ला बेला विता - ११

"जाताना मला कार वल्हवत न्यावी लागेल असं दिसतंय." तो तोंड वाकडं करत म्हणाला. "उद्या  संध्याकाळपर्यंत मला परत पणजीला पोहोचायचं आहे. शो कॅन्सल झाला तर हेवी पेनल्टी बसेल."

त्याने पुढे येऊन तिच्या हातातले मग्ज घेत सेंटर टेबलवर ठेवले.

"बापरे, किती एकटं वाटत असेल असं नेहमी फिरत रहायला" ती सोफ्यावर बसता बसता म्हणसली.

"एकटं? विशेष नाही. एकटा तर मी हे शहर सोडून गेलो तेव्हा होतो." तो तिच्या नजरेला नजर मिळवत म्हणाला.

"हूं, बरोबर आहे. तुला कोणी एकटं सोडतच नसेल ना.." ती तिच्या मगमध्ये हळूच पुटपुटली.

"व्हॉट इज दॅट सपोज्ड टू मीन?" त्याने पटदिशी विचारलं.

"कमॉsन तुला कळलंय मला काय म्हणायचंय ते!" तीने खांदे उडवले.

"ओह प्लीज, आत्तापर्यंत तू मला सगळच तोंडावर सांगितलं आहेस ना मग हेही सांगून टाक" तो जरा रोखून बघत म्हणाला.

"म्हणजे हेच की जाशील त्या ठिकाणी तुला फिमेल कंपनीची काही कमी नसेल. त्यामुळे एकटा कुठे असतोस तू. शंभर मुली तुझ्यामागे जीव टाकत असतात." ती नाक मुरडत म्हणाली.

"ओह! मी आधीही म्हटलंय हे एग्झॅजरेशन आहे. अश्या कोणी शंभर जणी माझ्यावर जीव टाकत नाहीत. हां, अधेमध्ये होत्या एक दोन जणी पण सध्या कोणी नाहीये." कॉफीचा एक सिप घेऊन मगच्या काठावरून तिच्याकडे पहात तो म्हणाला. "आणि तू काय कुठली संतीण लागून गेलीस गं? सेंट बेला द ग्रेशियस! सगळं लक्षात आहे मला. कॉलेजमधले ते सगळे तुझे बिचारे आशिक आणि आता? त्या दिवशीचा तुझा तो गेस्ट? त्यालाही असाच गळाला लावून ठेवला असशील. ना बिचारा बाहेर येतोय ना पाण्यात पडतोय."

हा आता जुना असीम बाहेर येतोय. तीने त्याच्याकडे रागाने पहात मग खाली ठेवला. "उगीच काहीतरी आरोप करू नकोस. तो संजीव होता. लहानपणी आमच्या सोसायटीत राहायचा आणि माझ्या शाळेतपण होता. 'जस्ट' मित्र आहे तो माझा, अणखी काही नाही. हां त्याचं अजून लग्न ठरत नाहीये आणि मी त्याला समोर एलिजीबल मुलगी दिसते म्हणून कधी कधी तो चिपकूगिरी करतो पण हार्मलेस आहे बिचारा" आता ती त्याच्याकडे बघून हसत होती.

"ओके.. म्हणजे मीच चुकीची कंक्लूजन्स काढली होती तर." तो शांत होत म्हणाला.

"हम्म आणि निखिल, वी वर सीइंग इच अदर फॉर अराउंड सिक्स मंथस्. पण तू इथे आलास त्याच्या दोन दिवसाआधीच आमचं वाईट ब्रेक अप झालं होतं. त्यामुळे मी आधीच हर्ट होते आणि त्यात तू जुन्या आठवणी घेऊन आलास त्याने अजूनच चिडचिड झाली माझी." ती खाली बघत टेबलच्या काचेवरच्या पाण्यात बोट फिरवत म्हणाली.

"हम्म, निखिल!" तो पुन्हा रोखून बघत म्हणाला. त्याला व्हाईट एलिटमधली रात्र आठवली.

"मला मान्य आहे बारावीचं वर्षभर मी खूप माती खाल्लीय. मी एक अति लाडावलेली, स्वार्थी, सेल्फ सेन्टर्ड मुलगी होते आणि मी स्वतःच्या फायद्यासाठी खूप लोकांचा वापर केला. मला आता वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल. इट्स नथिंग टू बी प्राउड ऑफ अँड आय एम रिअली सॉरी फॉर एव्हरीथींग. पण आता त्या प्रत्येकाची माफी नाही ना मागू शकत." तिच्या चेहऱ्यावर आता उदासीची छटा दिसत होती.

"पण आपण एकमेकांची नक्कीच मागू शकतो!" तो म्हणाला. "खरं म्हणजे त्या दिवशी पालवीमध्ये मी तुझी माफी मागणार होतो पण एका मागोमाग एक प्रसंगच असे घडत गेले की माझा स्वतःवर कंट्रोलच राहिला नाही." आता तो सगळं बोलूनच मोकळा होणार होता.

तो जसा बोलत होता त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. त्याच्या आवाजातील ऍग्रेशन, आत्मविश्वास, उपरोध सगळं नाहीसं होऊन फक्त एका भूतकाळात हरवलेल्या मुलाचा आवाज येत होता.

"मी तुला खोटं सांगितलं. नाही, खोटं नाही, अर्धवट सांगितलं. आता सुरुवातीपासून सांगतो. आईबाबांचं लव्हमॅरेज झालं तेव्हा बाबा नाटकांमध्ये स्ट्रगल करत होते आणि आई युनिव्हर्सिटीत केमिस्ट्री शिकवायची. ह्या लग्नामुळे आईच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले होते, जे नंतर कधी जुळलेच नाहीत. आईला सायन्समध्ये प्रचंड इंटरेस्ट होता. एमेस्सीला गोल्ड मेडलिस्ट होती ती. आयझॅक असीमॉव तिचा सगळ्यात आवडता लेखक म्हणूनच माझं नाव असीम आहे! शी वॉज अ टोटल नर्ड." मिश्किल हसत तो म्हणाला.

"माझा जन्म झाला तोपर्यंत बाबा अचानक टीव्हीवर स्टार झाले होते. त्यांच्या डोक्यात यशाची प्रचंड हवा गेली आणि तसे चढवणारे चमचेही होते आजूबाजूला. त्यातच त्यांचा राग, पार्ट्या आणि सगळ्याच भांडणाना कंटाळून आई मला घेऊन त्यांच्यापासून वेगळी झाली. तिच्या तत्वांना ती एवढी जपणारी होती की तिने माझ्यासाठीसुद्धा कधीच बाबांकडून पैसे मागितले नाहीत. माझ्यासाठी ती खूप कष्ट घेत होती, sacrifice करत होती पण ते तिने कधी मला जाणवू दिलं नाही. बाबांवरचा राग सोडता मी खूप मजेत होतो."

"दहावीच्या परीक्षेनंतर ती सारखी आजारी पडायला लागली. बेसिक उपाय करत तिने दुखणं खूप अंगावर काढलं. महागड्या टेस्ट टाळत राहिली. पण त्यामुळेच जेव्हा कळलं तिला कॅन्सर आहे तोपर्यंत फार उशीर झाला होता. माझ्या बारावी सायन्सच्या परिक्षेआधीच ती गेली. मी परीक्षा दिली नाही. डिप्रेसच्याही पलीकडे अक्षरशः बधीर झालो होतो. तेव्हाच बाबांनी हा नवीन बंगला बांधला होता. ते मला घरी घेऊन आले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी त्या अवंतिकाशी दुसरं लग्न केलं होतं. मी इथे रहायला आल्यानंतर पुन्हा सायन्सचा अभ्यास नकोसा वाटत होता मग मिड टर्ममध्ये कॉमर्सला आलो." त्याच्या चेहऱ्यावर आता राग आणि दुःखाचं मिश्रण दिसत होतं."

"आई नसल्याची पोकळी, बारावीचं टेन्शन, इथे नवीन असल्यामुळे कोणी खास मित्र नाहीत आणि माझी चिडचिड, बंडखोरपणा सगळंच एकत्र येऊन मी विचित्र बनलो होतो. आय वॉज अ मेस! त्यातच ती अवंतिका. मी इथे आल्यापासून ती मला स्पेशल ट्रीटमेंट देत होती. जेवायला बाहेर नेणं, गिफ्ट्स देणं, एकत्र व्हिडीओ गेम्स खेळणं वगैरे. मला वाटायचं ती फ्रेंडली वागतेय. बाबा जास्त घरी नसायचे. त्यांच्या कुठल्यातरी डेली सोपचं तेव्हा शूटिंग सुरू होतं. त्यांनाही वाटत होतं अवंतिका आणि माझ्यात चांगलं बॉंडींग होतंय. मग दिवाळीपासून हळूहळू ती माझ्या जास्त जवळ यायला लागली. मिठ्या मारणं, गालावर पाप्या घेणं हे जेव्हा वेगळं कळायला लागलं तेव्हा मी तिला टाळायला लागलो. बट शी वॉज रिलेंटलेस. आय वॉज बीइंग अब्युज्ड आणि तिथून पळण्याव्यतिरिक्त मला काही करताही येत नव्हतं. म्हणून मी स्वतःला कायम लायब्ररीत अभ्यासात बुडवून घेतलं. अगदीच प्रेशर यायचं तेव्हा बास्केटबॉल खेळायचो. शक्य तितका घरी न जाण्याचा प्रयत्न करायचो."

ओह.. हे तेव्हाच सुरू होतं जेव्हा मी पार्टीत येण्यासाठी त्याच्या मागे लागले होते. तिचे डोळे आता पाण्याने भरून आले होते.

"परीक्षेपर्यंत असंच चाललं. रिझल्ट आला आणि इतका अभ्यास केल्यामुळे बहुतेक खूप चांगले मार्क्स होते. त्यादिवशी बाबा घरी नव्हते म्हणून मी मित्रांबरोबर सेलिब्रेट करायला बाहेर गेलो. पबमध्ये गेलो आणि त्यांच्या आग्रहाने पहिल्यांदाच एक बीअर प्यायलो. मी साधारण दहा वाजता घरी येऊन गुपचूप माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. झोप आणि नशा दोन्हीमुळे अर्धवट गुंगीत होतो. मी समजत होतो अवंतिका तिच्या खोलीत झोपली असेल. पण ती तशीच अंधारात माझ्या खोलीत आली आणि माझ्या बेडवर येऊन तिने मला मिठी मारली. मी काही रिऍक्ट करणार इतक्यात बाबा बाहेरून माझ्यासाठी सरप्राईज म्हणून केक घेऊन आले आणि त्यांनी लाईट्स ऑन केले. आणि हेच त्यांनी 'तिला' माझ्या बेडमध्ये रेड हँडेड पकडलं होतं." त्याची एकात एक गुंतवलेली बोटं आता आवळल्यामुळे पांढरी पडली होती.

"पण तिने कांगावा करून माझ्यावर उलटे आरोप केले. माझ्या तोंडालाही बीअरचा वास येत होताच. मग काय माझ्या सख्ख्या वडिलांनी माझ्या सावत्र आईवर विश्वास ठेवून माझ्यावर नाही नाही ते आरोप केले, इतकं जोरात मारलं की माझ्या नाकातून रक्त आलं. त्यानंतर दहा बारा दिवस घराबाहेर गॅरेजमध्ये राहायला लावलं. का तर त्यांच्या प्रेश्यस बायकोला माझ्यापासून धोका नको. तोपर्यंत माझं दिल्लीचं अ‍ॅक्सेप्टन्स लेटर आलं आणि मी बॅग्ज पॅक करून दिल्लीला निघून गेलो. नंतर वर्षभरात बाबांना बहुतेक सगळं रिअलाईज झालं आणि त्यांचा पुन्हा डिव्होर्स झाला. पण तोपर्यंत मी मनाने त्यांच्यापासून खूप लांब गेलो होतो. त्यांची आलेली एक दोन पत्र मी न वाचताच फाडून टाकली. कॉल्स कधीच रिसिव्ह केले नाहीत. बस्स.. पुढचं सगळं तुला माहितीच आहे." टेबलावरची बाटली उचलून त्याने घटाघट पाणी प्यायलं. ती सुन्न होऊन त्याच्याकडे बघत बसली होती. ती त्याला किती चुकीचा समजली होती. तिच्या सगळ्या भावना तिच्या भरलेल्या डोळ्यांतून बाहेर पडत होत्या. तिला पुन्हा त्याचं मघाचं वाक्य आठवलं, 'एकटा तर मी हे शहर सोडून जाताना होतो.'

"आय एम सॉरी टू असीम, तू या सगळ्यातून जात असतानाच मी तुला इतका त्रास देत होते. तुला कसं वाटलं असेल ते कळतंय मला. तुला मी तिच्यासारखीच वाटले असणार." ती डोळे मिटून घेत म्हणाली.

"हो त्या वेळी रागात तसंच वाटलं पण नंतर शांत झाल्यावर मला माझ्याच वागण्याचं वाईट वाटलं होतं. तू मला जाणूनबुजून काहीच त्रास दिला नव्हतास आणि मी तुला अति बोललो. व्हेअरऍज ती बाई माझ्या वडिलांची बायको होती." तो मान हलवून म्हणाला.

"पण पव्हीलीयनसमोरचा तो क्षण मी कधीच विसरणार नाही कारण माझ्या आयुष्यातली ती पहिली मिठी आणि पहिला किस होता." तो हसऱ्या डोळ्यांनी तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.

"माझ्याही..." ती ओठ चावत म्हणाली. "मी फ्लर्ट कितीही केलं तरी कुणाला मी लिमिटच्या बाहेर जाऊ दिलं नव्हतं. पण तू स्पेशल होतास. तुझ्यासाठी मी इतकी कशी वहावत गेले मलाच कळलं नाही." चेहऱ्याचा बदललेला रंग त्याला दिसू नये म्हणून ती पटकन रिकामे मग उचलून आत ठेवायला निघून गेली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle