बदतमीज़ दिल - २१

"नको. प्लीज थांब. आय प्रॉमिस, मी काही करणार नाही." तो भुवया जवळ आणून तिच्यावर फोकस करत म्हणाला.

ती मोठ्याने हसली. "तुम्ही काय सांगताय ते तुम्हालाच कळत नाहीये. यू आर टोटली ड्रंक!"

त्याला सकाळी यातलं काहीच आठवणार नाही. आताही ती कोण आहे हे कळतंय की नाही देव जाणे.

सुस्कारा सोडून तो बेडकडे वळला आणि गुबगुबीत मॅट्रेसच्या कडेला धप्पकन बसला. गुढघ्यांवर कोपरं टेकून त्याने डोकं दोन्ही हातात गच्च धरून ठेवलं. "मला माहीत आहे तू... तुम्ही सगळेच, माझ्याबद्दल काय विचार करता. मी एक अतिशय वाईट, भावनाशून्य माणूस आहे. जो OR मध्ये बारीकशी चूक झाली तरी चिडतो, सगळ्यांना फैलावर घेतो, वगैरे. मेबी ते खरं असेल. आय एम नॉट अ गुड मॅन." त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. खिडकीच्या पडद्यामधून येणाऱ्या चंद्रप्रकाशाच्या लहानश्या तुकड्यात त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे चढउतार स्पष्ट दिसत होते. "आय हॅड अ वाईफ. हे तुला माहिती होतं का?"

त्याच्या पटापट विषय बदलण्यामुळे तिची धडधड वाढली. रात्री थांबण्याबद्दल बोलून आता तो त्याच्या लग्नाबद्दल सांगत होता. तिला पटकन वळून तिथून पळ काढायचा होता पण तिचे पाय तिथेच चिकटून राहिले. शुद्धीत असताना जे कधीच उघड करणार नाही अश्या गोष्टी तो आत्ता सांगत होता.

"डिवोर्स?"

त्याने मान हलवून नजर वळवली. "मी MBBS संपताच लग्न केलं होतं. माझ्या आईला खूप वर्ष ब्रेस्ट कॅन्सर होता. सर्जरी, किमो सगळं नीट झालं. शी वॉज अ सर्वायवर. पण मी शेवटच्या वर्षाला असताना कॅन्सर परत आला. तिला जाण्यापूर्वी मला सेटल झालेलं बघायचं होतं. तन्वी आमच्या फॅमिली फ्रेंडची मुलगी, आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. सगळे असं धरूनच चालले होते की आमचं लग्न होणार. तसंच झालं. लग्न होताच तीन महिन्यात अम्मा गेली. माझं MS सुरू होतं, बरोबर रेसिडेन्सी सुरू होती. खूप काम होतं. आम्ही हॉस्पिटलजवळ फ्लॅट घेऊन राहात होतो तरीही मला खूपदा घरी यायला जमत नसे. तन्वीला डॉक्टरची बायको म्हणवून घ्यायला आवडत होतं पण त्यातली रिऍलिटी झेपत नव्हती. मी आठवड्याला 75 ते 80 तास काम करत होतो. त्यात तिच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. आय रिअली फेल्ड ऍज अ हजबंड."

ती गप्प राहून त्याला पुढे बोलू देत होती.

त्याने केसांतून हात फिरवला. "तिला जसं कोडकौतुकाचं फॅमिली लाईफ हवं होतं तसं मी देऊ शकलो नाही. तिने वर्षभर वाट बघितली आणि एक दिवस बॅग भरून निघून गेली. ती गेली हेही मला दीडेक दिवसाने कळलं. मी तिला फोनवर विचारलं 'तुझे थोडे कपडे कुणाला देऊन टाकले की काय, मला कपाटात रिकामी जागा दिसतेय.' त्यावर तिचं कडवट हसणं अजून लक्षात आहे."

"आणि तुमचे वडील?"

"'पपा न्यूरोसर्जन आहेत, मी लहान असल्यापासून ते इतके बिझी होते की माझ्यासाठी ते कधीच जवळ नव्हते. अम्मा गायनॅक होती. मला लहानपणापासून पाच्छीनेच सांभाळलंय. यू नो, शर्विलची आई. अम्मा गेल्यानंतर पपाना UK मध्ये एक चांगली संधी आली म्हणून ते तिकडे गेले आणि तिकडेच राहिले. आय एम नॉट क्लोज टू हिम. बघ, कालच्या लग्नालासुद्धा ते आले नाहीत. नीना त्यांची सख्खी भाची असूनसुद्धा."

ओह, त्याला बायको असेल असं तिच्या कधी डोक्यातही आलं नव्हतं. आजच्या आधी तो तिच्यासाठी फक्त एक सर्जन होता, त्याला काही पर्सनल लाईफ असू शकेल, त्यात तो इतका एकाकी असेल हे कधी वाटलंच नाही. ह्या क्षणी, ह्या खोलीत त्याच्या भूतकाळाबद्दल ऐकताना तिला अचानक जाणवलं की त्याच्या त्या कडक इस्त्रीच्या सूटखाली एक धडधडणारं हृदय आहे आणि त्याला हॉस्पिटलबाहेर काही इच्छा, आकांक्षा असू शकतात.

लोकांप्रमाणेच डिवोर्ससाठी ती त्याला दोष देईल अश्या अपेक्षेने तो तिच्याकडे बघत होता. ते जाणवून तिने एक पाऊल पुढे टाकलं. "तुमचं लग्न तुटलं म्हणून तुम्ही एक वाईट माणूस ठरत नाही. तुमची रेसिडेन्सी सुरू होती, आई गेल्याची पोकळी मनात होती, कदाचित तुमच्या दोघांसाठीही तो काळ खूप अवघड असेल."

"असेल कदाचित. पण तिने कधीच लग्न केलंय आणि ती आता प्रेग्नन्ट आहे." जमिनीकडे बघत त्याचे दुखावलेले शब्द बाहेर आले. "तिची फॅमिली वाढतेय आणि मी डिवोर्सनंतर साधी एक रिलेशनशिपसुद्धा करू शकलो नाही."

"कारण तुमची रिलेशनशिप हॉस्पिटलबरोबर आहे."

त्याने पापण्या उचलून तिच्याकडे पाहिले. "हम्म, मेबी इट्स नॉट इनफ एनीमोर." तो पुटपुटला आणि बसल्या जागीच थाडकन बेडवर आडवा झाला.

तो जागा होऊन उठेल म्हणून ती वाट बघत थांबली, पण नाही. तिने नाकासमोर बोट धरून पाहिलं, तो मेल्यासारखा झोपला होता.

ओह गॉड...

किचनमध्ये जाऊन तिने फ्रिजमधली एक पाण्याची बाटली आणून बेडशेजारी ठेवली. "तुम्ही माझ्याबरोबर हे जे काही वागलाय त्यामुळे मला तुमचा अतीशय राग येतोय. मी ही डेट चांगली एन्जॉय केली असती. एव्हाना मी शर्विलबरोबर नाचत असते. मान्य आहे, मला नाचायला अजिबात आवडत नाही आणि हो, मी शर्विलमध्ये फार इंटरेस्टेड नव्हते. तरीही! हू नोज, लग्नात बरीच नाती जुळतात." त्याच्या शूजच्या लेस सोडता सोडता त्याला ऐकू जाणार नाही म्हणून ती बडबडत होती. एकेका पायातून शूज काढून तिने खाली टाकले आणि त्याचे पाय उचलून बेडवर ठेवले. बास, खूप झालं. आता हा ओकला तर मी साफ करणार नाहीये.

"तुम्ही वाईट नाही आहात फक्त जरा जास्तच काम करता, म्हणूनच तुमची एक्स सोडून गेली असेल. तिला खरंच निग्लेक्टेड वाटलं असणार. शुभदा म्हणत होती आताही तुम्ही बऱ्याचश्या रात्री हॉस्पिटलमध्येच झोपता."

तिने एकदा त्याच्याकडे आणि शेजारी ठेवलेल्या पाण्याकडे नजर टाकली. डन, निघावं आता. इथून कॅब सहज मिळेल आणि अंतरही मॅनेजेबल आहे. उबरसाठी तिने पर्समधून फोन बाहेर काढला. शिट!! फोन डेड झालाय. डे.. ड!! मी का ते किंडल उघडून बसले, त्यानेच बॅटरी खाल्ली असणार. नोssss नो!! तिला किंचाळावंसं वाटलं.

चलाखी दाखवत तिने ब्लेझरच्या खिशातून त्याचा फोन बाहेर काढला. एंटर पासकोड! Obv! आता काय करू.. काळजीने नेहाचा जीव खालीवर होत असेल. त्याच्या घरात लँडलाईन दिसत नाहीये. आत्ता दीड वाजलाय, ह्या वेळी इथे कुणाच्या घरी जाऊन पण मदत मागू शकत नाही. कोण कसा माणूस भेटेल काय सांगावं.. तिने बेडच्या पलीकडे जाऊन शेजारी प्लग केलेला चार्जर बघितला. हुंह, आयफोन! माझ्या सॅमसंगच्या काय कामाचा.. हताश होत ती तशीच फोन हातात धरून बेडला टेकून खाली बसली. अजून तीन चार तास, जरा पहाट होताच तो उठण्यापूर्वी मी पळ काढेन.. पाठीला बेडची कडा टोचल्यावर तिने उठून त्याची एक उशी टेकायला घेतली. उशीतही त्याचा तो मस्की सुगंध भिनलेला होता. ती त्या गंधापासून लांब राहायच्या प्रयत्नात होती पण काय उपयोग! ती स्वतःच पूर्णपणे त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये होती. त्याची बेडरूम, त्याच्या श्वासांची लय, त्याचा गंध. ती विचारांनी जरा थरथरली.

खिडकीतून चंद्र किरण आत झिरपत होते. त्या मंद उजेडात तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं, त्याचा श्वास एका लयीत शांत सुरू होता. तिला लागोपाठ दोन जांभया आल्या. पापण्या खूप जड झाल्या होत्या. बहुतेक काकूंनी आग्रहाने खायला लावलेली शेवटची दोन वाट्या बासुंदी अंगावर आली होती. तिने डोळे ताणून उघडे ठेवायचा प्रयत्न केला पण उपयोग नाही. स्वतःला झोपू नको, झोपू नको सांगतानाच तिच्या जडावलेल्या पापण्या बंद झाल्या...

आणि ती चहूबाजूनी भणाणता वारा आणि उसळणारा समुद्र पसरलेल्या कुठल्यातरी भल्यामोठ्या दगडी किल्ल्यावरच्या महालात जागी झाली. खालच्या किनाऱ्यावरच्या स्पीकर्समधून हिमेश तक ता ना ना ना, तंदूरी नाईट्स, तंदूरी नाईट्स, तंदूरी नाईट्स रेकत होता. गाण्याच्या तालावर तिच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांमधून ड्रॅगन्स म्हणजे लालभडक ड्रोगॉन आणि हिरवागार ऱ्हेगार उडता उडता नाचत ज्वाळांच्या जिभा लपलपत होते. ठिणग्या जवळ आल्यावर ती घाबरून स्वतःला महालाच्या कानाकोपऱ्यात लपवत होती. कुठल्याही क्षणी तिची तंदूरी होणार होती.

इतक्यात एक दाट केस आणि मधाळ डोळ्यांचा, 'पांढरा शर्ट आणि ब्लॅक ट्रावझर्स '?! घातलेला सुंदर राजपुत्र दार उघडून आत आला आणि खिडकीमागे लपून त्याने नाईट किंगच्या भाल्याने ऱ्हेगारला बरोब्बर टिपला. ऱ्हेगार समुद्रात कोसळताना बघून त्याच्या मागोमाग ड्रोगॉन नाहीसा झाला. तो परत येऊन हल्ला करण्याआधी राजपुत्राने तिला बाहेर नेण्याऐवजी उचलून एका मंचकावर झोपवले. ती त्याला सांगत होती, तिला झोपायचं नाहीये, तिला निघायचंय, घरी तिची बहीण वाट बघतेय, तरीही त्याने तिच्या अंगावर उबदार पांघरूण घातले आणि चक्क तिच्याकडे पाठ फिरवून बाहेर निघाला!

"हेय! तू काहीतरी विसरतोयस..." त्याने वळून पाहिलं आणि तिने ओठांचा चंबू करून मुआह, मुआह स्मूची आवाज काढून दाखवले. हेलो! हे स्वप्न ऍटलीस्ट PG 13 आहे. मला माझा किस हवाय!! पण तो राजपुत्र फक्त गालातल्या गालात हसला आणि बाहेर चालू पडला.

ह्यां! स्वप्नातसुद्धा असला तत्त्ववादी, खडूस राजकुमार!! काय नशीब आहे...

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle