माझ्यावर भलामोठा झब्बू चढवला. "यास्स!" ती हवेत पंच मारुन उभी राहिली.

पप्पा त्यांचा ग्लास उंचावून चीअर्स म्हणाले. "पदाचा मान राखला पोरीने!"

"मग काय, ह्यात चॅम्प आहेच मी!" तिने हसत खाली बसून वाईन भरलेला तिसरा ग्लासपण संपवून टाकला. मी तिला डोळे दाखवल्यावर पप्पा हसले. "काय लेका, ही एकटी माझ्या कलेला दाद देते बघ!" मी काही बोलण्यात अर्थ नाही अशी मान हलवली.

तेवढ्यात कॉल संपवून कश्मीरा आत येऊन बसली. "समर, आयाम सो टायर्ड.. आपण निघायचं का?"

ऐकताच पलोच्या भुवया डोक्यात गेल्या आणि ठसका लागून तोंडातून वाइनचा फवारा उडाला. तिला बहुतेक कश्मीरा माझ्या घरी राहणार असं वाटलं. फवाऱ्यातले निम्मे लाल-जांभळे थेंब कश्मीराच्या आकाशी रंगाच्या टॉपवर उडाले. ' ओ नो नो नो.." करत ती वैतागून टॉप झटकत उभी राहिली. पप्पा हसायला लागले. आईने घाईघाईत पलोला पाणी प्यायला दिलं आणि मी कश्मीराला टिश्यू पास केले.

"आय एम सो सो सॉरी, ठसका लागला बहुतेक. तू टीशर्ट घालशील का? मी हा टॉप माझ्या घरी नेऊन, धुवून परत देते तुला." पलोने विचारलं.

"नको, नको. हे प्योर सिल्क आहे, ड्राय क्लीन करावं लागेल." तिने पलोला जबरदस्तीचं स्माईल दिलं आणि माझ्याकडे पाहिलं. ती कंटाळली होती आणि चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. पलोमा हात वर करत पुन्हा एकदा सॉरी!! म्हणाली आणि तिने आईकडचा नॅपकीन घेऊन टेबलावर सांडलेली वाईन पुसायला सुरुवात केली.

"ओके! आम्ही निघतो. पलो, तुला ड्रॉप करतो आधी." तो शॉर्टफॉर्म ऐकून कश्मीराने चमकून माझ्याकडे पाहिलं. आता हिला काय प्रॉब्लेम आहे! आमचं ब्रेकअप होऊन जवळपास सहा सात महिने झाले होते. आम्ही क्वचित टेक्स्ट, कधीतरी कॉल असं बोलत होतो. एखादा इव्हेंट अटेंड करत होतो. बस. ब्रेकअप आम्ही ठरवून केलं होतं, सगळं इतकं कॅज्युअल होतं की त्यात ब्रेक करायला काही नव्हतंच म्हणा.

"काही गरज नाही. मी रिक्षा करेन." पलोमा उठून टेबलाजवळ जराशी अडखळली.

मी किल्ली उचलून दरवाज्याकडे गेलो."तू रात्रीची एकटी घरी जाणार नाहीयेस. पाऊसपण येतोय. गाडीत जाऊन बस."

"काकी, हा कायम एवढा बॉसी होता?" तिने लिफ्टची वाट बघताना आईला विचारले.

"जन्मापासून! फक्त तू त्याला बरोबर उत्तर द्यायचीस." आई हसत म्हणाली आणि तिने पलोमाचा खांदा थोपटला. "समरशी भांडलीस तरी आम्हाला भेटायला येत जा." 

कश्मीरा लिफ्टमध्ये शिरून आमचा फेअरवेल कार्यक्रम बघत होती. ती फार प्रेमळ वगैरे नव्हती. फ्रेंडली होती, सुंदर, स्मार्ट, इंडिपेंडंट मुलगी. पण मिठ्या मारणं आणि गप्पा मारणं हा तिचं एरिया नव्हता. ती सेलिब्रिटी असणं मनापासून एन्जॉय करत होती. रेड कार्पेट गर्ल!

शेवटी एकदाचे आम्ही पार्किंगमध्ये पोचलो. पलोमा सवयीने पुढे बसायला गेली आणि तिला उचकी लागली. हसत तिने खिडकीतून आमच्याकडे बघितले आणि पुन्हा खाली उतरली. "ऊप्स, सॉरी तुला 'तुझ्या ' समर शेजारी बसायचं असेल! मी मागे जाते." म्हणून आमच्या ऑकवर्ड चेहऱ्यांकडे न बघता ती ड्रायव्हर सीट मागे जाऊन बसली. कश्मीरा नाखूषीनेच स्कॉर्पिओमध्ये चढली. आम्ही जेव्हाही एकत्र बाहेर गेलो, तिने कायम हाय एंड गाडीच प्रिफर केली होती.

पलोमाने ड्रायव्हर सीट आणि शेजारच्या सीटमध्ये असलेल्या फटीतून माझ्या सीटच्या पाठीला डोकं टेकलं आणि लांब श्वास सोडला. "खूप बरं वाटतय. मी काका काकींना इतकं मिस करत होते हे मलाच कळलं नव्हतं."

"मी बोललो होतो, तुला बघून ते खूप खूष होतील म्हणून.." मी गाडी मेन रोडवर घेत म्हणलो.

थोडावेळ पलोमाची बडबड ऐकत आम्ही तिच्या रेंटेड घरापाशी पोचलो. गेटबाहेर गाडी थांबवून मी कश्मीराकडे नजर टाकली. आता तर ती खूपच वैतागलेली दिसत होती. पलोमाने पुन्हा एक उचकी दिली. "आय एम सॉरी! आईशप्पत, ती वाईन म्हणजे खरंच हातभट्टी होती. वाऱ्यावर मला जास्त चढली बहुतेक." तेवढ्यात ती दार उघडुन खाली उतरली. "ओके, बाय बाय. यू टू एन्जॉय.." म्हणत ती पुढे जाऊन ओल्या रस्त्यावर थोडी घसरली. "आय एम ओके, आय एम ओके.." ती दोन्ही हात वर करून, हळूहळू न घसरता चालायचा प्रयत्न करत म्हणत होती.

"थांब तिथेच, मी येतच होतो ना?" म्हणून मी खाली उडी मारली. कश्मीरा आता वैताग विसरून किंचित हसायला लागली.

मी पळत जाऊन तिचा हात पकडला. पण तिच्या गुळगुळीत सोल असलेल्या चपलांमुळे ती घसरत होती. मग मी सरळ तिला उचलली आणि दरवाजात नेऊन खाली ठेवली. तिने पर्समध्ये शोधून किल्ली बाहेर काढली आणि दार उघडलं. "शांत झोप आता पलो, गुड नाईट. उद्या भेटू." मी तिच्या डोक्यावर थोपटलं.

ती थोडी गंभीर होऊन उभी राहिली आणि स्कॉर्पिओकडे एक नजर टाकली. "हम्म, नक्की. गुड नाईट. लिफ्टसाठी थँक्स." ती आत जाऊन दरवाजा बंद करेतो मी थांबून राहिलो.

"ही 'तीच ' आहे ना?" गाडीत बसताच कश्मीराने माझ्याकडे वळून विचारलं. मी हसून मान हलवली.

आम्ही बऱ्याचदा आपापल्या एक्सेसबद्दल, प्रेमाबद्दल, डिस्टन्सबद्दल, सेलिब्रिटी म्हणून येणाऱ्या एकटेपणाबद्दल बोललो होतो.

मी तिच्या हॉटेल गेटपाशी गाडी थांबवली. "शी'ज अडोरेबल! पण मला तिचा राग येतोय कारण इतके कार्ब्ज खाऊन, वाईन पिऊन कोणी इतकं शेपमध्ये कसं राहू शकतं, है ना? लाईफ इज नॉट फेअर यार!" ती माझ्याकडे बघत म्हणाली.

"कॅश, हे सगळं कशासाठी आहे? आय थिंक वी वर गुड!"

"वी आर! मी तुला मिस करत होते. इथे आले आणि अचानक एका क्षणी वाटलं की तुला भेटावं आणि बघावं की तूही तेवढाच मिस करतोस का.."

मी तिचा हात हातात घेऊन थोपटला. "तुला बघून मला आनंद झाला की, अँड यू आर ऑल्वेज वेलकम!"

"आऊच! तू माझ्यासाठी झुरत वगैरे का नाहीयेस!! दॅट्स द वर्ड, राईट?" ती लाडात येत म्हणाली. "नेव्हर माईंड! मला कारण कळलंय. मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं." ती तिरकस हसली.

"आमच्यात तसं काही सुरू नाहीय. फक्त भरपूर हिस्ट्री आहे." मी खांदे उडवले. अर्थात त्यामुळे कश्मीरा आणि माझ्यात काही बदलणार नव्हतं. कश्मीरा उगीचच आमच्या संपलेल्या नात्याला गुलाबी चष्म्यातून बघत होती. मी कधीच कश्मीराच्या प्रेमात वगैरे नव्हतो आणि तिला ते माहीत होतं.

"समर सावंत! वेडा आहेस का तू? इथे हिस्ट्रीपेक्षा खूप जास्त काहीतरी सुरू आहे. सी या!"  सीट बेल्ट काढून ती खाली ऊतरली.

कदाचित ती बरोबर असेल.

आमच्यात असेल काही कनेक्शन पण आम्ही ते प्रत्यक्षात आणू असं नाही ना...

पलोमा

तोंडावर आलेल्या उन्हाने मला जाग आली. डोकं हातोड्याने ठाण ठाण ठोकल्यासारखं दुखत होतं. मी बाथरूममध्ये जायला दार उघडलं तर समोर जाई!

"हाय तायडे, मी तुझ्यातल्या कुकीज उसन्या घेतल्यात." हातात एक मोठी चोको वॉलनट कुकी नाचवत ती म्हणाली.

"उसन्या म्हणजे तू त्या परत आणून ठेवणार आहेस. जे कधीही होत नाही." तिला बाजूला करून मी बाथरूममध्ये शिरले.

मी बाहेर आले तो ती किचनमध्ये ताटं शोधत होती. "त्या बाजूच्या कपाटात आहेत." मी खुर्ची ओढून बसत म्हणाले.

"बापरे तुला काय झालं? मरगळलेली दिसतेयस!" ती माझ्या तोंडाकडे बघत म्हणाली.

"आधी माझ्या कुकीज लंपास कर आणि वर मलाच नावं ठेव. चांगलं आहे! तुला दुसरी किल्ली देऊन चूकच केली मी." मी रागात म्हणाले.

तेवढ्यात उघड्या दारातून समर जुईबरोबर आत आला आणि हातातल्या पिशव्या दोघांनी टेबलवर ठेवल्या. मी घाईघाईत माझा चुरगळलेला लहानसा कॅमी आणि शॉर्ट्स नीट केल्या.

"रिलॅक्स, आय नो द डिटेल्स!" तो डोळा मारत हसला आणि पुढे जाऊन त्याने फ्लास्कमधली गरम फिल्टर कॉफी दोन मगमध्ये ओतली. एक मग माझ्या हातात देऊन स्वतःच्या कॉफीचा घोट घेतला.

"आह समर! मला लै गरज होती!" मी पटकन मगला तोंड लावत म्हणाले.

"हाय ताई!" जुई माझ्या गळ्यात हात टाकत शेजारी बसली. ही आमच्या घरातली सगळ्यात शांत, हळुवार पोरगी. आताच्या हँगओव्हरमुळे मला सगळं हळुवारच हवं होतं.

"आम्ही दोघी युनिव्हर्सिटीत जात होतो, तर बॅटमॅन इथे येताना दिसला. मग काय जुपीटर वळवली आम्हीपण!" जुई म्हणाली.

"मी वेंडीबरोबर जाऊन अर्ध्या शिवाजीजवळचा लोणी डोसा पार्सल आणलाय. उतरतो तो दारात ह्या दोघी भेटल्या! सॉरी मुलींनो, माहीत असतं तर तुमच्यासाठी आणला असता. आता माझ्यातला शेअर करा. पलोला ब्रेकफास्टची गरज आहे." तो टेबलावर कोपरं आणि दोन्ही हातात चेहरा ठेऊन माझ्याकडे बघत म्हणाला.

मी आ करून बघत राहिले. दावणगिरे! लहानपणीचा माझा सगळ्यात आवडता डोसा! मी त्याला हाताने हार्ट साईन करून दाखवलं.

"मग काय ते कालचं सरप्राइज वेगेरे काय ते लवकर सांगा!" जाईची गाडी तराट सुटली होती.

"काही नाही, आम्ही पार्कात गेलो काकाकाकीना भेटायला आणि तिथे अचानक ह्याच्या हिरोईनने येऊन आम्हालाच सरप्राइज दिलं!" मी थोडी वैतागून म्हणाले आणि समर मोठ्याने हसला. जुईने मला सपोर्ट म्हणून माझ्या दंडावर डोकं टेकलं. ती माणसं वाचण्यात हुशार होती आणि मी आत्ता इमोशनली वाईट जागी आहे हे तिला जाणवलं होतं.

"कोण? कश्मीरा बर्वे? हायला! तू अजून तिला डेट करतोस? मी वाचलं तुमचं ब्रेकअप झालं.. ती हॉट आहे पण ते लीप फिलर्स जरा जास्तीच झाले. खरं सांगते, थोडीशी डोनाल्ड डक दिसते ती!" जाई डोश्याचा तुकडा खाऊन बोटाला लागलेलं लोणी चाटत म्हणाली.

समर हसतच होता. "आता नाही करत. आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत."

"ती ' आमचा ' समर म्हणते. मला नक्की माहितीये की हे जस्ट फ्रेंड्स वगैरे तिला मान्य नाहीय." मी तडतडले. मला हवं होतं त्यापेक्षा जास्तच तिखट बोललं गेलं. कश्मीरा इतकीही वाईट नव्हती वागली. मला फक्त तिच्या झिंज्या उपटाव्या वाटत होत्या. हे नॉर्मल आहे, राईट!

जुई माझं निरीक्षण करत हसली. "जाई, ऊश्शेर!" तिने जाईकडे बघून डोळे दाखवले. हां! जुई म्हणूनच माझी आवडती होती. अनकंफर्टेबल विषय बदलणं तिला सहज जमायचं.

जाई भराभर हात धुवून आली आणि त्या आमचा निरोप घेऊन बाहेर पडल्या.

समर माझ्या किचनमध्ये त्याचंच घर असल्यासारखा वावरत होता. त्याने RO खाली जग भरला आणि टेबलवर आणून ठेवला.

हा इतका छान का दिसतोय...

"काल मी एकटीनेच एवढी वाईन पिली का?"

"नाही, पप्पा होते की तुझ्या जोडीला, आईपण शेजारीच होती." तो चिल होता.

मी माझी कॉफी पीत कालच्या गोष्टी आठवत होते.

द किस!

कश्मीराने त्याच्यावर हक्क दाखवणं.

तिच्या क्यूट टॉपवर उडालेली वाईन आणि माझी एम्ब्रासिंग एक्झिट!

मी श्वास सोडला. "मी काल स्वतःचं खूपच हसं करून घेतलं."

"काही झालं नाही. तू ठीक आहेस." तो डोसा खाताखाता म्हणाला.

"मला वाटत होतं तुमचं ब्रेकअप झालंय?" मी उत्तराची वाट पहात थांबले. मी का विचारतेय., त्याच्याशी आता माझं काहीच नातं नाही. आम्ही एवढी वर्ष लांब होतो. मग मी इतका इश्यू का करतेय...

"तसंच आहे." त्याने वाकून लोण्यात माखलेला दुसरा जाडजूड डोसा माझ्या ताटात वाढला. "खा."

"थॅन्क्स." मी एक घास खाल्ला आणि आम्ही दोघेही गप्प बसलो.

क्रमशः

चाँदनी रात - अली सेठी इथे पाहता येईल.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle