वाडा (कथा): भाग ५

घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...

“हायला सुमीतराव तुम्ही तर एकामागोमाग एक सर्वांवरच संशय घेऊ लागले. अजुन चार-दोन दिवसांत सगळं चाफे गाव संशयितांच्या यादीत सामील नाही झालं म्हणजे मिळवलं.” सुमीत स्वतःशीच हसत बोलला. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला. आता सी सी टी व्ही फूटेज हाच एक मदतीचा मार्ग दिसत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी आत्याने सुमीतच्या हातात एक पत्रक दिलं. ती एक आमंत्रण पत्रिका होती. गावातल्या लहान मुलांसाठी एक उपक्रम आत्या राबवत होती. त्याचा एक भाग म्हणून आज गावात एका आश्रम शाळेतल्या बाई व्याख्यान द्यायला येणार होत्या "सुजाण पालकत्व" या विषयावर. गावात या बाईंचे व्याख्यान व्हावे, ते गावातील लोकांनी ऐकावे यासाठी आत्याने बरेच प्रयत्न केले होते. आत्याचं म्हणणं होतं की सुमीतनेही या कार्यक्रमाला उपस्थित रहावं. सुमीत काय मोकळाच होता बरं म्हणाला तो. संध्याकाळी चारची वेळ होती कार्यक्रमाची.

आत्याला सांगितल्याप्रमाणे सुमीत गावातील शाळेच्या मैदानात पोचला. व्याख्यानासाठी मैदान सजवले होते. स्टेज उभारले होते. समोर खुर्च्या मांडल्या होत्या. आत्या सार्‍या व्यवस्थेवर नजर ठेवून होती. चार वाजायला आले तसे हळूहळू लोक जमू लागले. पाहुण्या आल्या. सारे व्यासपीठावर स्थानापन्न झाले. आत्याही स्टेजवर बसली. सुमीतला एकदम भारी वाटत होतं आत्याला समोर पाहुन. तिने पाहुण्यांची ओळख करुन दिली आणि पाहुण्या बोलण्यास उठल्या. "लहान मुले म्हणजे मातीचा गोळा. आपण जसा आकार देऊ तशी ती घडणार” अशी सुरुवात करुन त्या बोलू लागल्या. “मुलांशी संवाद साधत रहा, लहान वयात जर त्यांच्या मनावर कसला आघात झाला तर त्याचे पडसाद मोठे झाल्यावर उमटतात, डीप्रेशन, स्प्लिट पर्सनॅलिटी अशा गंभीर आजाराच्या स्वरुपात.” सुमीतला बोअर होऊ लागलं. अशी भाषणं ऐकत एका जागी बसायचं म्हणजे... कंटाळवाणं काम. त्याची चुळबुळ सुरु झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला जाणवले की कार्यक्रमाला तुफान गर्दी जमलीये. त्याने मागे वळून पाहिले, सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या. शिवाय लोक मागे उभे राहून ऐकत होते. त्यांच्या वहिनीसाहेबांनी कार्यक्रमाला यायचे आवाहन केले होते ना... भारी वट आहे आत्याची गावात. अचानक त्याला क्लिक झाले. सगळं गाव इथे आहे तर आपण इथे काय करतोय? विजेचा झटका लागल्यागत तो उठला आणि सरकत गर्दीतून वाट काढू लागला. थोडे दूर जाऊन त्याने मुकुंदाला कॉल केला. तो कुठेतरी काम करत होता. त्याला ताबडतोब देसाई वाड्यावर यायला सांगितले सुमीतने. “आपण आत्ता इंस्टॉलेशन करायचेय”, इतके फोनवर कुजबुजून तो तडक घरी पोचला.

कॅमेरा आणि इतर सामुग्री घेऊन पोचला वाड्यापाशी. काही मिनिटांतच मुकुंदा पोचला. त्याने त्याच्या बाबांना सांगून ठेवले आणि दोघे लागले कामाला. वाड्याबाहेरुन कोणती वायर कशी फिरवायची हे सारे मुकुंदाला माहीत होते. ते तर त्याने चुटकीसरशी केले आणि दोघे आत गेले, सावधगिरी बाळगत. मुकुंदाने विचारले,”कुठल्या खोलीत करायचे फिटींग?” सुमीतने आधीच ठरवले होते बेडरूममध्ये. जे काही आहे ते याच खोलीत याबद्दल त्याची खात्री होती. मुकुंदा चाटच पडला ती खोली पाहून. आधी ही खोली पाहिलीच नव्हती त्याने. सुमीतने त्याला शक्य तितक्या फास्ट काम करायला सांगितले. तोही मग पटापट काम करु लागला तर सुमीत इतरत्र नजर ठेवून होता. तासभर कसा गेला समजलेच नाही. पण मुकुंदाने काम पूर्ण केले.

मुकुंदा घामाघुम झाला होता. सुमीतने तर त्याला मिठीच मारली. अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान वाटत होते दोघांना. आता लोकांच्या नजरा चुकवत इथे यायला नको. सुमीतने आपल्या लॅपटॉपवरच हे फूटेज पहाता येण्यासाठी आवश्यक ती जोडणी केली. आज रात्री तर दोघांना मोकळे रान मिळणार होते. कारण आत्या त्या व्याख्यात्या बाईंना आश्रमात पोचवण्यासाठी पाटील काकींसह गेली होती. रात्री त्या दोघी तिथेच राहून उद्या गावी परतणार होत्या. रात्री चुकुनही आत्या कधी वाड्यावरुन येणे शक्य नव्हते. त्यामुळे तिनेच हा आश्रमात रहायचा प्लॅन केला होता.

सुमीत आणि मुकुंदाने हा नाईट आउट एंजॉय केला एकदम आत्याच्या घरात. गप्पा, मूव्हीज आणि अधेमधे सी सी टीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद आढळंतय का ? याची चाचपणी. कसलं काय, रात्रभर त्या खोलीत सुमीतच्या अपेक्षेप्रमाणेच संशयास्पद हालचाल, कुणाचे अस्तित्व, काहीच वेगळे जाणवले नाही. सुमीत अगदी आत्मविश्वासाने मुकुंदाला सांगत होता. “माझी पूर्ण खात्री होती की इथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. उगाच वाड्याला भुतांच्या तावडीत देऊन ठेवलंय तुम्ही गावकर्‍यांनी.” दोघंही एकमेकांना टाळ्या देत हसले.

सकाळ झाली. सुमीतला आज खूपच मोकळे वाटत होते. एकदम खुशीत होता तो. उराशी बाळगलेले एक स्वप्न पूर्णत्वाला पोहोचू पहात होते. त्याने चहा केला. मुकुंदालाही दिला. नंतर भेटू म्हणत मुकुंदा त्याच्या घरी निघून गेला. सुमीतने आई-बाबांना फोन केला. बराच वेळ मनसोक्त गप्पा मारल्या त्याने दोघांशी. इतके दिवस आई-बाबांपासून सारे लपवून ठेवायचे असल्यामुळे तो त्यांच्याशी अगदी मोजकेच, तुटक बोलत होता फोनवर. पण आता त्याची गरज नव्हती. आता एक - दोन दिवसांत तो हे सगळं उघड करणार होता गावकर्‍यांसमोर. बाबांची तर त्याला चिंताच नव्हती. त्यांना सुमीतने केव्हाच खिशात टाकले होते. इकडच्या बर्‍याचशा घडामोडीही तो आईला सांगत नसला तरी बाबांच्या कानावर अधून मधून घालत असे. बाबा आईसारखे ओव्हर रिअ‍ॅक्ट होत नसत. फक्त काळजी घे स्वतःची, सावध रहा, जपून इतकंच मोघम बोलत असत.पुढील कार्यवाही ठरवण्यासाठी तो मुकुंदाकडे पोचला.

पाटील काकांनी त्याला पहाताच त्याचं स्वागत केलं, "या या सुमीतराव. खूश आहात न्हवं? झालं का तुमच्या मनाजोगं सारं?" सुमीतने आनंदाने मान डोलावली. पाटील काका म्हणाले "मग आता बोलून घ्या तुमच्या वडीलांशी, आत्याशी. आम्हीही गावात एक मिटिंग घेतो नि सांगतो समद्यांस्नी". "नाही, नाही काका, थांबा एव्हढ्यात नको" सुमीतने त्यांना अडवले. "का हो? आता काय बाकी आहे?" "आहे ना अजुन एक काम बाकी आहे. ते आज पूर्ण करुयात आणि उद्या घ्याच तुम्ही मिटींग". पाटील काका प्रश्नार्थक मुद्रेने सुमीतकडे बघत राहिले. "काका", सुमीत म्हणाला, "आजची रात्र मी आणि मुकुंदा वाड्यात झोपणार. आम्ही रात्रभर तिथे राहून, सकाळी सुखरुप वाड्यातून बाहेर आलो हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा तोच एक पुरावा पुरेसा आहे वाड्याच्या भितीतून गावाला बाहेर काढायला. मग आपल्याला कोणाला काही पटवून द्यायची गरजही नाही पडायची." हे ऐकलं मात्र पाटीलकाका हादरलेच एकदम. "छ्या, छ्या, हे करायची काय बी गरज न्हाय. क्यामेरा हाय न्हवं? इतकं बास झालं बघा. तुम्ही दोघी तरनीताठी पोरं असं वंगाळ काय करु नका." पाटील काकांनी आपला नकार स्पष्टपणे दर्शवला. जसं सुमीतने हे सगळं आत्यापासून त्याच्या आई-वडीलांपासून लपवून ठेवलं होतं तसंच मुकुंदाच्या आईलाही याची अजिबातच कल्पना नव्हती. सुमीत मात्र हट्टास पेटला. "तुम्हाला अजून भिती वाटतेय का काका? अहो आम्ही नाही का जाऊन आलो तिथे दोन -तीनदा? काही असतं तर जाणवलं असतंच ना. आपण एक काम करुयात. वाड्याच्या पुढल्या दाराला कुलुप आहे. आपण अजुन एक आपले कुलुपही लावू आणि आम्ही आत गेलो की मागच्या दारालाही लावून घ्या तुम्ही एक कुलुप. म्हणजे कोणी घुसून हल्ला करायचा प्रश्नच येणार नाही. आणि तुम्हाला काळजी नाही." सुमीत तर इरेला पेटला. एव्हाना मुकुंदालाही हे असलं साहस आवडू लागलं होतं. तो ही हट्ट करु लागला. शेवटी पाटील काकांच्या खास विश्वासातले दोन तगडे सशस्त्र नोकर वाड्याच्या पुढल्या आणि मागल्या दारी रात्रभर पहार्‍यावर राहतील या अटीवर त्यांनी नाखुशीनेच हे मान्य केले. आता सुमीतने अजून एका गोष्टीसाठी हट्ट केला. ती म्हणजे काकांनी गावाबाहेर शेतात असलेल्या त्यांच्या वाड्यात रहायचे आजची रात्र. "हे कशाला आता? त्या वाड्यात मोबाईल रेंज पकडत न्हाय. तुम्हास्नी काय लागलं सवरलं म्हंजी?" "काका, याची आवश्यकता आहे. उद्या जर गाववाले भडकले तर तुम्ही गावात नव्हताच आणि पोरापोरांनी मजा-मस्तीत वाड्यात रहायचं ठरवलं. मला हे काहीच माहीत नव्हतं अशी तुम्हाला सारवासारव करता यावी म्हणून. आणि आमची चिंता सोडा. आम्हाला काहीही होणार नाही. तुमचे पहारेकरी असणारच आहेत की हाकेच्या अंतरावर." नव्या पिढीचे, तरुण रक्त आणि त्यांचा आग्रह यापुढे काकांना अनिच्छेने का होईना पण मान तुकवावीच लागली.

आत्याला आणि मुकुंदाच्या आईला, सुमीत आणि मुकुंदा बरोबर पाटील काका त्यांच्या शेतातल्या वाड्यावर रात्री जाणार आहेत अशी बतावणी करण्यात आली. सबंध दिवस सुमीत , मुकुंदा आणि पाटील काका आवश्यक वाटेल अशी प्रत्येक वस्तू विचारपूर्वक बरोबर घेत होते. मोबाईल, लॅपटॉप फुल्ल चार्ज केले गेले. पाणी, सुका खाऊ, इमरजंसी औषधे. काकांनी तर त्यांच्या जवळ असलेला एक खास रामपुरी चाकू मुकुंदाच्या पिशवीत टाकला. जवळ असलेला बरा या उद्देशाने.

दिवस ढळला. संध्याकाळी आपापल्या घरातच राहून लवकर जेवून निघायचे असा प्लॅन होता. सुमीत आत्याशी बरीच चेष्टामस्करी करीत होता. तिला हसवत होता. तिने केलेलं गरम गरम कुळथाचं पिठलं आणि भाकरी त्याने आडवा हात मारुन खाल्ली आणि निघाला सुमीत. "उद्या सकाळी येईन बरं का आत्या" असं म्हणत त्याने आत्याचा निरोप घेत घराबाहेर पाऊल टाकले अन अचानक परत वळला. खाली वाकून तिच्या पायांना स्पर्श केला त्याने. अचानक हे काय असं करतोय सुमीत हे न कळून आत्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला "यशस्वी हो" असं बोलून गेली ती. सुमीत चमकला. हिला कसं सुचलं याच आशिर्वादाची मला गरज आहे ते? किती साधी, भाबडी आहे बिचारी. गेले कित्येक दिवस आपण तिच्या घरात राहून तिला फसवून हे सगळं करतोय. त्याला एकदम अपराधी वाटू लागले. पण सावरले त्याने स्वतःला आणि आत्याचा निरोप घेत घराबाहेर पडला.

मुकुंदा आणि काका गाडीत त्याची वाटच पहात होते. तिघे निघाले तडक. वाटेत काका दोघांवर असंख्य सुचनांचा भडीमार करत होते. काय करा? काय नाही? अगदी गरज लागलीच तर त्यांच्या एका इंस्पेक्टर दोस्ताचा नंबरही त्यांनी देऊन ठेवला होता. दोघेही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. नाही म्हटलं तरी त्यांनी परवानगी दिली म्हणून हे इतकं धाडस तरी करु शकले होते दोघे मिळून.

बोलतच तिघे वाड्यापाशी आले. शेवटची एस टी केव्हाच निघून गेली होती आणि म्हणून रस्त्याला सामसूम झाली होती. काका आज प्रथमच वाड्यात येत होते. ठरल्याप्रमाणे त्यांचे दोन विश्वासू पहारेकरीही हजर झाले.सर्वप्रथम काकांनी स्वहस्ते वाड्याच्या दर्शनी दरवाजावर असलेल्या आधीच्या कुलुपावर स्वतःचे भक्कम कुलुप बसवले. एक चावी स्वतःकडे ठेवून घेतली. तर दुसरी त्या पहारेकर्‍यास दिली. तिघे मागील दाराने आत गेले. काकांनी स्वतः जातीने सगळ्या खोल्यांत फिरुन खात्री करुन घेतली. बेडरुममध्ये, जिथे मुले रहाणार होती तिथे तर विशेष लक्ष देत पहाणी केली. जुजबी सफाई करुन घेतली.खोलीत त्यांनी एक मंद दिवा लावला होता, आतमध्ये तर प्रकाश पडेल पण बाहेरुन विशेष उजेड जाणवणार नाही असा. त्यांच्या माणसांस डोळ्यांत तेल घालून राखण करण्यास सांगितले आणि काही संशयास्पद वाटल्यास मुलांच्या हाकेची वाटही न पाहता वाड्यात घुसण्याच्या सुचना दिल्या. मुकुंदाच्या पिशवीतून आणलेला रामपुरी चाकू त्यांनी तिथेच पलंगाशेजारील साईड टेबलवर ठेवला आणि वेळ पडल्यास स्वसंरक्षणार्थ तो वापरण्यास दोघांना सांगितले. शेवटी मुकुंदा म्हणाला, "बाबा आम्ही कुठे सात समुद्रापल्याड नाही इथे गावातच राहणार आहोत". सगळेच हसले आणि वातावरणातला ताण हलका झाला. दोघांनी काकांना वाकून नमस्कार केला. “काळजी घ्या पोरांनो.” “काका तुम्ही साथ दिलीत म्हणून इथवर पोचलो आपण” सुमीतने कबुल केले. त्या दोघांच्या पाठीवर थोपटत मागील दाराला कुलुप लावून घ्या याची आपल्या माणसांना आठवण करुन देत काका वाड्याबाहेर पडले सावधपणे.

काकांची गाडी दूर निघून गेलेली दिसताच दोघांनी जरा वेळ टी पी केला. मग सुमीतने लॅपटॉप उघडला. सी सी टीव्ही चे रेकॉर्डींग लॅपटॉपवर पहाण्या/ऐकण्यासाठी काय आणि कशी जोडणी करायची? ते कसे पहायचे हे मुकुंदाला शिकवले. स्वतःच्या लॅपटॉपचा पासवर्डही शेअर केला. मुकुंद गोंधळला. "तू हे आत्ताच का मला दाखवत आहेस?" त्याने विचारणा केली. "कारण आज रात्री माझा लॅपटॉप तुझ्याकडे असणार आहे म्हणून." सुमीत उत्तरला. मुकुंदा अजुनच गोंधळला. सुमीत त्याच्या जवळ गेला आणि त्याला सांगितले,"मित्रा आजवर साथ दिलीस . आता यापुढे नाही. आता ही लढाई माझी एकट्याची आहे. तुझा जीव धोक्यात नाही घालणार मी" मुकुंदाचे डोळेच विस्फारले. "काय बोलतोयस तू हे सुम्या; बाबा असतांना काही सांगितले नाहीस?” “हो. कारण त्यांनी मला एकट्याला नसते राहू दिले इथे. पण माझा निर्णय झालाय तू आता गावात परत जाणार आहेस." "अरे पण का? राहुयात की आपण दोघे" मुकुंदा कळवळून त्याला सांगत होता. सुमीत ठामपणे म्हणाला" नाही, उद्या मी इथून सुखरुप बाहेर येणार आहे या बद्दल मला ९९ % खात्री आहे. पण १ % काही बिनसले, तर... तर आपली मेहनत वाया जाऊ नये. इथे जे झालं ते या कॅमेर्‍याच्या मदतीने तू काकांना, गावकर्‍यांना आणि वेळ पडल्यास पोलिसांना दाखव. त्यासाठी तुला सेफ रहावेच लागेल आणि तसंही ही माझी इच्छा होती. माझ्या हट्टापायी मी कुणाचा जीव धोक्यात कधीच घालणार नाही." "अरे पण सुम्या ऐक माझं जरा" मुकुंद समजावणीच्या सुरात बोलू लागला. "बास्स, चल निघायचं आता इथून", त्याने दरडावत निक्षून सांगितले मुकुंदाला. मुकुंदाचे काही चालले नाही. सपशेल हार पत्करत तो निघाला स्वतःचे सामान घेऊन. त्याने एकदा सुमीतला घट्ट मिठी मारली,दोघंही इमोशनल झाले , सुमीत म्हणाला," तुला थँक्यु म्हणून तुझा अपमान नाही करणार पण तू मैत्री निभावलीस मित्रा". “जप स्वतःला” म्हणत मुकुंदा घराबाहेर पडला.

मुकुंदाला वाड्याबाहेर पडून गावाच्या दिशेने जाताना सुमीतने खिडकीतून पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. हे एक अत्यंत जोखमीचं काम आपण कसं काय पार पाडू शकू याबद्दल त्याला साशंकता होती. पण साधलं ते आणि एका दगडात दोन पक्षी मारले गेले. काकांना गावापासून दूर, मोबाईल रेंज नसलेल्या ठिकाणी पाठवणे आणि मुकुंदाला घरी. मात्र काकांच्या लेखी दोघं एकत्र वाड्यात आहेत, एकाला दुसर्‍याची सोबत आहे. शिवाय वाड्याबाहेर आपल्या विश्वासू माणसांचा पहारा. सुमीतसह आपला लेकसुद्धा वाड्यात असल्यामुळे काकांच्या मनात यदाकदाचित काळंबेरं असेल तरी आज रात्री त्यांना काही करता येणार नव्हतं. मुकुंदाबरोबर वाड्यात रहाण्याची बतावणी याचसाठी सुमीतने केली होती. त्यामुळे आज रात्री सुमीत काकांच्या विश्वासू नोकरांच्या पहार्‍यात सुरक्षितच रहाणार होता. काकांच्या डोळ्यांत सुमीतने लेकाविषयीची काळजी नीटच पाहिली होती, त्यामुळे तो मुकुंदाला सोबत राहू देणारच नव्हता. कोणालाही न दुखावता त्याने सारे काही आपल्या प्लॅननुसार मनाजोगे करुन घेतले, शिताफीने, इतक्या शिताफीने की मघाशी मुकुंदाने जेव्हा सुमीतला मिठी मारली तेव्हा त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल सुमीतने काढून घेतल्याचेही मुकुंदाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे मुकुंदा आता बाबांना किंवा इतर कोणालाही फोन करुन सुमीत एकटा आहे हे कळवू शकत नव्हता. आज त्याची बाईकही सर्व्हिसिंगला दिली होती. शेतापर्यंतचे अंतर काळोखात पायी जाण्यासारखेही नव्हते. त्यामुळे बाप-लेक रात्री एकत्र येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुकुंदा बिच्चारा, “उद्या जर काही बिनसले तर माझा लॅपटॉप वापरुन तू सगळं रेकॉर्डींग पोलिसांना दाखव त्यासाठी तुला सेफ रहायलाच पाहिजे" या इमोशनल डायलॉगला बळी पडला होता.” सुमीत खदखदून हसला. अरे मुकुंदा,वेड्या ९९ % काय मला आता तर १०८% खात्री आहे की मी उद्या इथून सुखरुप बाहेर पडेनच.

सुमीतने मुकुंदाचा फोन बंद करुन ठेवला आणि स्वतःचा फोन हातत घेतला. काही मेसेज आहे का पाहिलं. अचानक त्याला आईची प्रकर्षानं आठवण आली. आई, गेले काही दिवस तुला न सांगता बरंच काही करतोय गं. मला माहितीये तुला मुळ्ळीच पसंद पडलं नसतं हे. पण आई हे आजचं शेवटचं. खरंच शेवटचं आणि आई माझी खात्री आहे की तुला उद्या जेव्हा हे सारं कळेल ना तेव्हा वरकरणी तू रागावशीलही माझ्यावर की कशाला सुम्या इतकी जोखीम पत्करलीस? पण आयॅम शुअर मनातुन तुला आणि बाबांना माझा अभिमानच वाटेल. निस्वार्थीपणे गावाच्या, आत्याच्या भल्यासाठी काहीतरी करुन दाखवलं माझ्या बाळाने असं अभिमानाने सांगशील तू सर्वांना. आईचा डीपी निरखत त्याने "लव्ह यू मम्मा" म्हणत आईला गुडनाईट किस केले आणि फोन बाजूला ठेवला.

रात्री शक्यतो झोपायचे नाही असे ठरवले होते सुमीतने. पण मोबाईल डिस्चार्ज होईल म्हणून त्याने नेट बंद ठेवले होते आणि लॅपटॉप तर मुकुंदाबरोबर पाठवून दिला होता. त्यामुळे आता कंटाळला तो. मध्यरात्र उलटून गेली. डोळ्यांवर झापड येऊ लागली सुमीतच्या आणि पलंगाच्या बैठकीला पाठ टेकून नि पाय पसरुन बसलेला सुमीत नकळत निद्राधीन झाला.

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

क्रमश:

भाग ६

किंवा

भाग ६-अ

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle