ला बेला विता - १२

वैधानिक इशारा: रक्तदाब, हृदयविकार किंवा #कायबैहल्लीच्यामुली विकार असणाऱ्यांनी पुढे वाचू नये. :winking: बाकीच्यांसाठी: दिल धडकने दो!

-----

"असीम, तुला बाबांशी बोलायचं आहे. विसरू नको." ती नॅपकीनला हात पुसत बाहेर येत म्हणाली. त्यांना तू परत हवा आहेस त्यांच्या आयुष्यात. त्यांनी मला ऑलमोस्ट आठवडाभर फोन केले, माझं तुझ्याशी काही बोलणं झालं का हे विचारायला. तुझी गरज आहे रे त्यांना, खरं तर तुलाही आहे पण तू ते मान्य करत नाहीस. हल्ली त्यांची तब्येत पण बरीच नाजूक आहे असं मिसेस दिवाण म्हणत होत्या. ह्यावेळी ते फक्त तुझं आणि तुझंच म्हणणं ऐकतील. तू फक्त त्यांना मनापासून भेट. प्लीज भूतकाळात अडकून बसू नको. मिसेस दिवाणपण तुला मदतच करतील. गोड आहेत त्या." ती त्याच्यासमोर बसत म्हणाली.

"हो त्या प्रेमळ आहेत हे त्या एका भेटीतच जाणवलं. हम्म... पण ती भेट माझ्या रागामुळे खराब झाली. तुम्ही तिघे असे माझ्यासमोर एकत्र आल्यामुळे कन्फ्युज झालो, चिडलो. ते असे इतके अचानक समोर आले की एवढ्या वर्षांचा साठलेला सगळा राग बाहेर पडला." तो केसांमधून हात फिरवत म्हणाला. "अजून एक गोष्ट आहे ज्यामुळे मी ती भेट व्यवस्थित हँडल करू शकलो नाही. कारण मला काही सुचतच नव्हतं."

"कश्यामुळे?" ती कोड्यातच पडली.

"कान्ट यू गेस?" तो तिच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला. "तू! तू सोडून माझं दिवसभर बाकी कुठेच लक्ष नव्हतं."

आश्चर्याने तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. "मी?" एवढंच ती कसंबसं म्हणू शकली. तिची शब्द शोधायची धावपळ बघून तो हसत होता.

"विश्वास बसणं कठीण आहे ना? की मी तुला अजून छपरी, अतिशहाणा आणि अजून काहीतरी वाटतोय?

"चल! असं काही नाहीये." अचानक तिच्या श्वास घेण्यावर काहीतरी परिणाम झाला होता. श्वासांचा वेग वाढून तिला तिचं वजन नाहीसं होऊन हवेत कुठेतरी तरंगल्यासारखं वाटत होतं.

"तुला पहिल्यांदा 'ला बेला'मध्ये बघितलं तेव्हा मी इतका शॉक झालो होतो की ही वेडी मुलगी इतकी स्मार्ट, एलिगंट, सुंदर बिझनेस वूमन कधी झाली! पण तेव्हा जितकं तुझं वागणं बघितलं तू थंड आणि आधीसारखीच लोकांना खेळवणारी वाटलीस. नंतर व्हाईट एलिटमध्ये खरं तर मला तुला आवडूनही घ्यायचं नव्हतं. पण ज्या प्रामाणिकपणाने तू माझ्याशी बोललीस त्याने मी न राहवून तुझ्याकडे खेचला गेलो. आणि किल्ल्यावर गेलो तेव्हा मला तुझी कंपनी खरंच आवडायला लागली आणि आपण इतका वेळ, एकमेकांच्या इतके जवळ होतो की मला फक्त तुझ्याशी बोलतच रहावं वाटत होतं. आणि नेमके तेव्हाच बाबा तिथे आले!"

"माझा फ्यूज उडाला होता त्यांना अचानक बघून. आणि त्या जुन्या सगळ्या आठवणी. माझ्या संतापाने सगळंच मेसी करून टाकलं. त्या रात्री मी रात्रभर स्वतःला दोष देत होतो की मी बहुतेक तुला आणि बाबांना आयुष्यभरासाठी गमावलं आहे. गेले दोन आठवडे सलग शोज होते, बऱ्याच प्रॉस्पेक्टिव्ह मीटिंग्स होत्या पण रोज रात्री डोक्यात फक्त तुझे विचार गर्दी करायचे आणि विचार करून करून माझी झोप उडाली होती. शेवटी हा दोन दिवसांचा ब्रेक मिळाला आणि मी कसलाही विचार न करता निघून आलो." त्याने पुढे होऊन तिच्या हातांवर हात ठेवले.

पुढे काय होणार त्याचा अंदाज येऊन ती घाईघाईने उठली. गेल्या फक्त एक दीड तासात त्याच्याबद्दलचे सगळे गैरसमज धुवून गेले होते. त्याजागी बदललेल्या नव्या इमोशन्स प्रोसेस करायला तिला थोडा वेळ हवा होता. "असीम आपल्याला बाबांबद्दल बोलायचंय.." ती हळूच म्हणाली.

"मला आपल्याबद्दल बोलायचंय" तो मोठ्याने म्हणाला आणि मग चूक कळल्यावर, "ओके. मला बाबांशी बोलायचंय" म्हणत त्याने मान हलवली. "काय करू मग?"

"आत्ता जाऊन भेट, लगेच जा घरी आणि त्यांना भेटून हेच सगळं सांग जे मला सांगितलंस."

त्याने लगेच जॅकेट, शूज घालून बाहेर जायला दार उघडलं तर समोर लॉबीच्या मोठ्या काचेतून पावसाचा हैदोस दिसत होता. समोरच्या रेन ट्रीची एक मोठी फांदी तुटून पार्किंगमध्ये पडली होती. आता तर जोरदार गाराही पडत होत्या. बाहेरचं दृश्य बघून ती हबकली. "असीम थांब, नको जाऊ" मागून त्याच्या दंडाला धरत ती म्हणाली.

"आता निघालोय तर जाऊन येतो. मग पुन्हा मला मनाची तयारी करावी लागेल."

तिला खूप प्रेम, भीती, काळजी, हुरहूर आणि या सगळ्यांचं मिश्रण होऊन काहीतरी वेगळंच वाटत होतं. पण तो जावासा वाटत नव्हता हेच खरं. "ऍक्सिडंट व्हायला हवाय का तुला? एकतर हायवेवर दरड कोसळली आहे आणि ती क्लिअर केली तरी पावसामुळे पुन्हापुन्हा पडतात. गुलमोहर पार्कला जायला हायवे सोडून दुसरा रस्ता नाहीये. प्रचंड ट्रॅफिक असेल आत्ता. प्लीज नको जाऊ एवढ्या पावसातून... आपण दुसरं काहीतरी सोल्युशन काढू."

त्याच्यासमोर दार बंद करून दाराला पाठ टेकून उभी रहात ती म्हणाली. "ह्या गोष्टी फोनवर बोलण्याच्या नाहीत पण पाऊसच असा आहे की बाबा समजून घेतील तुला. माझ्याकडे नंबर आहे, तू कॉल कर लगेच. मग तर झालं?"

"हम्म ओके." त्याने पुन्हा अजून न वाळलेलं जॅकेट आणि शूज बाहेर बाल्कनीत नेऊन ठेवले.

"नंबर पाठवलाय, तू मोकळेपणाने बोल. मी आत जाते तोपर्यंत." तिने बेडरूममध्ये जाऊन दार लावून घेतलं.

जवळ जवळ एक - दीड तासाने त्याने दारावर टकटक केली.

दार उघडल्यावर तिच्यासमोर वेगळाच असीम उभा होता. खांद्यावरचं मोठं ओझं उतरून गेल्यासारखा तो हलका हलका झाला होता. डोळ्यात एक वेगळेच तेज होते आणि चेहऱ्यावर इतका आनंद होता की तो पुन्हा टीनेजर झाल्यासारखा वाटत होता. फक्त टीनेजर असताना कधीही तो एवढा आनंदी नव्हता!

"ऑल ओके?" तिने खूष होत विचारलं.

"येस्स, आय एम सोss सोss हॅपी! मला काय करू नि काय नको असं होतंय. मला हे आधी का सुचलं नाही? काहीच कठीण नव्हतं. बाबांना आधीच सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. मी त्यांना इथे आल्याचं सांगितलं नाही, पाऊस थांबला की भेटायला येतो म्हणून सांगितलं. घाईघाईत येण्यापेक्षा तीन चार दिवस सुट्टी घेऊन रहायला बोलावलं आहे त्यांनी. आता बघतो शेड्युलमध्ये कसं बसवता येईल ते."

"थँक्स अ लॉट बेल्स, तुझ्यामुळे शक्य झालं हे सगळं. तुझे किती आणि कसे आभार मानू तेच कळत नाहीये. नाहीतर आयुष्यभर माझ्या फुटकळ इगोपायी कुढत बसलो असतो मी. तो रूमीचा काहीतरी कोट आहे ना की कठीण दगड असाल तर पाणीसुद्धा ओघळून जाईल पण तुटून चुरा होऊन मातीत मिसळाल तर अंगावर रानफुलं उगवतील तसलं काहीतरी झालंय!" आत येत हसता हसता तो म्हणाला.

"बssरं रूमी भक्ता, आधीच गवतात बराच पाऊस पडलाय, बघूदे कुठे कुठे रानफुलं उगवलीत ती. ." म्हणत पाय उंचावून तिने त्याच्या डोक्यावर बघितलं आणि त्याचे ते रेशमी, मऊ मऊ केस विस्कटून टाकले. गडबडीत तिच्या हनुवटीला त्याचा गाल घासून दाढीचे केस टोचले तेव्हा तिला अचानक जाणीव झाली की मस्ती करता करता ती त्याच्या किती जास्त जवळ आलीय. सगळीकडे अचानक शांतता पसरली होती. तिचे हात अजूनही त्याच्या मानेवर केसांमध्ये थबकले होते. त्याने एका हाताने तिच्या कंबरेला वेढून तिला अजून जवळ ओढून घेतलं आणि दुसऱ्या हाताने तिचा मेसी बन सोडवून केस मोकळे केले.

दोघांना एकमेकांची जोरजोरात धडकणारी हृदये जाणवत होती. तिच्या गालावर त्याचा उष्ण श्वास हुळहुळला आणि ओठांचा पुसटसा स्पर्श झाला. पण तेवढा स्पर्शही तिच्या अंगातून वीज दौडत न्यायला पुरेसा होता. "थांबायचं असेल तर मला आत्ताच सांग" तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. तिचा श्वास आता बंदच होईल की काय असं तिला वाटत होतं. ती काहीच न बोलल्याचं पाहून त्याने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकले "आता?", ओठांनी तिच्या गालाचा उंचवटा ट्रेस करताना "किंवा आत्ता?", तिच्या नाकाच्या शेंड्याला हलकेच चावून "आता?" आता मात्र न राहवून पुढे होत तिने त्यांच्यातलं अंतर संपवून टाकलं आणि त्याचे पुढचे शब्द तिच्या ओठांमध्ये विरघळून गेले.

तो तिला हळुवारपणे किस करत होता पण तिला आता काहीच हळू नको होतं. आता नाही, इतक्या वेळानंतर तर नाहीच नाही. तिने त्याचा टीशर्ट दोन्ही मुठीत धरून त्याला स्वतःकडे ओढून घेतलं आणि वेड्यासारखी त्याला किस करत सुटली. जसं काही तिचं आयुष्य तेवढ्याच गोष्टीवर अवलंबून होतं. त्याचे हात तिच्या अंगावर सगळीकडे होते. तिच्या शरीरातली नस न नस थरथरत होती आणि हृदय कुठल्याही क्षणी फुटून जाईल असं वाटत होतं. त्याची किंचित वाढलेली दाढी तिला सगळीकडे टोचत होती, पण त्याची तिला काळजी नव्हती. तिला आत्ता फक्त असीम हवा होता. ती खोल श्वास घेत त्याचं शेविंग क्रीम, त्याचा शॅम्पू , त्याचा डबलमिंट चुईंगगम आणि त्या सगळ्यात मिसळलेला त्याचा स्वतःचा सगळ्या जगात डिलीशीयस सुगंध नाकात साठवून ठेवत होती. तिला तो अजून-अजून जवळ हवा होता. त्याने त्याच्या लांब पापण्या उचलून गडद होत चाललेल्या डोळ्यांनी तिच्या काळ्याभोर विस्फारलेल्या डोळ्यात पाहिलं आणि ओह बेला! म्हणून श्वास सोडत दोन्ही हातांनी तिला घट्ट वेढून टाकलं. खिडकीबाहेर वादळी पाऊस आताही सुरूच होता.

त्याच्या कुशीत तिला जाग आली तेव्हा तो उशीवर कोपर रुतवून, तळहातावर डोकं टेकून तिच्याकडे मधाळ नजरेने पहात तिच्या केसांमधून हात फिरवत होता. ती जागी झालेली जाणवल्यावर तो तिच्या कानापाशी "से बेलीस्सीमा" म्हणत हळूच कुजबुजला. पापण्या पूर्ण न उघडता तिने त्याच्या मानेला धरून त्याला खाली ओढले आणि गालात हसत "ऍझीमाऊ..." म्हणत त्याचं टोकदार नाक आणि मिटलेल्या डोळ्याच्या मधल्या छोट्याश्या पर्मनंट पिंपलवर ओठ टेकले. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू पसरलं. पुन्हा तिला मिठीत गोळा करत त्याने दुलई वर ओढली आणि ते एकमेकांच्यात गुरफटून गेले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle