वाडा (कथा): भाग ६-अंतिम

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

दिवस उजाडला. सूर्याची कोवळी, उबदार किरणे चाफे गावावर सोनेरी पखरण करु लागली. शहरासारखं आखीव रेखीव घड्याळाच्या काट्यावर फिरणारं जीवन इथे नजरेस पडत नसलं,तरी संथ गतीतलं साचेबद्ध जीवन जगायची ही लोकं. आज मात्र गावकर्‍यांनी तो साचा जणू झुगारुन दिला होता. एरव्ही कधी देसाई वाड्याच्या वार्‍यालाही न थांबणारी गावातली माणसं आज मात्र घोळक्या-घोळक्याने देसाई वाड्याभोवतीच जमलेली दिसत होती. गाव जणू ओस पडलं होतं आणि देसाई वाड्याभोवती सकाळी सकाळी जत्रा फुलली होती. सर्वतोमुखी 'सुमीत' हे फक्त एकच नाव ऐकू येत होते. विशीच्या कोवळ्या वयात त्याने दाखवलेले धाडस, जिद्द,आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सारं केवळ कौतुकास्पद होतं. सर्वांत वाखाणण्यासारखा गुण म्हणजे रुढी परंपरांचं जोखड उखडून फेकून देऊन जे सत्य आहे ते शोधण्याचा त्याने केलेला प्रामाणिक प्रयत्न. सत्य गावासमोर यावं हा त्याचा ध्यास भल्याभल्यांना लाजवेल असा होता. त्यामुळे आज तो चर्चेचा विषय बनला तर नवल नव्हते.

पाटील काकाही शेतातल्या वाड्यावरुन भल्या पहाटेच गावात पोहोचले होते. आज त्यांची लगबग तर विचारायलाच नको अशी होती. सतत कोणाला तरी फोन करत होते, आलेल्या फोनना उत्तरं देत होते. गावातल्या तरण्याताठ्या मुलांना हाताशी घेऊन वेगवेगळे हुकुम सोडत होते.सगळं गाव त्यांच्या इशार्‍यावर नाचत होतं. थोडीफार तशीच अवस्था मुकुंदाचीही. तो ही बाबांच्या मागे-पुढे करत होता आणि एका रात्रीत ‘स्टारडम’ प्राप्त झालेला आपला 'सुपरस्टार' सुमीत.... तो कुठे होता या सगळ्या गदारोळात? आज आणि पुढचे काही दिवस 'लाईमलाइइटमध्ये' तो असणार होता त्याची सवय तर लावून घेत नव्हता? की यापासून दूर राहू पहात होता?
सुमीत या कशातच नव्हता.
कारण
.
.
.
.
.
वाड्याभोवतीच्या गूढतेच्या वलयाचा पर्दाफाश करत असताना, देसाई वाड्याने तिसरा बळी घेतला होता.... सुमीतचा!
-------------------------------------------------------------------------------------------------
सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन वाड्यासमोर येऊन थडकली. पाटील काका लगबगीने सामोरे गेले. सर्वप्रथम खून पाहणारे आणि पोलिसांना बोलावणारे असे पाटील काका, मुकुंदा आणि वाड्याबाहेर पाटील काकांनी ठेवलेले पहारेकरी अशा चौघांना फक्त वाड्यात येण्यास सांगून बाकीची गर्दी पोलिसांनी पांगवली.

या चौघांची प्राथमिक चौकशी, काय आणि कसकसे घडले हे इंस्पेक्टर जाणून घेत होते. तर इतर अधिकारी बॉडीची पाहणी करत रिपोर्ट बनवत होते. प्रत्येकाकडे भेदक दॄष्टीक्षेप टाकत, इंस्पेक्टर साहेब उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत होते.

चौकशीला सामोरे जात असतांना मुकुंदाला रात्रीचा त्याचा आणि सुमीतचा शेवटचा संवाद आठवला...”उद्या मी इथून सुखरुप बाहेर येणार आहे या बद्दल मला ९९ % खात्री आहे. पण १ % काही बिनसले, तर... तर आपली मेहनत वाया जाऊ नये. इथे जे झालं ते या कॅमेर्‍याच्या मदतीने तू काकांना, गावकर्‍यांना आणि वेळ पडल्यास पोलिसांना दाखव" किती हे प्रसंगावधान सुमीतचे. मुकुंदाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले आणि त्याने इंस्पेक्टर साहेबांना सी सी टी व्ही फूटेज बघायची विनंती केली.

तिकडे घरात आत्यालासुद्धा बातमी समजली होती. तिच्या अवस्थेचं तर वर्णन करणं कठीण होतं. सदाच्या मॄत्यूच्या वेळी झाली होती तशीच काहीशी अवस्था. पण सुमीतचे पालक म्हणून इथे तर तिचा भाऊ आणि वहिनी होते. काय उत्तर देणार होती ती त्यांच्या प्रश्नांना? परीक्षेनंतर श्रमपरिहारासाठी बोलावून घेतलेल्या आपल्या भाच्याचा असा आपल्या वाड्यात दुर्दैवी आणि खुनी हल्ल्यात मॄत्यू व्हावा? इतके दिवस तो आपल्या घरात रहात असतांना त्याचे वाड्यासंबंधित जे काही उद्योग सुरु होते ते आपल्याला कळूही नयेत? पण कोणाला काय आणि कसे उत्तर द्यायचे यापेक्षाही आत्याचं हॄदय विदीर्ण होत होतं ते या एकाच भावनेने....की सुमीत हा तिचा एकुलता एक आणि त्यामुळे अत्यंत लाडका भाचा होता. त्याच्यावर तिनं जितकं प्रेम, माया केली तितकी आजवरच्या आयुष्यात कुणावरही केली नव्हती. म्हणूनच दु:खातिशयाने तिच्या डोळ्यांतले अश्रुही गोठून गेले होते. कोरड्या ठाक डोळ्यांनी ती गाभार्‍यातल्या मूर्तीकडे बघत बसली होती...एकटक निश्चल....जणू या सर्वांचा जाब देवीकडे मागत असल्यागत.

इकडे वाड्यात मुकुंदाने इंस्पेक्टर साहेबांची परवानगी घेऊन सुमीतचा लॅपटॉप ऑन केला. रात्री जे काही रेकॉर्ड झालं होतं ते तो दाखवू लागला. जे काही दिसलं, ऐकू आलं ते पाहून, ऐकून सगळे अंतर्बाह्य हादरले.

सुमीत झोपून गेल्यावर बर्‍याच वेळानंतर खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. नीट बघताच एक व्यक्ती खोलीत आल्याचे दिसले. अंधुक प्रकाशात चेहरा, कपडे नीट दिसत नव्हते. पण ती व्यक्ती सराईताप्रमाणे वावरत होती. अचानक त्या व्यक्तीचे लक्ष पलंगावर गाढ झोपलेल्या सुमीतकडे गेले आणि.... आणि काय झाले ते कळलेच नाही ती व्यक्ती हिंसक झाल्यागत स्वतःच्या डोक्यावर दोन्ही हात मारुन घेत इथे तिथे पाहू लागली...कसला तरी शोध घेत असल्यासारखी. कॅमेर्‍यात काहीतरी चमकल्याचे जाणवले. ती व्यक्ती त्या दिशेने जाऊ लागली. पलंगाशेजारी साईड टेबलवर पाटील काकांनी ठेवलेला चाकू होता तो. दुसर्‍या क्षणी त्या व्यक्तीने तो चाकू उचलून सुमीतवर हल्ला केला.....घाव एकदम वर्मी लागला होता..........इतकी निर्घॄण हत्या समोर बघताच नकळत सर्वांनी डोळे झाकून घेतले.

इंस्पेक्टर साहेबांनी आपला मोर्चा आता पहारेकर्‍यांकडे वळवला. कुलपाच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. कोण आलं होतं ? आणि त्या व्यक्तीला आत का जाऊ दिलं? हा ओघानेच आलेला प्रश्न. पहारेकरी काहीच सांगू शकले नाहीत. त्यांच्या मते रात्रभर दोन्ही दारांपाशी कोणीही आलं वा गेलं नव्हतं.सुमीत ज्या खोलीत झोपला होता, त्या खोलीपासून पुढले व मागले दार दूर असल्यामुळे की काय नकळे पण त्यांना त्या खोलीतूनही कसलाच आवाज आला नव्हता. तितक्यात मुकुंदाला काहीतरी जाणवले त्याने रिवाईंड करत ती व्यक्ती आत येत होती तो भाग पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली.

बेडरुममध्ये आत येण्याचे दार दिवाणखान्यातून होते, जे बंद करुन सुमीत झोपला होता आणि ती व्यक्ती त्या दारातून आत आलीच नव्हती. तर दुसर्‍या भिंतीवर जे वाड्याचं पेंटींग होतं ते हलताना दिसत होतं आणि त्यामागूनच ती व्यक्ती आत आली. ताबडतोब इंस्पेक्टर साहेब त्या खोलीत पोचले आणि ते पेंटींग बाजूला करण्यास लावले. त्या भिंतीवर ठोकून पाहिले असता सिमेंटच्या भरीव भिंतीवर ठोकल्यावर होतो तसा आवाज आला नाही. काहीतरी पोकळ असल्याचे जाणवले. हवालदारांना कामाला लावून त्या भागावर दमदार आघात केले असता दरवाजा उघडला. काही पायर्‍या खाली जात होत्या आणि आतमध्ये अंधार.

सावधगिरी बाळगत पोलिसांचे पथक आत गेले. बॅटरीच्या उजेडात पायर्‍या उतरताच ते एक भुयार असल्याचे लक्षात आले. आतमध्ये काही अंतर चालून गेल्यावर परत तशाच वर जाणार्‍या पायर्‍या होत्या. त्या जिथे उघडत होत्या ते दारही फोडून उघडण्यात आले. दार एका स्वयंपाकघरात उघडत होते. बंद, न वापरते स्वयंपाकघर. मोठा वाडाच होता तो.पोलिस पथक सार्‍या रिकाम्या खोल्यांतून फिरत वाड्याच्या दर्शनी भागात पोचले. तो देसायांचा गावातला वडीलोपार्जित वाडा होता, जिथे देसाई पती- पत्नी पूर्वी रहात असत. याचाच अर्थ दोन्ही देसाई वाडे जमिनीखालून जोडले गेले होते तर... आणि ही गोष्ट कोणाकोणाला अवगत होती? इंस्पेक्टर साहेबांनी पाटलांना विचारले. त्यांनी नकारार्थी मान हलवली. म्हणजे ही गोष्ट माहीत असण्याची शक्यता होती- वाडा बांधून घेणार्‍या देसायांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि कदाचित वाड्यात कामाला असणार्‍या नोकरांना. यांपैकी नेमके कोण 'ती रात्री भुयारातून आलेली व्यक्ती’ होती जिने सुमीतला मारलं??

मात्र इंस्पेक्टर साहेबांना यावर जास्त काम करावे लागले नाही. सुमीतने विचारपूर्वक कॅमेरा विथ ऑडीओ रेकॉर्डर बसवून घेतला होता वाड्यात. या शुटींगमध्ये 'त्या खुनी व्यक्तीचा' आवाजही रेकॉर्ड झाला होता आणि सारी संदिग्धता त्यामुळेच दूर झाली होती.

सुमीतवर हल्ला केल्यावर ती व्यक्ती चक्क बोलू लागली. कोणाशी पण? सुमीतशी? पण सुमीतचा तर प्राण केव्हाच निघून गेला होता. मग कोणाशी? स्वतःशीच? पण स्वतःशी का असं कोणी उघडपणे मोठमोठ्याने बोलतं? की मग अजून कोणी त्या वेळी त्या खोलीत होतं ज्याचं अस्तित्व त्या खुनी व्यक्तीलाच फक्त माहीत होतं आणि त्या तिसर्‍या कोणाशी तरी ही खुनी व्यक्ती बोलत होती?..... देसाई वाड्यातील पिशाच्च त नव्हे?......

वाड्याचे गूढ उलगडले गेले होते ते याच बोलण्यामुळे. पोलिसांना तर आता कसलाच तपास करावा लागणार नव्हता. करायची होती फक्त कारवाई. त्यासाठीच सारे थांबले होते....वाट बघत.....

वाड्याबाहेर गलका वाढला. एक गाडी येऊन थांबली. आतून थोरले जमिनदार उतरले. जड पावलांनी, खाली मान घालत, म्लान वदनाने वाड्यात आले. इंस्पेक्टर साहेबांनी आणि पाटील काकांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. बसायला जागा दिली. इंस्पेक्टर साहेबांनी इशारा करताच मुकुंदाने पुन्हा एकदा रिवाईंड करुन रेकॉर्डींग सुरु केले.

सगळे बघत होते. थोरले मालकही. खून केल्यावर खुनी व्यक्ती बोलू लागली.भयंकर संतापलेल्या सुरातले ते बोलणे होते.
.
.
.
.
.
.
"अरे चांडाळा? पुन्हा आलास? का ? कशासाठी? माझ्यावर परत अत्याचार करायला? कितीदा सांगितले माझ्या घरात येऊ नकोस. पहिल्या वेळी आलास तेव्हा खरंच अजाण, निरागस वयात होते मी, त्यात एकटी म्हणून डाव साधलास. पण त्यानंतर प्रत्येक रात्र मी जागून काढलेय, सावध रहात. तू पुन्हा आलास माझ्या या घरात, धाकट्या जमिनदाराचं रुप घेऊन? इथे? माझ्या खोलीत? पण मी बेसावध नव्हते बरं. तुला तुझ्याच शस्त्राने मारलं मी. त्यानंतरही हिंमत केलीस? सदा बनून आलास? अरे तेव्हा तर उशीखाली दाबून फेकून दिले तुला विहीरीत. तेव्हा बजावलं होतं चालता हो, कायमचा निघून जा. तरी आज आलास? बघून घेते तुला. नाही सोडणार जिता. कितीही वेळा आलास तरी नाही सोडणार्,पुन्हा कधीच माझ्या घरात माझ्यावर अत्याचार नाही करुन देणार तुला.”

हे सारं पहाताना थोरल्या जमिनदारांचे डोळे पाझरत होते. इंस्पेक्टर साहेबांनी सांत्वनपर त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला. आपल्या वॉलेटमधून एक कार्ड बाहेर काढून ते थोरल्या मालकांच्या हाती सरकवलं.थोरले मालक बघत होते. ते एक विझिटींग कार्ड होतं. रत्नागिरी शहरातील प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचं....वहिनीसाहेबांसाठी !!

समाप्त

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle