वाडा (कथा): भाग ४

सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.

सुमीत दिवसभर अस्वस्थ होता. त्याची कैक दिवसांची इच्छा खरंतर आज पुरी होणार होती. पण घरच्यांना असं अंधारात ठेवून हे असं मोठं धाडस करणं, समजा काही बिनसलं तर आपण आत्याला, आई-बाबांना कसे काय मॅनेज करणार याचा विचार तो करीत होता. शिवाय मुकुंदा आणि त्याच्या वडीलांबद्द्ल त्याला शंभर टक्के खात्री वाटत नव्हती. त्या दोघांबद्द्ल अतिशय सावधगिरी बाळगायची हे त्याने ठरवलं. सुमीत स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट होता. त्याच्यासमोर पाप्याचं पितर असलेल्या मुकुंदाचा टिकाव लागणंच शक्य नव्हतं. पण न जाणो पाटील काकांनी कुणाला सुपारी दिली असेल तर...? सावधगिरी बाळगणे आवश्यकच होते. आत्याला मी आज मुकुंदाबरोबर गावाबाहेर जातोय, उद्या येईन असे सांगून तो संध्याकाळी लवकरच घराबाहेर पडला. रात्री उशीर झाला तर तिच्या जीवाला घोर नको उगाच.

ठरल्याप्रमाणे दोघे निघाले. मुकुंदाने टूल बॉक्स बरोबर घेतला होता. एस टी येऊन गेली. काही दोन - चार मंडळी उतरुन गावाकडे निघून गेली. पाच - दहा मिनिटांत सारी सामसूम झाली रस्त्यावर तसे निघाले दोघे वाड्याकडे. सुमीतने पाटील काकांना एस एम एस करुन आत जात असल्याविषयी कळवले. काकांनी अर्धा तास दिला होता. त्या अर्ध्या तासात जर त्यांचा पुन्हा मेसेज नाही आला तर पाटील काका स्वतः येणार होते त्यांना बघायला, असा प्लॅन ठरला होता. आजूबाजुला खूप गवत, झुडपे वाढली होती. त्यातून वाट काढत, दबकत, पावलांचा आवाज न होऊ देता दोघे जात होते. दोन-तीन मिनिटांत ते वाड्यापाशी पोचले. एकदा बाहेरुन वाड्याभोवती एक चक्कर मारुयात असे ठरवून दोघे जाऊ लागले. आतला, आजुबाजुचा कानोसा घेत.... थबकत.... दबकत. भोवताली सावध कटाक्ष टाकत दोघे मागच्या दारी आले. गडग्यावरुन विहीरीपाशी पोहोचले. अंधार पडू लागला होता. अंदाज घेत दोघे मागील दारी आले. पहातात तर.... त्या दाराला कुलुप नव्हतेच. इतकी वर्षं हे मागचं दार असंच कुलुपाशिवाय ठेवलंय की आत्ताच कुलुप उघडून आतमध्ये कोणीतरी....... सुमीतने शक्यता वर्तवली.

आत जाणं जोखमीचं होतं खरंतर. पण आता रिस्क घेतली तर कदाचित 'ते' जे कोण आहे त्याला रेड हँडेड पकडता येईल असा विचार करुन अत्यंत सावधपणे दोघं पुढे झाले.एकमेकांना सूचक खूण करत त्यांनी सावधपणे ते दार ढकलले, अनेक वर्षे न वापरल्यामुळे दरवाजा गच्च बसला होता. दोघेही आवाज न होऊ देता पण दमदार धक्के दाराला देत राहिले. बर्‍याच प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळाले. दरवाजा किरकिरत उघडला. मुकुंदाने दबकत आत पाऊल टाकले. सुमीत पाठीमागे, बाहेर सर्वत्र चौफेर नजर फिरवत कोणी पहात तर नाहीये ना याचा अंदाज घेत होता. मुकुंदाने सुमीतला आत येण्याची खूण केली. आता सुमीत आत गेला. हळूहळू पुढे चालत असतांना अचानक सुमीतच्या चेहर्‍यावर काहीतरी आपटले. अचानक झालेल्या या विचित्र स्पर्शाने सुमीत गोंधळला. मात्र मुकुंदाने प्रसंगावधान राखून मोबाईलमधली टॉर्च सुरु केली आणि खोलीत सर्वत्र फिरवली. उलटे लटकलेले ते एक वटवाघूळ होते. हुश्श करत दोघे टॉर्चच्या अंधुक उजेडात पुढे जात होते. कित्येक वर्षं वाडा बंद असल्यामुळे सर्वत्र कुबट वास भरुन राहिला होता. धुळीचे साम्राज्य होते. एकेक खोली पहात दोघे पुढे जात होते. सुमीत जमतील तसे भराभर फोटोज काढत होता. दिवाणखान्यात उंची फर्निचर होते पण आता त्याची रया गेली होती. भिंतींना वाळवी लागली होती. रंगांचे पोपडे उडाले होते. एक भकासपणा भरुन राहिला होता सगळीकडे. दोघे अंदाजे वीसेक मिनिटे तिथे असतील. पहिल्याच दिवशी अति स्टंटस नको करायला असा विचार करत दोघांनी आवरते घेतले. आल्या मार्गानेच ते दोघे बाहेर पडले आणि गपचुप साळसुदपणे शेजारच्या गावातून आल्याची बतावणी करत गावात शिरले.

गावात प्रवेश करताच दोघे तडक पाटील काकांना भेटायला गेले. ते वाटच पहात होते. वाड्यातून बाहेर पडतांच मुकुंदाने बाबांना "मिशन फत्ते" असा एसेमेस करुन ठेवला होता. त्या दोघांना आतल्या खोलीत नेऊन पाटील काकांनी सर्व चौकशी केली. पोरं सुखरुप आली याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. नाही म्हटले तरी त्यांना प्रचंड टेंशन आले होते. दोघांकडून सर्व कहाणी ऐकत फोटो बघत त्यांनी विचारले आता पुढची स्टेप काय? सर्व विचाराधीन झाले. खरंतर वीस मिनिटे वाड्यात थांबुनही त्यांना नीट काही बघता आले नव्हते कारण वाड्यात काळोख होता. दिवसाउजेडी वाड्यात जाणे लगेच तरी परवडले नसते त्यांना. सुमीतला एक आयडीया सुचली. मुकुंदा इलेक्ट्रिशियन होता. वाड्यात तात्पुरती इलेक्ट्रिसिटी सुरु करुन सी सी टी व्ही कॅमेरा विथ ऑडीओ रेकॉर्डार बसवायचा. हे एव्हढे जरी केले तरी असे स्टंटस करत लोकांच्या नजरा चुकवत अंधारात तिथे जायची गरज पडणार नाही. सी सी टी व्ही फूटेज लोकांना त्यांची खात्री पटवण्यासाठी दाखवताही आले असते. हा विचार सर्वांना पसंत पडला. दुसर्‍या दिवशीच पाटील काकांच्या ओळखीने रत्नागिरी शहरात जाऊन ही खरेदी करायचे ठरले. पाटील काकांनी सी सी टी व्ही च्या डीलरशी तसे बोलून भेटीची वेळ ही ठरवून ठेवली होती.

दुसर्‍या दिवशी दुपारीच दोघे निघाले रत्नागिरीत जायला मुकुंदाच्या बाईकवरुन. सुमीत नको म्हणत असतांनाही काकांनी पैसे देऊन ठेवले होते. सुमीतच्या मनातला त्या दोघांबद्दलचा संशय मावळत चालला होता. कारण सारे प्लॅनिंग त्याचेच असे आणि हे बाप-लेक ते एक्झिक्युट करायला मदत करत असत.पण तरीही कसलीच रीस्क घ्यायची नाही हे त्यानी पक्के ठरवले होते. एका अज्ञात स्थळी मुकुंदाबरोबर एकटे जाणे ते ही काकांनी सांगून ठेवलेल्या माणसाला भेटायला.... न जाणो काही दगाफटका झाला तर...त्यामुळे बाईक हायवेला लागल्यावर सुमीतने प्लॅन बदलला. मुकुंदाला म्हणाला, की "माझ्या बाबांचा मेसेज आलाय घरी थांबण्यासाठी तर तू जाऊन खरेदी करुन ये मी घरी जातो". मुकुंदाने बरं म्हणत बाईक थांबवली. सुमीतला उतरु दिले अन त्याचा निरोप घेऊन हा पुढे निघून गेलाही. सुमीत यापुढेही असाच सेफ गेम खेळणार होता. मुकुंदाची आणि त्याच्या वडीलांची मदत तर घ्यायची पण स्वतःला सेफ ठेवून. आता त्याला घरी परत जाण्यात काही पॉइंट वाटला नाही. न जाणो मुकुंदाने मी परत येतोय हे कोणाला कळवले असेल तर.... त्यामुळे घरी न जाता तो दबकत, लपत देसाई वाड्यातच शिरला. दिवसा उजेडी कोणालाही कल्पना न देता वाडा पाहण्याची एक आयती संधी त्याला मिळाली होती.

आजही तो त्याच मागच्या दारानेच आत शिरला.आतमध्ये प्रचंड धुळ, ओल, शेवाळ, कुबट वास, कबुतरे, वटवाघळांनी केलेली घाण हेच होतं. एकेक खोली निरखत तो दिवाणखान्यात पोचला. एका ठिकाणी त्याला दिवाणखान्यात एक बंद दार दिसले. कडी लावून ठेवलेले. अरेच्चा. हे नव्हतं दिसलं परवा आपल्याला. त्याने हळूच कडी काढली आणि आत गेला. आत एक प्रशस्त बेडरुम होती. बहुदा हीच आत्याची बेडरुम असावी इथेच ते दोन्ही प्रसंग घडले असावेत. हे जाणवतांच सुमीत जास्तच बारकाईने सगळं निरखू लागला. एका बाजूला मोठा नक्षीदार पलंग. एका कोपर्‍यात दोन कपाटे, इतरही बरेचसे सामान. पलंगाच्या दुसर्‍या बाजूच्या भिंतीवर एक मोठे पेंटींग होते. उत्कॄष्ट रंगसंगती होती. नीट बघताच सुमीतच्या लक्षात आले की ते या वाड्याचेच पेंटींग होते, अगदी हुबेहुब, वाडा नवा कोरा असताना जसा दिसत असेल अगदी तसाच या चित्रात तो दिसत होता. सुमीत गुंग होऊन ते चित्र पाहत राहिला. त्याने त्या खोलीचे, त्या पेंटींगचे बरेच फोटोज काढले. एक गोष्ट सुमीतला जाणवली ती ही की या खोलीत इतर खोल्यांसारखी घाण नाहीये. बर्‍यापैकी साफ आहे ही खोली. पण हे कसे शक्य होते? या खोलीला बाहेर उघडेल असा दरवाजाही नाही आणि ज्या दरवाजातून या खोलीत प्रवेश करता येतो त्या दरवाजाला दिवाणखान्याच्या बाजुने कडी होती आणि दिवाणखान्यात तर धुळीचे साम्राज्य होते. कदाचित बंदीस्त असल्यामुळे या खोलीत धुळ नसेल आली फारशी असं वाटलं त्याला. सुमीतने आता कपाटाकडे मोर्चा वळवला. कपाटात भारी सिल्क साड्या , एक पितळी डबा सापडला. डब्यात बरेचसे दागिने होते. आत्याचे असावेत हे. हे सगळं असं इथे पडून आहे इतकी वर्षं? सुमीत चक्रावला. पण आता शोध मोहीम आवरती घेत तो जसा आला तसाच गुपचुप बाहेर पडला वाड्यातून.

दबकत कानोसा घेत बाहेर पडत असताना त्याला मागे परसदारी विहीरीपाशी कोणीसे बसलेले दिसले. त्याने काही क्षण तिथेच थांबून अंदाज घेतला. एक माणूस होता. शून्यात नजर लावून बसला होता. पण इथे यायला तर सगळे इतके घाबरतात आणि हा कसा काय आला इथे? सुमीत सावधपणे त्याच्याजवळ गेला. सुमीतला पाहताच तो माणूस चपापला आणि पळून जाऊ लागला. सुमीतने चपळाईने त्याला " ए थांब " म्हणत मागून पकडले. तो थरथर कापू लागला. सुमीत त्याची चौकशी करु लागला "कोण आहेस तू? आणि असा इथे बसून काय करतोयस?". त्याने आपले नाव विठू सांगितले. मी तालुक्याला जाता जाता इथे थांबलो होतो असे बोलू लागला. का पण? इथे का थांबलायस असा? इथे कोण भेटणार होतं तुला? बर्‍या बोलानं बोल नाहीतर पोलिसांत देईन. पोलिसांची धमकी देताच तो रडू लागला आणि सांगतो म्हणत बोलू लागला. साहेब माझं लेकरु या हिरीत पडून गेलं, लई वर्स झाली. त्याची आठवण आलती , म्हनून बसलो होतो वाईच." सुमीतला सदाचा विहीरीत पडून झालेला मॄत्यू आठवला. त्याने मुलाचे नाव विचारले, तर सदा हेच सांगितले त्याने. म्हणजे हा वाड्यातला नोकर विठू होता तर. सुमीतने आवाज चढवूनच त्याला इथे कोणी पाठवलंय का याची चौकशी केली. तो नाही नाही म्याच आल्तो म्हणाला. सुमीतने त्याचा पत्ता विचारला. फोटो काढून घेतला आणि इथून निघून जायला सांगितले. परत इथे असा येऊन बसू नकोस हेही सुनावले आणि सोडले त्याला.

घरी आल्यावर त्याने मुकुंदाला फोन करुन चौकशी केली. त्याची खरेदी झाली होती आणि इन्स्टॉलेशनही तोच शिकून परत येत होता. सुमीतने मात्र तो वाड्यात जाऊन आल्याचे मुकुंदला मुळीच सांगितले नाही.संध्याकाळी मुकुंदा परत आला आणि ते तिघे मुकुंदच्या घरात नेहमीच्या खोलीत भेटले. सी सी टी व्ही कॅमेर्‍याचे मॅन्युअल सुमीत चाळत होता. सहज म्हणून त्याने चौकशी केली पाटील काकांकडे की "सदाचे आई-वडील सध्या कुठे असतात?" पाटील काका म्हणाले "ते त्यांच्या गावी निघून गेले पण अधेमधे तालुक्याला जाऊन थोरल्या मालकांना भेटत असतात असं ऐकलंय मी. थोरले मालक त्यांना काही कमी पडू देत नाहीत म्हणे."

अच्छा, म्हणजे विठू खरं बोलत होता तर. सुमीत विचाराधीन झाला. थोरले मालक.... यांना पण एकदा भेटायला हवे खरंतर. तेच कदाचित विठूला हाताशी धरुन..... काहीतरी काळंबेरं आहे इथे. हा विठूच तर नसेल ना आत्याची ती बेडरुम वापरत? पण का करत असेल तो हे? की हे थोरले देसाईच तर नाहीत अमरीश पुरी? आत्याला माहीत असावं का तो विठू इथे येतो ते? की आत्याला अजुनही बरंच काही माहीत आहे? आणि आपल्या ‘खानदान की इज्जत’ वाचवायला ती मूग गिळून आदर्श सूनबाईचा रोल करतेय?.... मुकुंदाने खांद्याला धरुन "सुम्या" अशी हाक मारत गदगदा हलवले तेव्हा सुमीत भानावर आला.

सुमीतने हसत हसत जणू काहीच झाले नाहीसे दाखवले नि बोलू लागला. “चला सामान तर आलं आता महत्वाचा प्रश्न की हे इंस्टॉलेशन कसं आणि कधी करायचं? मुकुंदा तुला जमेल का एकट्याला हे करायला?” मुकुंदा आत्मविश्वासाने “हो” म्हणाला. त्याला आधी वाड्यात इलेक्ट्रिसिटी पुन्हा सुरु करावी लागणार होती.“हे काम शिताफीने झालं पाहिजे मुकुंदा. अंधारात कसं काम करशील तू?” दिवसा उजेडी वाड्यात घुसणे, काम करीत राहणे जोखमीचे होते. गावातल्या कोणी हे बघायला नको होते इतक्यात. शेवटी यावर काहीतरी मार्ग काढू असं पाटील काका म्हणाले आणि सुमीत घरी जाण्यासाठी निघाला.

घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...

क्रमशः

भाग ५

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle