चांदणचुरा - १८

सीडर आज आधीच सोफ्याखाली झोपून गेला होता. पळून पळून दमला असणार बिचारा. तिने सोफ्यावर ब्लॅंकेट अंथरून झोपायला तयार झाली पण तिला झोप अजिबात येत नव्हती. ती उशीला टेकून गुडघ्याना मिठी घालून बसली. एकदा बोलून झाल्यावर त्याने पुन्हा तिच्या लेखाचा विषय काढला नव्हता. तिला वाटले होते तो बराच वाद घालेल, त्याच्या खाजगी गोष्टी उघड न करण्यासाठी बजावेल. कदाचित भांडेलसुद्धा.

पण त्याने यातले काहीच केले नव्हते. लेखासाठी नाही तर स्वतःसाठी तिला त्याच्याविषयी अजून खूप जाणून घ्यायचे होते, खूप काही बोलायचे होते पण या क्षणी अजून काही बोलणे चुकीचे होते. तिच्या मनातून सध्या तरी त्या लेखाबद्दलचे विचार मागेच पडले होते.

शेवटी थकून ती आडवी झाली. तिच्या मनावर फक्त त्याच्या विचारांनी गारुड केले होते. तिला आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या पुरुषांपेक्षा हा वेगळाच होता ही गोष्ट तिला सगळ्यात जास्त भुरळ घालत होती. तिच्या आजूबाजूला वावरणारे सगळेजण अति चकाचक, गुळगुळीत, स्वतःच्यात जास्तच रमलेले, आपली परफेक्ट करिअर्स फ्लॉन्ट करणारे, माज दाखवणारे असे होते. याच्यातला साधा, सरळ, सच्चा आणि रफ अराउंड द एजेस माणूस तिला मनापासून आवडला होता. विचार करता करता तिला केव्हा झोप लागली कळलेच नाही.

मध्यरात्री तिला अचानक जाग आली तेव्हा तो तिला हलवून उठवत होता.

"सकाळ झाली?" तिने डोळे चोळत विचारले. अचानक तिला तिथून निघण्याची जाणीव होऊन तोंडाला कोरड पडली. तिला जायचं नव्हतं. इतक्या लवकर तर नाहीच.

त्याने नकारार्थी मान हलवली. "तू बेडवर झोप. मला झोप येत नाहीये." तो सीडरला न उठवण्याची काळजी घेत हळू आवाजात म्हणाला.

तिने वाद घालून काही उपयोग होणार नव्हता. ती ब्लॅंकेट बाजूला सारून उठायला लागली इतक्यात त्याने तिला सहज उचलले आणि आत घेऊन गेला.

तिला हलकेच बेडवर ठेऊन अंगावर ब्लॅंकेट पांघरले. काही वेळ तिच्याकडे बघत राहिल्यावर शेवटी तो वाकला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले. "स्लीप टाईट." तो हळूच म्हणाला. तो उठून वळणार तोच अर्धवट ऊठत तिने त्याच्या गालावर हात ठेवला आणि मऊ डोळ्यांनी त्याच्याकडे बघून जरासं हसली. त्याची खरखरीत दाढी तिच्या हाताला टोचत होती. तिच्या डोळ्यांमधली उत्कंठा, विलग झालेले ओलसर ओठ त्याला जे सांगत होते ते तो ऐकत होता. तिला काय हवे आहे तेही त्याला समजले होते. तरीही अनिच्छेनेच तो उभा राहिला आणि खोलीबाहेर निघून गेला.

तिने डोक्यावरून ब्लॅंकेट ओढून झोपायचा खूप प्रयत्न केला पण तीचे डोळे टक्क उघडे होते. झोप न यायला ब्लॅंकेटला येणारा त्याच्या लेमनी कलोनचा सुगंधही तेवढाच कारणीभूत होता. त्यालाही बहुतेक झोप लागत नसावी कारण बाहेर त्याच्या वावरण्याचे आवाज येत होते. तोही तिच्याइतकाच अस्वस्थ होता.

कुस अदलून बदलून, शेवटी सरळ पाठीवर आढ्याकडे बघत ती पडून राहिली. कितीतरी वेळाने ब्लॅंकेट बाजूला करून ती खाली उतरली. या खोलीला खिडकी होती. तिने अलगद खिडकीपाशी उभी राहून पडदा सरकवला. बाहेर अजूनही रात्रच होती. पण पुन्हा तेच चांदण्याची पखरण असलेले आभाळ तिच्या हृदयाचा ठाव घेत होते. आता पूर्ण चंद्र वर आल्यामुळे लांब लांबपर्यंत पसरलेला पांढराशुभ्र बर्फ त्याच्या उजेडात चमचमत होता. ह्या सगळ्या चमकत्या कॅनव्हासवर काळोखात देवदारांच्या जंगलाची  काळी नागमोडी रेषा उठून दिसत होते.

त्याला हिमाचल आवडणं साहजिक आहे. इतकी जादुई, साधी, रफ आणि एकदम सुलझी हुई जागा आहे ही.. अगदी त्याच्यासारखीच! शहराच्या वेडेपणापासून अगदी दूर.

बराच वेळ तिथे थांबून मग ती बाहेर आली तेव्हा तो टेबलासमोर बसून लॅपटॉपवर भराभर काहीतरी टाईप करत होता. दारात तिचा आवाज आल्यावर त्याने लगेच खुर्ची गोल फिरवत तिच्याकडे वळून पाहिले. तिला जागी पाहून त्याला आश्चर्य वाटले.

"मलापण झोप नाही आली." तिने कबूली दिली.

तो काय लिहितोय ते लपवत असल्यासारखी त्याने चटकन वर्ड फाईल बंद केली.

"अजून एक पुस्तक?" तिने विचारले.

"माहीत नाही, बघूया."

"ऑन माय ओन'चा सिक्वल असेल तर फॅन लोक वेडे होतील. खरंच!" ती हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली.

"तासाभरात फते इथे पोचेल. तो घरून निघालाय." तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता भिंतीवरच्या घड्याळात बघून तो म्हणाला.

"निघाला पण?!" ती आश्चर्याने म्हणाली. हे खूप लवकर होतं, तिचा पाय तिथून निघत नव्हता. तरी तिने आत जाऊन ब्रश वगैरे करून, कावळ्याची आंघोळ करून तिचं विखुरलेलं थोडं सामान बॅगमध्ये भरलं. ब्लॅक जीन्सवर मरून फुल स्लिव्जचा टॉप घालून वर तिचा ग्रे हूडी अडकवला. केस एका क्लिपमधे कोंबले. चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि तिचा आवडता फ्रेंच व्हेनिला लिप बाम लावून ती तयार झाली. गळ्यापाशी न विसरता तिचे लाडके टॉमी गर्ल फवारले. फतेने दिलेली जाड बीनीसुद्धा आठवणीने डोक्यात घातली.

"कॉफी?" ती बाहेर आली तेव्हा तो टेबलावर दोन मग ठेऊन वाटच बघत होता. कॉफी पिताना दोघांची एकमेकांत मिसळलेली नजर हटत नव्हती. दोघांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली होती. तो किचनमधून एक पिशवी घेऊन आला.  "थोडी चॉकलेट्स आणि काही प्रोटीन बार्स आहेत. रस्त्यात उपयोगी पडतील आणि हे 'लुंग ता' तुला गुड लक म्हणून!" तीन छोट्याश्या काचेच्या बरण्या दाखवत तो म्हणाला.

"Wow, थँक यू सो मच! किती क्युट आहेत ह्या" म्हणत तिने बरण्या हातात घेऊन पाहिल्या. लुंग ता जॅम होते. ऍपल सिनेमन, पर्सिमॉन स्ट्रॉबेरी जिंजर आणि पीच एप्रिकॉट. तिने ते नेऊन बॅगेत ठेवेपर्यंत बाहेर फोनचा बीप बीप आवाज आला. "उर्वी, तो मॉनेस्टरीपर्यंत आलाय, दहा मिनिटात इथे येईल. आपण पुलाच्या पुढे जाऊन थांबू."  तो मोठ्याने म्हणाला.

सीडर अजूनही झोपलेलाच होता. तिने निघता निघता त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बाहेर पडले. बाहेर अजूनही अंधारच होता. तो घरातल्याच ग्रे स्वेटपॅन्ट आणि ऑलिव्ह ग्रीन हूडीवर बाहेर पडला होता. आज बॅग त्याने उचलल्यामुळे तिला नीट चालता येत होते. उदासवाण्या शांततेत पूल क्रॉस करून रस्त्याकडेच्या कठड्याला टेकून ते थांबले. दोघेही शक्य तितकी एकमेकांची नजर टाळत होते. तिचा घसा दाटून आला होता. पण तिला रडायचं नव्हतं, इतका वेडेपणा बघून हसेलच तो. त्याला नक्कीच आपण इथून लवकरात लवकर जावं असं वाटत असताना आपण उगाच इतकं इमोशनल नको व्हायला. तिने उगीचच केसांतून हात फिरवला.

तेवढ्यात लांबून फतेची जिप्सी येताना दिसली.  "हॅलो बॉस!" गाडी थांबवून खिडकीतून निम्मा बाहेर येत हात दाखवून तो ओरडला. आदित्य पुढे होऊन त्याच्या डोक्यात टपली मारून काहीतरी म्हणाला. फते हसत तिच्याकडे बघून हात हलवत गाडी सरळ पुढे घेऊन गेला.

तिने आदित्यकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

"ह्या नॅरो रोडवर जिप्सी वळवता येत नाही. तो पुढे चिटकूलपर्यंत जाऊन वळून येईल."

"ओह अच्छा.." ती त्याला डोळ्यात जमणारे पाणी न दाखवायचा प्रयत्न करत कशीबशी हसली. त्याच्याशी निरोपाचे काय बोलावे तिला सुचत नव्हते.

"आदित्य, थॅंक यू फॉर एव्हरीथींग!" जे तोंडात आलं ते तिने बोलून टाकलं.

त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्याइतके गडद इंटेन्स डोळे तिने आधी कधीच पाहिले नव्हते. तिने त्याच्या नजरेला नजर भिडवली. तिला न बोलता तिला वाटणाऱ्या फीलिंग्ज त्याच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. गेल्या दोन दिवसात तिला मिळालेला आनंद, ती त्याच्यामुळे किती प्रभावित झाली होती हे सगळं आणि बरंच काही त्याला सांगायचं राहून गेलं होतं. तिला अजून वेळ हवा होता.

तिच्याकडे बघताबघता खांद्यावरची त्याची पकड घट्ट झाली. त्याने असहायपणे एक खोल श्वास घेतला आणि तिला जवळ ओढले. पटकन तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत धरत आवेगाने त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याची गरजही तिच्याइतकीच स्ट्रॉंग होती तर. तिच्या डोक्यातली बीनी घसरून खाली पडली आणि तिने पापण्या घट्ट मिटून घेतल्या.

एक क्षण ती एवढी आश्चर्यचकित झाली की तिच्या पायातली सगळी शक्ती निघून गेली. तिला अगदी हेच हवं होतं आणि हेच घडावं असं वाटत होतं. हा किस अगदी तसाच होता जशी तिने कल्पना केली होती. किंवा त्याहून जरा जास्तच एक्सायटिंग! तो त्याच्या कॉफीसारखाच होता, बिटर-स्वीट आणि स्ट्रॉंग! तो थांबल्यावर तिचे डोके गुलाबी धुक्यातून जरा बाहेर आले. तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या डोळ्यात बघत पुन्हा त्याला किस केलं. त्याच्याकडून मिळालेलं सगळं तिला परत करायचं होतं. तिचा फ्रेंच व्हेनिला कधीच नाहीसा झाला होता!

बऱ्याच वेळाने त्याने चेहरा बाजूला केला पण तिला अगदी जवळ घट्ट मिठीत पकडून ठेवलं. बर्फावरून त्याने जवळजवळ तिला उचललंच होतं. "गुडबाय आदित्य." लांबून जिप्सीचा आवाज ऐकू आल्यावर ती त्याच्या कानात म्हणाली.

"गुडबाय!" तो तिच्या कानामागे केसांमध्ये तोंड लपवून तिचा सुगंध मनात साठवून ठेवत म्हणाला.

जिप्सी येऊन थांबल्यावर तो मागे तिची बॅग ठेवायला गेला. बीनी उचलून ती त्याच्याशेजारी जाऊन थांबली. त्याने बॅग ठेवल्यावर ती वळू लागताच त्याने हात धरून तिला मागे ओढले.

"उर्वी?" तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला.

"हुं?" तिचं हृदय आता जोरजोरात धडधडत होतं. तो इथेच अजून थांबायला सांगतोय का? आता इतक्या उशिरा फतेसमोर कसं काय थांबणार? किती एम्बरासिंग आहे हे. त्याला नक्कीच माझ्यासारखंच वाटतंय. तिच्या मनात एकदम शेकडो विचार आले.

तिला जवळ घेत त्याने पुन्हा एकदा पटकन किस केले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला "ते आर्टिकल लिहू नको."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle