बदतमीज़ दिल - ७

ती अनिच्छेनेच उठून हळूहळू चालत बाहेर येऊ लागली.

"आजच आलीस तर बरं होईल!" तो त्रासिक आवाजात म्हणाला.

तिने त्याच्याशेजारून जाताना फक्त एक झणझणीत कटाक्ष टाकला आणि बाहेर दरवाजापासून जरा लांब कोपऱ्यात जाऊन थांबली. आता त्याला तिच्यामागे चालत जावंच लागलं.

तिने हाताची घडी घातली. "माझा लंच टाइम संपायला दहा मिनिटं बाकी आहेत. काय बोलायचंय ते लवकर बोला प्लीज." मान वर करून ती म्हणाली.

झाली परत हिची दादागिरी सुरू! एवढी वर्ष डॉ. आनंदकडे कशी काय टिकली ही? आश्चर्यच आहे.
माझ्याकडे जेमतेम चार दिवस टिकेल. त्याने तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. पार्टीनंतर तो पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून बघत होता. गोरा गुबगुबीत चेहरा, लांब सरळसोट केसांची उंच पोनिटेल, हिरवट नितळ पाण्याच्या रंगासारखे डोळे, गुलाबी ओठ ज्यांची आता चिडून सरळ रेष बनली होती उंची कमी असली तरी सडपातळ असल्यामुळे ती बुटकी वाटत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा एक निरागस ताजेपणा होता. एखादया लहान मुलांच्या मुव्हीत ही नक्की खपून जाईल.

"हे चाईल्ड साईज स्क्रब्ज कुठे मिळाले?" अजाणता त्याच्या तोंडून निघालं.

"काय?" रागाने रोखून बघताना तिच्या डोळ्यांचा रंग अजूनच वेगळा वाटत होता.

तिच्या भुवया वर गेल्या. "तुम्ही हे विचारायला मला इथे बोलावलं?"

त्याने बोटांनी स्वतःचं कपाळ जरा चेपलं. काय करतोय मी, ऍम आय सिक? ऍम आय गोइंग सायको?

"डॉ. आनंदबरोबर तू किती वर्ष काम केलं आहेस?" त्याने जरा भानावर येत विचारलं.

"सहा!"

"ते तुझ्या कामाबद्दल चांगलं बोलत होते."

"हम्म आमचं टीमवर्क चांगलं होतं." ती त्याच्या खांद्यावरून पलीकडे बघत म्हणाली.

"सो तुला कार्डिऍक मध्येच रहायचं आहे, राईट?"

"येस. प्रीफरेबली."

"कधी पीडियाट्रिक केसेस हँडल केल्यात ?"

"नाही. डॉ. आनंद मोस्टली अडल्ट केसेस घेत होते."

त्याला ह्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होता.

"त्यांच्या रुटीन सर्जरीज दोन तीन तासाच्या असायच्या. मला त्यांच्या डबल, ट्रिपल वेळ लागू शकतो. इतका वेळ तू मॅनेज करू शकशील?"

तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. आधी तडतड उडणारी ती आता शांत, ऑलमोस्ट कंटाळली होती. नक्कीच ही खोटी शांतता आहे. त्याला तिच्या गळ्याला बोट लावून बघावंसं वाटलं, पल्स नक्कीच ताडताड उडत असणार.

"मी कन्फ्युज झालेय, तुम्ही मला जॉब ऑफर करताय की वॉर्न करताय?" तिने शांतपणे विचारले.

क्वेश्चन ऑफ द डे!
एकीकडे त्याला ती सर्जरीमध्ये कितपत टिकाव धरेल शंका होती पण तेवढीच एका अनुभवी असिस्टंटची गरजही होती.

हम्म, हिला अनुभव तरी चांगला आहे.

त्याने एक खोल श्वास घेतला. "तुझी पहिली केस गुरुवारी सकाळी असेल. शुभदाकडून डिटेल्स घे. टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो आणि डी जॉर्ज सिंड्रोमचा शक्य तेवढा अभ्यास कर, सगळ्या स्टेप्स नीट समजून घे कारण एका लहान मुलाचं अख्खं आयुष्य आपल्यावर अवलंबून आहे. मी तुला एक चान्स देतोय." वळून तो भराभर तिथून निघाला. ती मागून काहीतरी ओरडून सांगेल वाटलं होतं पण काहीच आवाज आला नाही. लॉबीचं दार ढकलून तो लिफ्टसमोर थांबला.

ती गुरुवारी सर्जरीला हजर असण्याबाबत त्याला खात्री होती.

सो! मला एक नवी कोरी असिस्टंट मिळाली. फायनली! किंचित हसत तो लिफ्टमध्ये शिरला.

---

गुरुवारी सकाळी सायरा अगदी आत्मविश्वासाने पटापट चालत लिफ्टमधून बाहेर आली. तिच्या डोळ्यात चमक होती आणि ओठांवर आवडती डस्ट पिंक लिपस्टिक. सकाळीच शाम्पू केलेल्या केसांची पोनिटेल मस्त सुळसुळत होती. बाथरूमला जावं लागणार नाही पण डोकं शिस्तीत राहील इतकीच कॉफी पिऊन ती OT कडे आली. सर्जरी स्मूद पार पडत होती. फायनली सगळं संपलं आणि तिने डॉ. पैंच्या अपेक्षेपेक्षा उत्तम काम केलं. सगळ्या डीस्पोजेबल गोष्टी कचऱ्यात टाकून हात धुतल्यावर त्यांनी सायराला बाजूला घेऊन तिच्या कामाचं कौतुक केलं. त्यांचे डोळे आज नेहमीपेक्षा जास्त चॉकलेटी दिसतायत. त्यांचा चेहरा अजून जवळ आला. ओह नो, अजून अप्रिशीएट करायला किस करणार की काय.. ओके, आय हेट पै. बट आय डोन्ट हेट हिज लिप्स, ऑर फेस ऑर दॅट हेअर... तिने विचार केला आणि डोळे मिटून चेहरा वर केला. अचानक OT च्या दारामागून धाड धाड आवाज यायला लागला आणि तिचे डोळे उघडले.

"दी ss द, ऊठ ऊठ.." नेहा जोरात दार वाजवत होती.

"शिट! सात वाजले! साडेआठला सर्जरी आहे." ती पांघरूण उडवत उठून किंचाळली. दार उघडून बाथरूममध्ये जाऊन ब्रश करता करता ती नेहावर ओरडली. "मला आधी का नाही उठवलं बावळटss" गिझर आधीच ऑन होता. "कारण तू कधीच इतक्या उशिरा घरी नसतेस" किचनमधून नेहा ओरडली. "ठीक आहे, माझं पाणी घे आता अंघोळीला."

"थोर उपकार!" म्हणून पटापट आवरून सायरा बाहेर आली तर पार्किंगमध्ये ऍक्टिवा किकवर किक मारूनही सुरू होत नव्हती. "दीद मी नौकरीवर तुझ्यासाठी सर्च करायला घेते" नेहा खिडकीतून डोकं वर काढत हसत म्हणाली.

"शिट! आजच सगळं व्हायचं होतं." तिने ऍक्टिवाला लाथ मारली.

कशीबशी टॅक्सी मिळवून ती हॉस्पिटलकडे निघाली. रात्रभर अभ्यास करून तिने पूर्ण सर्जरी स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवली होती. तरीही एका लहान मुलांची सर्जरी म्हणून ती थोडी नर्व्हस होती. अक्षरं धुरकट होऊन तिला उशिरा कधी झोप लागली कळलंच नव्हतं. शिट! मला कधीच उशीर होत नाही, नेहमी मी अर्धा तास आधीच हजर असते आणि नेमकं आज... तिचं डोकं बधिर झालं.

शेवटी एकदाची टॅक्सी गेटपाशी येऊन थांबली. भराभर वर जाऊन OT च्या दारात डोकावताना तिला पैंच्या टिममधली नर्स दिसली. "सायरा, सर्जरी शुरू होने ही वाली है! डॉक्टर जानते है तुम लेट हो, पाच मिनिटमें चेंज करके आ जाओ. तब तक मै इधर सब हँडल करती हूं. सब तुम्हारा वेट कर रहे हैं, जस्ट फाईव्ह मिनिट्स, ओके?"

"थॅंक्यु सो मच!" म्हणत ती चेंज करायला पळाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle