वाडा (कथा): भाग २

थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदीराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला? काय आहे त्यामागे रहस्य? एकंदर देसाई वाडा एक गूढतेचे वलय स्वतःभोवती बाळगून होता, गेली अनेक वर्षे !!!

हा वाडा गावच्या जमीनदारांच्या मालकीचा. देसाई नाव त्यांचं. त्यांच्या नावेच ओळखला जायचा. हे जमीनदार म्हणजे आत्याचे सासरे. आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आत्याशी जमलं तेव्हा लेकासाठी आणि सुनेसाठी मोठ्या हौसेने हा वाडा त्यांनी खास बांधून घेतला. लग्न झाल्यावर नवं जोडपं या वाड्यातच राहणार होतं. तर जमीनदार आणि त्यांची पत्नी गावात मध्यवर्ती भागात स्वतःच्या वडीलोपार्जित घरात रहात असत. देसाई घराणं मोठं प्रस्थ. त्यामानाने आत्याच्या माहेरची परिस्थिती बेताची, आत्याचे वडील म्हणजे सुमीतच्या वडीलांचे काका अनेक वर्षं देसायांकडे चाकरी करीत असत. गरीबाची एकुलती एक आईविना असलेली, सोज्वळ, नाकी डोळी नीटस पोर-म्हणजे राधा- सुमीतची आत्या, देसाई पती पत्नीला मनापासून आवडत होती. आपल्या मुलाची संमती घेऊन देसाई पती-पत्नींनी राधेला मागणी घातली आणि सोनं झालं तिच्या आयुष्याचं. सोनपावलांनी या राधेनं देसाई वाड्यात गृहप्रवेश केला.

सुमीतला जे सांगितलं गेलं होतं ते म्हणजे आत्याचे लग्न लागताच वरात त्या नव्या वाड्यात आली. फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई यांनी सज्ज होऊन देसाई वाडा नव्या नवरीचे स्वागत करण्यास दिमाखात उभा होता. वरात आली. पाहुणे मंडळींच्या जेवणावळी होऊन संध्याकाळनंतर मंडळी पांगली. घरची चार माणसं तेव्हढी राहिली. मध्यरात्री अचानक राधेची आर्त किंकाळी ऐकून देसाई बाई धावत बघायला आल्या तर ....तर त्यांचा तरणाताठा लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि राधा त्यांच्या डोळ्यांदेखत भोवळ येऊन पडली. काही तासांपूर्वी जो वाडा लग्नघर म्हणून सजला होता त्यावर मॄत्यूचे तांडव थैमान घालू लागले.

थोरल्या मालकांनी आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या मागच्या अंगणातून काळोखात कुणीसे पळून जाताना दिसले. चौकशीअंती असे लक्षात आले की गावाबाहेरच्या जंगलात एक लुटारुंची टोळी काही दिवसांपूर्वीपासून सक्रीय होती. आजूबाजूच्या गावांत, घरात घुसुन चोर्‍या, दरोडे असे प्रकार झाले होते. त्यांनीच डाव साधला असावा, राधेचे दागिनेही मिळत नव्हते. देसाई म्हणजे मोठं प्रस्थ असल्यामुळे काही दिवसांतच त्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. राधेचे दागिनेही पोलिसांच्या हाती आले आणि त्या टोळीने गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांकडून देसायांना सांगण्यात आले.मात्र राधेच्या मनावर झालेला हा आघात कोणालाही मिटवता आला नाही. ती कित्येक दिवस शॉकमध्ये होती. थिजुन गेल्यागत ती एकटक तासंतास बघत बसे.

या आघातानंतर मात्र सारंच चित्र बदललं. हौसेने केलेली मुलगी सून म्हणून ज्या दिवशी घरात आली त्याच दिवशी तिच्या वाट्याला असं वैधव्य यावं हा केवढा दैवदुर्विलास. पण नातलगांनी कान भरले म्हणून किंवा इतर काही कारणाने थोरल्या जमीनदार बाईंनी सुनेचं नावच टाकलं आणि त्या नव्या वाड्याचंदेखील. सून नजरेसमोर नकोशी झाली सासूला. काही दिवस वडीलांनी माहेरी गावाला नेलं. पण वडील थकले होते. ते कितीसे पुरणार तिला? राधेची काही कायमची सोय लावणं आवश्यक होतं. थोरले जमीनदार भला माणूस. त्यांनी वचन दिलं राधेच्या वडीलांना की मी सांभाळेन हिला. विठू आणि रखमा हे वाड्यावर चाकरी करणारं जोडपं. या जोडप्याला त्यांच्या आठ-नऊ वर्षांच्या मुलासह या नव्या वाड्यात राधेच्या सोबतीला ठेवून घेतलं. राधेच्या नावानं मोठी रक्कम बँकेत जमा केली आणि त्याचं व्यवस्थित व्याज तिला मिळेल हे सर्व पाहून स्वतः मात्र पत्नीसह तालुक्याच्या गावी असलेल्या त्यांच्या दुसर्‍या घरी राहू लागले.

राधा हळूहळू दु:खातून सावरु लागली. तिनं मन रमवण्यासाठी स्वतःला अनेक कामांत जुंपून घेतलं. लोकांच्या अडीअडचणीला धावून जावू लागली. वेळप्रसंगी पैशांची मदत करु लागली. थोडीफार शिकलेली असल्यामुळे गावकर्‍यांना शिक्षणाचं मह्त्व पटवून देत मुलांना शाळेत पाठवणे, महिलांना आरोग्यविषयक माहिती देणे, त्यांना एकत्र करुन शिवणकाम, विणकाम शिकवणे असे करता करता दिवस सरत होते. हळूहळू राधा गावकर्‍यांची लाडकी वहिनीसाहेब झाली. पांढरी सुती साडी, कोपरापर्यंत ब्लाऊज,लांबसडक केसांचा अंबाडा असा तिचा साधा वेश. सुमीतने आत्याला या पोशाखातच कायम पाहिली होती. अंगावर एकही दागिना नाही. चेहरा मात्र मायेने ओतप्रोत भरलेला. तोच काय तो तिचा दागिना.हेच धन ती सार्‍यांवर उधळत असे. गावात सर्वांना तिची कर्मकहाणी माहीत होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिने अनेक माणसं जोडली. सारेजण तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल मात्र हळहळ व्यक्त करीत असत.

सासरे अधुन मधुन चौकशीसाठी येत. गावातल्या वाड्यात उतरत. त्यामुळे राधाने हा वाडाही नीट सांभाळला होता. रखमाला हाताशी घेऊन त्याची दररोज झाडलोट ती करुन घेत असे. पण ते सासू -सासर्‍यांचे घर म्हणून. ती स्वतः तिथे कधीही राहिली नाही.
हा गावाबाहेरचा नवा वाडाच तिला आपला वाटत असे. रख्मा आणि विठुचा मुलगा सदा. त्याच्याशी खेळायला म्हणून वाड्यात बरीच मुलं येत असत. त्या सर्वांशी राधा खूप आपुलकीने वागत असे. सदा तर तिचा जीव की प्राण होता. हे विठूचं कुटुंब वाड्यातच परसदाराजवळ असलेल्या शेवटच्या खोलीत रहात असे. पण त्या दिवशी सदाने राधाक्काच्या खोलीत तिच्या जवळच झोपायचा हट्ट केला. किती समजावले तरी ऐकेचना तो रख्मेचं. राधानेच समजावले तिला की “अगं झोपू देत की त्याला इथे काय बिघडलं त्यात?” म्हणून मग त्याला राधाच्या खोलीत झोपवून विठू आणि रख्मा आपल्या खोलीत गेले. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून रख्मा कामाला लागली. राधा उठून खोलीबाहेर आली आणि रख्माला बोलली "काय मग शेवटी रात्री आईची आठवण आलीच ना सदाला? कधी आला तुझ्याजवळ? मला समजलेच नाही बघ." रख्माने ऐकले मात्र ती डोळे विस्फारुन वहिनीसाहेबांकडे बघतच राहिली. "सदा....? माझ्याजवळ....नाही.. आला..." रख्मा थरथरत तुटक तुटक बरळली. राधेच्या तर पायाखालची जमीन सरकली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच तिघांनी मिळून सदाला आजुबाजूला सगळीकडे शोधले, हाका मारल्या. पण नाहीच मिळाला तो. आता गावात जाऊन शोधुयात असा विचार करत विठू परसदारी विहीरीपाशी गेला. सहज म्हणून आत डोकावून पाहिले....आणि...सदाSSSSS अशी आर्त किंकाळी देसाई वाड्यात घुमली. विहीरीत सदाचे प्रेत तरंगत होते ............. ते पहाताच आत्या भोवळ येऊन पडली.

सदा रात्रीच्या वेळेस उठून बाहेर विहीरीपाशी का नि कसा गेला? आत कसा पडला? तो उठल्याचे राधेला कसे समजले नाही? या सार्‍या प्रश्नांची उकल कोणालाही करता आली नाही. अपघाताने विहीरील पडून मृत्यू असे नोंदवून पोलिसांनी केस बंद केली.केवळ एका गोष्टीवर एकमत झालं, देसाई वाड्याने दुसरा बळी घेतला !!!

हा प्रसंग घडला आणि गावाला एक ‘हाय अॅलर्ट’ मिळाला जणू देसाई वाड्याबद्दल. या वाड्यातच काही भानगड आहे. राधाच्या सासरेबुवांना पाचारण केले गेले. गावचे पाटील, जमीनदार, शाळा मास्तर अशी प्रतिष्ठीत मंडळींची बैठक झाली आणि सर्वानुमते या वाड्यातच काहीतरी दोष आहे यावर शिक्कामोर्तब झाले. राधेशी बोलून देसाईंनी तिचे सामान गावातील घरात हलवले आणि देसाई वाड्याला टाळं लागलं ते आजतागायत.

राधा घडल्या प्रकाराने अंतर्बाह्य हादरली होती. पती निधनानंतर ती जशी शॉक मध्ये होती तशीच यावेळीही तिची परिस्थिती झाली, किंबहुना या वेळी तर तिच्या मनावर झालेला आघात फार मोठा होता. दुसर्‍याच्या पोराला आपल्या खोलीत झोपू दिलं काय आणि रात्री ते पोर गेलं?? आपल्याला कानोकान खबर नाही... हे फार लागलं राधेच्या मनाला. सदाचे दिवस कार्य झाले आणि थोरल्या मालकांनी विठु - रखमाच्या दु:खावर फुंकर घालण्याचा एक क्षीण प्रयत्न म्हणून त्या जोडप्याला बर्‍यापैकी पैसे दिले जेणे करुन त्यांना कष्टाने गुजराण करावी लागू नये. रख्मा, विठू दोघांनी नोकरी सोडून आपल्या मूळ गावी जायचा निर्णय घेतला. देसाईंना मान्य करावाच लागला तो निर्णय. तसंच राधेनंही एक निर्णय घेऊन टाकला, " मी यापुढे वाड्यात रहणार नाही. मंदीरात व्रतस्थ जीवन जगेन". हा धक्का होता खरंतर सासरेबुवांसाठी. पण सुनेच्या मनाचा विचार करणेही महत्वाचे होते. सदाचे असे जाणे तिला चटका लावून गेले आहे. शिवाय आपल्या पत्नीने तिला स्वीकारले नसल्यामुळे ती आपल्या घरात रहायला येत नसावी हेही कारण होतेच. गावदेवीच्या मंदीरात दोन खोल्या मंदीरातील अतिरिक्त सामान ठेवण्यासाठी राखून ठेवल्या होत्या. त्या भाडेतत्वावर घेऊन राधाची सोय सासरेबुवांनी मंदीरात केली.

यापुढे राधा त्या दोन खोल्यांत एकटी राहू लागली. कोणालाही सोबतीला ठेवायचं नाही हे ठरवूनच टाकलं तिने. सुमीतचं कुटुंब सुट्टीत कधीतरी येत असे तेव्हढीच काय ती सोबत. पण राधेच्या घरात जागा कमी त्यामुळे ते रात्री वस्तीला इतर ओळखीच्या कुटुंबात जात असत किंवा मंदीरातच झोपत असत.हळूहळू राधाने गावातील बायकांचा बचतगट चालू केला. शिवणकाम, विणकाम करुन बनवलेले कपडे इतर वस्तू या महिला विकत असत. त्यांतून त्यांच्या हाती पैसा खेळू लागला. राधेलाही ही स्वकष्टाची कमाईच बरी असे वाटत होते. सासर्‍यांनी दिलेले पैसे ती त्यांचा मान राखायला घेत असे पण ते गावात इतरांच्या अडल्या नडल्या वेळेस वापरत असे. तिचा एकटीचा असा खर्च तरी कितीसा असणार?

ही होती कहाणी देसाई वाड्याची. तीन महिन्यांमध्ये झालेले दोन मॄत्यू हे केवळ एकमेव कारण होतं देसाई वाड्याबद्दल निरनिराळ्या वदंता उठायला. मॄत्यू कोणाच्या घरात होत नाहीत? म्हणून काय अख्खं घरच भुताटकीने झपाटलेलं ठरवून ते सोडून जातं का कोणी? आणि तसंही काकांवर हल्ला झाला तेव्हा हल्लेखोर बाहेरुन आले होते. म्हणजे फक्त सदाचा संशयास्पद स्थितीत झालेला मृत्यू. त्याच्या मॄत्यूची शहानिशा होणं भाग होतं खरंतर. त्यामागचं कारण समजलं असतं तर आपली आत्या बिचारी अशी निर्वासितासारखी राहिली नसती. या देसाई वाड्यातच मानाने राहिली असती. कोणीतरी हे मुद्दाम घडवून आणलं असावं का? का पण? कशासाठी? आत्याशी कोणाचं बरं वैर असावं? की दुसरा काही अंतस्थ हेतू असावा? कसे कळणार यामागील रहस्य? इथे रहाणार्‍या कोणाला तरी हाताशी घेऊन सार्‍या घटनांची उजळणी त्या व्यक्तीकडून करुन घ्यायला हवी. तरच कळेल काही धागेदोरे सापडतायत का? खरंतर आईशी अनेकदा या विचारावर बोलणं, नव्हे वादच झाले होते सुमीतचे. त्यांचं म्हणणं एकच होतं. पुन्हा त्या वाड्यात रहायला जाऊन विषाची परीक्षा का करा? जे झालं ते आत्याचं नशीब, यापुढे काळजी घ्यायला हवी आणि तू या भानगडीत मुळीच पडायचे नाहीस. साहजिकच होतं म्हणा. आईला काळजी वाटणारच. आपलं लेकरु या साहसकथांच्या नादापायी कुठे गोत्यात नको यायला याची. पण सुमीतचे बाबा मात्र त्याला समजून घेत असत. वयानुसार त्याच्या मनात उद्भवणारे वाड्याबाबतचे कुतुहल ते त्यांच्या परीने उत्तरं देऊन शमवायचा प्रयत्न करीत. घरी असतांना तो कैकदा मी हे वाड्याचे गूढ उलगडायला रत्नागिरीला जाईन असे म्हणताच आई खेकसत असे त्याच्या अंगावर. पण बाबा तिला शांत करीत असत. आपला मुलगा बुद्धिमान आहे, तो जे करेल ते विचारपूर्वकच, आततायीपणा तो करणार नाही असे ते आईला समजावत असत. सुमीतला पण बाबा म्हणजे आपला भक्कम आधार होता. सुमीतने मनाशी ठरवून टाकले होते की या प्रकरणाचा छडा लावायचाच. म्हणूनच तर तो निवांत वेळ काढून आत्याकडे आला होता. देसाई वाड्यात (न) राहणार्‍या भुतांचा बंदोबस्त करण्यासाठीच.

सुमीतने चटकन लॅपटॉपवर नोटस काढायला सुरुवात केली. एक स्ट्रॅटेजी प्लॅन करणे आवश्यक होते. या कामात कोण मदतीला येऊ शकत होते? सर्वांत आधी डोळ्यांसमोर आले आत्याचे नाव. पण आत्या करेल का काही मदत? की तिला त्रास होईल याचा? तिला दुखवून काही करायचे नाही. तिचा कल पाहून गोडीगुलाबीने तिच्याशी बोलत काही समजतंय का याचा सर्वप्रथम अंदाज घ्यावा. हा प्लॅन ए. हा जर वर्क आउट झाला तर नथिंग लाईक इट. पण याचे चांसेस फिफ्टी पर्सेंट. जर हे नाही जमलं तर....प्लॅन बी काय असेल? कोण मदत करु शकतो? सुमीत विचाराधीन झाला. लहानपणी आपण इथे यायचो तेव्हा आजुबाजुच्या कितीतरी मुलांशी आपली मैत्री झाली होती. त्यांतील काही गाव सोडून गेली असतील. पण कोणीतरी असेलच गावात. त्यांपैकी एकाला गाठायचे. या नव्या पिढीला हाताशी घेणं बरं पडेल. त्यांचे विचार तरी समजतील या बद्दलचे. सुमीतचा आराखडा तयार होत होता. कोणाची तरी मदत, परवानगी मिळवून देसाई वाड्यात प्रवेश करायचा... इतकं जरी करता आलं तरी खूप झालं. पुढचं पुढे.

तेव्हढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. बस एक आचका देत थांबली. पाठोपाठ कंडक्टरचा आवाज "चाफे फाटा". चला सुमीतराव "मिशन देसाई वाडा कॉलिंग.... यो..."

क्रमशः

भाग ३

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle