चांदणचुरा - २९

मध्यरात्र होऊन गेली तरी आदित्य टक्क उघड्या डोळ्यांनी काळोखात वर धुरकट पांढऱ्या झुंबराकडे पहात बेडवर पडला होता. गेल्या दोन दिवसांत त्याने दाबून ठेवलेले नकारात्मक विचार आता एकटेपणात दुथडी भरून वर येत होते. काहीच तासांपूर्वी अनुभवलेल्या कोवळ्या, नवथर भावना आणि आणि त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच यांची सांगड काही बसत नव्हती. एकीकडे त्याचे तिच्यावरचे प्रेम उतू जात होते, तेव्हाच दुसरे मन पाऊल मागे घ्यायला सांगत होते. त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेला बंध तात्पुरता होता.

त्यांच्या नशिबात एकत्र असण्याचा काळ मोजकाच असणार आहे हे त्याच्या मनाने कधीच ठरवले होते. तो विचार करत होता, आज नसले तरी भविष्यात एके दिवशी ते दोघेही ह्या गोड स्वप्नातून जागे होऊन वास्तवात येणार होते. त्याला आशा होती की त्यांनी एकत्र घालवलेले हे आनंदाचे क्षण कायम टिकून रहातील पण तेव्हाच दुसरे मन कबूल करत होते की कदाचित हे होऊही शकणार नाही.

माणसे बदलतात, आज बरोबर, अगदी बिनचूक  वाटणाऱ्या गोष्टी उद्या पूर्णपणे चुकीच्या वाटू शकतात. एखाद्या दिवशी उर्वीला जाग येईल आणि त्यांच्यातील फरक जाणवेल. अजूनपर्यंत दोघांनीही त्यांच्या एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे असण्याकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा ती ह्या स्वप्नातून जमिनीवर येईल तेव्हा त्याला स्वतःपासून तोडून टाकेल, त्याचे मन हे करायला धजावले नाही तरीही. त्याने हे खूपदा पाहिले होते. त्याची स्वतःची आई त्याला आणि बाबाला सोडून गेलीच होती की. एक स्त्री आणि पुरुष जे एकत्र राहूच शकत नाहीत, ते सगळ्या धोक्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून एकत्र आले तर काय घडू शकते याचे त्याचे आई-बाबा उत्तम उदाहरण होते.

पण या दोन तीन दिवसांत उर्वी आणि तो नकळत एकमेकांच्या इतके जास्त जवळ आले होते की पुढे काय करावे हेच त्याला सुचत नव्हते. तो तिचे चार पाच दिवस मजेत जावेत म्हणून आला होता पण तिला सोडून, तिच्यापासून लांब जायच्या विचारांनी स्वतः अजून अजून दुःखी होत होता. विचारांच्या क्रूर लाटा त्याच्यावर आदळत असतानाच कधीतरी त्याला झोप लागली.

सकाळी आठ वाजता twisted nerve रिंग जोरात वाजल्यामुळे त्याला जाग आली. शिट! तो रात्री फोन व्हायब्रेट मोडवर टाकायला विसरला होता. पण स्क्रीनवर उर्वीचे नाव बघून आपोआप त्याचा मूड सुधारला.

"हॅलो" डोळे चोळत, झोपाळू घोगऱ्या आवाजात त्याने फोन उचलला.

"आदीss उठ, उठ! अना घरी गेली आत्ताच." ती उत्साहाने फसफसली होती.

"काय? कशी काय?" तो उठून हेडबोर्डला टेकत म्हणाला.

"तिच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी तिला जरा शांत करून बोलावलं घरी. मीसुद्धा रात्री थोडं लेक्चर दिलं होतं त्याचा थोडासा परिणाम असेल." ती घाईघाईत सांगून टाकत होती.

रात्रीची हुरहूर दडपून टाकत तिच्या आवाजाने त्याचा चेहरा थोडासा फुलला.

"कूल! मी एक दोन तासात येतो. मुंबईत आल्यापासून रनिंग थांबल्यामुळे अंग जड झालंय. इथे जिम आहे तर थोडं रनिंग करून येतो. आपण शूज घेतलेच आहेत परवा, जरा वापर होईल त्यांचा"

"ओके, लवकर ये. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे!"

"उं हूं, आलोच!" त्याने फोन व्हायब्रेटवर करून ठेवला.

हॉटेलच्या जिममध्ये जाऊन ट्रेडमिलवर अर्धा तास पळून झाल्यावर त्याचे डोके आणि शरीर बरेच हलके झाले. परत येऊन आंघोळ उरकून त्याने बॅगमधून तिच्यासाठी आणलेले गिफ्ट बाहेर काढले. स्वतःशीच बारीकशी शिट्टी वाजवत त्याने नेहमीची ब्लॅक जीन्स आणि ऑलिव्ह टीशर्ट चढवला. न विसरता गिफ्ट बॅग हातात घेतली. एव्हाना उगवलेल्या स्टबलमुळे त्याचे गाल पुन्हा खरखरीत झाले होते त्यांना हात लावून तो स्वतःशीच 'नो वे!' म्हणाला आणि रूम लॉक करून बाहेर पडला.

शेवटची करंजी नागमोडी कातण्याने कातून तिने गरम तेलात सोडली आणि डोअरबेल वाजली. पटकन नॅपकीनला हात पुसत ती बाहेर पळाली. तिने दार उघडलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्माईल होतं.

"हम्म, कसलातरी मस्त वास येतोय.." एका हाताने तिच्या घामेजल्या कपाळावरच्या बटा मागे सरकवत त्याने तिथे ओठ टेकवले.

"यक! आदी.. लांब रहा, मला खूप घाम आलाय.." ती नाक मुरडत मागे सरकत म्हणाली. अजून तिच्या अंगावर नाईट सुटच होता.

"मला चालतो घाम!" म्हणत त्याने डोळा मारला आणि तिला पुन्हा जवळ ओढलं.

तिने त्याला चिकटून खोल वास घेतला. "म्म्म.. कूल वॉटर! स्वतः कलोन लावून मला सांगतो आहेस." ती हसत वर त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली.

"तो माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी लावलाय" तो डोळे मिचकवत म्हणाला. "असाच गिफ्ट मिळालेला पडून होता. तुला आवडेल म्हणून वापरतोय."

"बरं, आता पटकन टेरेसमध्ये जाऊन बस. मला तुला सरप्राईज द्यायचं आहे." त्याच्या गालाची पापी घेत ती आत पळाली. तो शूज काढून आज्ञाधारकपणे बीन बॅगवर जाऊन बसला. एव्हाना उन्हाची तीव्रता वाढू लागली होती. दहा मिनिटात तिची हाक आलीच.

सरप्राईज! त्याच्यासाठी डायनिंग टेबलाची खुर्ची ओढून धरत ती मोठ्याने म्हणाली. टेबलवर प्लेटमध्ये चार पाच करंज्या होत्या.

Wow! ओरडून तो आनंदाने खुर्चीत बसला. तिने पटकन प्लेटमधली एक करंजी त्याला भरवली. "ओल्या नारळाची!" ती हसत म्हणाली. "आधी मी तुला खाणारे" म्हणत त्याने तिला मांडीवर ओढली पण वाकून हसतहसत ती त्याच्या हाताखालून सटकली. "तू करंजीच खा, मी पटकन आंघोळ करून येते. पाणी तापलंय कधीचं." म्हणून ती बेडरूममध्ये गेली. पडत्या फळाची आज्ञा मानून त्याने त्या परफेक्ट सोनेरी करंज्यांवर ताव मारला आणि तिची वाट बघत बसला.

ती ढगळ पांढरा टीशर्ट आणि स्लॅक्स घालून डोक्यावर मोठा टॉवेल गुंडाळून बाहेर आली. ती समोर आल्याआल्या त्याने तिच्यासमोर ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळून बारीकशी लाल रिबन बांधलेला बॉक्स धरला.

"मीसुद्धा तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. आय होप तुला आवडेल. पहिल्यांदाच खूप विचार करून काहीतरी गिफ्ट बनवून घेतलंय मी." गिफ्ट देताना त्याचे डोळे चमकत होते.

"ओएमजी! चक्क दिवाळी गिफ्ट?!" तिने हसत हसत बॉक्स हातात घेतला. "पण मी हे आज नाही उघडणार."

"का??" त्याचा चेहरा जरा पडला.

"कारण मी ते उद्या उघडणार आहे." ती दात दाखवत म्हणाली.

"उद्या काय स्पेशल आहे?" तो आता अजूनच कन्फ्युज झाला होता.

"कारण उद्या पाडवा आहे. आता तू ते काय असतं विचारायच्या आत मीच सांगते. कारण ह्या पाडव्याच्या दिवशी नवरे बायकांना पाडव्याचं गिफ्ट देतात. आय होप हल्ली बॉयफ्रेंड्स देत असतील. रिवाज होता है, यू नो?" तिने हसता हसता गिफ्ट टिव्हीशेजारच्या शेल्फवर ठेवले.

तो काय बावळटपणा लावलाय असं तिच्याकडे बघून मान हलवत होता.

"आदी.. लंचसाठी काहीतरी करून मग मुव्ही बघूया का?" ती डोक्यावरचा टॉवेल काढून केस पुसता पुसता म्हणाली.

"करंज्या खाऊन आता लंचएवढी भूक नाहीये पण काहीतरी लाईट खाऊ शकतो."

"मलापण भूक नाहीच्चे. सकाळी अनाबरोबर खूप हेवी ब्रेकफास्ट झालाय. एक काम करू, मुव्ही बघू आणि मधेच भूक लागली तर जंक खाऊ."

"डन, कुठली मुव्ही?" त्याने विचारले.

"ऍक्शन आणि हॉरर नको हं प्लीज.. माझ्यासाठी एखादी रॉमकॉम बघ ना."

त्याने नाक मुरडले. "रॉमकॉम? रिअली?"

"प्लीss ज" ती पापण्या फडफडत म्हणाली.

"Stop overacting!" तो खो खो हसत म्हणाला.
"बरं. बघ तुझ्यासाठी काय काय सहन करतोय मी! काय काय ऑप्शन्स आहेत?"

"50 फर्स्ट डेट्स" त्याने डोळे फिरवले.

"नॉटिंग हिल?" त्याने डोळे मिटून मान हलवली.

"हॅरी मेट सॅली!" नोप!

"मग 500 डेज ऑफ समर? हा मी रेकॉर्ड करून ठेवलाय पण पाहिला नाही अजून.

"फॉर अ चेंज, हा मी बघितलाय दिल्लीला असताना. पण बघू शकतो पुन्हा, खूप वर्ष झाली." तो म्हणाला.

"मिस्टर संतांना आवडलेला रोमॅन्स! म्हणजे भारी असणार."

"मी आवडलेला शब्द वापरला नाहीये" तो तिला चिडवत म्हणाला.

खांदे उडवून तिने पडदे बंद करून काळोख केला, टीव्ही लावला आणि एक भलामोठा प्लेन सॉल्टी चिप्सचा पॅक उघडला. त्याने फ्रीजमधून कोक काढून दोन ग्लासेस भरून आणले. ती सोफ्यावर पाय घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बसली.

मुव्ही सुरू होताना मस्ती करणारे ते बघता बघता शांत होऊन गेले. समरच्या बोटातली रिंग बघून टॉमचं उध्वस्त होणं बघताना उर्वीच्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं. तो मॅड म्हणून पुटपुटला आणि तिला घट्ट मिठीत घेत तिच्या ओल्या गालावर ओठ टेकले. एन्ड क्रेडिट्स येताना त्याचे पाय सेंटर टेबलवर होते आणि ती त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन समोर बघत होती. तो डोळे मिटून डोकं मागे टेकून बसला होता. तिने हळूच मान उचलून त्याच्याकडे पाहिलं.

तो झोपलाय बघून तिने उठून टीव्ही बंद केला. पडदे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर उन्हाची तिरीप पडली. ती त्याच्या कपाळावरून नाकावर तिथून ओठांपर्यंत बोट फिरवत आली आणि त्याने पटकन तोंड उघडून बोट चावले. "ऑss आदीss" ओरडत ती त्याला चापट्या मारत सुटली. तो हसत तोंडासमोर हात धरून तिला चुकवत होता. तेवढ्यात तिचा फोन वाजला.

"कहां हो? व्हॉट्सऍप क्यू नही देख रही?" अना ओरडत होती

"बिझी हूं. क्यू, क्या हुआ?" ती शांतपणे म्हणाली.

"अपने ग्रुपपे कबसे गेटटुगेदर की डिस्कशन चल रही थी अब जाके सब फायनल हुआ है. पूरा गॅंग आज ही मिल रहा है. बटरफ्लाय हाय, पाच बजे. और तुम्हे आना है."

"एक मिनिट, पूछ कर बताती हूँ."

"किसको पूछकर? ओ, ओ ओss क्या वो ललित है साथ मे?" अनाला आता फारच इंटरेस्ट आला.

"हाँ, वही है."

तिने फोन कट करून आदित्यकडे पाहिले. "आदी, माझे फ्रेंड्स भेटतायत एका पबमध्ये, तू येशील? प्लीज."

"उर्वी, तुला माहितीये मला बोर होतं अश्या जागी.."

"प्लीssज.. माझ्यासाठी? मला फक्त सगळ्यांना दाखवायचं आहे की माझा खरंच बॉयफ्रेंड आहे. गेल्या महिन्याभरातलं माझं वागणं सगळ्यांना विचित्र वाटतंय. प्लीज चल ना, आपण लवकर निघू तिथून." तिने त्याच्या मानेत डोकं खुपसत विचारलं.

"आय कान्ट रिफ्यूज यू एनीथिंग." तो श्वास सोडत म्हणाला. ती त्याच्याकडे बघून हसली आणि तिने कॉल बॅक केला.

"अना, सुन हम दोनो आ रहे है! बी एच मतलब  बीकेसीवाला ना? ओके. यप शार्प पांच बजे." ती फोन ठेऊन पुन्हा आदीच्या मिठीत घुसली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle