बदतमीज़ दिल - १३

संध्याकाळी घरी पोचल्यावरही तिचे शर्विलबरोबर टेक्स्ट्स सुरूच होते. तो तिच्यात इंटरेस्ट घेतोय हे दिसतच होतं पण ती अजून त्या पायरीवर पोचली नव्हती. त्याला दिल्लीहून यायला किती दिवस लागतील याचा काही अंदाज नव्हता, पण तो परत आला तरी डेटिंग वगैरे करायला ती मनाने अजून तितकीशी तयार नव्हती. कपडे इस्त्री करताना तिच्या फोनवर accident guy नाव ब्लिंक झालेलं नेहाने पाहिलं. झालं! ह्या सासूला स ग ळी इत्यंभूत माहिती द्यावीच लागली. 

"अग पण नको का म्हणतेस? यू आर सोss सिंगल! तुला झीरो बॉयफ्रेंड्स आहेत, झीरो!!" नेहा जीन्स फोल्ड करताकरता म्हणाली.

"आय नो.. पण.." काय एक्स्प्लेन करायचं ते तिचं तिलाच समजत नव्हतं. शर्विल सगळ्या गोष्टी टिकमार्क करतोय पण तिचं हृदय धडधडत नाहीये, त्याचा मेसेज आल्यावर नाव दिसलं की उत्सुकतेने तिचे डोळे चमकत नाहीयेत. "काय माहीत.. मी जेवणाची तयारी करायला घेते." ती खुर्ची सरकवून उठली.

"पण तू त्याला रिप्लाय केलाच नाहीस..." नेहा तिचा फोन उंचावून दाखवत ओरडली.

आह, हे असं व्हर्च्युअल गप्पा मारणं किती बोर आहे. नेहा आणि तिच्या फ्रेंड्सना काय मजा वाटते कुणास ठाऊक! "नेहा, प्लीज तू रिप्लाय कर ना. फक्त मी जास्त डेस्पो दिसणार नाही एवढी काळजी घे."

"थांब डझनभर हार्ट आईजच टाकते!" नेहाने मान वाकडी करत म्हणल्यावर तिने मान वळवून डोळे वटारले. "किडींग!!" नेहा पटापट टाईप करू लागल्यावर तिने कांदा चिरायला घेतला. शर्विल रात्री तिचे काय प्लॅन्स आहेत विचारत होता. तिने काहीतरी व्हेग उत्तर लिहायला सांगितले. तिच्या अस्तित्त्वात नसलेल्या सोशल/नाईट लाईफबद्दल त्याला कळायला नको. "मी त्याला सांगितलं, आय एम हिटींग द टाऊन विथ माय गर्ल्स अँड पेंटिंग द टाऊन रेड! पेंटिंग द टाऊन रेड म्हणजे काय ग एक्झॅक्टली?" नेहा म्हणाली.

"नेहाsss"

नेहा तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमधून वाचत होती. " तो म्हणतोय, तो हॉटेलची रूम सर्व्हिस घेऊन एकटा जेवतोय. ऑ... बिचारा."

आयतं जेवण आणि आयती साफसफाई! मला हे कधीही द्या! ती किंचित हसली.

थोड्या वेळाने तिच्या फोनवर इनकमिंग इमेलची बारीक शिट्टी वाजली. "डॉ. पै कोण आहेत?" नेहाने विचारलं.

तिच्या पोटात गपकन खड्डा पडला. "काय?" किसताना हातातला चीज ब्लॉक खाली टाकत ती ओरडलीच.

"ओह माय गॉड, तेच डॉक्टर! वेबसाईटवरचे!" नेहाची ट्यूब पेटली.

ती ओट्यापासून पळत दोन सेकंदात हॉलमध्ये पोचली आणि नेहाच्या हातून फोन हिसकावला. "ऑss माझं बोट.." नेहा दुखऱ्या बोटावर फुंकर घालत किंचाळली. धडधडून तिचं हृदय बाहेर येईल की काय अशी स्थिती होती. तिच्या हातावरचं चीज स्क्रीनवर पसरून स्क्रीन ब्लर झाली होती. हॉस्पिटलबाहेर मला इमेल? मेबी ही इज ट्राइंग टू बी फ्रेंडली. तिने थरथरत्या हाताने मेल उघडली. नेहा हे बघतच होती. तिने मेल वाचली आणि फुस्स! फुग्यातली हवाच गेली. शनिवारच्या सर्जरीची वेळ अर्धा तास पुढे ढकलली होती. मेलसुद्धा तिला पर्सनली न पाठवता सगळे सतराशे साठ लोक सीसीमध्ये होते.

"काय आहे?" नेहा रुमालात बर्फाचा खडा घेऊन बोट शेकवत पुढे आली. "विशेष काही नाही... आय काईण्ड ऑफ वर्क फॉर हिम. आऊच!" ती बोलतानाच बर्फाचा खडा तिच्या दंडावर बसला. "हो? कधीपासून?" नेहाने मुद्दाम गंभीर चेहरा ठेवत विचारले. खाली पडलेला बर्फ उचलून तिने पुन्हा मारायच्या आत सायराने उचलला. "पंधरा दिवस झाले. पण हे अजून नवीन आहे, मी त्या टीममध्ये टिकेनसं वाटत नाही." तिने मला काही फरक पडत नाही असं नाटक करत सांगितलं.

"आणि ही इमेल?"

"काही नाही, वर्क स्टफ!"

"पण तुला काहीतरी वेगळं पर्सनल असेल असं वाटलं, हो ना? माझ्या बोटाचा ऑलमोस्ट तुकडा पाडलास तू!" नेहा डोळे बारीक करून तिच्याकडे बघत म्हणाली.

तेवढ्यात शर्विलचा मेसेज वाजला. हुश्श म्हणत तिने नेहाला तिकडे डायव्हर्ट केले. नेहा मेसेज टाईप करायला लागल्यावर तिने आत जाऊन चीज किसायचे काम पुन्हा सुरू केले. पिझा अव्हनमध्ये सारून तिने हात धुतले. ओट्याला टेकून हात पुसता पुसता तिच्या डोक्यात प्रकाश पडला. शर्विलचा मेसेज आणि डॉ. पैंची इमेल. दोन्हीला तिचा रिस्पॉन्स किती वेगळा होता. इमेलच्या नादात अति एक्साइटमेंट मध्ये तिने नेहाचं बोट मुरगळलं होतं.

आय नो. हे सगळं आमच्यात असलेल्या चिडचिडीमुळे असणार. आमची वर्किंग रिलेशनशिप म्हणजे उकळता ज्वालामुखी आहे. ते मला कसंबसं सहन करतात. एवढंच नाही तर त्यांनी आमच्यात एक मोठी भिंत उभी करून ठेवलीय की मी प्रयत्न करूनही फ्रेंडली वागू नाही शकत. पण ती भिंत पाडायचा अजूनच प्रयत्न करते. काहीही सायरा, ग्रो अप. ही'ज जस्ट युअर बॉस! पण मला डॉ. आनंद इमेल करायचे तेव्हा असं काही वाटत नव्हतं. अर्थात तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मी त्यांची फेवरीट बच्ची होते. ही वॉज नाइस टू मी. सर्जरीमध्ये ते बोलायचे आणि कायम माझी चौकशी करायचे. कधीतरी म्युझिक कुठलं लावायचं यावरून वाद घालायचे.

डॉ. पैंबरोबर सर्जरीमध्ये कॅज्युअली गप्पा मारायचा मी विचारही नाही करू शकत. म्युझिक लावणं तर लांबच.

"शर्विल तुझ्यात जामच इंटरेस्टेड दिसतोय." अचानक नेहा म्हणाली आणि ती भानावर आली. नेहा तिचा मूड हलका करू पहात होती. ओह, मला मूड हलका करायची तरी का गरज पडावी? हू इज डॉ. पै? मी कशाला काळजी करतेय. काही दिवसांपूर्वी मला ते सहन होत नव्हते आणि आता मी अपसेट आहे की ते मला नोटीस करत नाहीत आणि माझ्याशी फ्रेंडली वागत नाहीत. कश्याला! आय डोन्ट वॉन्ट टू बी हिज फ्रेंड! तिने स्वतःला चिमटा काढला.

ह्या सगळ्याचं एक्स्प्लनेशन एवढंच आहे की आय जस्ट वॉन्ट हिम टू लाईक मी. लाईक डॉ. आनंद डिड. दॅट्स ऑल. मला एक हातोडा घेऊन त्या नाईट किंगच्या आजूबाजूचा बर्फ हळूहळू एकेक टवका फोडून काढायचाय जोपर्यंत ते डोळे उघडून म्हणत नाहीत, ओह सायरा? शी'ज नॉट बॅड. हम्म, हा प्लॅन चांगला आहे. जोरदार कामाला लागायला हवं. गो सायरा!

----

पुढचे जवळपास तीन महिने ती जिवापाड मेहनत करत होती. अगदी मॉडेल एम्प्लॉयी. रोज शिफ्टला वेळेआधी हजर असणे, प्रत्येक सर्जरीआधी सगळ्या स्टेप्स समजून पाठ करणे, कामात जीव ओतून, पूर्ण लक्ष देऊन काम करणे, सगळ्यांशी आदराने आणि नम्रपणे वागणे आणि नवीन गोष्टी शिकून घेणे हे सगळं ती अगदी बिनचूकपणे करत होती. नर्सेस तिला सारखं सांगत होत्या की आता सर्जरीज किती सरळ, विना अडथळा आणि बऱ्याच कमी वेळात होत आहेत. डॉ. पैंची टीम इतकी फ्लॉलेस याआधी कधीच नव्हती. डॉ. पैंकडून आदर मिळवण्यासाठी तिने अक्षरशः जीवाचं रान केलं होतं. सगळेजण हे नोटीस करत होते, फक्त डॉ. पै सोडून.

उलट त्यांचा तिच्याबद्दल ऍटीट्यूड अजूनच कडक झाला होता.

तो विनाकारण तिच्यावर चिडचिड करत होता. प्रत्येक बारीकश्या चुकीवरही ओरडत होता, अगदी तिने एखादं इन्स्ट्रुमेंट द्यायला किंचित उशीर झाला किंवा त्याने प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला जराही वेळ लागला किंवा तिने अगदी लांबलचक सर्जरीत बाथरूम ब्रेक मागायची हिंमत केली तरीही त्याचा पारा चटकन चढत होता. सगळे सर्जन्स असा ब्रेक देतात, इव्हन काहीजण असिस्टंट बदलतातसुद्धा.

OT च्या बाहेर तो कधी दिसतच नाही. ती स्क्रब बदलून बाहेर येईपर्यंत तो गेलेला असतो. कॉरिडॉर मध्ये दिसला नाही तर त्याच्या केबिनमध्ये असतो जिथे शुभदा "डोन्ट डिस्टर्ब हिम" म्हणत जाऊ देत नाही. आजही शुभदा "ऐसा मैने उस्को कब्बी नई देखा. इट सीम्स समथिंग इज गोइंग ऑन इन हिज पर्सनल लाईफ."  असंच म्हणत होती.

पण आज तिला शुभदाचा सल्ला नको होता. ती आता हे सहन करू शकत नव्हती. रोज सर्जरीमध्ये त्याच्या समोर सात आठ तास उभं राहून नीट काम करूनसुद्धा त्याचा असा ऍटीट्यूड सहन करण्यासारखं तिने काहीच चुकीचं केलं नव्हतं.

तिचं काम अचूक होतं. ती वेळच्यावेळी येत होती.  त्याने न बोलणं, प्रोफेशनल वागणं मान्य, त्याला फ्रेंडली वागायचं नव्हतं तेही मान्य पण याचा अर्थ त्याने अख्या टीममध्ये मुद्दाम फक्त तिच्याशी इतकं रूड वागावं असं नव्हे.

ती शुभदाच्या डेस्कसमोरून पुढे जाऊन त्याच्या दारावर नॉक करून थांबली. दार बंदच होतं. तिने दाराला कान लावून कानोसा घेतला, फोनही चालू नव्हता. तिने पुन्हा नॉक केलं. "डॉ. पै, मे आय हॅव अ वर्ड प्लीज?" ती शांतपणे पण मोठ्याने म्हणाली. आतून खुर्ची सरकवण्याच्या आवाज आणि मागोमाग पायरव. दार उघडलं. त्याने तिच्याकडे थंड नजरेने बघितलं. स्क्रब्जच्या जागी आता स्लेट ब्लू शर्ट आणि ब्लॅक ट्रावझर्स आल्या होत्या. ते परफेक्ट सिल्की केस बऱ्याचदा हात फिरवल्यासारखे अस्ताव्यस्त होते. तरीही तिने बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून फोकस एकाच गोष्टीवर ठेवला, मला याचा किती राग येतोय!

"येस?" त्याने भुवई उंचावली.

तिने न घाबरता हनुवटी उंचावून त्याच्या नजरेला नजर दिली. "मला माझ्या जॉब परफॉर्मन्सबद्दल बोलायचंय."

"म्हणजे?" त्याच्या भुवया जवळ आल्या.

"हो, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून अजून काय एक्सपेक्ट आहे? शिफ्टला अजून लवकर येणं, अजून फास्ट रिस्पॉन्स टाइम, अजून मोठा ब्लॅडर की अजून काही?"

तिच्या तिरकस बोलण्याची त्याला मजा वाटली नाही.

"तुझं काम चाललंय तसं ठीक आहे." तो मागे सरकून दार लावू लागला तेवढ्यात तिने दारात पाय घातला. "माझं काम चांगलं आहे तर तुम्ही माझ्याशी इतकं वाईट का वागताय? पहिल्या दिवशी उशीर केल्याबद्दल मला अजून माफ केलं नाहीये का? कारण ही अपॉर्च्युनिटी मी किती सिरियसली घेते हे मी माझ्या कामातून तुम्हाला दाखवलंय."

त्याने तिच्या दारात अडकलेल्या स्नीकरकडे पाहून पुन्हा वर पाहिलं. "सायरा! तुला HR कडे जाऊन चार फॉर्म भरायची इच्छा आहे का? कारण तू पाय हलवला नाहीस तर आपल्या दोघांना बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील जसं की कशामुळे मी तुझ्या पायावर दरवाजा लावला."

"गुड! आता तुम्ही मला जखमी करायची धमकी देताय." ती हवेत हात उडवत म्हणाली.

आईशपथ एक क्षण तिला त्याच्या डोळ्यात जरा हसल्यासारखी चमक दिसली. पण लगेच त्याच्या चकाचक पॉलीश्ड शूजने तिचा पाय बाहेर सरकवला आणि दार बंद झालं.

"व्हॉट अ शो ऑफ प्रोफेशनॅलिझम डॉक्टर!" ती बंद दारासमोर पुटपुटली.

"मैने पहले ही वॉर्न किया था" शुभदा डेस्कवरून तिच्याकडे रोखून बघत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle