नभ उतरू आलं - १३

समर

अज्या: भावा, आज संध्याकाळी सयाजीला येणार काय? पलोमा तिच्या त्या मित्राला भेटायला जातेय आणि त्याच्यासोबत त्याचे पंटर आहेत. जाईजुई तिला सोबत म्हणून जातायत तर कार्तिकी म्हणे आपण पण जाऊ. तू चल, अजून आपली एक दोन पोरं पण बोलवू.

मी: यायलाच लागतंय भावा! :D

मी टेक्स्टला उत्तर दिलं.
हा चान्स मी काही झालं तरी सोडणार नव्हतो.
तिने मला बनवलं की काय? ती अजून रिलेशनशिपमध्ये असेल तर.. मी नक्कीच शोधून काढणार आहे.

मोबाईल खाली ठेऊन मी समोरच्या सोफ्यावर मांडी घालून बसलेल्या पलोमाकडे पाहिलं. काळ्या थ्री फोर्थ टाईट्सवर बारीक निळ्या रेषांचा पांढरा लूज बटन डाऊन शर्ट आणि डोक्यावर नारदमुनी सारखे गुंडाळलेले केस. त्यातून निसटून तिच्या टोकदार हनुवटीपर्यंत येऊन थांबलेली एक रेशमी बट! डोळ्यावर तो सेक्सी ब्लॅक कॅटआय रिमचा चष्मा लावून ती हातातल्या आयपॅडवर पटापट टाईप करत होती. "सो, अजून तरी तुला क्रिकेट आवडतं आहे. ह्यात काही बदल नाही, राईट?" वर बघून तिने विचारले.

"हो. पण आपलं ह्या विषयावर आधीच बोलून झालंय." मी पुढे वाकून गुढघ्यावर कोपरं टेकवून बसलो. ही मुलगी रोज माझा वर्कआऊट ट्रॅक करते, रोज अखंड दोन तास प्रश्न विचारते आणि ते स ग ळं लिहून ठेवते. अजून आता डिस्कस करायला उरलंय काय?

"इतका अडगा होऊ नको हां समर! मी तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करतेय. घोरपडेना काही तरी एक काँक्रिट मुद्दा हवाय." मान हलवून ती उठलीच. तिने दोघांचे ग्लासेस उचलले आणि किचनमध्ये गेली. ती इतक्या परफेक्ट शेपमध्ये आहे की मी मान वळवून तिच्याकडे बघणे टाळूच शकलो नाही. ती थंड पाण्याचे ग्लास घेऊन परत आली आणि समोरच्या टेबलवर ठेवले.

"ऑफ कोर्स! घोरपडे तेच मागणार. त्याला ही फॅक्ट मान्यच करायची नाही की कुठलाही खेळाडू प्रत्येक मॅचच्या प्रत्येक क्षणी ऑन नाही राहू शकत. माझं ट्रॅक रेकॉर्ड बरंच चांगलं आहे. पण शेवटी मीपण माणूस आहे. तू माझी सगळी भंकस ॲनालाईज करू शकतेस. तुला असा एकही प्रसंग मिळणार नाही ज्यामुळे माझ्या खेळावर परिणाम झाला. मी तुला सांगितलं आहे... हा सगळ्याचा एकत्र परिणाम आहे." मी घडाघड बोलून बुक्का पाडून टाकला.

"मला ते समजलं आहे. खरंच. तुझ्यावर खूप जास्त प्रेशर आहे आणि तरीही तू ते चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो आहेस."

"ह्या सगळ्या गोष्टीला तुमच्या मेडिकल टर्म्समध्ये काहीतरी फॅन्सी नाव असेल ना, बस ते त्याच्या तोंडावर मार नि त्याला गप कर." मी हसलो.

ती हसून पाणी प्यायली. "माझ्या मते त्यांना फक्त तू परत खेळणार की नाही यातच इंटरेस्ट आहे. तेही पूर्ण ताकद लावून. तुला अजून बऱ्याच टीमच्या ऑफर्स येतायत का?"

मी डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. "तू अंडरकव्हर काम करत नाहीस ना? घोरपडेची छुपी हस्तक वगैरे?"

तिचं तोंड उघडंच राहिलं. " मी कधीच असं काही करणार नाही."

"पण त्याने तुला हे विचारलं, राईट?"

"त्यांनी चौकशी केली, पण मी म्हटलं आमचं याबाबतीत काही बोलणं झालं नाही. आपण बोललो जरी असतो, तरी मी त्यांना सांगितलं नसतंच. कारण मी तुझ्यासाठी काम करतेय, पैसे ते देत असले तरी."

मी मान हलवली. पलोमा इतक्या खालच्या थराला कधीच जाणार नाही. मला माहिती आहे.

"काही ऑफर्स आहेत. पण मी जर खेळलो तर इंडियन्सकडूनच खेळेन, नाहीतर नाही. ती टीम म्हणजे माझे भाऊ, माझी फॅमिली आहे. माझा असिस्टंट कम मीडीया मॅनेजर जय, तो हे सगळं हॅण्डल करतो पण माझं मन कशात आहे ते त्याला माहिती आहे, त्यामुळे कायम माझ्या निर्णयांना तो बॅकअप देतो."

"तू मेंटली, फिजीकली खेळण्यासाठी एकदम फिट आहेस. प्रश्न हा आहे की तुला खेळायचे आहे का?"

"माझं मत हो म्हणण्याकडे झुकतय. तुझं काय? मला ठीक केल्यावर तुझ्याकडे काही काम आहे?" मी विचारून टाकलं. मला हे ऐकायचंच होतं. तिचे प्लॅन्स ऐकल्यानंतरच मी माझा निर्णय घेणार होतो.

तिने खांदे उडवले. "अजून तश्या काही फॉर्मल ऑफर्स आल्या नाहीत."

"पण येतील. आत्ता कुठे ह्या खुर्च्या अडवून बसलेल्या लोकांना कळतंय की ॲथलीट्स साठी मेंटल गेम किती महत्त्वाचा आहे."

"हम्म.. माझी फेलोशिपच्या वेळची बास्केटबॉल टीम मस्त होती. पण तिथला माझा सिनीयर अजून तिथे काम करतोय त्यामुळे मला काही स्कोप नाही. प्लस मुलगी असल्यामुळे पण मला अपॉइंट करायला लोकांना लिमिटेशन्स येतात."

"पलो, तू मला भेटलेली सगळ्यात टफ मुलगी आहेस. कीप पुशिंग! तू मला जर फिल्डवर पाठवू शकलीस तर घोरपडे तुला नक्की हायर करणार!" मी हसत म्हटलं. खरं सांगायचं तर मी खेळायला तयार झालो तर मी तिला टीमचा फूल टाईम जॉब मिळवून देऊ शकतो, ह्या गोष्टीनेच मी पुन्हा खेळायला प्रवृत्त होतोय. शी डिझर्व्ड द जॉब. पण कोच म्हणजे स्वार्थी माणूस आहे, तो कुणाचा होऊ शकत नाही. बाकी कोणाहीपेक्षा अधिक काळ मी त्याला ओळखतो. खूप वर्ष मी त्याचा गोल्डन बॉय होतो आणि तेव्हा तो माझ्या फुल सपोर्टमध्ये होता. पण आता जेव्हा दोन चार मॅच डड गेल्या, तेव्हा तो किती कटथ्रोट आहे त्याची झलक मला मिळाली. त्याला फक्त मॅच जिंकून हवी, बाकी काही नाही. शेवटी हा बिझनेस आहे, आय नो! त्याबाबतीत मी इतका नाईव नाहीये. माझी किंमत तोपर्यंतच आहे, जोपर्यंत मी परफॉर्म करेन.

"मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय." ती पुढे वाकून माझ्या डोळ्यात बघत म्हणाली. "माझ्यासाठी, माझ्या फायद्यासाठी, कधीही कुठली गोष्ट मान्य करू नको समर. मला माहितीये तू कसा आहेस."

"कसा आहे?" मी पापणी न लववता विचारले.

"मदत करणारा, प्रामाणिक आणि सच्चा." तिने पापण्या मिटल्या. "आणि मला जॉबची अगदी गरज नाहीये. म्हणजे मिळाला तर हवाच आहे, पण माझा विश्वास आहे की गोष्टी घडायच्या असतील तेव्हा घडतात. आपण प्रयत्न कमी पडू द्यायचे नाही. कोणी ना कोणी मला हायर करेलच. न करण्याइतकं माझं काम वाईट नाहीये, हो ना?" ती हसली.

मी हसत मान हलवली.

"म्हणून प्रॉमिस कर की मला मदत करण्यासाठी म्हणून तू कुठलीही गोष्ट मान्य करणार नाहीस. तसं केलंस तर ते माझं फेल्युअर असेल. इथे मी 'तुला' मदत करायला आले आहे."

"आय प्रॉमिस!" मी लहानपणी सारखी करंगळी पुढे केली. ती कायम असं प्रॉमिस करायला लावायची.

तिने जवळ येऊन माझ्याभोवती तिची करंगळी लपेटली. तिचा उबदार श्वास माझ्या गालावर जाणवला आणि तिने हलकेच तिचा टपोरा ओठ चावला.

"एवढ्या मॅचेस खेळणं कंटाळवाणं होत असेल ना? केवढं लांबलचक शेड्यूल आहे!" ती पटकन लांब होऊन सोफ्याला टेकून बसत म्हणाली.

"खूपच! पण जेव्हा तुम्ही आत खेळत असता तेव्हा अमेझिंग फीलिंग असतं. क्रिकेटर म्हणून लाईफच कितीसं असतं, मी पुढच्या एकदोन वर्षात ३३ - ३४ मध्ये रिटायर झालो तरी कुणाला काही वाटणार नाही. लीग वगैरे धरून अजून जास्तीत जास्त दहा वर्ष, तेही अगदी ओढून ताणून. नेहमी इतकं ट्रॅव्हल करावं लागल्यावर नॉर्मल लाईफ जगणं कठीण असतं."

"हम्म, म्हणूनच कश्मीरा आणि तुझं इतकं चांगलं चाललं होतं. तुम्ही दोघेही कायम फिरत असता म्हणून.."

"माझ्या - तिच्या रिलेशनशिपबद्दल तुला लैच काळजी दिसतेय!" मी एक भुवई वर केली आणि तिचे गाल तांबूस झाले.

"आय एम जस्ट क्यूरीअस! आज तुला तिच्याबरोबर इव्हेंटला जायचं होतं ना?"

"ती मैत्रीण आहे, पण मी त्या इव्हेंटला जात नाहीये. आमचं बोलणं झालं आणि मी न गेलेलं बरं असं मी ठरवलं.

"का?"

माझ्या पर्सनल लाईफ बद्दल किती ते कुतूहल!! मी प्रयत्न करून चेहर्‍यावर काही रिअ‍ॅक्शन दाखवणं टाळलं.

"कारण ती माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्टेड आहे. मी तिला स्ट्रेटवे सांगितलं होतं की आपण कायम मित्र म्हणूनच ठीक आहोत. मला गोष्टी अजून कॉम्प्लिकेट करायच्या नाहीत."

"तू ह्या सगळ्यात असून इतका वेगळा कसा राहू शकतोस? तू एका टॉपच्या ॲक्ट्रेसला डेट करत होतास, तुम्ही इतक्या सगळ्या मॅगझिन कव्हर वर होतात! तरीही तू इतका 'तू' कसा काय राहू शकतोस!" ती आश्चर्याने डोळे विस्फारत म्हणाली.

मला हसायला आलं. "तू मला दिलेलं हे बेस्ट काँप्लिमेंट असेल! पैसा आणि इगो माणसाला काय बनवतं ते मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मी आधीच जाणीवपूर्वक ठरवलं होतं की ही नशा डोक्यात जाऊ द्यायची नाही. हे सगळं टेंपररी आहे. आज मी चांगला खेळतोय ते एन्जॉय करायचं. जेव्हा वाईट खेळेन तेव्हा गाशा गुंडाळायचा. मी जवळपास तिथे पोचलो आहे. अजून एखादा सीझन किंवा बाहेर पडणे."

तिने मान हलवली आणि ग्लास उचलून पाणी प्यायली. "मी एवढी वर्ष एवढ्या ॲथलीट्स बरोबर काम केलंय. पण तुझी स्वतःची एक वेगळीच लीग आहे!"

"माझं एवढं पण कौतुक नको करू! मला माहिती आहे फिल्डवर मी एकदम दबंग क्रिकेटर असतो. पण फक्त तेवढी एकच गोष्ट मला डिफाईन करत नाही."

"गुड ॲटिट्यूड!"

"रिअलिस्टिक ॲटिट्यूड!!" मी सोफ्याला मागे टेकून आळस देत म्हणालो. "सो.. मला अजयने मेसेज केला होता. तू म्हणे कुठल्या माणसाला सयाजीमध्ये भेटायला जाते आहेस आणि बाकी सगळे तुझ्याबरोबर जाणार आहेत.. तो मला बरोबर ये म्हणून आग्रह करतोय."

"कोल्हापुरात काहीही सीक्रेट राहू शकत नाही! हो, तो माणूस म्हणजे हरीश- माझा एक्स बॉयफ्रेंड. आम्ही काही महिने डेट करत होतो. तो इथे एका बॅचलर पार्टीसाठी आलाय."

"मग तो एक्स कशामुळे झाला?" मी विचारण्यापासून स्वत:ला थांबवू शकलो नाही. मला कारण ऐकायचंच होतं.

"त्यात काही सिरीयस नव्हतं. फक्त कॅज्युअल रिलेशनशिप होती. इव्हेंट, पार्टीज वगैरे अटेंड करायला बरोबर कोणी असेल तर जरा बरं वाटतं. मी माझ्या कामात खूप सिरीयस होते त्यामुळे बाकी कोणाच्यात गुंतून पडायचं नव्हतं. तसंही लवकर दिल्ली सोडून निघायचं हे माझं ठरलेलंच होतं."

ही मुलगी अजूनही आपलं हृदय सेफ ठेवायची काळजी घेत होती.

"हां, तुला एक विचारायचं होतं."

"विचार की!" तिने हातातला ग्लास खाली ठेवला.

"मला पुढच्या महिन्यात एका इव्हेंटसाठी मुंबईला जायचंय. मला तिथे कोणी डेट किंवा आर्मकँडी नकोय. उगीच इश्यू करतात लोक. आपण इतका वेळ एकत्र आहोत, एकत्र काम करतो आहोत तर मेबी तुला यायला आवडेल. येशील का तू?"

तिचे डोळे विस्फारले पण तिने पटकन मान हलवली. "येईन की! मला आवडेल यायला."

मी तिला एवढं का पुश करतोय! आम्ही आधीच एवढा वेळ एकत्र घालवतोय, आमचं एक रूटीन सेट झालंय, बऱ्याच वर्षांनी मला इतकं शांत शांत, सूदिंग वाटतंय. मला खात्रीने सांगता येत नाही, हा कोल्हापूरला आल्याचा इफेक्ट आहे की पलोमा सोबतीला असल्याचा!

"थॅन्क्स! मी आंघोळीला जातो. सयाजीला आपण एकत्र जायचं की तुझा मित्र तुला पिक करणार आहे?" मी एकदम चिल आहे असं दाखवत विचारलं पण नुसतं तिला त्याच्याबरोबर बघायच्या विचारानेही माझे खांदे टेन्स झाले.

"नाही, तो मला तिकडेच भेटेल."

"ओके, येतो मग थोड्या वेळात." उठताना माझा हात टेबलवर आपटला. सरसरत एक बारीकशी कळ उठली. पलोमाच्या अवतीभवती राहून माझ्या आत खोल काहीतरी हललंय, जे इतकी वर्ष जाणवलं नव्हतं. पण मी तिला स्वतःपेक्षा जास्त ओळखतो. सध्या माझं आणि तिचंही फ्यूचर टांगणीला लागलं आहे, अश्यावेळी पुढे पाऊल टाकण्यात अर्थ नाही. कदाचित हा फक्त नॉस्टॅल्जिया असेल.. माहीत नाही, पण आमच्यात काहीतरी घडतंय.

आमची रिलेशनशिप संपण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे एकमेकांपासून खूप लांब रहायला जाणं. हा ताण, ही खेच आमच्यात कायमच होती. पण ते तिलाही जाणवतं आहे का कोण जाणे.. आणि तिला जाणवलं तरी ती परत एक चान्स घ्यायला तयार आहे का? ती अजूनही स्वतःला कोणाच्यात न गुंतता सेफ ठेवतेय. मी तिच्याबाबतीत आता एकही चूक करणार नाही. पुन्हा ती मला सोडून गेली तर ते मी सर्वाइवच करू शकणार नाही.

"समर!" मी लिव्हिंग रूमच्या दाराबाहेर जाताजाता तिची हाक आली. मी थांबून वळून पाहिलं.

"थॅन्क्स फॉर इन्व्हायटींग मी. मी वाट बघतेय त्या इव्हेंटची." ती हसत म्हणाली.

"यू नो, तू कायमच माझी फेवरीट आहेस. लाँग डिस्टन्सने काही फरक पडत नाही!" मी डोळे मिचकावले आणि शॉवर घ्यायला बाहेर पडलो.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle