चांदणचुरा - १७

तिने डोळे उघडून एक खोल श्वास घेतला. "मला मोकळ्या हवेत जायचंय, इथे जरा बंद बंद वाटतंय." खरं तर तिला तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके जरा शांत करायचे होते. त्यांच्यामुळे खोलीतील तापमान तर आधीच वाढलेले होते.

"चलो" म्हणून शांतपणे त्याने तिचा स्वेटर हातात दिला. त्याने त्याचं जाडजूड जॅकेट चढवून दार उघडलं. बाहेर पाऊल टाकताच गार वाऱ्यात हुडहुडी भरून तिने हाताची घट्ट घडी घातली. तिच्या पातळ स्वेटरला तिथली थंडी झेपत नव्हतीच. डोक्यावर आणि आजूबाजूला पसरलेले काळ्या मखमलीसारखे गडद, मऊ आकाश आणि त्यात हिऱ्यामोत्यांची रास उधळून दिल्यासारखे चांदणे चमचमत होते. सत्तावीस वर्षांच्या तिच्या अख्या आयुष्यात तिने एवढे चांदणे बघितले नव्हते. चंद्र समोरच्या कुठल्यातरी देवदारामागे लपला होता पण त्याची कमी अजिबात जाणवत नव्हती.

"अनबिलीव्हेबल!" त्या जादुई क्षणात हरवून जात ती हळूच म्हणाली.

सीडर बाहेर पडू नये म्हणून दार लॉक करून तो तिच्यामागे आला. "ह्या व्ह्यूचा मला कधीच कंटाळा येत नाही." तीच्या खांद्यावर हात टाकून तो तिच्या कानापाशी कुजबुजला.

"नो वंडर! इथे माझ्याकडची सगळी विशेषणं संपली." ती वर बघत म्हणाली.

"आपल्या डावीकडे उत्तर दिशा आहे." त्याने तिला डावीकडे अर्धवट वळवत वर बोट दाखवले.

तिकडे बघताच ती अवाक झाली. चिमणीतून निघणाऱ्या धुराच्या लोटासारखा, चांदणचुऱ्याने भरलेला एक लोळ देवदारांच्या शेंडयांपासून लांबवर हिमालयाच्या शिखरांपर्यंत पसरलेला होता. थोडेसे उधळलेले लाल, निळे, पिवळे रंगही मध्येच चमकून जात होते. "इज दॅट द.. मिल्की वे?" ती अजूनही आश्चर्याने ते अभूतपूर्व दृश्य डोळ्यात साठवून घेत होती.

"येस, आपल्या आकाशगंगेचा लहानसा भाग! आधी कधी बघितली नाहीस का?" तो समोर आकाशात बघत म्हणाला.

"कधीच नाही. म्हणजे ऐकून माहिती होतं पण नुसत्या डोळ्यांनी हे दिसेल असं वाटलं नाही. किती सुंदर, जादू आहे ही!"

"आज आपण लकी आहोत, जेव्हा पूर्ण काळोखी रात्र असते तेव्हाच आकाशगंगा दिसते. आत्ता चंद्रावर ढग आलेले असणार." तो म्हणाला.

तो चमकणारा लोळ बघूनच तिला वाजणारी थंडी नाहीशी झाली होती. मग अचानक तिच्या लक्षात आलं की आजूबाजूला थंडी आहेच पण तिच्याभोवती त्याचे हात वेढलेले होते. त्याच्या शरीराच्या उबेने थंडी बाहेर रोखून धरली होती.

"श्श्.. एक मिनिट डोळे मिट." तो तिला गप्प करत म्हणाला.

ती डोळे मिटून शांत उभी राहिली.

"काही ऐकू येतंय?" त्याच्या गरम श्वासाने तिचे कान थरारले.

"हम्म.. बारीक आवाज येतोय, काच तडकल्यासारखा... मधेच काच खळकन फुटल्यासारखा पण येतोय" ती कुजबुजली.

"तू जिथून चालत आलीस त्या पुलाखालून बस्पा नदी वाहते. आता तिचा वरचा लेयर गोठून बर्फ झालाय पण आत पाणी पूर्ण गोठलेले नसते ते वाहण्याचा प्रयत्न करत असते त्या प्रवाहामुळे बर्फाचे तुकडे हलून बाहेरच्या घट्ट बर्फावर मोठमोठे तडे जातात. त्याचा आवाज आहे हा."

"ओह! तुलाही ऐकू येतोय?" तिच्या तोंडून आता शब्द फुटत नव्हते. त्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे तिचा श्वास जवळजवळ थांबला होता.

"हम्म." पुन्हा त्याचा श्वास तिच्या मानेजवळ जाणवला आणि तिने हळूच सुस्कारा सोडला.

त्याच क्षणी दोघांना ते एकमेकांना किती घट्ट चिकटून उभे आहेत ते जाणवले. काही न बोलता त्याने  पटकन तिच्या खांद्यावरून हात काढला आणि घरात निघून गेला. ती काही मिनिटे तशीच देवदारांच्या नागमोडी रांगेवरून दिसणारा आकाशातला चमचमता चुराडा न्याहाळत उभी राहिली. एव्हाना चंद्र अक्खा ढगाबाहेर येऊन आकाशगंगा पुसट झाली होती. चंद्रप्रकाशात पायाखालचा आणि झाडाझुडपांवरचा बर्फ चांदण्यासारखाच चमकत होता. तिच्यासाठी ही रात्र खरंच जादुई होती.

अखेरीस तिने घरात शिरून दार बंद केले. तो आधीच टेबलासमोर बसला होता. "मेंदू रिस्टार्ट झाला का तुझा?" तो घसा खाकरत म्हणाला.

"हो, बराचसा." तिच्या आवाजातली थरथर त्याला जाणवू नये म्हणून ती प्रार्थना करत होती.

"मी आजपर्यंत अनुभवलेली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे." ती पुढे म्हणाली.

"मीपण" तो तिला वरपासून खालपर्यंत डोळ्यात साठवत म्हणाला.

तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले तेव्हाही तो तिचे निरीक्षण करत होता. त्याने त्याचे घर, त्याचे आयुष्य दोन दिवस तिच्याबरोबर शेअर केले म्हणून तिला त्याचे आभार मानायचे होते. शब्द तिच्या अगदी ओठांपर्यंत येऊन थांबत होते.
ती घाबरत होती की ती आता एक शब्द जरी बोलली तरी ती डोळ्यातून येणारा पाण्याचा ओघ थांबवू शकणार नाही. हे शेवटी अनुभवलेले काही  क्षण इतके दैवी होते की तिला एखाद्या निबीड अरण्यात भग्न देवालयाच्या थंड दगडी फरशीवर बसून आवर्तने घेणारा घंटानाद ऐकल्याप्रमाणे वाटत होते.

ती त्याच्याकडे बघून हसली आणि पुन्हा खेळायला खुर्चीत जाऊन बसली. सगळं नॉर्मल आहे काही घडलंच नाही असं दाखवायचा तिचा प्रयत्न होता. पण मनातून आता काहीच नॉर्मल नाहीये हे पक्के समजलेले होते. नशिबाने ती सकाळीच इथून निघून जाणार हेच बरं आहे. हा विचार येताच एकीकडे तिचा घसा दाटून येत होता. फक्त दोन दिवसात हिमाचल आणि आदित्यने तिच्या मनात घर केले होते.

टाय ब्रेकर गेम ती काही सेकंदात हरली कारण तिचा मेंदू बंद पडला होता. तिला हे समजत नव्हतं की ती उद्या त्याचा, ह्या उबदार घराचा निरोप कसा घेणार होती? ती निघाली तरी तिचे हृदय ह्या एकांतातच मागे राहून जाणार होते.

त्याने तिला जिंकू द्यायचा प्रयत्न करूनही ती हरलेली पाहून त्याला धक्काच बसला. तिला सोफ्यावर झोपून किती त्रास झाला ते त्याला समजत होते. "तू झोप बेडवर." तो तिच्याकडे पाहून म्हणाला.

"नाही तू झोप. तू जिंकलास शेवटी!" ती उसना उत्साह आणत हसून म्हणाली. सीडर तिच्याजवळ असेलच सोबतीला. ह्या सुंदर दोन दिवसांसाठी अशी सोफ्यावरची झोप कुर्बान! सकाळी लवकर निघून connecting फ्लाईट्स पटापट मिळाल्या तर निदान तिथे झोप तरी पूर्ण करता येईल.

त्याने उठून नोटपॅड, टेबलभर पसरलेले कागद, पेन वगैरे गोळा करून सेंटर टेबलच्या खणात ठेवले.

"मला माहितीये, मी तुला नको असणारी पाहुणी होते." ती खुर्चीवर मागे टेकत म्हणाली. "पण तरीही तू माझी काळजी घेतलीस, माझ्याशी इतका चांगला वागलास आणि मुख्य म्हणजे मला सहन केल्याबद्दल मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत."

"तू इतकीही वाईट पाहुणी नव्हतीस." तो खांदे उडवत म्हणाला.

"आणि लोकांच्या मताविरुद्ध, तू ही नाहीस!"

"आणि तुझ्या मते?" तो हसला.

"अम्म्म.. आपली सुरुवात इतकी काही चांगली नव्हती."

"खरंय." त्याने मान्य केलं.

"तू फतेवर अजून नाराज आहेस का?"

त्याने थोडा विचार केला. "त्याला मी नंतर बघून घेईन."

"प्लीज त्याला फार त्रास देऊ नको." ती विनवत म्हणाली. "त्याने खरंच तुझ्या भल्याचा विचार करून हे केलं. तुझा चांगला मित्र आहे तो."

"हम्म, ते आहेच. आता झोपूया आपण, पहाटे तुला लवकर उठायचंय." म्हटल्यावर ती आत कपडे बदलायला गेली. ती आत असताना त्याने फतेबीरला कॉल केला. त्यांचे संभाषण तिला तुटक ऐकू येत होते.

ती आवरून बाहेर आली तेव्हा आदित्य फोन बंद करत होता. "फते पहाटे पाचच्या आसपास इथे येईल. तो तुला शिमला एअरपोर्टला सोडेल आणि पुढच्या फ्लाईट्सचेही बुकिंग करून देईल."

"पण कसं काय? केवढी गर्दी आहे, सगळ्या फ्लाईट्स भरलेल्या असतील."

"डोन्ट वरी. तो ट्रॅव्हल एजन्सीवाला आहे, रिमेम्बर? काहीतरी जुगाड करून एक सीट मॅनेज करेल तो." त्याचा चेहरा गंभीर दिसत होता.

त्याला अजूनही तिला लवकरात लवकर उठून पाठवून द्यायचं होतं. तिला वाटत होतं की तिला जाणवलेल्या भावना त्यालाही जाणवत होत्या. नक्कीच जाणवलं असेल, कारण त्यांच्यामध्ये चमकून जाणारी वीज अख्या गावाचे दिवे पेटवू शकली असती. कदाचित यामुळेच तो तिच्याइतकाच अस्वस्थ आहे आणि म्हणून लवकर तिला इथून पाठवायच्या मागे असेल.

तो उशी आणि ब्लॅंकेट्स घेऊन आला. "तू खरंच इथे झोपणार आहेस? मला काही प्रॉब्लेम नाही, मी सोफ्यावर झोपू शकतो." तो काळजीने म्हणाला.

"नोप! बेट इज अ बेट. मी झोपेन इथेच." ती खोटं हसत म्हणाली.

"ओके, मी लाईट घालवतो" त्याचा आवाज तुटक झाला होता. फायरप्लेसमध्ये दोन लाकडं टाकून तो आत निघून गेला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle