वाडा (कथा): भाग ६-अ-अंतिम

(भाग ५ नंतर हे वाचा)

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

दिवस उजाडला. सूर्याची कोवळी, उबदार किरणे चाफे गावावर सोनेरी पखरण करु लागली. शहरासारखं आखीव रेखीव घड्याळाच्या काट्यावर फिरणारं जीवन इथे नजरेस पडत नसलं,तरी संथ गतीतलं साचेबद्ध जीवन जगायची ही लोकं. आज मात्र गावकर्यांनी तो साचा जणू झुगारुन दिला होता. एरव्ही कधी देसाई वाड्याच्या वार्यालाही न थांबणारी गावातली माणसं आज घोळक्या-घोळक्याने देसाई वाड्याभोवतीच जमलेली दिसत होती. गाव जणू ओस पडलं होतं आणि देसाई वाड्याभोवती सकाळी सकाळी जत्रा फुलली होती. सर्वतोमुखी 'सुमीत' हे फक्त एकच नाव ऐकू येत होते. विशीच्या कोवळ्या वयात त्याने दाखवलेले धाडस, जिद्द,आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सारं केवळ कौतुकास्पद होतं. सर्वांत वाखाणण्यासारखा गुण म्हणजे रुढी परंपरांचं जोखड उखडून फेकून देऊन जे सत्य आहे ते शोधण्याचा त्याने केलेला प्रामाणिक प्रयत्न. ते सत्य गावासमोर यावं हा त्याचा ध्यास भल्याभल्यांना लाजवेल असा होता. वाड्याचे गूढ आज त्याच्यामुळेच तर उलगडले गेले होते. भितीचे सावट दूर झाले होते. त्यामुळे आज तो चर्चेचा विषय बनला तर नवल नव्हते.

एका रात्रीत ‘स्टारडम’ प्राप्त झालेला आपला 'सुपरस्टार' सुमीत.... तो कुठे होता पण? आज आणि पुढचे काही दिवस लाईमलाइइटमध्ये तो असणार होता त्याची सवय तर लावून घेत नव्हता? की यापासून दूर राहू पहात होता?
सुमीत या कशातच नव्हता. तो आत्याच्या घरात तिची सेवा, शुश्रुषा करण्यात गढला होता. रात्री वाड्यात जे काही घडले त्याने बराच अस्वस्थ, विष्ण्ण मनःस्थितीत.

वाड्यात जे रात्री घडलं ते सुमीतकडून ऐकताच आता कसलाही आडपडदा न ठेवता पाटलांनी गेले काही दिवस जे सुरु होते ते गावकर्यांसमोर आणि थोरल्या जमिनदारांना बोलावून त्यांनाही सांगायचे असा निर्णय घेतला. थोरले जमीनदार गावात पोचले. सुमीतला बोलावून आणण्यात आले. पाटलांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर सुमीतचा येथे येण्याचा मनसुबा, आजवर त्या तिघांनी मिळून केलेले कार्य याबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि सुमीतला रात्री जे घडलं ते सांगण्याबद्दल विनवले. सुमीतने फार काही न बोलता सी सी टी व्ही फूटेज बघायची विनंती केली. लॅपटॉप ऑन केला गेला. रात्री जे काही रेकॉर्ड झालं होतं ते तो दाखवू लागला. जे काही दिसलं, ऐकू आलं ते पाहून, ऐकून सगळे अंतर्बाह्य हादरले.

सुमीत झोपून गेल्यावर बर्‍याच वेळानंतर खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. नीट बघताच एक व्यक्ती खोलीत आल्याचे दिसले. अंधुक प्रकाशात चेहरा, कपडे नीट दिसत नव्हते. पण ती व्यक्ती सराईताप्रमाणे वावरत होती. अचानक त्या व्यक्तीचे लक्ष पलंगावर झोपलेल्या सुमीतकडे गेले आणि.... आणि काय झाले ते कळलेच नाही ती व्यक्ती हिंसक झाल्यागत स्वतः च्या डोक्यावर दोन्ही हात मारुन घेत इथे तिथे पाहू लागली...कसला तरी शोध घेत असल्यासारखी. कॅमेर्‍यात काहीतरी चमकल्याचे जाणवले. ती व्यक्ती त्या दिशेने जाऊ लागली. पलंगाशेजारी साईड टेबलवर पाटील काकांनी ठेवलेला चाकू होता तो. त्या व्यक्तीने चाकू उचलला आणि सुमीतवर वार करणार इतक्यात.....सुमीतला हालचाल जाणवली आणि तो उठला. चपळाईने पलंगावरुन टुणकन उडी मारत त्याने सावध पवित्रा घेतला. झटक्यात त्या व्यक्तीच्या हातातला चाकूही काढून घेतला त्याने. इतक्या सहजतेने चाकू हातातून सोडून दिला याचा अर्थ ती व्यक्ती सराईत गुन्हेगार नव्हती असा कयास सुमीतने बांधला आणि त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करु लागला. आपल्या हातातील शस्त्र काढून घेतल्यामुळे ती व्यक्ती बिथरली आणि सुमीतला ओरबाडू लागली, दोघांची झटापट चालू असतांना सुमीतने त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे वस्त्र दूर सारले आणि तो जागच्या जागी थिजून गेला..... यापुढे सुरु झाली ती फक्त सुमीतची स्वतःला वाचवण्याची शिकस्त. तो फक्त त्या व्यक्तीचा मार चुकवत होता आणि तिला शांत करु बघत होता. एकदाही त्याने त्या व्यक्तीवर हात उचलला नाही. का असं? कोण होती ती व्यक्ती?

सुमीतला मारत असतानाच ती व्यक्ती संतापून बोलत होती. ते बोलणेही रेकॉर्ड झाले होते.

"अरे चांडाळा? पुन्हा आलास? का ? कशासाठी? माझ्यावर परत अत्याचार करायला? कितीदा सांगितले माझ्या घरात येऊ नकोस. पहिल्या वेळी आलास तेव्हा खरंच अजाण, निरागस वयात होते मी, त्यात एकटी म्हणून डाव साधलास. पण त्यानंतर प्रत्येक रात्र मी जागून काढलेय, सावध रहात. तू पुन्हा आलास माझ्या या घरात, धाकट्या जमिनदाराचं रुप घेऊन? इथे? माझ्या खोलीत? पण मी बेसावध नव्हते बरं. तुला तुझ्याच शस्त्राने मारलं मी. त्यानंतरही हिंमत केलीस? सदा बनून आलास? अरे तेव्हा तर साध्या उशीखाली दाबून फेकून दिले तुला विहीरीत. तेव्हा बजावलं होतं चालता हो, कायमचा निघून जा. तरी आज आलास? बघून घेते तुला. नाही सोडणार जिता. कितीही वेळा आलास तरी नाही सोडणार्,पुन्हा कधीच माझ्या घरात माझ्यावर अत्याचार नाही करुन देणार तुला.”बराच वेळ झटापट करुन गलितगात्र होत शेवटी ती भोवळ येऊन पडली.

सगळं चित्रीकरण समोर बघत असताना सुमीतच्या डोळ्यांतून मात्र अश्रुधारा वाहत होत्या. हे सारं अजाणतेपणी का होईना पण आपली आत्याच करत होती यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. इतरांचीही तशीच काहीशी अवस्था झली होती.

इतक्या रात्री वहिनीसाहेब गावाबाहेरच्या वाड्यात एकट्या आल्या होत्या की कोणा बरोबर? असा प्रश्न उपस्थितांना पडला. पहारेकरी काहीच सांगू शकले नाहीत. त्यांनी वहिनीसाहेबांना किंवा कोणालाच आतमध्ये येतांना पाहिलं नव्हतं. तितक्यात मुकुंदाला रेकॉर्डींग बघत असतांना जे जाणवले होते ते त्याने निदर्शनास आणून दिले. रिवाईंड करत ती व्यक्ती आत येत होती तो भाग पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली.

बेडरुममध्ये आत येण्याचे दार दिवाणखान्यातून होते, जे बंद करुन सुमीत झोपला होता आणि आत्या त्या दारातून आत आलीच नव्हती. तर दुसर्या भिंतीवर जे वाड्याचं पेंटींग होतं ते हलताना दिसत होतं आणि त्यामागूनच आत आलेली दिसत होती. थोरल्या जमीनदारांनी ती जागा पहात आठवून सांगितले की त्यांच्या दोन वाड्यांना जमिनीखालून जोडणारे ते भुयार होते जे त्यांनीच वाडा बांधत असतांना, सुरक्षेच्या दॄष्टीने बांधून घेतले होते. मात्र या गोष्टीची कल्पना फक्त घरातील व्यक्तींनाच होती.

इतकी वर्ष वाड्याबाबतीत असलेले सारे कयास खोटे होते तर. ना तिथे भूत-पिशाच्चबाधा होती ना ते कोणाचे कपट कारस्थान होते.जे काही घडले होते ते अजाणतेपणी अपघातच जणू.

थोरले जमिनदार गावात आत्याला भेटायला गेले सर्वांबरोबर, आत्याच्या घरात. आत्या.... काय घडलंय, घडतंय या सगळ्या आकलनापलिकडे पोचलेली... शुन्यात नजर लावून बसली होती. तिला पहाताच थोरल्या जमीनदारांना गलबलून आले.... इतरांनी त्यांचे सांत्वन केले. कुणीतरी एक कार्ड त्यांच्या हाती सरकवले. ते एक विझिटींग कार्ड होते.... रत्नागिरी शहरातल्या प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचे.

थोरल्या जमीनदारांच्या संमतीने सुमीतने त्या मानसोपचारतज्ज्ञाची अपॉइंटमेंट घेतली.स्वतः आत्याला घेऊन तिथे पोचला. सगळी केस हिस्ट्री पाहून आणि प्राथमिक तपासणी करुन डॉक्टरांना ही स्प्लिट पर्सनॅलिटीची केस वाटत होती. आत्याने स्वतः अटॅक आल्यावर बोलून दाखवल्यानुसार लहानपणी तिच्या बाबतीत काही अनुचित घडले असण्याची शक्यता होती, त्या घटनेच्या परिणामस्वरुप जडलेला विकार. नक्की निदान व उपचारपद्धती पुढील अनेक चाचण्यांनंतर ठरणार होती. त्यासाठी आत्याला तिथेच ठेवून घ्यायचे ठरले. जमीनदार साहेबांनी कितीही पैसा तिच्या उपचारांवर खर्च करण्याची तयारी दर्शवली.

सुमीतला झाल्या प्रकाराबद्दल फार अपराधी वाटत होते. आपल्यामुळे हे सारं झालं. ज्या गावात आत्याला इतका मान होता त्याच गावाने आज तिची अशी अवस्था पाहिली. हे गावकरी पुन्हा तिला असा मान देतील का? तिच्या आजाराबद्दल सहानुभुती दाखवत तिच्या हातून अजाणतेपणी घडलेल्या गुन्ह्यांबद्दल तिला माफ करतील का? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. अजुनही बर्याच शंका-कुशंका त्याच्या डोक्यात येत होत्या ज्यावर समाधानकारक उत्तर त्याला मिळत नव्हते. नीट शांतपणे बसून झाल्या घटनाक्रमावर पुनर्विचार करणे त्याला खूप आवश्यक वाटत होते. पण जे झालं ते इतकं अकल्पित आणि अचानकपणे समोर ठाकलं होतं की त्यानंतरच्या सार्या गदारोळात सुमीतला असा शांत वेळ विचार करण्यास मिळालाच नव्हता. त्याची मनःस्थिती ओळखून थोरल्या जमीनदारांनी त्याला समजावले की “तुझ्या या जिज्ञासेमुळेच आपण या प्रकरणाच्या मुळाशी तरी पोचू शकलो. उशीरा का होईना राधेच्या आजाराबद्द्ल समजलं आता उपचार करणं आपल्या हाती.”

हा सारा घटनाक्रम अप्रत्यक्षरित्या त्या वाड्याशीच संबंधित होता. त्यामुळे आता खरंतर थोरल्या देसाईंना या वाड्याचाच उबग आला होता. लेकाचे लग्न करायचे असं घरात ठरवताच त्यांनी हौसेने या वाड्याच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र वाडा बांधल्यावर एकही दिवस धड ना त्यांचा लेक त्या वाड्यात सुखाने रहू शकला ना सून आणि ना ते स्वतः. त्यामुळे हा असा वाडा आपल्याला नकोच असे विचार त्यांच्या मनात आले. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं सर्वांना. पण खरं तर आता देसाई वाड्याबाबतची संदिग्धता दूर झाली होती. वाडा जणू शापमुक्त झाला होता सुमीतच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे हा वाडा गावच्या हिरोला - सुमीतलाच बक्षीस म्हणून देण्यात यावा असा विचार गावकर्यांमधून पुढे आला. मोक्याच्या ठिकाणी असलेला वाडा पुन्हा वहिवाटीत यावा, त्यात माणसांचा राबता रहावा असंच सर्वांना वाटत होतं. तसंही सुमीत वहिनीसाहेबांच्या नात्यातच होता. त्यामुळे त्यांनाही हा प्रस्ताव पसंद पडलाच असता. दुसरं असं की वाडा हस्तांतरीत केल्यामुळे कदाचित वहिनीसाहेबांच्या मनातील ही वाड्याच्या स्वामित्वाची भावना निघून जाऊन झाला तर त्यांच्या उपचारात या गोष्टीचा फायदाच होईल हा विचारही थोरल्या मालकांचा या निर्णयामागे होता. सुमीतला मात्र हे काही नको होतं. त्याचा अपराधीभाव वाडा प्राप्त झाला तर वाढणारच होता. हा वाडा आत्याचा आहे तिच्यासाठीच राहु द्या असं तो गयावया करत विनवू लागला.पण जेव्हा आत्याच्या तब्येतीचा विचार पुढे आला तेव्हा मात्र आत्याला बरे वाटणार असेल तर त्यापरते दुसरे सुख नाही असा विचार करीत सुमीतला यासाठी मान तुकवावी लागली.

गावाने सुमीतचा सत्कार करुन त्याला वाड्याचे कागदपत्र सुपुर्द केले. आता सुमीत घरी जाण्यासाठी निघाला. आत्याशिवाय या गावात राहणे त्याला जड जात होते. मुकुंदा त्याला सोडायला बस स्टँडवर आला होता. त्याला आत्याची चौकशी करायला मध्येमध्ये जात जा असे पुन्हापुन्हा सांगत सुमीत बसमध्ये चढला. आपल्या आयुष्यातील पहिली ‘मिस्ट्री’ सोडवल्याचा आनंद त्याला मुळीच वाटत नव्हता. केवळ आत्याला बरी झालेली त्याला पहायचे होते. मुकुंदाशी बसमधून बोलत असतांना त्याला स्टँडवर एक बाहुल्या विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्या हातात एक नाचणारी बाहुली होती. नीट पाहताच त्याला आढळले की ती कठपुतळी होती. तिच्या दोर्या त्या फेरीवाल्याच्या हातात होत्या. सुमीतच्या डोळ्यांसमोर अचानक त्या बाहुलीच्या जागी आत्या दिसू लागली... आणि तिला नाचवणारा तो स्वतः..... गलबलून आले त्याला.

क्षणात हा विचार झटकत त्याने मुकुंदाला निरोप दिला. बस सुरु झाली. वेगाने गोव्याच्या दिशेने धावू लागली. मात्र ती कठपुतळी काही केल्या सुमीतच्या नजरेसमोरुन हलेना. आपण चुकीचे वागलो ही जाणीव त्याच्या मनाला स्वस्थता देत नव्हती. त्याचे मन थार्‍यावर नव्हते. राहून राहून डोळे भरुन येत होते.

सुमीतने सार्‍या घटनांची मनातच उजळणी केली. आत्याबद्दल , वाड्याबद्दल ऐकीवात असलेल्या सार्या गोष्टी. आजोबा, आत्याचे वडील तर देसाई वाड्यात असायचे आणि आत्या त्यांच्या गावी घारात एकटी, तेव्हाच कोणीतरी तिच्यावर अत्याचार केला असावा का? हे तर सुमीतला कधी कोणी सांगितलेच नव्हते. साहजिकच होते म्हणा. अशा गोष्टी सांगतं का कधी कोणी? आजोबांना माहीत असावं का हे? त्यानंतर आत्याची मनस्थिती कशी असेल? ती उदास, शॉक बसल्यागत आतल्या आत कुढत राहत असावी का? किंवा कदाचित तिला तेव्हाही असे झटके येत असावेत? त्याच दरम्यान कधीतरी तिला मागणी आली असावी देसायांकडून आणि आजोबा हुरळून गेले असावेत. आत्याचं विक्षिप्त वागणं लग्नानंतर तिचा जीवनसाथी मिळाला की ठीक होईल असे वाटून आजोबांनी हे लपवून ठेवले? त्यांचं ही काय चुकलं म्हणा? त्या काळी अशा खेडेगावात कुठे असा मानसिक रोगांबद्द्ल अवेअरनेस होता?

पण मग लग्नानंतर या ज्या दोन मॄत्यूच्या घटना घडल्या त्यानंतर काय झालं असावं? आजोबा तर त्यानंतर काही महिन्यांतच गेले. पण कुणीतरी आत्याच्या वागण्या-बोलण्यावर, राहणीमानावर लक्ष ठेवून होतं का? कुणाला या आजाराचा संशय आला होता का कधी? आत्या अधे मध्ये या भुयारी मार्गातूनच या वाड्यात येत असते. त्या वेळेस जर तिथे कोणी दुसरं असेल तर ती बिथरते आणि हिंसक होते याची कल्पना असावी का कोणाला? या विचारमंथनातून सुमीतला अचानक जाणवलं की आत्या नेमकी त्या रात्रीच कशी काय वाड्यात आली भुयारातून ज्या दिवशी सुमीत तिथे राहिला होता? तिला मुद्दाम तिथे जाण्याबद्दल, तिथे कोणी आहे हे सांगून तिला झटका यावा अशी वातावरणनिर्मिती तर नव्हती केली? तिला असे उघडे पाडण्यासाठी? तिच्या आजाराचा फायदा उचलून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी?

हा विचार मनात येताच अचानक सुमीतला त्या कठपुतळीच्या जागी आत्याऐवजी तो स्वतः दिसू लागला आणि हादरलाच तो.......
नाही नाही.... मी नाही.... मी बाहुला नाहीये... मला नाही कोणीच नाचवत आहे. मी स्वतःहून आलो वाड्याचे गूढ उलगडायला. कोणी जबरदस्ती तर नव्हती केली. त्याने स्वतःचे डोके दोन्ही हातांत गच्च दाबून धरत डोळे मिटून घेतले. पण विचार थोडेच थांबवता येत होते त्याला?

जबरदस्ती नाही केली पण हा धोका पत्करु नकोस असे सांगून विरोधही केला नव्हता ना? या वाड्याबद्दल अंधश्रद्धा आहेत त्या दूर करुन गाव भयमुक्त व्हावे, आत्याला तिच्या घरापासून वंचित केले गेलेय तिला पुन्हा तिचे घर मिळावे असे गाजर दाखवले होतेच ना? सुमीतच्या तर ध्यानी मनी, स्वप्नीही नव्हतं हे असं आत्याच्या आजाराबद्दल. रात्री अचानक अशी आत्या समोर आलेली पाहून तीही अशा हिंसक रुपात हादरलाच सुमीत. पण त्याचं काय? त्याला माहीत असावं का हे सगळं आत्याबद्दल? तिच्या आजाराबद्दल?
आपण तर विश्वासाने इथे घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची खबर त्याला देत होतो. तो निमूटपणे ऐकून फक्त प्रोत्साहन देत होता, हुरुप वाढवत होता. त्या दिवशी एकटे रात्री वाड्यात झोपायला जाणार हे पण आपण कळवले होते त्याला. ओह माय गॉड...मग त्यानेच पाठवलं का आत्याला ? त्या रात्री काही विपरीत घडले असते, मी जागा झालोच नसतो तर.... आत्याच्या हातून तिसरा खून झाला असता.... माझा... हे चाललं असतं त्याला? माझा बळी गेला असता तर? सुमीत भंजाळून गेला विचार करकरुन.
माझा वापर करुन त्याने स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण केली का? कसली? वाडा हडप करण्याची? मला अंधारात ठेवून?. एकाएकी सुमीतला आपण एका मोठ्या षडयंत्राचा भाग झालोय, फसवले गेलोय हे जाणवू लागले. केवळ त्याला असलेल्या रहस्य उलगडण्याच्या आवडीमुळे?

आणि ही आवड? ओह.. हा देखील या षडयंत्राचा भाग तर नव्हता? रहस्य कथांची आवड माझ्यात जोपासण्याचा? रहस्य कथांची पुस्तके, सिनेमे मला मिळतील याची तजवीज करण्याचा? एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीव्हीटी म्हणून कराटेचीच निवड करणे हाही?

सुमीतला गरगरु लागले. त्या बाहुलीच्या गळ्यातील दोर्‍या आपल्या गळ्याभोवती आवळल्या जातायत नि आपला श्वास घुसमटतोय असे वाटू लागले त्याला. पण आता सगळं होऊन गेलं होतं. आता काय उपयोग हे सगळं समजून? या गाडीला रिव्हर्स गियर नव्हताच. ब्रेक दाबूनही काही फायदा झाला नसता. आता केवळ अॅक्सलरेटर दाबत पुढे जात रहाणे हेच हातात होते. जे झालं ते झालं पण यापुढे मीच सारी सुत्रे हातात घेणार त्याला कठपुतळी बनवून. पण असा छुपा वार नाही करणार त्याला सांगूनच करणार. मीच असणार यापुढे मास्टरमाईंड.

मनाशी निश्चय करत सुमीतने खिशातून फोन बाहेर काढला, नंबर डायल केला. फोन उचलला गेल्यावर सुमीत बोलला, "तुमचं मिशन फत्ते करुन मी येतोय..........बाबा !!"

समाप्त

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle