बदतमीज़ दिल - १९

तिने उत्तर देण्यापूर्वीच त्याने तिच्या कोपराला धरून एका रिकाम्या टेबलकडे नेले.

"हळू! तुम्ही पळताय आणि मला ह्या हील्समध्ये फास्ट चालता येत नाहीये."

त्याने तिचा हात किती घट्ट धरला होता ते जाणवून त्याने चालायचा वेग कमी केला. टेबलापाशी पोचल्यावर तिला एका जागी बसवून तो समोरच्या खुर्चीत बसला, जेणेकरून समोरासमोर बोलता येईल.

"जस्ट टू बी क्लिअर, मी तुमच्या नातेवाईकांशी फक्त पोलाईटली बोलत होते." तिच्या आवाजातली मृदुता आता निघून गेली हाती.

नक्कीच.

"शर्विलने तुला ह्या लग्नाला बोलावताना काय सांगितलं होतं?" त्याने गंभीरपणे विचारलं.

तिने जरा चुळबुळ केली. "अम्म.. म्हणजे विशेष काही नाही. लहानसं रिसेप्शन आहे. घरचेच लोक असतील, नो प्रेशर वगैरे वगैरे."

"त्याने माझा उल्लेखही केला नाही?"

"नव्हताच केला." ती कडक आवाजात म्हणाली. "पण नक्कीच करायला हवा होता."

हम्म. त्याने मान हलवली. पुढची काही मिनिटं त्रासदायक असतील पण आता हे तिला सांगायलाच हवं होतं. नाहीतर सगळं त्याच्यावर येऊन फुटेल. शर्विलला लोकांच्या भावनांशी खेळणं जमेत असेल पण सोमवारी त्याला सायराला फेस करावं लागणार नाहीये, मला करायचं आहे.

"तुझ्या मनात शर्विलसाठी फीलिंग्ज आहेत?" त्याने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले.

"फीलिंग्ज.. अं.." तिने नजर वळवली पण तिचा वाकडा झालेला चेहरा त्याला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरत होतं पण ते समोर न दाखवण्याइतका तो हुशार होता. "वाटलंच मला आणि तेही ठीक आहे कारण शर्विल तुला इथे फक्त मला जेलस करायला घेऊन आला होता." त्याने तोफगोळा टाकला.

ती खाली टेबलकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात काहीतरी भावनांचा खेळ सुरू होता पण तिला नक्की वाईट वाटलंय की पूर्ण गोष्ट ऐकायची उत्सुकता आहे ते कळत नव्हतं.

तिच्या प्रतिक्रियेसाठी त्याने स्वतःला तयार ठेवलं आणि पुढे बोलत राहिला. "सगळं समजावून सांगायला किचकट आणि तेवढंच मुर्खपणाचं आहे. पण सांगायची गोष्ट ही की शर्विलने स्वतःच असा समज करून घेतलाय की तुम्ही दोघांनी डेट केलेलं मला आवडणार नाही आणि माझ्या मनात तुझ्यासाठी काहीतरी बर्निंग डिझायर वगैरे आहे. म्हणून ही थिअरी टेस्ट करायला त्याने तुला इथे आणलं."

तिच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. "मी ऐकलेली ही सगळ्यात विचित्र गोष्ट आहे."

चला आमचं कुठेतरी एकमत आहे.

"बर्निंग डिझायर? माझ्यासाठी! एह!"  तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला अजिबात अपेक्षित नसलेली गोष्ट तिने केली.

ती खळखळून हसू लागली.

"खरं सांगायचं तर त्याने खोटं बोलून मला इथे यायला भाग पडलं म्हणून मी त्याच्यावर चिडूही शकत नाही. कारण त्याच्या आमंत्रणाला उत्तर 'मी' दिलं नव्हतं."

काय?! आता तो समोर झुकून पुढे ऐकायला उत्सुक होता.

"माझ्या लहान बहिणीने." ती खांदे उडवत म्हणाली. " मला टेक्स्ट करायला खूप बोर होतं म्हणून मी तिला ते काम दिलं आणि ती थोडी वहावत गेली. ह्या लग्नाबद्दल आणि तिने शर्विलच्या आमंत्रणाला हो म्हटल्याचं मला कालच समजलं."

आह! रिलीफ!! "तू जोक करतेयस."

तिने हसता हसता ओठ चावला. "नाही. माझ्या बहिणीला वाटतं मी जरा बाहेर जावं, डेटिंग वगैरे करावं आणि शर्विल माझ्यात इंटरेस्ट दाखवणारा पहिला माणूस होता."

"दॅट कान्ट बी ट्रू!"

तिचं हसू मावळलं. "इट इज! आम्ही सगळे काही दाट केस आणि डार्सीसारखी ब्रूडींग पर्सनॅलिटी असलेले कार्डीऍक सर्जन नसतो."

"डार्सी? तू काय बोलतेयस?" त्याने रोखून बघत विचारले.

"ओ कम ऑन!" तिने हात हलवला."तुमच्या इगोला अजून खतपाणी घालण्याची माझ्यात एनर्जी नाही. तुम्ही डॉक्टर आहात, अट्रॅक्टिव आहात, तुम्ही टिंडरवर वगैरे गेलात तर मॅचेस बघूनबघून तुमचे अंगठे गळून पडतील. एवढ्या ट्रॅफीकला हँडल करण्यासाठी टिंडरला नवा सर्व्हर घ्यावा लागेल."

तो तिच्याकडे पाहून अविश्वासाने हसला. "तू नक्की किती ड्रिंक घेतलीस?" तिला त्याचा जोक बहुतेक आवडला नाही. ती खांदे उडवून जायला निघाली. "थांब." तिचं मनगट धरून त्याने तिला थांबवलं.

परत तेच. स्किन ऑन स्किन. हे संध्याकाळपासून सुरू होतं. तो रिसेप्शन प्लॅन देताना बोटांचा स्पर्श, मग त्याचा गुढघा पायाला टेकणे, त्याने तिला टेबलकडे आणताना धरलेलं कोपर आणि आता हे मनगट! ते इतकं नाजूक आहे की त्याने काळजी घेतली नाही तर त्याने धरलेल्या जागी वळ उठेल.

"यूज्वली आपल्या हातात ग्लव्ह्ज असतात." त्याच्या तोंडातून निघून गेलं. शिट! ऍम आय सो हाय!?

"काय?"

त्याने हातात धरलेल्या तिच्या मनगटाकडे बघितलं. "OT मध्ये तू मला इन्स्ट्रुमेंट हातात देतेस तेव्हा आपण ग्लव्ह्ज घातलेले असतात, म्हणून.."

म्हणून हे इतकं इंटिमेट वाटतंय. त्याने पुढचे शब्द गिळून टाकले आणि तिचा हात सोडला.

"आय थिंक मला घरी जायला हवं. आजची संध्याकाळ म्हणजे टोटल डिझास्टर आहे." ती जाण्यासाठी वळली.

तिचा हात सोडल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याचा आता गोंधळ होत होत होता. तिला जाऊ द्यावं की थांबवावं. ते एकत्र काम करतात, इथे ती त्याच्या भावाबरोबर आलीय आणि आजच्या संध्याकाळचा कुठलाच भाग नॉर्मल नाहीये.

"व्हॉट इफ शर्विल वॉज राईट?" तो अचानक म्हणाला." त्याचा प्रयोग यशस्वी झाला असेल तर?"

ती वळली आणि त्यांची नजर एकमेकांत मिसळली. त्याने विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ तिच्या डोळ्यात हळूहळू झिरपताना त्याला दिसत होता. होली शिट! मी हे काय करून बसलो! हे मी का विचारलं!!

"गॉच्या!!"  तिच्या पाठीमागून शर्विलचा मोठा आवाज आला. परफेक्ट टायमिंग साधत शर्विल पुढे आला आणि त्याने सायराच्या खांद्यावर हात टाकला. तिने अंग चोरले पण ते त्याच्या लक्षात आले नाही. "कमॉन, सगळ्यांना वर दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये बोलावलंय. डिनर सुरू होतोय."

---

ओह गॉड, समोर फाईव्ह कोर्स मील आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात विचित्र संभाषण! याचीच कमी होती. तिची भूक मेली होती आणि पोट म्हणजे टेन्शनचा गोळा झालं होतं. तरीही ती शर्विल आणि सगळ्या फॅमिलीसोबत जेवायला बसली होती. डॉ. पै तिच्या समोर बसले होते. परत ब्रूडींग मि. डार्सी स्टाईल! हॉलमधल्या सगळ्या त्यांच्या नात्यात नसलेल्या होतकरू बायकांच्या नजरा त्याच्यावर होत्या. त्याच्या ग्लासात पाणी ओतणारी वेट्रेस पण त्याच्या केसांकडे बघत पाणी ओततेय. दाट, सिल्की, थोडे विस्कटलेले आणि ग्रिप इट व्हाइल ही किस यू सेन्सलेस केस! पाणी काठोकाठ भरून सांडण्यापूर्वी वेट्रेस जागी होऊन पटकन पुढे सर्व्ह करायला वळली.

जेवणाचं टेबल लांबलचक असलं तरी रुंदीला कमी होतं. समोरचे सहा फुटी पाय त्यात न मावून त्याचे गुढघे मधेच तिला स्पर्श करत होते. आतापर्यंत हे दोनदा झालं आणि दोन्हीवेळा तिच्या पोटात खड्डा पडला. तोंडातून उसासा बाहेर पडू नये म्हणून तिने पुढ्यातल्या नानचा तुकडा तोंडात कोंबला. गुड, आता पोटात गोळ्याऐवजी भलामोठा नान जाऊन बसेल.

हॉलमधल्या फक्त बाकीच्या बायकाच डोळ्यात बदाम आणून त्याच्याकडे बघत नव्हत्या, ती समोरच बसल्यामुळे तिला जास्त चांगला ऍक्सेस होता. ही हँडसम माणसाची कुठलीतरी नवी जात असल्यासारखी तिने डेटा जमवायला सुरुवात केली. तिची निरीक्षणे:

१. त्याचे डोळे वितळत्या चॉकलेटसारखे आहेत की मधासारखे ते ठरवणं कठीण आहे. माणूस कितीही कडू असला तरी डोळे गोडच आहेत.

२. ब्लेझर काढून खुर्चीच्या पाठीला घालणे ठीक पण त्या व्हाईट शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करणे गरजेचे आहे का? जेवताना तरी ते मनगट आणि शिरा पॉर्न न दाखवण्याची आमच्यावर कृपा करावी. TYSM.

३. तो अतिशय वाईट गेस्ट आहे. त्याच्या बाजूच्या लोकांशी तो आतापर्यंत मोजून पाच शब्द बोलला आहे. मला कळतंय कारण माझा एक कान तिकडेच समर्पित आहे. त्याने साधा आवंढा गिळला तरी मला कळेलच.

४. मी कितीही प्रयत्न केला तरी तो माझी नजर टाळतोय. बहुतेक मघाशी बोललेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होत असावा.

त्या गोष्टीचा त्याला पश्चात्ताप व्हावा की नको हे काही तिचं ठरत नव्हतं. ते दार तिच्यासाठी कधी उघडलं जाईल असा तिने या आधी कधी विचारच केला नव्हता.

"सायरा, तू कधीपासून हे काम करते आहेस?" शेजारून तिला शर्विलच्या आईने विचारले. अरे हो, तिच्या आजूबाजूला सगळीकडे पैच पैंचा ढिगारा होता. ह्या काकू एवढ्या प्रेमळ नसत्या तर हे एक वाईट स्वप्न ठरलं असतं. गॉटच्या भाषेत बोलायचं तर त्या सॅम टार्ली होत्या. दयाळू, मदत करणाऱ्या आणि खाण्यापिण्यासाठी नेहमी तयार! आताही त्या तिला समोरची नान ठेवलेली परडी संपवायला मदत करत होत्या.

"बरीच वर्ष झाली. आधी मी हे शिकायचा विचार केला नव्हता."

"अच्छा? मेडिकलला जायचं नव्हतं तुला?"

"मेडिकललाच जायचं होतं पण डॉक्टर व्हायला. एन्ट्रन्ससुद्धा पास झाले पण मग काही कारणांनी पुढे जाता आलं नाही." त्यांच्या चेहऱ्यावर दयेसारखं काही दिसायच्या आत ती पुढे बोलली, "पण मी आता जे काम करते ते मला आवडतं."

"शर्विल मला सांगत होता, तुझ्या लहान बहिणीची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे मेडिकल सोडावं लागलं का?"

"हो, पण मला आवडतं तिची काळजी घ्यायला. काहीच प्रॉब्लेम नाही." ओह नो, आता ह्या मम्मी पप्पांबद्दल विचारणार..

पण नाही, नशिबाने त्यांनी संभाषण दुसऱ्या दिशेला वळवले.

"एकटी कधीपासून सांभाळते आहेस तिला?"

"वीस वर्षांची असल्यापासून."

"बापरे!" त्यांनी चक् चक् करत मान हलवली. "तुला खूप लवकर मोठं व्हावं लागलं."

ती हसली. "हो, पण त्यामुळे मी खूप काही शिकले. मला त्याचं वाईट वाटत नाही." त्यांनी तिच्या हातावर हात ठेवून थोपटलं. अचानक तिचा घसा दाटून आला. कदाचित बऱ्याच वर्षांनी कोणीतरी तिची प्रेमाने चौकशी केली होती.

"तू बहिणीला सांभाळतेस हे मला माहित नव्हतं." त्यांच्या गप्पा भेदत समोरून डॉ. पैंचा आवाज आला.

ती स्तब्ध झाली. ती काकूंकडेच बघत होती. डॉ. पै ऐकत असतील याची तिला कल्पना नव्हती. आजूबाजूच्या कलकलाटात त्यांना तिचा आवाज ऐकू येणं कठीण होतं. दुर्दैवाने, जरा धीट होत तिने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ते तिच्याकडे निरखून पहात होते. नो डाऊट त्यांनी प्रत्येक शब्द ऐकलाय.

तिला परत काही मिनिटं मागे जावंसं वाटलं जेव्हा ते तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. आता ते ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होते त्यावरून त्यांना तिचा सॉफ्ट स्पॉट कळला होता. हे वाईट आहे. ऑलरेडी ते तिला इतकं डॉमिनेट करू शकतात त्यात अजून एक मुद्दा तिनेच ऍड केला होता.

तिच्या उजवीकडे बसलेला शर्विल शेजारच्या माणसाच्या कुठल्याश्या जोकवर खदखदून हसला. तिला आणि डॉ. पैंना हे लग्न एखाद्या थेरपी सेशनसारखं वाटत असलं तरी शर्विल खूपच एन्जॉय करत होता. तिची कौटुंबिक दुःख ऐकणारे अजून श्रोते तिला नको होते.

"आय विश यू हॅड टोल्ड मी." अनिश काळजीच्या सुरात म्हणाला.

ती जराशी खोकली. "तुम्ही माझ्या हॉस्पिटलबाहेरच्या आयुष्याबद्दल कधी विचारलं नाही."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle