चिठ्ठी भाग 8

'अनु, ए बाळा'
सुमा अनुच्या कपाळावरची पट्टी काढत हळुच हाक मारली.
अनुने डोळे उघडले.
'मी नाही हनी बनीला रडवले डाॅक्टरकाका'
दुसर्या बाजूला अनुशेजारी बसून त्याच्या कपाळावर हात लावून पाहणार्या डाॅक्टरकाकांना बघून अनु तटकन उठून बसला काॅटवर.
त्याचं बोलणं ऐकून किंचित हसत डाॅक्टरकाकांनी stethoscope लावून तपासायला सुरूवात केली अनुला.
'काय अनुशेठ? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? की शाळेची वेळ टळल्यावर उत्तर देणारेस? '
अनुने डोळे उघडल्याबरोबर जयंतच्या येरझार्या थांबल्या होत्या. थोडं relax feel करत दोन्ही हात मागे बांधत अनुला विचारलं त्यांनी.
'असं रे काय म्हणतोस जयंता', असं म्हणून खुर्चीत बसलेल्या शोभाताई हसायला लागल्या. सुमानेही जयंतकडे बघत - 'काय तुम्ही पण' वाला कटाक्ष टाकला.
सगळे जण डाॅक्टरांकडे आतुरतेने बघायला लागले.
ताप नाहीये, गोळ्या द्या वगैरे बोलून डाॅक्टर बाहेर पडले. 'दंगा कमी कर आणि त्रास न देता औषध घे', असं अनुला बजावायला विसरले नाहीत ते.
'अरे बाय तरी सांग काकांना. कालपासून उशाशी बसून राहिलेत ते तुझ्या', असं म्हणत जयंत बाहेर पडला औषध आणायला.
अनुने इतका वेळ रोखून धरलेला श्वास सोडला. मागच्या उशीला टेकत त्याने लिंबू सरबत संपवलं आणि चौफेर नजर फिरवली. सुमा, मुग्धा, शोभाताई आणि नीलू त्याच्याचकडे पाहात होते.
'कामं झाली वाटतं तुमची?', असं अनुने विचारताच नीलूने उठून त्याच्या पाठीवर धपाटा घातल्यासारखं केलं.
'शहाण्या, कालपासून ताप होता तुला. कुणीच हललं नाहीये इथून. अगदी डाॅक्टरकाकासुध्दा रात्रभर बसून होते तुझ्या जवळ . काय दंगा केलास तू मी सोडून गेल्यावर? '
त्याच्या कपाळावरचे केस सारखे करत तिने विचारलं.
'मी? मी काय केलं ', चेहर्यावर निरागस भाव आणून अनुने विचारताच मुग्धा देखील पुढे आली.
'अरे काल नाही का ओट्यावर बसून बरळत होतास? काकुआज्जी, पपई, चिठ्ठी न काय काय. तुझे बाबा आले तुला शोधायला म्हणून. नाही तर किती वेळ तसाच होतास काय माहित?'. तिच्या स्वरातली काळजी जाणवली अनुला.
'काकुआज्जी!'
'हो रे बाळा. आहे मी इथंच. पड बघू तू जरा वेळ'
शोभाताईंनी त्याच्या चेहर्यावरून हात फिरवला.
'कबुतर.. नाही नाही चिठ्ठी.. चिठ्ठ्या. आई, माझ्या हातातले कागद कुठे आहेत?'
अनु शोधक नजरेने इकडे तिकडे पाहू लागला.
(क्रमशः)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle