वाडा (कथा) : भाग १

वेळेवर बस पणजी डेपोतुन सुटली आणि रत्नागिरीच्या दिशेने धावू लागली. सुमीत खिडकीजवळच्या सीटवर निवांत बसला होता. सहा ते साडे सहा तासाच्या प्रवासात टाईमपास करायला त्याने बर्‍याच मूव्हीज अपलोड करुन ठेवल्या होत्या.लॅपटॉप ऑन करत असतांनाच त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. आज जवळजवळ पाच-सहा वर्षांनी तो आत्याकडे रत्नागिरीला चालला होता. वर्ष किती झरझर निघून गेली. कॉलेजात जायला लागल्यापासून त्याला रत्नागिरीत जायला जमलेच नव्हते. मात्र आई-वडीलांकडून आत्याची खबरबात मिळत होतीच. शेवटच्या वर्षाची परीक्षा आटोपली आणि जरा मोकळा वेळ हाताशी मिळाला की आत्याकडे नक्की जायचे असे मनाशी पक्के केले होते सुमीतने. ठरवल्याप्रमाणे आज सुमीत निघाला होता. आत्याची आठवण येताच सुमीत पिक्चर बघायचे विसरुन त्याच्या बालपणीच्या आत्याकडे घालवलेल्या सुट्टीतल्या रम्य दिवसांत गढून गेला.

आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही. शांत स्वभावाची, हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची आत्या, साधी राहणी, नेसणं साधं, कधी कोणाबद्द्ल उणाअधिक शब्द हिच्या मनात तरी आला असेल का? याची शंका यावी इतकं आत्मीयतेनं वागणं-बोलणं. या शांत चेहर्‍यामागे भावभावनांची किती स्थित्यंतरं लपली होती हे त्या लहान वयात सुमीतला कळण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला एक कारण होतं आत्याला विचलित झालेलं बघायला आणि ते म्हणजे गावाबाहेरचा ‘देसाई वाडा’. त्या वाड्याचं नाव जरी आत्याच्या समोर कोणाच्या तोंडून निघालं तरी तिच्या जीवाची घालमेल होई. दिवसभर कितीही उंडारा मात्र त्या वाड्याच्या सावलीलाही कधी जायचे नाही अशी सक्त ताकीदच होती आम्हा मुलांना. केवळ आत्याकडूनच नाही तर गावातल्या सगळ्या मोठ्यांकडून होती म्हणा ना. वाढत्या वयात फुशारक्या मारायला आम्ही कित्येकदा आत्याला देसाई वाड्याच्या आसपास जातो असे मुद्दाम बोलून चिडवत असू.त्या प्रत्येक वेळेस ती बिचारी गयावया करुन आम्हाला रोखत असे. तसंही आत्याचा शब्द त्या गावात कोणीही खाली पडू देत नव्हतंच.

हा 'देसाई वाडा' खरं तर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा ठिकाणीच होता. गावात येणार्‍या माणसाला हा वाडा टाळून जाणं शक्यच नव्हतं. दुसरी वाटच नव्हती. हायवेपासून चाफे गावचा फाटा सुरु झाला की अर्ध्या-एक मैलावर असेल हा वाडा. त्याला बगल देऊनच पुढे एक पाऊलवाट गावात जाई. त्यामुळे वाडा टाळून जाणे शक्यच नव्हते. आजही आठवत होतं सुमीतला, लहानपणी त्या वाड्यावरुन जाताना 'रामनाम' जपत धडधडत्या काळजाने आईचा हात धरुन जात असे तो. प्रत्येक वेळेस तिथून जाताना छातीत होणारी धडधड त्याच्याच काय, आईच्याही होत असावी. कारण आई नेहमी हाताला धरुन ओढायाचीच त्या ठिकाणी पोचल्यावर. तिलाही लवकर तिथून लांब जायचं असायचं. तिन्हीसांजेची वेळ असेल तर अंधार पडू लागला असायचा. आजुबाजुला गर्द झाडी आणि रातकिड्यांची किरकिर. ती मोठाली झाडंही भकासपणे बघतायत असं वाटायचं. कधी कोणी पाठलाग करतंय, आपल्यावर नजर रोखून बघतंय असे विचित्र भास होत असत सुमीतला. त्याने कधीच यातलं काही आईला किंवा इतर कोणालाही सांगितलं नव्हतं.मनात भिती असली तरी एखादा चोरटा कटाक्ष वाड्यावर टाकल्याशिवाय चैन पडायचे नाही सुमीतला.त्या एका दॄष्टीक्षेपात काय जे दिसेल ते मनात साठवून ठेवलं होतं त्याने. नीटस चौसोपी असा दगडी वाडा होता तो. मागे-पुढे अंगण, जिथे नुसतं तण माजलं होतं. परसदारी गडग्यावरुन गेलं की विहीर. सारी खिडक्या, दारे कायम बंद, दगडी चिरांमधून वाढलेलं शेवाळ, तर कुठे उगवलेलं पिंपळाचं रोप हा वाडा कैक वर्षे ओसाड पडून असल्याचे सांगत होता.

वाड्याला बगल देऊन पुढे येताच जिथे गावाची वेस सुरु होते तिथे हनुमानाच्या नावानं एक शिळा स्थापन केली होती गावकर्‍यांनी. भोवताली पार बांधला होता. स्थापनेचा सोहळा सुमीतला चांगलाच आठवत होता. वाड्यातल्या ‘पिशाच्चापासून’ गावाचे रक्षण करण्यासाठी गावच्या भगताने काही उपाय केले होते. ही 'हनुमंताची शिळा' त्यांपैकीच एक उपाय. का कुणास ठाऊक पण त्या हनुमान पाराशी पोचलं की हायसं वाटू लागायचं. पोचलो एकदाचे सुखरुप असं 'हुश्श' करणारं फिलिंग यायचं. सुमीतच्या आठवणीत त्यांनी कधीच दुपारनंतरची एस टी पकडली नव्हती. दिवसाउजेडी, फार फार तर संध्याकाळी गावात पोचेल अशी वेळ साधूनच एस टी पकडत असत ते. पण जर कधी क्वचित कोणावर रात्री-बेरात्री त्या वाटेने गावात जाण्या-येण्याचा प्रसंग आलाच तर त्या व्यक्तीची चांगलीच तंतरायची. एका-दोघांनी तर रात्री त्या वाड्यात हडळ फिरतांना पाहिली होती म्हणे आणि मग तापाने फणफणले बिचारे. भगताने किती उतारे-पातारे केले तेव्हा कुठे बरं वाटू लागलं होतं त्यांना.

बसने अचानक ब्रेक मारला आणि सुमीत तंद्रीतून जागा झाला. हसला स्वतःशीच . कोकणी घरं, जुने वाडे आणि त्यांत सुखेनैव नांदणारी ‘भूतं’ हे समीकरण तर कित्येक वर्षांपासून आहे तसंच आहे. प्रत्येक अंगणात डोलणार्‍या माडाच्या झावळ्या, कानावर पडणारी समुद्राची गाज, भरपूर झाडं झुडपं त्यामुळे अंधारी घरं, रातकिड्यांची किरकिर, फार पूर्वी, लाईटसही नव्हते तेव्हा ही सारी परिस्थिती भुताखेताच्या सांगोवांगी अनुभवांसाठी पोषक होती. पण आज....प्रत्येक घरात वीज पोचली असतांना, शिक्षणाचे - प्रगतीचे वारे वाहत असतांनाही या छोट्याशा गावात आजमितीलाही 'देसाई वाडा' मात्र भुतांनी पछाडलेलाच होता. का असं? या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे जसं मला मोठं झाल्यावर वाटू लागलं तसं त्या गावात अजुन कुणालाही वाटत नाही? आणि वाटत असल्यास ते बदलण्याचा प्रयत्न का केला गेला नाही इतकी वर्षं? आजही घरुन निघतांना आईने देसाई वाड्याच्या अवतीभवती जायचं नाही हे निक्षून सांगितलं होतंच.

थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदिराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला? काय आहे त्यामागे रहस्य? एकंदर 'देसाई वाडा' एक गूढतेचे वलय स्वतःभोवती बाळगून होता, गेली अनेक वर्षे !!!

क्रमश:

भाग २

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle