बदतमीज़ दिल - १८

केक कापून झाल्यावर संगीत आणि नाचगाणी होण्याआधी वेटर्स ड्रिंक्स आणि फिंगर फूड सर्व्ह करू लागले. अनिश स्वतःला अल्कोहोलमध्ये बुडवून घ्यायच्या विचारात होता जेणेकरून सायरा इथे शर्विलबरोबर असल्याचं तो विसरून जाईल. पण ती शेजारीच शर्विलचं कसंबसं तयार केलेलं एक्स्प्लनेशन ऐकत उभी होती. त्याने ऑलरेडी एक ड्रिंक संपवून दुसऱ्यासाठी वेटरला हात केला. सायरा खूप चिडलीय, ऑब्वीअसली. माझ्या भावाने ही सिच्युएशन अत्यंत वाईट प्रकारे हँडल केलीय आणि मी चुकून पॉसीबल लव्ह ट्रँगलचा एक कोन झालोय. मला तो कोन होण्यात काही इंटरेस्ट नाहीये.

"बघ सिम्पल आहे, मी तेव्हा बाऊन्समध्ये खूप वेळ बसलो होतो आणि तू तुझ्या फ्रेंड्सबरोबर आली होतीस. मला अनिश भेटायला येणार होता पण त्याने ऐनवेळी टांग दिली. मग तुला भेटायचा चान्स मी सोडला नाही." शर्विल आता तिच्यासमोर अगदी शेपूट घालत होता. त्याने काळजी घेतली नाही तर सायराचे डोळे त्याचं डोकं जाळून भोक पाडू शकतात. "ठीक आहे, पण तेव्हा तुला माहिती होतं का मी डॉ. पैंबरोबर काम करते?"

परत डॉ. पै.
बुलशिट!

"अनिश!" त्याने चूक सुधारली. तिने त्याच्याकडे थर्ड डिग्री बर्न्स देणारा कटाक्ष टाकला. शर्विल अस्वस्थ होत जॅकेटची कॉलर सरळ करत होता. "मला त्या रात्रीच पण नंतर कळलं."

"मग नंतरसुद्धा तू मला सांगितलं का नाहीस? आपण किती दिवसांपासून चॅट करतोय." तिने मान हलवली. "मला हे सगळं आता खूपच वीअर्ड वाटतंय!"

आता शर्विलचा सूर विनवणीचा झाला. "मी सांगणारच होतो, पण मधेच खूप कामात बिझी झालो. आज तर सांगूनच टाकणार होतो."

अनिश गालात हसत त्यांच्याकडे बघत होता. खरं म्हणजे त्याला तिथं उभं राहून हा सीन बघायला मजा येत होती. रोहित शेट्टीच्या गाड्या ब्लास्ट होऊन स्लो मो मध्ये उडतात तसंच! शर्विलचा बँड वाजताना बघायला मजा येत होती. त्याने अजून एक घोट घ्यायला ग्लास तोंडाजवळ नेला तेवढ्यात सायराने मोर्चा त्याच्याकडे वळवला. "आणि तुम्हालासुद्धा माहिती होतं. मग मला का नाही सांगितलं?"

"आय डोन्ट नो." त्याने रिकामा हात वर केला. "ह्या भांडणात मी नाहीये. तुला विचारायचं असेल ते तुझ्या बॉयफ्रेंड ला विचार!"

तिने हाताची घडी घातली. "ही इज नॉट माय बॉयफ्रेंड. येट! काल मला घरी सोडताना तरी तुम्ही हे सांगू शकत होतात. तेव्हा भरपूर वेळ होता."

त्याने उत्तर देण्याऐवजी हातातला ग्लास रिकामा केला. घशात उतरणाऱ्या द्रवापेक्षा तिची नजर जास्त जाळत होती.

शर्विलने लगेच त्याच्याकडे पाहिलं. "हे, व्हॉट डू यू मीन, घरी सोडताना?" आता शर्विलला मुद्दा मिळाला.

हाहा. धिस इज रिच!

आता चिडायचा टर्न शर्विलचा होता.

त्याला हसू येत होतं. "भाऊ रिलॅक्स! पाऊस पडत होता आणि तिची गाडी बंद पडली म्हणून मी सोडलं. आता माझा खून करणार असल्यासारखं बघू नको."

"धिस इज अ मेस! तुम्ही काय ते सॉर्टआउट करा, मी चालले." सायराने हवेत हात उडवले आणि शेजारच्या सर्व्हिंग टेबलावरचा एक पायनॅपल ज्यूसचा ग्लास उचलून लांबच्या एका खुर्चीत जाऊन बसली.

ती जरा लांब गेल्याचं पाहून तो शर्विलच्या समोर सरकला. त्याला चुकवायला, पळ काढायला जागाच नव्हती. "इज धिस अ गेम टू यू? नक्की काय विचार करून तिला इथे घेऊन आलास?"

शर्विल खांदे मागे करून त्याच्यासमोर ताठ उभा राहिला. "गेम नाही, प्रयोग! मला बघायचं होतं की तिला इथे माझ्याबरोबर बघून तू किती चिडतोस. बाहेर कुठे तू आम्हाला भेटला नसतास. मी तिच्याशी बोलल्याचं ऐकूनच तेव्हा तू विचित्र वागत होतास. सो, मला स्वतःला बघायचं होतं की मी तिच्याबरोबर असताना तू कसा वागशील? आणि माझी शंका बरोबर ठरली."

त्याने भुवई उंचावली. "असं? जरा माझ्या डोक्यात प्रकाश पाड."

शर्विल स्वतःवर खूष होत हसला. "तुला सायरा आवडते. आम्ही आलो तेव्हा ती इथे आल्यामुळे तू अपसेट नव्हतास. ती 'माझ्या'बरोबर आल्यामुळे अपसेट होतास."

त्याने शर्विलच्या खांद्यावर हात ठेवत त्याला ढकललं. शर्विल जरा अडखळून पुन्हा उभा राहिला.

त्याच्या ह्या रिऍक्शनने दोघेही चकित झाले. लहानपणी, टीनेजमध्ये त्यांनी खूप मारामाऱ्या केल्या होत्या पण मोठेपणी कधी फिजिकल व्हायची वेळ आली नव्हती.

तो पुन्हा पुढे झाला." यू आर अ‍ॅक्टिंग लाईक ऍन इडियट!"

शर्विलही पुढे आला. "मेबी सो. पण मी तुझ्यासारखा मिझरेबल फूल नाहीये. तुला असं एकटं राहायची इतकी सवय झालीय की समोर आनंदी व्हायचा इतका मोठा चान्स असूनसुद्धा तुला दिसत नाहीये."

अचानक शेजारून मोहनआज्जो उठून उभे राहिले. "सगळं ठीक आहे ना मुलांनो?"

"एकदम मस्त!" शर्विल हात वर करत निरागसपणे म्हणाला. "नाउ प्लीज एक्सक्यूज मी, मला माझ्या डेटला शोधू दे." हे त्याच्याकडे बघून.

तिला शोधत जाणाऱ्या पाठमोऱ्या शर्विलकडे बघत त्याने टाय जरा लूज केला. त्याच्या डोक्यात शर्विल लावत असलेल्या रंगीबेरंगी कल्पना रुजण्याआधी उपटून फेकायच्या होत्या. शर्विलला वाटतंय, मी सायराचा विषय निघाला की जेलस होतो. माझ्या मनात तिच्यासाठी फीलिंग्ज आहेत. मला फक्त त्याने माझ्या एम्प्लॉयीबरोबर काही रिलेशनशिप ठेवायला नको आहे. तीच डोकेदुखी टाळायचा माझा प्रयत्न आहे.

धिस इज सो स्टूपीड!

त्याने शेजारून जाणाऱ्या वेटरला थांबवत एक शँपेन फ्लूट उचलून पूर्ण पिऊन ट्रे मध्ये ठेवला आणि दुसरा उचलला. वेटर त्याच्याकडे पहातच राहिला. आज पार्टीत बॉटम्स अप करणारा हा पहिलाच गृहस्थ होता. दुसराही ग्लास संपवून त्याने ट्रे मध्ये ठेवला.

"सर, तुम्हाला अजून काही आणू का?" वेटरने काळजीने त्याच्याकडे बघत विचारले.

त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. कुठे जावं विचार करताना त्याला बाप्पा- पाछीबरोबर गप्पा मारणारी सायरा दिसली. ही त्यांच्याशी कसल्या गप्पा मारतेय? शर्विल जवळ कुठे दिसत नाहीये पण मला चिडवायला तो अचानक कुठूनही सायराच्या बाजूला प्रकट होईल. मला चिडवण्यासाठी तिच्या गालावर किस किंवा कंबरेत हात असले काहीही उद्योग करू शकतो. रिसेप्शन सुरू असतानाही त्याने तिचा हात धरला होता. रिडीक्युलस! मला पीडीए अजिबात आवडत नाही. हे असले टची फीली उद्योग. त्याने मला राग येण्यासाठीच ते केलं असणार, तरीही मी त्याला माफ केलं नाहीये. रादर, मला अजूनच राग आलाय. सायराला हे माहिती आहे का, की ती फक्त त्याच्या खेळातलं एक प्यादं आहे.

वाटत तरी नाही. ती एवढी तयार होऊन आलीय. सिल्की लांब केस आज थोडे वेव्ही करून मोकळे सोडलेत. मेकअपमुळे चेहऱ्याचे सगळे फीचर्स उठून दिसतायत. हॉस्पिटलमध्ये असताना ती तिच्या दिसण्यावर फार मेहनत घेत नाही, खरं तर त्याची गरजही नाहीये. तिचा मेकअप आणि ड्रेस छान आहे, लोक माना वळवून तिच्याकडे बघत आहेत पण मला तिचा स्वच्छ, ताजा तरतरीत चेहरा आवडतो. गोबरे गाल, सिल्की केस, क्यूट स्माईल, तिच्यात एक गर्ल नेक्स्ट डोअर चार्म आहे तो कुणालाही भुरळ पाडू शकतो.

एक क्षण त्याने तिचा एक रेग्युलर मुलगी म्हणून विचार केला. त्याने त्यांच्या वर्किंग रिलेशनशिपकडे दुर्लक्ष केलं आणि तिचं उत्साही असणं, तोंडावर उत्तर देणं, तिचा आत्मविश्वास आणि OT मध्ये काम करतानाची जिद्द आठवली. एकदा तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवली. त्याच्या छातीत आग लागली पण लगेच गिल्टी वाटून त्यावर पाणी फिरलं. सायरा 'कोणीही' बाई नाहीये, ती माझी असिस्टंट आहे आणि मी असं पाहिलेलं तिला नक्कीच आवडणार नाही.

"अनिश!" समोरून पाच्छीने हात हलवत हाक मारली. तो त्यांच्या दिशेने गेला. "ही सायरा मला सांगत होती, तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करता म्हणून. मला माहीतच नव्हतं."

"आम्ही तिला प्रश्न विचारून बेजार केलं." बाप्पा शेजारून हसत म्हणाले."तू बॉस म्हणून कसा आहेस ते ऐकायचं होतं!"

"टेक्निकली मी तिचा बॉस नाहीये." तो कडक शब्दात म्हणाला."मी तिला पगार देत नाही."

मिनिटभर त्याचा वैताग सगळ्यांच्या चांगल्या मूडवर पाणी फिरवणार होता, पण सायराने निभावून नेलं. "ह्याच आठवड्यात आम्ही एक खूप किचकट सर्जरी केली. ही केस घ्यायला भारतातल्या बऱ्याच मोठमोठ्या सर्जन्सनी नकार दिला होता पण डॉ. पैंनी एकहाती ती यशस्वी केली."

बाप्पा- पाच्छी आनंदाने तिचं ऐकत होते. त्याच्या कामाबद्दल तो त्यांच्याशी कधीच बोलला नव्हता.

"त्यात इतकं नाही विशेष नव्हतं." तो जरासा शरमून म्हणाला.

पाच्छीने त्याच्या दंडावर थोपटलं."तू गप्प रहा. हां, सायरा तू सर्जरीमध्ये काय करतेस? मला सर्जिकल असिस्टंट म्हणून कोणी असतात, हेच आज कळतंय."

"कसं कळणार, आपला सगळा वेळ आपण नवऱ्याची बायको नाहीतर घाडग्यांची सून बघत घालवता ना!" बाप्पानी मधेच टोचलं आणि पाच्छीच्या नुसत्या वटारलेल्या डोळ्यांत बघत गप्प झाले.

"ती माझी राईट हँड आहे. सर्जरीची इन्स्ट्रुमेंट तयार ठेवणं, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रुमेंट माझ्या हातात देणं, मग जखम शिवून बंद करणं, वर ड्रेसिंग वगैरे सगळं ती करते. तिच्याशिवाय मी सर्जरी करू शकत नाही." हे सगळं बोलताना तो फक्त पाच्छीकडे बघून बोलत होता पण आजूबाजूला शांतता पसरलेली त्याच्या लक्षात आली. शेवटी त्याने मान वळवून शेजारी सायराकडे बघितलं, ती धक्का बसल्यासारखी मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. पाच्छी त्याच्याकडे बघून गालात हसत होती आणि थँक् गॉड, तोंड बंद ठेऊन बाप्पा हातातल्या ग्लासकडे बघत होते.

त्याने एक श्वास सोडून केसातून हात फिरवला. "सायरा, तुझ्याशी एक मिनिट काही बोलू शकतो का?"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle