बदतमीज़ दिल - १५

गाड्यांची एक रांग पास करून तो पुढे डावीकडे वळला आणि डॉक्टरांसाठी राखीव पार्किंगकडे जाऊन तिची वाट बघत थांबला. ती येऊन पहिल्याच ब्लॅक ऑडीसमोर थांबली.

"माझी नाहीये." तो गालात हसत म्हणाला.

"राईट!" ती पुढे होऊन शुभ्र चमकत्या लेक्ससपाशी गेली.

त्याने नकारार्थी मान हलवली आणि पुढे होऊन चालू लागला.

पुढच्या लालभडक फरारीकडे ती बघतच राहिली.

"डॉ. पंडित! एका सेलिब्रिटी पेशंटने गिफ्ट दिलीय" तो मागे न बघता म्हणाला.

ओहो, चंदाचे कॉस्मेटिक सर्जन! लाईफ इन प्लास्टिक, इट्स फँटास्टीक! तिने मान हलवली.

ती त्याच्या मागोमाग गेली, हां हीच! ब्लॅक मर्स जीएलसी. पण तिने मान उंचावून पाहिलं तर तो पलीकडे जात होता. रिमोटची बीप बीप ऐकू आली. गाडीचे टेललाईट्स फ्लॅश झाले. तिथे ती होती, त्याने मेडिकल कॉलेजपासून चालवलेली कार! तिने पुढे जाऊन पाहिलं तर तिथे इवलीशी मरून होंडा जॅझ उभी होती. ती चेहऱ्यावर आश्चर्य न दाखवता दार उघडून ड्रायव्हर सीटशेजारी बसली.

"इट्स गॉट गुड मायलेज आणि ट्रॅफिकमध्ये बरी पडते. ऑल्सो, आय एम नॉट इंटू कार्स!" तो म्हणाला.

"तुम्ही टांगा नाहीतर बैलगाडी वापरली असती तरी मला धक्का बसला नसता." ती नाक मुरडत म्हणाली.

त्याने हसत मागचं दार उघडून त्याची लॅपटॉप बॅग आणि तिची सॅक ठेवली आणि तिच्या शेजारी येऊन बसला. "भयंकर ट्रॅफिक असणार.."

शांततेत त्यांनी सीटबेल्ट लावले. "कुठे राहतेस तू?" गाडी मुख्य रस्त्यावर आल्यावर तो म्हणाला.

"वेस्ट. साईरूप नगर, पाचवी गल्ली."

"गुड, मला तिकडेच रस्त्यात एक काम आहे. तुला सोडायच्या आधी पाच मिनिटं थांबलो तर चालेल ना?"

"तुम्ही ज्या पद्धतीने माझी सॅक घेतली आणि मला गाडीत बसायला लावलं त्यावरून माझ्याकडे काही ऑप्शन नाहीच्चे!"

अच्छा, ही अजून नाक फुगवून बसलीय. फाईन. "वी आर ऑन द सेम पेज. नाइस!"

तिला त्याचं बोलणं अजिबात मजेशीर वाटत नव्हतं.

त्याने स्टिअरिंग आणि समोरचा रस्ता यावर लक्ष केंद्रित केलं होतं, जरी तिच्याकडे बघावं वाटलं तरी.

खूप काळानंतर त्याच्या कारमध्ये शेजारच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं. तिच्याइतकं इंटरेस्टिंग तर कोणीच नाही. ती ह्या छोट्या जागेत सुद्धा लहानशी दिसतेय. तिने मांडीवर हात एकमेकांत गुंफून ठेवले होते. हां! हातात सेलफोन नाहीये. तो खुषीत हसला. आत्तापर्यंत तिने शर्विलला टेक्स्ट करून तिचा दिवस कसा गेला सांगायला हवं. आत्ता तिने सांगितलं असतं की तिच्या शैतान बॉसने तिला रडवलं आणि आता घरी सोडतोय म्हणून.

त्याने एका हाताने टाय सैल केला. अचानक त्याला घसा दाटून आल्यासारखं वाटलं.

ट्रॅफिक कापत दोन रस्ते पुढे गेल्यावर तिला बोलायचं बळ आलं. "आज जे झालं ते सोडून मी तुम्हाला काही त्रास दिलाय का?" गुड! फायनली! "गेले तीन महिने तुम्ही माझ्यावर चिडचिड करताय आणि त्याचं कारणही मला माहित नाहीये."

कार पुढच्या गाडीला धडकता धडकता थांबली. पुन्हा एक रेड सिग्नल.

"यू नो, मला अ‍ॅक्चुली असं वाटत होतं की आपला प्रवास शांततेत होईल." तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला."तुला कधी असं नाही वाटत का, की याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये."

"वाटलं होतं, बट इट डझंट मेक सेन्स. तुम्ही फक्त माझ्यावर रागावता. बाकी कोणी उदा. नॅन्सीने एक मिनिट लेट आयव्ही कनेक्ट केली तर तुम्ही चिडत नाही पण मी असं काही केलं तर लिटरली डोळ्यांनी माझा खून करता." ती पटकन म्हणाली.

हॅ! असं काही नाहीये आणि असलंच तर मी नोटीस केलं नाही. त्याने हनुवटीवर वाढलेल्या स्टबलमधून हात फिरवला.

"देअर आर फ्यू थिंग्ज ऑन माय माईंड." तो शांतपणे म्हणाला.

"वर्क?"

"हम्म, काही वर्क रिलेटेड आहेत. मी एक ग्रँट प्रपोजल सबमिट केलंय त्याला उत्तर यायला वेळ लागतोय."

"हो, शुभदा असं काहीतरी सांगत होती."

"तो स्ट्रेस आणि आणखी नव्या केसेस ऍक्सेप्ट केल्यात त्याबरोबर ऍडिशनल पेपरवर्क वगैरे प्री ऑप, पोस्ट ऑप.. यू नो द ड्रिल.." तो रस्त्यावर नजर ठेवत म्हणाला.

"ओके.. पण म्हणून तुम्ही तो सगळा स्ट्रेस माझ्या एकटीवर का काढताय? जिमला जा, बीनबॅगवर पंच मारा." ती ताडताड बोलली.

"पंचिंग बॅग म्हणतात तिला!" तो हसू दाबत म्हणाला.

"तेच ते." तिने ओठ चावला."आणि अजून काय, काही वर्क रिलेटेड आणि बाकी काय?"

आता रस्ता बदलायची वेळ आलीय. त्याला एकीकडे स्वतःपाशी कबुली द्यायची होती की तिच्या त्याच्या कझीनबरोबरच्या टेक्स्टिंग आणि फ्लर्टिंगमुळे त्याला त्रास होतोय. पण शर्विल त्याचा चुलतभाऊ आहे हेच तिला अजून माहीत नाहीये. त्याने शर्विलला विचारलंही होतं पण त्याचं म्हणणं 'ही गोष्ट त्यांच्या बोलण्यात ऑर्गनिकली अजून आली नाही.' व्हॉट द हेल! त्याने शर्विलला 'मग आर्टिफिशिअली आण' म्हणून सांगितलं होतं. सिम्पल! पण शर्विलला तिला इतक्यात हे सांगून घाबरवायचं नव्हतं. जसं काही त्याच्याशी नातं असल्यामुळे शर्विलवर धब्बा वगैरे लागणार होता. शर्विलच्या लॉजिकला काही अर्थ नव्हताच. पण स्वतः तिला हे न सांगण्याचा शर्विलला दिलेला शब्द त्याने पाळला होता.

ह्या क्षणापर्यंत तरी. आत्ता तिला कारमध्ये बसवून हे अगदी नॉर्मल असल्यासारखा तो वागत होता. तिच्या फ्लोरल परफ्यूमचा हलकासा गंध त्याला जाणवत होता. सीटमध्ये तिची प्रत्येक हालचाल तो नोटीस करत होता. ती आरामात बसायचा प्रयत्न करतेय की त्याच्यापासून शक्य तेवढं लांब बसायचा? तिचा गाल ऑलमोस्ट खिडकीच्या काचेला टेकलाय.

ते दोघं चॅट करतायत याचा मला त्रास व्हायला नको, आणि मी तेच स्वतःला पुनःपुन्हा सांगतोय. शर्विलला हवं तसं वागू दे, माझं लाईफ आहे तसं सुरू राहील. हाच माझा प्लॅन होता, पण तो यशस्वी होतोयसं वाटत नाही. तिच्यामते मी रिअल ए*होल आहे. आय एम द डेव्हील!

"आता विषय बदलूया" म्हणत त्याने एफ एम प्ले करायला बटनाकडे हात नेला. कदाचित टॉप टेन गाणी ऐकून ही विसरून जाईल.

"नाही." तिने व्हॉल्यूम कमी म्हणजे जवळपास बंदच केला. "आता आपण खऱ्या कारणाकडे येऊया. दॅट इज यू हेट मी!"

त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या."नो, आय डोन्ट हेट यू."

"अरे हो सॉरी, काय होतं ते? मी तुम्हाला आवडत नाही. दोन्हीत काय फरक आहे!"

तो गप्प राहिला, गाडीत हाताला चटका बसेल इतकं टेन्शन तयार झालं होतं. त्याने एफ एमचा आवाज किंचित वाढवला, गाडी मेन रोडवरून गल्लीत आत घातली आणि एफ एमवर आधीचं गाणं बदलून 'दीवाना हुआ बादल' सुरू झालं. तिने एक श्वास सोडत हाताची घडी घातली.

"धिस इज नॉट वर्किंग आउट, आय थिंक आय शुड क्विट!"

त्याला एकदम कोणीतरी पोटात जोरदार बुक्का मारल्यासारखं झालं. "काय!? पण का?" तो कष्टाने डोळे रस्त्यावर ठेवत म्हणाला. "आज ओटीमध्ये जे झालं त्यामुळे?"

"हो, म्हणजे तो एक भाग झाला. पण मला ओटीमध्ये तुमची पर्सनॅलिटी, तुमचा प्रेझेन्स घाबरून टाकणारा वाटतो. माझी प्रत्येक कृती पारखली जातेय, तुम्ही मला जज करताय असं वाटतं. तुम्ही प्रत्येक वेळी मी किती मंद आहे किंवा तुमच्या स्पीडशी मॅच करू शकत नाही असे वागता. मेबी वी आर नॉट अ गुड मॅच. मला वाटत होतं मी प्रेशर हँडल करेन. डॉ. आनंदबरोबर काम करताना सगळ्यांना मोकळं आणि फ्रेश वाटायचं, मागे म्युझिक सुरू असायचं. वी वर हॅपी, बट यू.."

"मी व्हॉट?" त्याला पुढे ऐकायचंच होतं.

"यू आर इंटिमिडेटिंग." ती पुटपुटली.

त्याने गाडी पटकन वळवून दुकानासमोर पार्क केली आणि तिच्याकडे पाहिलं. ती काचेतून सरळ समोर पहात होती. काचेवर पावसाच्या माऱ्यातून अर्थातच समोरचं काहीच दिसत नव्हतं.

त्याने किंचित खाकरून बोलायला सुरुवात केली. "ओके, मला जेवढं समजलं त्यावरून प्रॉब्लेम बहुतेक मी आहे."

'बहुतेक' मी! ती सीटवर मागे डोकं टेकून हसत सुटली. तिचे ओलसर केस चेहऱ्यावरून पाठीवर ओघळून इथेतिथे चिकटले होते. हसताना डोळे बंद होऊन पापण्यांचे लांब काळेभोर केस तिच्या गोबऱ्या गालांना स्पर्श करत होते. तो स्थिर बसून फक्त तिच्याकडे बघत राहिला. त्याने हात स्टेअरिंगवर घट्ट धरून ठेवले कारण कुठल्या तरी वेड्या कारणाने त्याला पुढे होऊन तिला स्पर्श करण्याची तीव्र इच्छा झाली होती. बोट तिच्या नाकाच्या शेंड्याला लावून खाली आणत तिच्या ओठांवरून फिरवावंसं वाटत होते जे सध्या त्याच्यामुळे पसरून हसत होते.

हळूहळू ती भानावर येत शांत झाली. "प्रॉब्लेम 'बहुतेक' मी आहे. हो? खरंच?" हसून तिच्या डोळ्याच्या कडेला पाणी आलं होतं ते पुसत ती म्हणाली.

भानावर येत त्याने मान फिरवून बाहेर पाहिलं.  कारच्या बाहेर पडलं पाहिजे. पाऊस गेला खड्डयात.

"तू इथेच बस. मी पाच मिनिटात आलोच." म्हणून तो बाहेर पडला. नशिबाने सूट रेडी होता तो कलेक्ट करून काही मिनिटात बाहेर आला तेव्हा सूटवर प्लास्टिकची गारमेंट बॅग होती पण तो स्वतः भिजत होता. त्याने पळत येऊन मागचं दार उघडलं. ती साईड मिररमधून त्याच्याकडे बघत होती. पावसाने त्याच्या कपाळावर ओघळलेले केस, भिजून ऑलमोस्ट ट्रान्सपरंट होऊन त्याच्या कातीव ऍब्सना चिकटलेला पांढरा शर्ट. सायरा मागे वळून त्याच्याकडे बघत म्हणाली. "तुम्ही पूर्णच भिजलाय." टेल मी समथिंग न्यू! त्याने सूटची बॅग व्यवस्थित सरळ करून सीटवर ठेवली.

तो परत आत येऊन बसला तेव्हा ती बरीच शांत झाली होती. त्यांने भिजलेल्या शर्टच्या बाह्या उघडून कोपरापर्यंत फोल्ड केल्या. हाताने केस विस्कटत केसातले पाणी झटकले. कारमधल्या गरम हवेने थोड्या वेळात शर्ट वाळायला हवा.

"आता मला रस्ता सांग." तो सरळ म्हणाला.

"मला आपलं बोलणं पूर्ण करायचंय."

"मी माझा सूट घेतला आणि आता तुला घरी सोडतोय. आपलं एवढंच ठरलं होतं."

तिने अचानक त्याच्या ओल्या मनगटावर तिचा मऊ, नाजूक तळहात ठेवला. त्याने तिच्या हाताकडे बघून पुन्हा वर पाहिले. त्याला वाटलं ती घाबरून हात काढून घेईल पण नाही.

"तुम्ही प्रॉब्लेम तुमच्यात आहे हे मान्य केल्यावर मी हसायला नको होतं. सॉरी." ती मवाळपणे म्हणाली.

ओह, तिला वाटतंय की तिने माझ्या स्वाभिमानाला धक्का लावलाय वगैरे, जसा काही माझा स्वाभिमान इतका नाजूक आहे! तिच्याकडे बघता बघता तो विचार करत होता.

"मी तुमच्या टीममध्ये रहावं वाटत असेल तर प्लीज माझ्याशी बोलत जा."

"आय डोन्ट गिव्ह अ शिट इफ यू स्टे!" हां, तिला वाटतंय तिने मला पूर्ण ओळखलंय आणि आता गोड बोलून ती माझी काही डार्क सिक्रेटस उघड करून घेईल तर असं काही नाहीये.

तिची त्याच्या मनगटावरची पकड एक क्षण घट्ट झाली आणि तिने हात सोडून दिला. हाताची घडी घातली. "एस व्ही रोडवरून लेफ्टची पाचवी गल्ली."

मला काय करावं समजत नाहीये. तिला आत्ताच्या आता कारच्या बाहेर काढून माझी उरलीसुरली प्रतिष्ठा टिकवावी असं वाटतंय पण त्याच वेळी माझ्या इगोमुळे ती नोकरी सोडून गेली हे सोमवारी शुभदा आणि नॅन्सीला कसं सांगणार हा पण इश्यू आहे.

"मला   घरी   सोडा!" ती एकेका शब्दावर जोर देत म्हणाली.

"मी OR मध्ये गोड माणूस म्हणून वागू शकत नाही." तो अचानक बोलू लागला. विचार न करताच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत होते. "मी म्युझिक प्ले करून जोक्स पण नाही करू शकत. पीडीऍट्रिक कार्डीऍक सर्जरी कधीही कॉमन नसते. ती इंफन्ट हार्टस् पूर्ण तयारच झालेली नसतात जी आपण पूर्णत्वाला नेतो. हे एखादं म्हाताऱ्या माणसाचं ब्लॉक झालेलं हार्ट, ब्लॉकेज काढून चांगल्या आर्टरीज बसवण्याइतकं साधं नाहीये. ऑपरेट केलेली कमीत कमी तीस टक्के मुलं मोठी होऊनही आयुष्यभर आजारी रहातात. त्यांची काही चूक नसताना जन्मतः त्यांना हे भोग भोगावे लागतात. मला त्यांना जगायचा, पूर्णपणे निरोगी जगायचा चान्स द्यायचाय. आय एम नो गॉड, बट समटाइम्स आय हॅव टू ऍक्ट लाईक वन."

तिने अजूनही चेहरा त्याच्याकडे वळवला नव्हता. तरीही तो बोलत राहिला.

"मी माझ्या कामात खूप फोकस्ड असतो, त्यात काही कमीजास्त झालं तर माझी लोकांवर चिडचिड होते."

"लोकांवर नाही, फक्त माझ्यावर." ती मुद्दा सोडत नव्हती.

"कारण मी तुला त्यांच्यापेक्षा सुपिरीयर समजतो. माझ्या तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत."

तिने फक्त हुं! म्हणत मान हलवली. त्याला तिची पोनिटेल खेचून तिचं तोंड आपल्याकडे वळवण्याची इच्छा होत होती पण त्याने हातांवर काबू ठेवत खिडकीबाहेर दणकून पडणाऱ्या मुसळ धारांकडे नजर टाकली. त्याला त्याच्या कामाच्या काळ्या, गढूळ रिऍलिटीच्या तळाशी जायला आवडत नसे पण तिने आज कुठला पर्यायच ठेवला नव्हता.

"सायरा, कधी एखाद्या मुलाचा जीव तुझ्या हातांवर अवलंबून होता?" त्याचा आवाज बर्फासारखा थंड झाला होता. " तुला आठ तासांच्या सर्जरीनंतर बाहेर वाट बघणाऱ्या एका आईला जाऊन सांगावं लागलंय की आता तिच्या बाळासाठी आपण काहीच करू शकत नाही. कितीही सर्जरी केल्या तरी ते बाळ दोनेक महिन्यांच्या वर जगू शकणार नाही."

"कधी चुकून एखादी नर्व्ह कापली जाऊन कोणाला ऑलमोस्ट पॅरालाईझ केलं आहेस? ऑपरेशन टेबलवर असताना कुठल्या बाळाची धडधडती आयुष्य रेषा सरळ होताना बघितली आहेस?  यू थिंक आय एम अ कोल्ड ऍ*होल! तुला मी तुझ्याबरोबर गोड गोड वागायला हवंय, कौतुक करून मॉडेल एम्प्लॉयीचा स्टार द्यायला हवाय, आय वोन्ट!" त्याने जरा थांबून श्वास घेतला."ग्रो अप सायरा!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle