बदतमीज़ दिल - १६

सायराला शक्य असतं तर तिने चालत्या गाडीतून उडीच मारली असती. थोडं जखमी होणंही परवडेल. पण तरीही ती थरथरत गप्प बसून राहिली. तोही गप्पच होता. "डेड एन्डचं घर" म्हटल्यावर त्याने घरासमोर कार वळवून थांबवली. पावसात उतरून मागचं दार उघडून तिने सॅक काढली आणि पूर्णच भिजू नये म्हणून छातीशी धरली. दार लावल्यावर त्याला लिफ्टबद्दल थँक्स म्हणावं की आत्ताच्या वागण्यासाठी माफी मागावी हे न कळून काही क्षण तिने डोअर हँडल धरूनच ठेवलं. पण शेवटी काहीच न बोलता ती पावसातून घराकडे पळत सुटली. पावसात न भिजणे हे वरवरचं कारण पण मुख्य म्हणजे तिला शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून लांब जायचं होतं. लॅच उघडून तिने दणकून दार बंद केलं. खिडकीच्या अर्धवट सरकवलेल्या पडद्यातून तिला कार झपकन निघून जाताना दिसली. तिच्या छातीत चार पाच ट्रेन एकत्र धडधडत गेल्यासारखं होत होतं.

"दीssद! यू वोण्ट बिलीव्ह धिस!!" आतून नेहा ओरडत आली.

तिने दचकून नेहाकडे पाहिलं. ती हातातला उघडा लॅपटॉप सांभाळत तिच्याजवळ घेऊन आली. मेसेंजर टॅब ओपन होती. मी नसताना ही शर्विलशी बोलतेय, आय सी! त्यावरून तिला आठवलं की तिने दिवसभरात फोन चेक केला नव्हता.

"नेहा!!" ती ओरडलीच.

"ओके, ओके! आय एम गिल्टी. तुझ्या परमिशनशिवाय मी त्याच्याशी बोलले. पण दिवसभर इतके मेसेज आले की शेवटी मला रिप्लाय करावा लागला. गेस व्हॉट? तो परत येतोय! आणि त्याने उद्या तुला भेटण्यासाठी विचारलंय." नेहा नाचतच ओरडली.

भीतीने तिच्या पोटात गोळा आला. "मला सांग, तू त्याला रिप.."

"मी हो सांगितलं! प्लीजच!! अँड गेस व्हॉट? तुम्हाला पार्टीला जायचंय. त्याच्या बहिणीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे म्हणे. नेहाचे सायरासारखेच हिरवट घारे डोळे ते रिसेप्शनऐवजी ऑस्कर वगैरे असल्यासारखे चमकत होते.

ओह गॉड, दिवसभरात मला किती धक्क्यावर धक्के बसणार आहेत. हे अजून काय वाढून ठेवलंय पुढ्यात! माझा विश्वास बसत नाहीये की नेहा त्याला हो सांगून बसलीय. ओके, शर्विल छान माणूस आहे, सेफ आहे, पण मला इतक्यात तरी त्याला भेटायचं नव्हतं, आणि लग्नबिग्न, रिसेप्शन पार्टीत वगैरे तर नाहीच नाही.

ती लॅपटॉप मांडीवर घेऊन बसली. पूर्ण चॅट तिने भराभर वाचून स्क्रोल केलं. चॅट साधं आणि जरा बोरिंगच होतं. हवामान (सगळीकडे पाऊस), त्याची फ्लाईट (शेजारच्या सीटवर उपद्व्यापी लहान मूल आणि त्याची झोपाळू आई) वगैरे वगैरे. नेहाने प्रत्येक वाक्यात दोन चार इमोजी वापरलेत. गॉड! मी त्याच्याजागी असते तर कधीच चॅट करणं बंद केलं असतं. पण शर्विल टिकून आहे!

दुर्दैवाने.

शेवटी त्याने मला रिसेप्शनसाठी इन्व्हाईट केलंय, तोच मला पिकअप करेल वगैरे आणि नेहाने मूर्खासारखं accept केलंय, चार हार्ट आईजबरोबर. मी त्याला प्रचंड डेस्पो मुलगी वाटत असणार. त्याहून वाईट म्हणजे त्याने पुढे लिहिलंय की हे भलंमोठं लग्न नाहीये फक्त जवळचे थोडेसेच नातेवाईक आणि मित्र असणार आहेत. थीम मॉडर्न विथ सम ट्रॅडिशन आहे कारण नवरदेव जर्मन आहे.

तिने नेहाकडे मान वळवली. "त्याच्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे त्याचे आईवडील आणि सगळे नातेवाईक तिथे असतील."

नेहाने खांदे उडवले. "तो म्हणाला फक्त पन्नास साठ लोक असतील, खूप गर्दी नसेल. चांगलं आहे की मग!"

"ते अजून वाईट आहे येडपट! तिथे मी प्रत्येकाच्या रडारवर असेन."

"ओss ते माझ्या डोक्यातच नाही आलं." नेहाचं तोंड पडलं.

तिने लॅपटॉप सोफ्यावर ठेवला आणि समोरची बॉटल उचलून घटाघट पाणी प्यायली. तिला किंचाळत स्वतःचे केस उपटायची इच्छा होत होती. "हे अनडू कसं करू शकतो?"

नेहा तिच्या समोर येऊन गुढघ्यावर बसली आणि तिचे हात हातात घेतले."अनडू कशाला? ही'ज अ नाईस गाय आणि तू स्वतःच सांगितलं होतंस तो किती चार्मिंग आणि क्युट आहे ते. तसेही फर्स्ट डेटला सगळे ऑकवर्डच असतात, तसं समज. मेबी तुला खूप मजा येईल. जाऊन तर बघ!"

तिने नकारार्थी मान हलवत कपाळाला हात लावला.

नेहाने उठून तिच्या शेजारी बसत पाठीवरून हात फिरवला. "तुला ह्यातून बाहेर पडायचंय?"

"हो!"

"अगं पण मी त्याला हो म्हणून आता खूप वेळ झाला. तो बिचारा खूप एक्सायटेड आहे आता असं कॅन्सल करणं चांगलं नाही वाटणार. मी तर तुझ्या आय मेकपची पण प्रॅक्टिस करून ठेवली, हे बघ." ती एका डोळ्याचा निळसर आयशॅडो आणि लायनरचे विंग्स दाखवत म्हणाली. नेहा अगदी रडायची बाकी होती.

तिला किंचित हसू आलं. "पण माझ्याकडे ह्या थीमसारखा छान ड्रेस पण नाहीये." तिने श्वास सोडला.

"डोन्टच वरी! नेहा आहे ना! अगं तो माझ्या फेअरवेल पार्टीसाठी आपण स्काय ब्लू लेहंगा घेतला होता ना, त्याची एक शिवण उसवून तुला होईल तो. मी एकदाच घातलाय." उत्साहाने नेहाचे डोळे चमकले.

"तो तुझा डुप्लिकेट रितू कुमार! तू बारीक आहेस म्हणून चालून जातो, मला नाही सूट होणार."

"दीद, तुला उलट जास्त छान दिसेल. इट नीड्स कर्व्हज लाईक यू. सेक्सी दिसेल!"

"मला काहीतरी सोबर ड्रेस हवाय पण ह्या महिन्यात घेऊ शकत नाही. आत्ताच तर तुझी मिड टर्म फी भरली आपण."

"म्हणूनच हा ट्राय कर." नेहाने भराभर तो लेहंगा आणून ब्लाउजची एक शिवण उसवली.

जेवणं होऊन, सगळी वीकेंड कामं संपवून दमलेली असूनसुद्धा रात्री ती कशीबशी झोपली.

---

रविवार दुपार

ती आरशासमोर बसली होती. नेहा काळजीपूर्वक तिच्या पापणीवर आय लायनरची रेष आखत होती.
"नेहा, मला लेहंगा अजूनही टू मच वाटतोय" ती आकाशी नेटवर चंदेरी बुंदके असलेल्या ओढणीची पिन नीट करत म्हणाली. "चिल! इतकं पण एक्सपोज होत नाहीये. फक्त पाठ थोडी दिसतेय. तिकडे बरेच फॉरेनर्स असतील त्यात तुझा ड्रेस फार उठून नाही दिसणार."

"थोडी? ऑलमोस्ट बॅकलेस आहे हा इतकुसा ब्लाउज. आणि कंबरपण दिसतेय, म्हणून मला साडी वगैरे प्रकार आवडत नाहीत."

"रिलॅक्स, सगळ्या बायका अश्याच कपड्यात असतील तिकडे. यू आर लूकींग सो हॉट अँड चिक!"

हम्म.. तिच्या पोटात कसंतरी होत होतं, अजूनही रिसेप्शन वगैरे अटेंड करायची इच्छा नव्हती. पोटात टेन्शनचा गोळा आला होता. आता नेहाने तिचे कंबरेपर्यंत येणारे सरळ, सुळसुळीत केस विंचरून टोकाला थोडे सॉफ्ट कर्ल्स केले. नेहाची काम करता करता काहीतरी बडबड सुरू होती.

चेहऱ्याचे टेन्स फीचर्स जरा रिलॅक्स करायचा तिने प्रयत्न केला. काल डॉ. पै तिला सोडून गेल्यापासूनच ती टेन्स होती. तिला नीट झोपही लागली नव्हती. सारखे त्यांचे शब्द मनात घोळत होते. एक म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर होतं. त्यांना येणाऱ्या स्ट्रेसची ती कल्पनाही करू शकली नसती. तिने आता फक्त कामावर लक्ष द्यायला हवं. पण त्यांनी स्वतःची चूक पण मान्य करायला हवी. ते नुसतं तिला पंचिंग बॅग म्हणून नाही वापरू शकत.

उद्या सकाळी काय होणार या विचारानेच ती घाबरत होती. कारमधल्या बिहेवियरसाठी माफी मागावी की तरीही ते स्वतःला बदलत नसले तर दुसरी नोकरी शोधावी.. नेहा समजतेय मला रिसेप्शनला जायचं टेन्शन आलंय, म्हणून ती मेकअप खूपच काळजीपूर्वक करतेय. मेकअप खरंच मस्त झालाय. नेहाने इतके दिवस यू ट्यूब व्हिडीओ बघत वेळ घालवल्याचा काहीतरी फायदा झाला.

"डन! आता हे कर्ल्स विंचरले की तू एकदम हॉलिवूड स्टार दिसणार!" नेहा कर्लिंग आयर्न खाली ठेवत म्हणाली.

तिने कसाबसा फक्त अंगठा दाखवला. आता ती तयार होती.

"हम्म, गॉर्जस!" नेहाने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघत शिट्टी वाजवली.

"थँक्स, मी जपून वागेन, तुझी मेहनत खराब नाही करणार!" ती हसत म्हणाली.

"मला शंकाच आहे, तुझ्यासारख्या टॉमबॉयवर हे सगळं किती वेळ टिकेल. पण प्लीज काळजी घे, मधेच एकदा लिपस्टिक वगैरे टचअप कर."

नेहा फोन घेऊन बाहेर गेल्यावर ती आरश्यात बघून स्वतःलाच पेप टॉक देत होती. जे शर्विलबद्दल नव्हे तर पुन:पुन्हा येणारे डॉ. पैंचे विचार डोक्यातून काढून टाकण्याबद्दल होतं. तिने डोळे मिटले. समोर अनिशचे भिजून कपाळावर ओघळलेले केस, दार उघडून आत बसताना अंगाला चिकटलेल्या पांढऱ्या शर्टमधून दिसलेले बायसेप्स, गप्प बसून स्टीअरिंग घट्ट धरलेले मजबूत हात, लांबसडक बोटं आणि तिला ग्रो अप म्हणणाऱ्या आवाजातील संताप. लक्ष देऊन वास घेतला तर नाकात अजूनही त्याचा मस्की सुगंध जाणवत होता. त्याच्या केबिनमध्ये कमी पण कारच्या बंद जागेत तो नशीला गंध दुप्पट पसरला होता. त्याच्या शर्टमध्ये भिनलेल्या पावसासारखाच तो गंध तिच्या मनात भिनून राहिला होता. तोच तिला भानावर आणत  डोअरबेल जोरात वाजली.

"दीssदी? तयार आहेस का?" बाहेरून नेहाच्या ओरडण्याचा आवाज आला."शर्विल आलाय."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle