बदतमीज़ दिल - ८

"अजून जास्तीत जास्त पंधरा मिनिटं" अनिश घड्याळात बघत म्हणाला.  विहानचे वडील खोलीत फेऱ्या मारत होते तर आई खुर्चीत नखं चावत बसली होती. आधीच त्यांना विहानला इथे आणायला उशीर झाला होता, हे ऑपरेशन सहा महिन्यांपूर्वीच व्हायला हवं होतं. सर्जरी कितपत यशस्वी होईल याची त्यांना शंका होती. "बिलिव्ह मी, ही'ज इन गुड हँडस." तो विहानच्या डोक्यावर थोपटत म्हणाला.

आधीच त्यांचा विश्वास नाही आणि त्यात हा होणारा उशीर त्यात भर घालतोय. तेवढ्यात खोलीचं दार उघडून नर्स आत आली. "सब रेडी है"
त्याने मान हलवून श्वास सोडला.

याचा अर्थ सायरा आली. कामाच्या पहिल्याच दिवशी ऊशीर! आजच्या सर्जरीत त्याला मदत करायला चेन्नईहून डॉ. कृष्णमूर्ती आले होते. त्याने याआधीही त्यांच्याबरोबर काम केले होते. ते निष्णात सर्जन होतेच पण तितकेच फटकळ! दोघांची टाइम टेबल ऍडजस्ट करून ही सर्जरी होणार होती. आज OT दिवसभरासाठी बुक होते अर्थात उशीर झाल्यामुळे सायरा फक्त त्याचा किंवा कृष्णमूर्तींचाच वेळ वाया घालवत नव्हती तर त्यांच्यानंतर येणाऱ्या टीमच्याही शेड्युलची वाट लावणार होती.

त्याने तिला तिथल्या तिथे फायर केलं असतं पण आज त्याच्यासाठी विहान ही प्रायोरीटी होती. सगळं लक्ष त्याला सर्जरीकडे द्यायचं होतं. त्याचा राग मनाच्या एका कप्प्यात दाबून टाकत त्याने विहानच्या वडिलांना पुन्हा एकदा समजावून सांगितलं. समोरच्या रिकाम्या खोलीत डॉ. कृष्णमूर्ती कॉलवर होते. "तीन बजे मेरा फ्लाईट हैं.आय होप शी वोन्ट कॉझ एनी मोर डीलेज."तो दार उघडून डोकावल्यावर त्याच्याकडे पाहून ते म्हणाले.

"वी विल गेट यू इन टाइम, डोन्ट वरी." त्यांना घेऊन तो OT कडे निघाला. एव्हाना विहानला OT मध्ये आणला होता. ते दोघेही स्क्रब्ज घालून तयार झाले. ऑपरेशन टेबलवर विहान एवढासा दिसत होता. एक नर्स त्याला हसवायचा प्रयत्न करत होती पण तो घाबरून इकडेतिकडे बघत होता. डॉ. गांधींनी ऍनेस्थेशीया दिल्यावर काही वेळ तो त्यांना टेन टू वन म्हणून दाखवत होता पण थ्री पाशी पोचताच तो आउट झाला.

टाइम टू रोल.

खांद्याने दार ढकलून तो आत आला. विहान घाबरू नये म्हणून इन्स्ट्रुमेंट्स अजून टेबलशेजारी मांडली नव्हती. त्याने टेबलपलीकडे नर्सशी बोलत इन्स्ट्रुमेंट सेट तयार करणाऱ्या सायराकडे पाहिलं. तिचा काही अपघात होऊन लागलं वगैरे असेल असा त्याचा अंदाज होता पण ती तर अगदी टवटवीत फुलासारखी दिसत होती. "सो हू'ज द कल्प्रिट?" के ने विचारलं.

"सॉरी डॉक्टर, दॅट्स मी.." ती हळूच म्हणाली.

"इफ आय हॅव टू बुक अ न्यू वन, यू विल बी पेईंग फॉर दॅट." ते खडसावून म्हणाले.

"आय हॅव ऑलरेडी अश्यूअर्ड यू. इट वोन्ट हॅपन." अनिश त्यांना गप्प करायला म्हणाला. त्याला सगळा फोकस फक्त सर्जरीवर हवा होता.

सायरा अजूनही स्टराईल केलेला इन्स्ट्रुमेंट बॉक्स धरून जागीच उभी होती. त्याने इशारा केल्यावर टीम पटापट कामाला लागली. नर्सने दोघांचे हात पुसले आणि डॉ. के ना एप्रन चढवला.

"सर्जरी आजच करायची आहे." त्याचे पुढे केलेले हात आणि थंड आवाज ऐकून ती पटकन एप्रन घेऊन पुढे आली. "डॉ. आनंदकडे हे काम नर्स करायची." ती हळूच म्हणाली.

"माझ्याकडे माझा असिस्टंट करतो." तो शांतपणे म्हणाला. तिचा हात पुरत नव्हता म्हणून तो जरासा वाकला. एप्रन चढवून कंबरेच्या दोऱ्या बांधताना तिच्या हातातून निसटल्या, पटकन चाचपून ती त्या बांधेपर्यंत त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. मागे जाऊन मानेवरची गाठ बांधताना तिचा हात पोचत नाही बघून तो जरासा वाकला. त्याला हळूच पुटपुटलेलं थॅंक यू ऐकू आलं. तरीही गाठ मारायला तिला लागणारा वेळ बघून तो वैतागलाच. एप्रन बांधून झाल्यावर ती बाहेर जाऊन पुन्हा ग्लव्हज बदलून आली आणि त्याच्या शेजारी तिच्या जागी जाऊन उभी राहिली. टेबल त्याच्या उंचीनुसार सेट केले होते. त्याने एकदा तिच्याकडे पाहिले आणि स्टूल मागवले. शेवटी एकदाची स्टुलावर उभी राहून ती त्याच्या आणि टेबलाच्या लेव्हलला आली. त्याने रोल कॉल सुरू केला. प्रत्येकाने आपापली पोझिशन सांगितल्यावर तिचा नंबर आला.

अनिशने मास्कवरून तिच्याकडे बघितले. तिने एकटीने सगळ्याला उशीर केला होता. डॉ. के ने एवढा अपमान केल्यावर कदाचित ही आताच पळून जाईल असं एक मन त्याला सांगत होतं. पण आनंदच्या म्हणण्यानुसार ही जर इतकी अनुभवी हुशार एम्प्लॉयी असेल तर नक्की यातून तरून जाईल.

तिचे रेशमी केस, तरतरीत नाक, ओठ सगळं झाकलेलं होतं तरी तिच्या डोळ्यांत त्याला  वेगळाच निर्धार दिसला. "वेल? आता काय करणार?" विचारल्यासारख्या त्याने भुवया उंचावल्या. तिने ताठ उभी रहात बोलायला सुरुवात केली. "सायरा देशमुख, डॉ. पै'ज सर्जिकल असिस्टंट. एव्हरीथिंग इज रेडी."

ती थांबल्यावर लगेच तो बोलू लागला, "टुडे वी आर ऑपरेटिंग ऑन अ टू यर ओल्ड. ही हॅज प्रिव्हीअस शंट इन हिज हार्ट. वी आर गोइंग फॉर ऍन ओपन हार्ट सर्जरी टू रिमूव्ह द शंट अँड करेकटिव् रिपेअर ऑफ टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो. ऑल सेट?" सगळीकडून होकार आल्यावर त्याने हात पुढे केला. "सायरा, टेन ब्लेड. हार्मोनिक स्काल्पेल."

---
आज काय फालतू नशीब आहे! कधी न होणारा उशीर आज झालाय त्यात डोक्यावर पै आणि त्याहून वैताग नवा सर्जन! पै परवडला इतका हा माणूस रिडिक्युलस आहे. पन्नाशीचा असला तरी फिट आहे. आल्यावर तयारी करताना दोनदा तरी त्याच्या सायकलिंगबद्दल बडबड केली. काम करता करता तिच्या डोक्यात विचार सुरू होते.

आल्या आल्याच त्याने तिचा इतका सार्वजनिक अपमान केल्यामुळे ती डॉ. के कडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करत होती. पहिल्या इंसीजननंतर अनिशने अँटिरिअर पेरीकार्डियमचा एक तुकडा तिच्याकडे दिला, तिने लगेच ग्लुटाराल्डहाईड! म्हणत तो सोल्यूशन मध्ये ट्रीट केला. हा तुकडा पुढे VSD पॅच म्हणून वापरायचा होता. हेपारीन! कॅनूलाज!! अनिश पटापट ऑर्डर देत पुढच्या स्टेपवर जात होता. सायराने  बायपास इन्स्टिट्यूट केल्यावर डॉ. के ने तोपर्यंत व्हेंट कॅथेटर बसवला. मधेच विहानच्या ओठांच्या आजूबाजूला निळसर टिंज दिसल्यावर ती ऑक्सिजन सॅच्युरेशन बघत होती.

तेवढ्यात मागून आवाज आला. "यू नो डॉ. पै, आय वुड नॉट पुट अप विथ ऍन असिस्टंट होल्डिंग उप धिस मच कॉस्टली सर्जरी." ती पुन्हा अनिशशेजारी उभी राहून सक्शन करत होती. ऐकताच तिचा चेहरा उष्ण झाला. ती खाडकन काहीतरी उत्तर देतादेता थांबली. "वेल, देन इट्स अ गुड थिंग दॅट धिस केस इज हॅन्डल्ड बाय हॉस्पिटल्स चॅरिटेबल ट्रस्ट!" अनिशने थंड आवाजात उत्तर दिले. "सायरा, पे अटेन्शन. आय नीड मोर सक्शन." तिने पूर्ण लक्ष सर्जरीवर केंद्रित केले.

पैंनी गप्प केल्यापासून डॉ. के फक्त कामापुरते बोलत होते. सर्जरी सुरू होऊन तीन तास होऊन गेले होते. अचानक भुकेने तिच्या पोटात गुरगुर झाली. ही माझ्या आयुष्यातली वर्स्ट सर्जरी असेल. थँक गॉड, कोणी ऐकलं नाही. "इज दॅट यू सायरा?" तिच्या हातून ब्लेड घेताना अनिशने विचारले.  तिने त्याची नजर टाळत होकारार्थी मान हलवली. "माझ्या OR मध्ये खाल्ल्याशिवाय कधीही पाऊल ठेवायचं नाही. हे काम खूप वेळखाऊ आणि टीडीअस आहे. आपल्याला कितीही तास इथे उभं राहावं लागतं. टाके घालता घालता तुला चक्कर आली तर काय करणार? माझ्या पेशंटचा जीव धोक्यात येईल. समजलं?" तो नेहमीच्या कडक आवाजात बोलला.

"येस सर." ती खालमानेने म्हणाली.

"सायरा, इज इट युअर फर्स्ट टाइम हिअर? आय हर्ड.." डॉ. के चा वैतागवाणा आवाज आलाच.

"येस, फर्स्ट विथ डॉ. पै." ती शांतपणे म्हणाली.

"हां! दॅट एक्सप्लेन्स! पै विल बी इन मार्केट फॉर न्यू असिस्टंट शॉर्टली." तो ख्या ख्या करत हसला.

बास हे सहन करण्या पलीकडे होतं. तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला. उफ, हेच बाकी होतं. सर्जरीमध्ये रडणं म्हणजे टोटल रिस्क.

"सायरा, कम्युनिकेट. माझं पूर्ण लक्ष पेशंटवर आहे. तुला ब्रेक हवा असेल तर तसं सांग." अनिश विहानवरचं लक्ष हलवता म्हणाला.

"येस, फाइव्ह मिनीट्स." ती नर्सला तिची जागा देऊन बाजूला झाली. अजून थोडं रडून ओला मास्क आणि ग्लव्हज बदलून ती पुन्हा जागेवर आली.

तिच्यासाठी आजचा दिवस कितीही वाईट असला तरी तिला कामात मजा येत होती. डॉ. पै एकहाती सगळं करत होते. खरं तर ह्या दुसऱ्या सर्जनच्या मदतीची काहीच गरज नव्हती. पहिल्याच सर्जरीत तिला खूप शिकायला मिळत होतं. शेवटी तिने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं तेव्हा एक वाजला होता. डॉ. पैं नी भराभर काम करून सर्जरी वेळेत आटोपली. हुश्श, हा के माणूस वेळेत निघेल एकदाचा. अनिशने टाक्यांना सुरुवात करून सुई तिच्या हातात दिली आणि दोन्ही सर्जन बाहेर गेले. तिने बारकाईने व्यवस्थित टाके घातले की पुन्हा विहानच्या अंगावर त्या वाईट खुणा रहायला नकोत. "तुमने अच्छा काम किया" शेजारची नर्स म्हणाली. ती अर्धवट हसली "हां? और उसके पहले का क्या?" "सोचो, जो भी होता है अच्छे के लिए होता है!" नर्स हसत म्हणाली.

ती स्टाफ लाऊंजमध्ये एकटीच टीपं गाळत समोरच्या ताटातली पोळीभाजी खात बसली होती. नेमकी आज भाजीसुद्धा शेपूची! डोळ्यातून अजूनच पाणी आलं. हा माझा शेवटचा चान्स होता. शिट! आय टोटली स्क्रूड अप! तिची हकालपट्टी होणार हे एव्हाना तिचं ठाम मत झालं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle