बदतमीज़ दिल - १७

"हो, आलेच!" ती आरशासमोर उभी राहून हसायचा प्रयत्न करत ओरडली. ती बाहेर येताच शर्विल हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून सोफ्यावरून उठला. तो इतका हँडसम दिसत होता की तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला प्रत्यक्ष पाहून महिने उलटून गेले होते, तेही पबच्या अंधुक उजेडात. तिच्या आठवणीतला तो आत्ताच्या त्याला नक्कीच न्याय देत नव्हता. त्याचे जेल लावून स्टायलीश सेट केलेले दाट काळे केस, कडक कॉटनचा पांढरा कुर्ता आणि चुडीदार, वर त्याने आकाशी, चंदेरी फ्लोरल वर्क असलेलं मोतीया रंगाचं नेहरू जॅकेट घातलं होतं. खिशात आकाशी रुमालाचा त्रिकोण. पायात गुळगुळीत पॉलिश केलेले ब्राऊन लेदर शूज आणि त्याहून त्याचा पॉलिश्ड चेहरा उत्साहाने चमकत होता. तो इतका मस्त डॅपर डूड होऊन आला होता की तुलनेत तिला अगदीच एखाद्या लहान मुलीने गॅदरिंगसाठी तयार झाल्यासारखं वाटलं.

त्याने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघितलं आणि हसून पुढे होत गालापाशी हवेत मुआह केलं. "हे गॉजस! लूकिंग ग्रेट! मी थोडा तुला मॅच करायचा प्रयत्न केला."

ती जरा गोंधळली, मग आठवलं बहुतेक काल नेहाने त्याला तिच्या ड्रेसबद्दल सांगितलं असावं. तिने नेहाकडे कटाक्ष टाकला. नेहा डोळा मारत आता निघा म्हणून हात दाखवत होती. "माझी काळजी करू नको, नेटफ्लिक्स आहे ना! ब्रिजर्टनचा नवा सीझन संपवतेय मी आज. यू बोथ एन्जॉय!"

"उशिरा पर्यंत जागू नकोस." सायरा रागावली.

"फक्त साडेदहापर्यंत, मग झोपेन." नेहाने चष्मा अजून वर केला. "हे, इट वॉज नाईस मीटिंग यू शर्विल दादा!"

"यू टू, नेहा!" तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला. नेहा आपल्या चार्म आणि बडबडीने कुणालाही खिशात टाकू शकते.

"नेहा तुझ्यासारखीच दिसते." बाहेर पडून त्याच्या चमकत्या फॉर्च्युनरकडे तिला नेताना तो म्हणाला.

हम्म.

"गोड आहे ती."

"फसू नकोस बरं, चॅप्टर आहे ती!" ती गालात हसली.

तिच्यासाठी दार उघडून तो उभा राहिला. नंतर गाडी सुरू करताना त्याने उशीर झाल्याबद्दल सांगितलं. रिसेप्शन सहालाच सुरू झालंआणि आता सात वाजले होते.

"माझी फ्लाईट उशिरा आली, प्लस हे स्काय ब्लू जॅकेट शोधण्यात वेळ गेला. पार फिनिक्स मार्केट सिटीला जाऊन सापडलं. इट्स ओके. दे विल अंडरस्टँड"

तो गाडी पार्क करून तिचा हात धरून बँक्वेट हॉलकडे निघाला. थोडा वेळ का होईना पावसाने विश्रांती घेतली होती.

तिला उशीर झालेला अजिबात आवडत नाही, स्पेशली अशा फंक्शनला. नाहीतर सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळतात. मुख्य दरवाजातून ते आत शिरले आणि नेमकं तेच झालं. स्टेजवर नवरा नवरीला लोक शुभेच्छा देत होते आणि खाली दोन्ही बाजूला राउंड टेबल्सवर बसलेले लोक दोघांचं निरीक्षण करत होते. तिचे गाल उष्ण झाले. पटकन उलट फिरून तिथून बाहेर पळून जावसं वाटलं. पण ती आता जाऊ शकत नव्हती. शरमून खालमानेने ती कशीबशी पुढे गेली.

शर्विलला काहीच फरक पडला नव्हता. तो मस्त समोरून येणाऱ्यांशी बोलत, हसत काहींच्या पाठीवर थोपटत चालला होता. त्यामुळे त्यांना पुढे जायला अजूनच वेळ लागत होता. तिला शक्य तेवढं मागेच बसायचं होतं.

"तिथे बसूया का?" मधल्या रांगेतल्या टेबलापाशी जागा दाखवत तिने विचारलं.

"आपले सगळे लोक पहिल्या टेबलापाशी आहेत, जागा ठेवली असेल आपल्याला." तो एकदम चिल होता.

पहिल्या दोन रांगा फक्त आडव्या टेबलांच्या होत्या. दोन्ही बाजूच्या टेबलांच्या वर स्फटिकांची दोन भलीमोठी झुंबरे टांगली होती. त्यातून सगळीकडे सोनेरी प्रकाश पडत होता. अरर.. तिला एकदम स्कॅनरमध्ये ठेवल्याचा फील आला. नेहाला आत्ताच्या आत्ता घरी जाऊन बडवून काढायला हवं, हे कशात अडकवलं मला!

"शर्विल, किती उशीर!" पुढच्या टेबलवरून मागे वळून एक कांजीवरम नेसलेल्या गोड काकू हात उंचावत होत्या. "मला वाटलं तू आज पोहोचतोस तरी की नाही." शर्विलची आई! नक्कीच. तेच नाक, तशीच हेअरलाईन.

ते दोघे पुढे पोहोचेपर्यंत त्याच्या आईची नजर सायरावर पडली आणि त्या छान हसल्या. सायराला इतर वेळी त्यांना भेटायला आवडलं असतं पण इथे, बापरे. तरीही ती पुढे टेबलाजवळ जाताच हसली आणि... अचानक तिच्या पायाखालून जमीन नाहीशी झाली. पुतळाच झाला तिचा. मागे चालणारा शर्विल तिच्यावर धडकला आणि ती खाली पडणार इतक्यात हात धरून त्याने तिला सावरले. तिला त्याचा स्पर्श जाणवलाही नाही, समोर काय बघतेय ते तिला कळतच नव्हतं, तिच्या कल्पनेचा एखादा तुकडा आहे की एखादं भयानक स्वप्न पडलंय..

"डॉ. पै?" ती नकळत कुजबुजली.

तिला बघून डॉ. पै ताडकन उठून उभे राहिले. पूर्ण सहा फूट. तिचं तोंड उघडंच राहिलं. हृदय धडधडून कधीही बंद पडण्याच्या अवस्थेत होतं. ही इज डार्कनेस! त्याचे केस, डोळे, सूट, एक्स्प्रेशन्स सगळंच! त्याचं लक्ष तिच्यावरून शर्विलकडे गेलं.
"आर यू किडींग मी? तू तिला इथे घेऊन आलास? इथे??"

वेssट, व्हॉट? तिने शर्विलकडे बघितलं. हे दोघे  एकमेकांना ओळखतात?

तेवढ्यात हॉलभर बॉलिवूड इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचे सूर पसरले आणि स्टेजवर नवीन कपलसाठी भलामोठा वेडिंग केक आणला गेला.

शर्विल न बोलता तिला रांगेतून बाबा, आई आणि अनिशच्या पलीकडच्या खुर्चीकडे घेऊन गेला. "तू शर्विलच्या मैत्रिणीला ओळखतोस? काकूंनी आश्चर्याने अनिशला विचारले. सगळं खूप फास्ट होतं होतं. "ती माझी कलीग आहे, पाच्छी." सहज सांगून तो पुन्हा सायराकडे वळला.

"माय मॉम अँड डॅड. आणि अनिश, माझा चुलतभाऊ." दुसऱ्या बाजूने शर्विल तिच्या कानाजवळ कुजबुजला.

भाऊ! तो शब्द ट्रकची धडक बसल्यासारखा तिच्या अंगावर आला. ह्या दोघांमध्ये मी सँडविच झालेय. दोन भाऊ! एक, ज्याच्यात मी इंटरेस्टेड असायला हवं आणि दुसरा ज्याला मी डोक्यातून काढून टाकू शकत नाहीये. दिस मेक्स नो सेन्स. तिला पडलेले हजार प्रश्न ती आत्ता विचारू शकत नव्हती कारण त्यांच्या आजूबाजूला रिसेप्शन सुरू होतं.

समोर केक कापून नवपरिणीत जोडपे एकमेकांना भरवत होते. अश्यावेळी प्रश्न विचारणं उद्धटपणाचं वाटलं असतं म्हणून ती गप्प राहिली. जीभ चावून तिने समोर लक्ष दिलं. गुड, केकवर फोकस कर.

पण नाहीच.

तिला स्वतःच्या हातांची थरथर चांगली जाणवत होती. तिच्या दोन्ही बाजूला बसलेले दोघे भाऊ स्थिर समोर बघत होते. त्या दोघांना तिच्यासारखा धक्का बसलेला दिसत नव्हता. एक मिनिट, तिला बघताक्षणी डॉ. पै काय म्हणाले होते?

तू तिला 'इथे' घेऊन आलास? इथे!

म्हणजे ते तिला इथे बघून सरप्राईज झाले होते पण शर्विलबरोबर बघून नाही. व्हॉट द हेल!!

तिला शेजारून डॉ. पैंची नजर तिच्यावर जाणवली. त्याला तिने त्याच्याकडे बघायला हवं होतं. पण तिने अजिबात मान वळवली नाही. ती खुर्चीतच जरा सरकली तर त्याचा गुढघा तिच्या पायाला लागला. तो पाय बाजूला करत नव्हता आणि काय करावं तिला सुचत नव्हतं. त्याच्या पाय लागणाऱ्या ठिकाणी लेहंगा चुरगळत होता पण त्याने काय फरक पडतो. त्याचा स्पर्श होत होता तिथली त्वचा अक्षरशः भाजत होती. तिच्या पायापासून अंगात उष्ण लहरी दौडत होत्या, प्रत्येक श्वास तापला होता आणि ती स्वतःवर कितीही ओरडली तरी तिला पाय तिथून हटवता येत नव्हता.

इतक्यात ती अस्वस्थ दिसतेय बघून शर्विलने टेबलावरचा तिचा हात हातात घेत थोपटला. ती जागची हलणार तोच प्रत्येक टेबलावर ठेवलेला रिसेप्शनची टाइम लाईन असलेला प्लॅन अनिशने उचलून तिच्या हातात दिला. जसं काही तिला त्या बावळट प्लॅनमध्ये इंटरेस्ट असेल. तो घेताना तिच्या बोटाना त्याच्या बोटांचा अस्फुट स्पर्श झाला अन तेवढ्याने तिच्या अंगात वीज लहरत गेली. तिला पाय तर हटवता येत नव्हता पण ती किंचित शर्विलकडे वळून बसली आणि गडबडीत चुकून मोकळे केस खांद्यावरून पुढे घेतले. ओह शिट, शिट, शिट! तिच्या उघड्या पाठीवरची नजर तिला जाणवली. मी का घातला हा ड्रेस! का!! तिने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली.

कालपासून घडणाऱ्या एकामागोमाग एक घटनांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. सगळंच खूप घाईत होत होतं. कालचा कारमधला सगळा सीन आणि त्याचा संताप इतका इंटेन्स होता की त्यातून बाहेर येऊन त्याला फेस करायला तिला दोन दिवस तरी हवे होते. ती सोमवारी काय होणार म्हणून घाबरत होती आणि अचानक आजच तो तिच्या शेजारी होता. मांडीला मांडी लावून. वर त्याचा तो मस्की सुगंध. कलोन! तिला त्या वासाची एकूण एक बाटली जमवून टॉयलेटमध्ये फ्लश करावीशी वाटली.

ती शर्विलकडे चेहरा वळवून प्रत्यक्षात शून्यात बघताना शर्विलचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो फक्त ओठ हलवून सॉरी म्हणाला. ती एक शब्दही बोलली नाही.

स्पष्टीकरणे विचारायला आणि द्यायला रिसेप्शननंतर भरपूर वेळ होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle