बदतमीज़ दिल - १४

शनिवार तिचा घातवार ठरला.

डॉ. पै OT च्या दारातून आत आले तेव्हाच वाईट मूडमध्ये दिसत होते. ऑपरेशन सुरू असतानाही त्यांचे थंड डोळे तिच्यावर रोखलेले होते. त्याचा काय प्रॉब्लेम आहे तिला कळत नव्हतं पण जे काही आहे तिकडे दुर्लक्ष करून तिला पुढे जायचेच होते. त्याची निगेटिव्ह एनर्जी बाजुला सारून तिचे काम नीट पाडायचे होते पण ही कठीणच गोष्ट होती.

"सायरा, ती क्युरेट मला मिळणार आहे की आता दुसऱ्या कोणाला बोलवू?"

तिने योग्य उत्तर देण्याआधी जीभ चावली. "मी करेक्ट साईज बघत होते." क्युरेट देताना ती म्हणाली.

"मग वेळ वाया गेला, ही बरोबर नाहीये."

येस इट इज. यू इगोमेनियाक!

"तुम्हाला दुसरी हवी आहे का डॉक्टर?" ती आवाजात अति गोडवा आणत म्हणाली.

"येस सायरा." तो एखादया ढ मुलीला समजावून सांगण्याच्या सुरात म्हणाला. "आय नीड अ करेक्ट वन." OT मध्ये शांतता झाली. सगळेजण कामात असल्याचं दाखवत असले तरी त्यांचे कान या संभाषणात होते. सायरा किती आणि कुठपर्यंत ऐकून घेते हे सगळ्यांना बघायचं होतं.

सगळे तिचा स्फोट व्हायची वाट बघत होते पण तिने एक खोल श्वास घेतला आणि एखाद्या संत माणसासारखी "ऑफ कोर्स, लगेच देते" म्हणून ती ट्रे मध्ये बघू लागली. ट्रे उचलताच शेजारून आय व्ही चेक करणाऱ्या नॅन्सीचा तिच्या कोपरावर धक्का लागला आणि खळ्ळ.. अक्खा स्टराईल इन्स्ट्रुमेंट्सचा ट्रे खाली पडला. तिथल्या सगळ्यांचा श्वास एकदम अडकला. काहीजण शॉकमध्ये फरशीवर बघू लागले. "दुसरा सेट रेडी आहे का?" डॉ. पै नी पटकन विचारले. "नाही, अर्धवट आहे." तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिले. तिने पुढचा सगळा गोळीबार ऐकायला डोळे घट्ट मिटून घेतले. आज मरण पक्कं!

"सगळं पटापट गोळा कर आणि ऑटोक्लेवमध्ये टाक. लगेच! नॅन्सी, टेक हर प्लेस विथ रिमेनिंग इन्स्ट्रुमेंट्स." तो पटकन म्हणाला.

तिने सटासट ग्लव्हज काढून कचऱ्यात फेकले आणि गुढघ्यावर बसून सगळी इन्स्ट्रुमेंट आणि टेबलखाली घरंगळलेले स्क्रू वगैरे गोळा केले. दुसऱ्या असिस्टंटबरोबर मोजून पूर्ण सेट असल्याची खात्री करून ती ऑटोक्लेवकडे पळाली. सगळा सेट स्टराईल व्हायला जेमतेम वीस मिनिटं लागली. ती स्क्रब होऊन सगळा सेट घेऊन परत आल्यावर पूर्ण सर्जरी कुठल्याही अडचणीशिवाय, थोड्याश्या उशिराने का होईना पूर्ण झाली.

इतका वेळ तिने सगळी भीती मनाच्या दुसऱ्या कप्प्यात दाबून ठेवली होती. डॉ. पै तिला टाके बंद करायला सांगून बाहेर गेले. तिने सुटकेचा निःश्वास टाकला. तिचं डोकं बधिर झालं होतं. ती किती दुर्दैवी आहे याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतकं काम करूनही शेवटी सगळं युनिव्हर्स डॉ. पैंच्याच फेवरमध्ये होतं.

"सायरा, आर यू ओके? मैं हेल्प करू क्या?" नॅन्सीने शेजारून तिला विचारलं.

"नो नो, आय एम डूइंग इट." तिने टाके घालायला सुरूवात केली. कदाचित ह्या हॉस्पिटलमधलं तिचं हे शेवटचं काम असेल.

---
त्याने गरम पाण्याच्या नळाखाली हातावरचा साबण धुवायला सुरुवात केली तोच OR चं झुलतं दार ढकलून नॅन्सी  डोकावली. "एक मिनिट बात कर सकती हूं क्या डॉक्टर?"

त्याच्या आणि विकेंडमध्ये अजून कामाचा डोंगर उभा होता. काम जास्त आणि वेळ कमी. तो नॉर्मली वीकेंडला पण त्याच्या केबिनमध्येच असतो पण शुभदा नसल्यामुळे कामं जरा मंदावतात. एखादा ट्रेनीही नसतो त्यामुळे पटकन कॉफीसुद्धा हातात आणून मिळत नाही. क्लिनिंग स्टाफ तो असताना आतच येत नाही कारण त्याला त्याच्या वस्तू हलवलेल्या आवडत नाहीत. त्याच्या पसाऱ्यालाही मेथड इन मॅडनेस आहे. त्याने केलेला कचरा तो स्वतःच बिनमध्ये टाकतो.

पण हा वीकेंड नेहमीपेक्षा वेगळा आहे. उद्या नीना म्हणजे आत्येबहिणीचं लग्न आहे. अर्थात लग्न आधीच कोर्टात झालंय, उद्या फक्त रिसेप्शन कम पार्टी आहे. त्याला जरा लवकर निघून ड्राय क्लीनरकडून त्याचा सूट कलेक्ट करायचा होता.

सायराने सर्जरीमध्ये डीले केला नसता तर एव्हाना तो बाहेर पडला असता. "क्या चाहीये?" त्याने वळून नॅपकिन उचलला. ती दार सोडून पुढे आली. "जो हुआ उसमे सायरा का कोई फॉल्ट नहीं है. आप उसको प्लीज पनिश मत करो. आपने शायद नोटीस नही किया बट शी इज रिअली गुड. हम सुबोध के साथ काम करते थे, उसकी कंपॅरिझनमे दीज डेज आर लाईक हेवन."

त्याने नॅपकिन लॉंड्री बास्केटमध्ये फेकला.

त्याचा पेशन्स संपतोयसा बघून ती पुढे पटकन म्हणाली." ओके उसने आज डीले किया, लेकीन हर बार उसने बहुत एफिशियंटली काम किया है. आपका बहुत प्रोसिजर टाइम बचाया है."

मला माहिती आहे.

"एक्सेप्ट टुडे, शी इज योर बेस्ट असिस्टंट. प्लीज थिंक अबाउट हर."

"व्हॉट डू यू थिंक? आय एम गोइंग टू फायर हर?"

घाबरून तिचे डोळे विस्फारले."प्लीज डोन्ट!  उसने मेरा काम भी आसान किया है."

"थँक्स फॉर युअर ओपिनियन नॅन्सी, बट आय एम नॉट गोइंग टू फायर हर. हॅव अ नाइस वीकेंड." तो तिच्याशेजारून जाताजाता म्हणाला.

स्क्रब्ज बदलून त्याने नेहमीचा व्हाईट शर्ट आणि ग्रे ट्रावझर्स घातल्या आणि केबिनमध्ये येऊन पेपरवर्क संपवत बसला. शेजारी खिडकीच्या काचेवर आदळणारा मुसळधार पाऊस दिसताच त्याने न्यूज बघितल्या. दोन दिवस सलग वादळी पावसाचा इशारा फ्लॅश होत होता. झालं! आजपासून तुंबई सुरू! त्याने वैतागून फाईल्स लॅपटॉपबरोबर बॅगमध्ये भरल्या, उद्या घरीच थांबून हे संपवू.

तो स्टाफ लिफ्टमध्ये शिरला तेव्हा आधीच आत गर्दी होती पण त्याला बघताच लोकांनी जागा रिकामी करून दिली. बॉस असल्याचे फायदे! लिफ्टचा दरवाजा ग्राउंड फ्लोरच्या पार्किंगमध्ये सरकून उघडला. तो त्याच्या कारच्या दिशेने वळणार इतक्यात त्याला मेन एक्झिटपाशी भिजून ऍक्टिवा ढकलत पुन्हा पार्किंगमध्ये आत आणणारी सायरा दिसली. तिने स्क्रब्ज बदलून जीन्स आणि तेच पिवळं जॅकेट घातलं होतं. तेवढ्यात तिने गालांवर जोरजोरात पालथा हात फिरवून अश्रू पुसले.

ओह, ही रडतेय... शिट! त्याने आपल्या कारकडे नजर टाकली, पटकन निघून जाऊ शकतो. त्याने पुन्हा पाहिलं तर तिने ऍक्टिवा बाजूला पार्क केली आणि पाठीला सॅक लावून बाहेर जायच्या तयारीत होती. रस्त्यावर आत्ताच घोटाभर पाणी वहात होतं. कधीही रस्त्याची नदी आणि चिखलात ट्रॅफीकचा मुरांबा होणार होता. बाहेर सगळीकडे काळोखी दाटून विजा कडाडत होत्या.

फ*!

"सायरा!" तो मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज सहज तिच्यापर्यंत पोचला. "थांब" तो पुढे जात म्हणाला.

तिने थांबून मागे वळून पाहिलं. डोळे पुन्हा पुसून तिने मान हलवली. "माझी शिफ्ट संपलीय. मला आत्ता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. जे काय ओरडायचं, ऐकवायचं असेल ते सोमवारी ऐकवा. मी घरी जातेय."

"कशी?"

तिने पाण्याने भरलेले डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं." कशी म्हणजे?"

"घरी कशी जाणार? तुझी टू व्हीलर बंद पडलीय."

तो ओरडत नाही कळल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली. "ओह! बसने." ती खांद्यावर सॅकच्या बेल्टमध्ये अंगठा अडकवत म्हणाली."गेटपासून थोडं पुढे चालत गेलं की एक बस स्टॉप आहे."

"आत्ता? ह्या पावसातून? थोड्या वेळात बस ट्रॅफिकमध्ये अडकतील. उबर वगैरे का करत नाहीस?"

"एकही कॅब अव्हेलेबल नाहीये. एखादी आलीच तर तिप्पट भाडं सांगतायत. इट्स ओके, मला सवय आहे बसची." तिचा आवाज जरा मोकळा झाला होता.

तिच्याकडे छत्रीसुद्धा दिसत नाहीये. जॅकेट आधीच भिजलंय. "तू पूर्ण भिजून गारठशील, बस लवकर येईलशी वाटत नाही."

तिने किंचित हसून एक पाऊल मागे घेतलं." मी जाईन नीट. तुम्ही काळजी नका करू."

काळजी! दुर्दैवाने त्याला तिची काळजी वाटत होती. गेले तीन महिने तो तिची काळजीच करत होता.

सगळी शर्विलची चूक होती. रोज रोज शर्विल त्याला सायराबरोबरच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स पाठवून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रोग्रेस आहे ते सांगून त्याला वात आणत होता. सायराचे टेक्स्ट आणि स्मायलीज त्याच्या अजूनच डोक्यात जात होत्या. रिलेशनशिप! किती हास्यास्पद आहे. ते दोघं कुठे बाहेर गेले नाहीत, फोनवर बोललेही नाहीत, आहेत ते फक्त टेक्स्टस्. जर नंबर ऑफ टेक्स्ट्स वर रिलेशनशिप होत असती तर तो एकाच वेळी त्याच्या कामवाली, लॉंड्रीवाला आणि स्वीगी नाहीतर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये असता!

"एवढ्या पावसात मी तुला बस स्टॉपवर थांबू  देणार नाही. चल, मी सोडतो तुला."

तिच्या हसण्याचा आवाज पार्किंगमध्ये घुमला. "नको. त्यापेक्षा मी चालत जाईन. हार्डली अडीच - तीन किलोमीटर आहे."

"मी रिक्वेस्ट करत नाहीये, ऑर्डर समज. सोमवारी मला तुझी न्यूमोनिया झाला म्हणून सिक लीव्ह नकोय." तो गंभीर होत म्हणाला.

तिने रागाने पाहिलं."तुम्ही हे कॉलेजमध्येच शिकलाय की नुसतं भिजल्यामुळे न्यूमोनिया होत नाही."

ती वळून जायला निघाली इतक्यात त्याने तिच्या सॅकचा बेल्ट ओढून सॅक काढून घेतली आणि हातात धरून कारच्या दिशेने चालू पडला. ती मागे येतेय की नाही याची त्याला फिकीर नव्हती.

"डॉ. पै!" ती मागून भराभर चालत ओरडली.

"तुझी शिफ्ट संपली ना? आता मला अनिश म्हणू शकतेस." तो चालत राहिला.

"डॉक्टर!" ती मुद्दाम म्हणाली."प्लीज मला माझी सॅक द्या नाहीतर मी सिक्योरिटी बोलावते."

"अनिश! आणि जर तू सिक्योरिटी बोलवत असशील तर संतोषला बोलाव. तो जरा तरुण आहे, माझ्यामागे पळू शकेल. तशीही मी सॅक घेऊनच जाणार आहे." बोलतानाही त्याला आता हसायला येत होतं. सॅक अगदीच हलकी होती. "ह्यात आहे काय नक्की?"

"पाण्याची बॉटल आणि एक टपरवेअरचा डबा." ती अजूनही त्याला गाठू शकली नव्हती.

टपरवेअर! त्याने मागे वळून ती कुठवर आलीय ते पाहिलं. "तू पुन्हा सांदण आणलं होतं?"

तिने मान हलवली "मागच्या वेळी शुभदाला मिळालं नव्हतं."

"मागच्या वेळी मलाही मिळालं नव्हतं." त्याने मुद्दा मांडलाच.

ती फिस्कारून हसली. "अँड आय डोन्ट फील बॅड अबाउट इट."

तिला त्याचं हसू दिसू नये म्हणून त्याने पुन्हा समोर बघितलं. ब्रूटली ऑनेस्ट! नेहमीप्रमाणे. OR मध्ये ती अगदी आज्ञाधारक असते पण OR च्या बाहेर कुठेही? शक्यच नाही!

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle