बदतमीज़ दिल - २०

त्यानंतर जेवण कितीतरी वेळ सुरूच होतं. ती कशीबशी शांत बसून होती पण वेटरने टेबलावरची शेवटची प्लेट उचलताच ती चटकन उठली. मधेमधे येणाऱ्या लोकांना चुकवत वॉशरूमकडे पळाली. अपेक्षेप्रमाणे तिथे रांगेत एक लहान मुलगी, तिची आई आणि एक आजी होत्याच. ती भिंतीला टेकून तिच्या नंबरची वाट बघत थांबली, म्हणजे एकदाचं त्या स्टॉलमध्ये स्वतःला कितीही वेळ लॉक करून लोकांना टाळता येईल.

नंबर येताच टॉयलेट सीटवर टिश्यू पेपर पसरून ती बसली. फोनवर उबर ऍप उघडलं. अकरा वाजले होते आणि जेमतेम दोन कॅब दिसत होत्या. का ही ही! हे कॅब फेअर आहे की जोक! माझं आठवड्याचं पेट्रोल येईल ह्यात. ती कपाळाला हात लावून बसली. बाहेर आजही मुसळधार पाऊस पडतोय आणि इतक्या रात्री वीसेक किमी चालत जाणं अशक्य आहे.

"हॅलो!! लवकर बाहेर या, इथे दोनच वॉशरूम आहेत" कोणीतरी बाई धाडधाड दार वाजवत ओरडली.

"सॉरीss माझं पोट बिघडलंय!" तिने आतून जोरात नळ सोडून उत्तर दिले.

कितीही कॅब शोधून तिला चांगलं डील मिळालं नाही. हम्म.. म्हणजे इथून निसटता येणार नाही, शर्विलचीच वाट बघावी लागणार तर.

बऱ्याच वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिला वाटलं शर्विल तिला काळजीने शोधत असेल पण तो समोर डान्स फ्लोरवर एका छोट्या मुलीला मूनवॉक करून दाखवत होता, नंतर दोन करवल्यांमध्ये नाचत त्याचा नागिन डान्स सुरू झाला. तेवढ्या वेळात ती स्टेजशेजारी दमून बसलेल्या नवरा नवरीला विश करून आली. अजूनही बाकी लोक नाचत होते. ती त्यांच्याकडे पाठ करून वळली. काही लोक नाचण्यासाठी बनलेले असतात तर काही फक्त टाळ्या वाजवण्यासाठी. ती नक्कीच दुसऱ्या कॅटेगरीत मोडत होती.

ती वळून कुठल्यातरी कोपऱ्यातली जागा शोधत होती की तिला आरामात एकटीला बसता येईल. तेवढ्यात तिला खिडकीतून बाहेर बसलेले डॉ. पै दिसले. हॉलला बाहेर एक अर्धवर्तुळाकार बाल्कनी होती. तिने दारात जाऊन त्याच्याकडे पाहिले. तो एकटाच हातात स्कॉच सांभाळत बसला होता. समोर तुफान पावसाने हवा कुंद झाली होती. अशोकाच्या झाडांचे शेंडे वाऱ्याच्या झोतांबरोबर वाकडेतिकडे हलत होते. गळणाऱ्या पागोळ्यांच्या मुसळधारांचे तुषार त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर उडत होते. त्यानेही तिथल्या गर्दीत त्याचा एकांत शोधला होता. पावसाकडे बघत एक मोठा घोट घेऊन त्याने ग्लास कडेच्या टेबलावर ठेवला आणि खुर्चीत मान मागे टाकून वर काळ्याभोर आकाशाकडे पहात राहिला.

मूर्ख माणूस.

इतक्या गार हवेत भिजत, बर्फ घातलेलं ड्रिंक घेतोय आणि मला न्यूमोनिया होईल सांगत होता! आजारी पडेल. पडू दे!

मला काय!

आणि तरीही ती आत जाऊन खुर्चीवर घातलेला त्याचा ब्लेझर घेऊन बाहेर आली. काचेचं दार सरकवताच सोसाट्याच्या गार वाऱ्याचा झोत थेंबांसह तिच्या अंगावर आला. ती पटकन त्याच्याजवळ पोचली. "गॉड! हा काय वेडेपणा आहे. इथे काय करताय तुम्ही?"

त्याने काही रिऍक्ट न करता फक्त हातातला ग्लास उंचावला.

"हम्म, आय गेट इट. पिऊन मरायचा प्रयत्न आहे. संध्याकाळपासून तुम्ही ड्रिंक्स घेताय, आता वेळ जवळ आली असेल." ती तावातावाने म्हणाली.

तो हसला, "अजून एक ड्रिंक. त्याने काम होईल बहुतेक."

तो नेहमीपेक्षा हळू एकेक शब्द बोलत होता. हम्म चढलीय चांगलीच. तिने समोर जाऊन ब्लेझर त्याच्या मांडीवर ठेवला त्या वाऱ्यापावसातून शक्य तितक्या लवकर पळत आत गेली. आता तिला त्याची दया येत नव्हती, तिने जॅकेट द्यायचे काम केले होते. आता तिला फक्त एक रिकामी खुर्ची बघून, पाय ताणून, फोनवर किंडल उघडून बसायचं होतं. पण पुढे जाताच तिला दिसलं की असा विचार करणारी ती एकटीच नव्हती. अजून एक टीनएज मुलगी तिथे हंगर गेम्स उघडून बसली होती. "मी इथे बसले तर चालेल ना?" तिच्यासमोरची रिकामी खुर्ची ओढत सायराने विचारले. मुलीने पुस्तकातून डोकं न काढता फक्त मान हलवली. वाss, माझ्याच जमातीतली आहे.

काही वेळ ती आरामात वाचत राहिली, कुणी काही बोलायला येत नाही ते बरंच होतं. अचानक तिच्या डोळ्यासमोर दोन किल्ल्या हलल्या. तिने मान वर केली तर समोर डॉ. पै.

"प्लीज ड्राइव्ह मी होम."

तिने नाक वाकडं केलं. "का? तुम्ही गाडी चालवू शकता ना?"

"ती शक्यता चार ड्रिंकपूर्वीच संपली."

"मग? दुसऱ्या कुणाला विचारा. सगळे तुमचेच लोक आहेत."

त्यांनी किल्ल्या तिच्या मांडीवर टाकल्या. "मला कोणी नातेवाईक घरी यायला नकोय आणि शर्विल काही इथून लवकर निघणार नाही. मी आधीच सगळ्यांचा निरोप घेऊन बसलो होतो. मला माहिती आहे, तुलाही इथून लवकर बाहेर पडायचंय. एका दगडात दोन पक्षी. आता चल, मी सगळ्यांना आपण निघतोय म्हणून सांगितलंय."

"उबर करा."

"मला दारापर्यंत सुखरूप सोडणारा माणूस हवाय, ड्रायव्हरला वर नाही नेऊ शकत."

फाईन. माझा फोन तसाही मरत आलाय.

मी कुणाचा निरोप घ्यायची गरज नाही पण तरीही मी बाय म्हणून येणार आहे. आय एम नॉट दॅट जर्क. ती नाचणाऱ्या शर्विलकडे गेली. खालून तिने "मी निघतेय" म्हणून डॉ. पैं कडे बोट दाखवून सांगितल्यावर तो हसत वरूनच ओरडला. "Ok कूल, ड्राइव्ह सेफ." तिने डोळे फिरवले. तिला निघालेली बघून ऍटलीस्ट त्याच्या आईला वाईट वाटलं. "लवकरच भेटू परत " म्हणून त्यांनी तिच्या खांद्यावर थोपटलं. जरी तसे काही चान्सेस नक्कीच नव्हते. डॉ. पै दाराजवळ तिची वाट बघत होते.

पार्किंगमध्ये पोहोचेपर्यंत ती पुढे आणि ते हळूहळू तिच्या मागे चालत होते. टोटली हाय.

कारजवळ येताच तिने मागे पाहिलं तर ते दुसरीकडेच चालले होते. "कुठे जाताय?" ती पळत त्याच्याकडे गेली. "सॉरी, मी कारचा रंग विसरलो." तो नकळत हसत म्हणाला. ती हात ओढत त्याला कारकडे घेऊन निघाली. "एक मिनिट." तो थांबून खाली वाकला. उघड्या पार्किंगमधली एक टाईल फुटून त्यात हिरवं रोप उगवलं होतं. त्यावर आलेलं एक बारीकसं पिवळं फुल त्याने तोडलं. "टोकन ऑफ ग्रॅटीट्यूड." त्याने फुल तिच्यासमोर धरलं. तिने ते घेऊन पर्समध्ये टाकलं. "ओके थँक्स, आता चला."

ओह गॉड, मी कुठून अडकले ह्या सगळ्यात.

तिने गाडी अनलॉक केली. ती सोबर असूनसुद्धा त्याला धरून गाडीत कोंबणं तिला कठीण जात होतं. "व्हाय आर यू सो बिग!" ती पुटपुटली. शेवटी त्याला आत बसवून सीटबेल्ट लावल्यावर ती पलीकडे बसली. सीट शंभर फूट पुढे घेतल्यावर तिचे पाय एकदाचे ऍक्सीलेटरपर्यंत पोचले. स्टीअरिंगवरचा तिचा हात जरा थरथरला. आईच्या आजारपणात त्यांची जुनी सॅन्ट्रो विकायला लागल्यापासून तिने कुठल्या कारला हात लावला नव्हता. पण काही मिनिटातच ती हायवेवर होती. कारच्या gps वर त्याचा पत्ता होता.

पावसातून मागेमागे पडणारा धुवट, चमकता रस्ता वळणे घेत होता. आह, खूप दिवसांनी तिला जरा मोकळं वाटलं.

"सायरा, सायरा, सायरा.. व्हाय डू यू हेट मी?" सीटवर टेकलेलं डोकं तिच्याकडे वळवून तो हळू हळू म्हणाला.

तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याचा निरागस चार्म तिच्यावर पूर्ण वेगाने धडकला. त्याचा चेहरा तिच्याकडे वळला होता. त्याचे डोळे तिला विनवत होते. कशासाठी ते तिला कळत नव्हतं. त्याच्या ओठांचं उलटं दुःखी धनुष्य झालं होतं. समोर काँसोलवर त्याने तळहात उघडा ठेवला होता, जसा काही तो तिने हात धरण्याची वाट बघत होता.

तिने स्टीअरिंग घट्ट पकडलं.
"आय डोन्ट हेट यू डॉ. पै."

त्याने समोर फिरणाऱ्या वायपर्सकडे नजर वळवली आणि कुठेतरी दुखल्यासारखा लांब श्वास घेतला.

"माझं नाव अनिश आहे. तू दर वेळी का.."

"ओके. ओके." ती पटकन त्याला गप्प करायला म्हणाली, " अनिश."

त्याने श्वास सोडला. "परत एकदा."

त्याचं न ऐकता तिने fm लावून आवाज मोठा केला. पुढे बोलणं खुंटायलाच हवं कारण कुठल्याश्या 'रात बाकी' प्रोग्रॅममध्ये अरिजित जोरजोरात 'जो तेरी खातिर तड़पे, पहले से ही,
क्या उसे तड़पाना, ओ जालिमा...' गात होता.

हिरानंदानीमधला त्याचा फ्लॅट एकविसाव्या मजल्यावर होता. गार्डने दाखवलेल्या त्याच्या पार्किंगमध्ये तिने कार पार्क केली. त्याला कसाबसा बाहेर काढून ती लिफ्टमध्ये शिरली. फक्त 2102 लिहिलेल्या वूडन लूकच्या चमकत्या दरवाज्यासमोर त्याला उभं करून तिने हात पुसले "ऑल राईट, पोचलो आपण. सी यू." म्हणून ती मागे सरकत होती. तो दाराला कपाळ टेकवून तसाच उभा राहिला, आत जायचं नाव नाही.

"बरं, मी दार उघडते... हम्म, आता जा आत.." तिने त्याच्या पाठीवर एका बोटाने टोकलं. ती त्याला बाहेर सोडून जाऊ शकत नव्हती. काही इमर्जन्सी झाली तर तिथे कोणीच नव्हतं. फायनली ती त्याला धरून आत शिरली. डॉ. पैंची लिव्हिंग रूम. त्याचा हात तिच्या खांद्यावरून लोंबत होता. तिने हातातली किल्ल्यांची कीचेन सोफ्यावर टाकली. कॉरिडॉरमधून एखाद्या जखमी सैनिकासारखं ती त्याला ओढत नेत होती. त्याचं वजन तिला झेपत नव्हतं. समोर प्रत्येक दारात ती थांबू पहात होती.

"नाही, नाही ही स्टडी आहे, नाही हे बाथरूम आहे." तो फक्त नाही नाही मान हलवत होता.

"तुम्ही बेडरूम नक्की कुठाय ते सांगितलं नाही तर तुम्हाला इथेच झोपावं लागेल. आय स्वेअर, तुम्ही इतके जास्त हाय असल्याचं नाटक करताय." ती वैतागून म्हणाली.

फायनली शेवटच्या दारासमोर तो थांबला. तिने दरवाजा ढकलला. त्याची बेडरूम त्याच्या केबिनसारखीच पसरलेली असेल असं तिला वाटलं होतं पण सरप्रायजिंगली बेडरूम चांगली डेकोरेट केलेली आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी आवरलेली होती. किंग साईज बेडवर हॉटेल स्टाईल पांढऱ्या शीट्स होत्या. पायापाशी एक गुबगुबीत ग्रे कम्फर्टर टक इन केलेला होता. एका भिंतीवर तीन मोठे ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम केलेले नकाशे लावले होते. कोपऱ्यात पांढऱ्या चौकोनी सिरॅमिकच्या कुंडीत एक हिरवंगार झीझी प्लांट होतं. नेहमी पाणी घालत असल्यासारखं. इतकी वॉर्म, कोझी बेडरूम बघून तिच्याच आत काहीतरी व्हायला लागलं.

सायरा, कट ले!

"आय थिंक आता सगळं ठीक आहे, तुम्ही झोपा. मी निघते."

तिच्या खांद्यावरचा हात हळूहळू काढून तो जरा लांब सरकला. तिच्याकडे तोंड करून त्याने तिच्या नजरेला नजर मिळवली. "थांब. तू पूर्ण संध्याकाळ माझ्यापासून पळते आहेस. जस्ट स्टे फॉर अ मिनिट."

त्याच्या बेडरूममध्ये ते दोघे एकमेकांपासून काही पावलांवर उभे होते. एकमेकांकडे बघत.

तिला तिच्या प्रत्येक श्वासाची जाणीव होत होती.

"मला निघायलाच हवं."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle